हवाई युद्धाच्या पवित्र्यातील लढाऊ विमाने

हवाई युद्ध : (एअर वॉरफेअर ). विमाने, हेलिकॉप्टर्स व तत्सदृश वायुयाने यांच्या युद्धाकरिता होणाऱ्या आकाशातील लष्करी हालचाली. हवाई युद्ध म्हणजे युद्धाकरिता केलेला विमानांचा उपयोग, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

 

हवाई युद्ध ही पूर्णतः विसाव्या शतकातील उद्भूती असून लष्करी हालचालींतील ती एक प्रमुख व महत्त्वपूर्ण शाखा आहे.

 

विमानांचा सुरुवातीचा उपयोग : विमानांचा उपयोग सुरुवातीला टेहळणी व संकेत यांकरिताच करण्यात आला. पुढे त्यांची वेगमर्यादा व उड्डाणक्षमता जशी वाढली, तसा त्यांचा उपयोग युद्धात आयुधे व सैनिकांची ने-आण करण्याकरिता होऊ लागला. हवाई जहाजांचा व झेपेलिन्सचा उपयोग पहिल्या महायुद्धात फारसा झाला नाही तथापि दुसऱ्या महायुद्धात या गोष्टींची प्रगती इतकी जलद झाली की, स्वतंत्रपणे हवाई युद्ध फार मोठ्या प्रमाणात चालू झाले.

 

हवाई युद्धनीती : सर्व आयुधांचे मुख्य तत्त्व व हवाई युद्धनीतीच्या योजना म्हणजे विवक्षित युद्धाच्या सेनाधिकाऱ्याच्या योजनेला पाठिंबा देणे, शत्रूला थोपवणे, पिछाडीहून हल्ला करणे, शत्रूची कुमक व रसद युद्ध-स्थानावर पोहोचू न देणे इ. होत. पहिल्या महायुद्धात हवाई दलाचे काम मुख्यतः संकेत व तोफखान्याला पाठिंबा देणे एवढेच मर्यादित होते. हे काम यशस्वी होऊ लागले, तोच त्याच्यावर तडजोड म्हणून जर्मनीने शत्रू पक्षाची विमाने आपण व्यापलेल्या मुलखावर येण्याअगोदरच त्यांना अडवून धरणारी आपली विमाने (इंटरसेप्ट्स) पुढे पाठविण्यास सुरुवात केली. १९१६ च्या सुरुवातीसच लढाऊ विमानांच्या आपापसांतील धुमश्चक्रीच्या लढाईला (डॉग फाइट्स) महत्त्व प्राप्त झाले. १९१७ च्या मेपर्यंत अशा लढायांतून ब्रिटिश लेफ्टनंट बॉलने पन्नासावर विमानांचा एकट्याने निःपात केला. युद्धाच्या शेवटी शेवटी हा शूर वैमानिक एका लढाईत मारला गेला.

 

जर्मनीने झेपेलिन्सच्या साहाय्याने इंग्लंडच्या अनेक लष्करी स्थळांवर बाँबवर्षाव करून लष्करी साहित्याचे व इमारतींचे बरेच नुकसान केले. त्यात प्राणहानीही झाली. रॉबिनसन, मॅके व हंट या त्रयीने सप्टेंबर २–८ च्या दरम्यान टेंपेस्टनामक विमानांच्या मदतीने त्यांचा पिच्छा पुरवून व काही मोठ्या झेपेलिन्सना लढाईतून पार नाहीसे करून टाकण्यात खूपच मदत केली.

 

पहिल्या महायुद्धात लढाऊ विमानांचे मुख्य कार्य म्हणजे शत्रूच्या मुलखाची टेहळणी करणाऱ्या व महत्त्वाच्या ठाण्यांची छायाचित्रे घेणाऱ्या विमानांस व बाँबर्सना पाठिंबा देणे, हे होते.

 

पहिल्या युद्धाच्या अखेरच्या कालखंडात हवाई द्वंद्व लढणारा विजयी वैमानिक मेजर विल्यम बार्कर हा त्याच्या फ्लँडर्सच्या १९१५ च्या यशस्वी हल्ल्यामुळे प्रसिद्धीस आला होता. त्याच्या वैमानिकी हल्ल्याची दहशत जर्मन वैमानिकांनी घेतली होती. त्यामुळे त्याच्या विमान दलास तोंड देण्याचे जर्मन वैमानिकांनी नाकारले. २७ ऑक्टोबर १९१८ च्या एका हल्ल्यात त्याचे विमान जवळजवळ नष्ट होण्याच्या स्थितीत असतानाही त्याने कौशल्याने ते स्वस्थळी परत आणले. त्यानंतर काही महिन्यांतच पहिले महायुद्ध थांबले.

