राष्ट्रीय छात्रसेना : (नॅशनल कॅडेट कोअर) भारतातील शालेय, महाविद्यालयीन, विद्यापिठीय विद्यार्थ्यांसाठी सैनिकी-प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने १९४८ सालापासून सुरू केलेली योजना. नेतृत्व, चारित्र्य, बंधुभाव, खिलाडू वृत्ती, सेवावृत्ती इ. गुणविशेषांचे युवकवर्गाला शिक्षण देणे हे राष्ट्रीय छात्रसेनेचे उद्दिष्ट आहे.

सैनिकी सेवेत प्रवेश करण्यास विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करणे, राष्ट्रीय आपत्तीकालात प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध अशा युवकवर्गाचे साहाय्य मिळवणे, असे आनुषंगिक हेतू या योजनेमागे आहेत. छात्रसेनेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सैनिकी सेवेत प्रवेश करण्याची सक्ती नाही. १९८६ मध्ये भारतात सु. १० हजार शैक्षणिक संस्थांत छात्रसेनेची केंद्रे होती व त्यांत सु. ११ लाखांवर विद्यार्थीसंख्या होती.

लेफ्टनंट जनरल या दर्जाचा अधिकारी राष्ट्रीय छात्रसेनेचा प्रमुख असतो. देशात छात्रसेनेची एकूण १६ संचालनालये असून त्यांच्या अखत्यारीत देशातील सर्व घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश मोडतात. ब्रिगेडियर अथवा तत्सम दर्जाचा अधिकारी या संचालनालयाचा प्रमुख असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ विभाग, शालेय विद्यार्थ्यांचा कनिष्ठ विभाग व विद्यार्थिनींचा विभाग असे छात्रसेनेचे तीन विभाग आहेत. विद्यार्थिनींच्या विभागातही ज्येष्ठ व कनिष्ठ असे विभाग आहेत. १९८६ मध्ये ज्येष्ठ विभागातील मंजूर छात्रसंख्या ४.२ लक्ष होती. तीत भूसेना, नौसेना व वायूसेना यांसाठी अनुक्रमे ३ लक्ष ३३ हजार ८००, १२ हजार ६०० व ११ हजार ६०० अशी अधिकृत छात्रसंख्या होती. विद्यार्थिनींची संख्या ६२ हजार होती. कनिष्ठ विभागाची अधिकृत छात्रसंख्या ७ लक्ष होती. भूसेना : ५ लाख ३१ हजार ९०० नौसेना : ४९ हजार १०० वायुसेना : ५२ हजार आणि विद्यार्थिनी ६७ हजार.

सैनिकी प्रशिक्षणाबरोबरच छात्रांना गिर्यारोहण, जलपर्यटन, ग्लायडिंग इ. प्रकारचे साहसी कामांचे प्रशिक्षणही दिले जाते. कॅनडा देशाबरोबर छात्रांच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रमही कार्यवाहीत आहे. विद्यार्थ्यांना सिंगापूर, ग्रेट ब्रिटनमधील कॅम्पस्‌ व बांगलादेशातील विजयदिनाचा सोहळा यांत भाग घेण्याची संधीही मिळते. तसेच त्यांना सागरी सफरींचाही लाभ मिळतो.

राष्ट्रीय एकात्मतेचा एक नवा कार्यक्रम १९८३ पासून सुरू करण्यात आला. त्यानुसार एखाद्या ग्रामीण प्रकल्पावर दुसऱ्या प्रांतातील छात्र स्थानिक छात्रांबरोबर काम करतात व त्यांच्या घरी राहतात. रक्तदान, वृक्षारोपण, गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन, प्रौढ शिक्षण इ. प्रकारच्या सामाजिक कार्यातही छात्र भाग घेतात. राष्ट्रीय छात्रसेना ही योजना केंद्रीय संरक्षण खात्याच्या अखत्यारित मोडते.

आपटे, मु. दि.

.