 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने हवाई हल्ल्यांत पुढाकार घेतला. मे १९४० पासून इंग्लंडमधील महत्त्वाच्या लष्करी ठाण्यांवर व लंडनसारख्या मोठ्या शहरांवर बाँबहल्ले सुरू केले. सामान्य जनतेला भयभीत करणे व शत्रूची कमकुवत स्थाने हेरून शेवटी इंग्लंडवर स्वारी करणे, हा हेतू या हल्ल्यांत होता.

 

बाँबर्सच्या बरोबर भरपूर लढाऊ विमाने पाठवावयाची व शत्रूच्या विमानांना अडवून त्यांचा निःपात करून बाँबर्सना आपले कार्य करण्याची संधी द्यावयाची, ही पहिल्या महायुद्धातील युद्धनीती सुधारलेल्या आवृत्तीत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमलात आली पण इंग्लंडचे हवाई सामर्थ्य व वैमानिकांचे कौशल्य जसजसे वाढत गेले, तसतसे जर्मनीचे हे प्रयोग अयशस्वी होऊ लागले. याला मुख्य कारण म्हणजे स्पिटफायरसारख्या लढाऊ विमानांची मिचेल नावाच्या अभिकल्पकाने रचना केली. स्पिटफायरच्या वेगामुळे व आयुधांच्या वरचढपणामुळे ती यशस्वी ठरली. जर्मनांच्या अयशस्वी बाँबहल्ल्यांपासून धडा घेऊन एअर मार्शल बेनेटने मार्गदर्शक (पाथफाइंडर) विमानांचे पथक तयार केले. महत्त्वाची ठाणी अचूकपणे स्फोटक मशालींनी (फ्लेअर्स) निर्देशित करावयाची व नंतर बाँबर्सनी आपले कार्य लढाऊ विमानांच्या संरक्षणाखाली निर्वेधपणे करावयाचे, असे धोरण अवलंबिले. पुढे मित्र राष्ट्रांनी विमानाच्या पथकांची संख्या इतकी वाढवत नेली की, जर्मन कारखान्यांचा व युद्धसामग्रीचा नाश झाला व विस्कळीत झालेले जर्मन राष्ट्र शरण गेले.


 

हवाई युद्धास सांघिक व पद्धतशीर स्वरूप येण्यास रडारचा शोध कारणीभूत ठरला. यामुळे हवाई युद्धात खऱ्या अर्थाने क्रांतीला प्रारंभ झाला. हा शोध इंग्लंडच्या सर रॉबर्ट विल्सन याने लावला व त्याच्या अविश्रांत मेहनतीने रडार स्टेशनचे जाळे इंग्लंडभर पसरले. शत्रूच्या विमानांची पुढेपुढे इतकी अचूक माहिती मिळायची की, इंग्लंडची लढाऊ विमाने त्यांचा कौशल्यपूर्ण मुकाबला करायची. या धुमश्चक्रीत न्यूझीलंडच्या स्क्वॉड्रन लीडर डीअरने आपल्या स्पिटफायर विमान पथकांच्या साहाय्याने उत्तम कामगिरी बजावली. सात वेळा डीअरचे विमान शत्रूच्या हल्ल्यांमुळे कोसळले असतानासुद्धा त्यातून डीअरने ब्रिटनची ही अमर लढाई यशस्वी करून D.F.C. व Bar ही वीरचिन्हे मिळविली. एकंदरीत या वेळी जर्मन हवाई दलाच्या (लुफ्त्वाफ) प्रचंड हल्ल्यांस ज्या ज्या मित्र राष्ट्रांच्या वैमानिकांनी संख्याबल कमी असतानाही तोंड दिले व अनेकांनी त्या प्रयत्नात आपली प्राणाहुती दिली, त्यांच्याबद्दल इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान म्हणतात, ‘मानवी संघर्षाच्या इतिहासात इतके अधिक लोक, इतक्या प्रमाणात, इतक्या थोड्या जणांशी उपकृत झालेले नाहीत.

 

मित्र राष्ट्रांच्या, विशेषतः इंग्लंडच्या, विमानतळावर लुफ्त्वाफने २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर १९४० च्या दरम्यान पस्तीस बाँबर्सनी हल्ले चढवले. इंग्लंडच्या लढाऊ वैमानिकांशी त्यांचा जो संग्राम झाला, त्यात जर्मन वैमानिकांना हार पतकरावी लागली. वैयक्तिक कौशल्यास व शौर्यास त्या वेळी पहिल्या महायुद्धाप्रमाणेच वाव मिळाला. स्पिटफायर व हरिकेन या विमानांनी निडरपणाने हे हल्ले एकामागून एक परतवून लावले. २७ सप्टेंबरपर्यंत लुफ्त्वाफची कंबर मोडली. त्यांची १,७३३ विमाने नष्ट झाली.

 

दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी चढाईचे धोरण अवलंबिले आणि सुरुवातीस प्रिन्स बिस्मार्क नावाच्या सुप्रसिद्ध युद्धनौकेकडे लक्ष वेधले. या बोटीने दुसऱ्या दोन बोटींच्या साहाय्याने मित्र राष्ट्रांच्या २२ नौका बुडविल्या होत्या. निरीक्षण करणाऱ्या एका ब्रिटिश विमानाने बिस्मार्कला व दुसऱ्या दोन युद्धनौकांना नॉर्वेजियन किनाऱ्याजवळ बघितले व त्यांचे फोटो घेतले आणि ब्रिटिश नौदलास खबर दिली गेली. त्यांच्या अनेक युद्धनौका लढाईच्या तयारीने जर्मन युद्धनौकांच्या रोखाने यावयास लागल्या. या लढाईत इंग्रजांच्या किनारपट्टीवरील विमानांनी प्रामुख्याने भाग घेतला व बिस्मार्क या प्रचंड युद्धनौकेला हतबल केले. २३ मे १९४१ पासून ते २६ मेपर्यंत ही सागरी व हवाई लढाई झाली. त्यात शेवटी बिस्मार्क बुडाली. इंग्रजांचे एच्. एम्. एस्. हूड नावाचे जहाजसुद्धा बुडाले. याच सुमारास जर्मनीने आपले डावपेच बदलून रात्री हल्ले करण्यास सुरुवात केली. हे हल्ले अचानक होत होते. त्यांना (अचानक हल्ल्यांना) ब्लिट्झ म्हणत. त्या वेळी रडारचा वापर पूर्णावस्थेस पोहोचलेला नसल्याने त्या हल्ल्यांचा सुगावा लागत नसे. संरक्षण करणाऱ्या विमानांचे कार्य अधिक कठिण झाले, तरी आवाजाच्या अंदाजाने त्यांना शत्रूची विमाने कोणत्या दिशेने येत आहेत हे कळायचे. ब्लिट्झचा जानेवारी १९४३ अखेरपर्यंत जोर राहिला. मित्र राष्ट्रांचे लढाऊ वैमानिक अधिकाधिक अनुभवी झाले. रडारमध्ये सुधारणा झाल्यामुळे शत्रूच्या विमानांची इंग्लंडला पूर्वसूचना मिळू लागली. त्यानुसार डावपेच आखणे सुलभ झाले.

 

व्ही-१ व व्ही-२ अग्निबाण (रॉकेट्स) : यानंतर जर्मनीने व्यापलेल्या फ्रान्समधून ‘व्ही-१’ व ‘व्ही-२’ नावाच्या रॉकेट्सनी बाँबवर्षाव करण्यास सुरुवात केली परंतु त्यांचाही मुकाबला करणे शक्य झाले व फार नुकसान होण्याच्या आतच जर्मनीला शरण जावे लागले. जपानी बाँबर्सनी ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात अमेरिकेची १९ जहाजे व १७४ विमाने नष्ट झाली आणि ३,५८१ माणसे मृत्यू पावली. १,१०२ खलाशांसह चार प्रचंड युद्धनौका बुडविण्यात आल्या. यामुळे तटस्थ अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. १९ ऑगस्ट १९४२ रोजी दीप (ऊळशिशि) बंदरावरील हल्ल्यांपासून जर्मनांना त्यांच्या जागरूक हेरांच्या माहितीमुळे पुढील कारवाई करणे सुलभ झाले. जर्मन हवाई दलाने मित्र राष्ट्रांच्या हवाई दलाचा (इंग्रज, कॅनेडियन व फ्रेंच विमानांचा) धुव्वा उडविला. त्यात ४,००० सैनिक व १०० विमाने निरुपयोगी झाल्यावर जर्मन सैन्य स्वस्थळी परतले.

 

दुसऱ्या महायुद्धात माल्टा बेट भूमध्य समुद्राची गुरुकिल्ली समजले जात होते. लुफ्त्वाफने या बेटाला पादाक्रांत करण्याची शिकस्त केली व या प्रयत्नात त्यांनी ३,२१५ हवाई हल्ल्यांत १४,००० टन बाँब टाकले, १,४६८ नागरिक ठार केले, २४,००० इमारतींना नामशेष केले व स्वतः १,१२१ विमाने गमावून बसले. जून १९४० मध्ये जेव्हा पहिला हल्ला झाला, तेव्हा माल्टाच्या संरक्षणाकरिता फक्त ३ लढाऊ विमाने होती. शत्रूचे नुकसान १ : ५ प्रमाणात झाले. जानेवारी १९४१ मध्ये एच्. एम्. एस्. इल्यूस्ट्रिअस विमानवाहू नौका (जहाज) आली. तिने व तिच्यातील विमानांनी माल्टाचे व इतर व्यापारी जहाजांचे पुष्कळ संरक्षण केले. ‘माल्टा विजीगीषु राहू शकते’, हे या चिमुकल्या बेटाचे ब्रीदवाक्य झाले. ऑक्टोबर १९४२ पर्यंत हे हल्ले चालले (११ ऑक्टोबरला माल्टास शत्रूच्या २५० विमान हल्ल्यांना तोंड द्यावे लागले ). २३ ऑक्टोबरला मध्य-पूर्वेत अल् अमीन येथील संग्रामात जर्मनीने शिकस्त खाल्ल्यावर माल्टाचा वेढा उठविला गेला.

 

मित्र राष्ट्रांची हवाई दले सक्षम व बलवान असल्यामुळे ती दुसरे महायुद्ध जिंकू शकली. लढाईच्या उत्तरार्धात मित्र राष्ट्रांच्या वैमानिकांनी इंग्लंडमधून जर्मनीवर सतत आघात केला. मार्गदर्शक विमाने बाँब टाकण्याच्या स्थानांवर बाँबर्सना अचूकपणे नेत व बाँबर्स लढाऊ विमानांच्या संरक्षणाखाली शत्रूचे रेल्वे यार्ड, दारूगोळ्याचे मुख्य साठे, पेट्रोल साठे, शस्त्रागारे इत्यादींचा धुव्वा उडवीत. लांबपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता असल्यामुळे ही विमाने शत्रूचे नुकसान करून स्वस्थानी परत जात. आघाडीवर रशियन वैमानिक तितक्याच जोमात शत्रूच्या कुमकेवर व सामानांच्या लॉऱ्यांवर आघात करीत. या वेळी दोन्ही आघाड्यांवर अनेक वैमानिक आपल्या कौशल्याची व धैर्याची शिकस्त करून कधीकधी आपल्या प्राणांचे मोल देऊन मित्र राष्ट्रांना यश मिळवून देत. या सगळ्यात प्रसिद्ध ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चेशायर हा वैमानिक होता. चेशायर सुरुवाती-पासून बाँबर कमांडमध्ये होता. अचूक नेमबाजीमध्ये तो तरबेज होता. शत्रूच्या विमान विध्वंसक तोफांच्या सरबत्तीतून बचाव करीत तो त्यांची धोक्याची ठिकाणे शोधून काढून त्यांना नेस्तनाबूत करीत असे. त्याच्या अप्रतिम शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. युद्धसमाप्तीनंतर त्याने युद्धात पंगू झालेल्या सैनिकांकरिता व कुष्ठरोग्यांकरिता रुग्णालये काढली. भारतातही डेहराडून येथे असे एक रुग्णालय आहे.

 

४ जून १९४४ रोजी मित्र राष्ट्रांनी जर्मनव्याप्त फ्रान्सवर प्रचंड हल्ला केला. या सुमुहूर्ताची (‘ऊङ्खवरू) तयारी वर्षभर चालू होती. नौदल व हवाई दलाचे पूर्ण सहकार्य भूसैन्याला पाहिजे होते. विमानांनी शत्रूची वाहतूक – वाहन, रस्ते, पूल इ. – यंत्रणा प्रथम अगदी खिळखिळी करून टाकली. सैनिक नेणाऱ्या बोटींचे शत्रूच्या तोफखान्यापासून पूर्णपणे संरक्षण करणारी विमानांची मोठी पथके त्यांच्याबरोबर होती. हल्ल्याच्या तीव्रतेने फ्रान्समध्ये मित्र राष्ट्रांच्या सैन्यांचा पाय रोवला गेला. जर्मनव्याप्त फ्रान्सवर मित्र राष्ट्रांनी २४ डिसेंबर १९४३ रोजी जनरल आइझनहौअर याच्या नेतृत्वाखाली हल्ल्याची मोहीम आखली. त्याचा बेत सेन नदीच्या उपसागरी किनाऱ्यावर (नॉर्मंडी) उतरून त्या मुलखातील विमानतळ घेऊन पुढे नँट्सच्या दक्षिणेकडील बंदरे हस्तगत करून अखेरीस पॅरिस मुक्त करावयाचे, असा होता. जर्मन फील्ड मार्शल कार्ल रुन्टश्टेटने मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्याचा अंदाज घेतला तथापि मित्र राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांमुळे जर्मन चिलखती दले किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. प्रचंड वायुबलामुळे मित्र राष्ट्रांचा पाय किनाऱ्यावर रोवला गेला. परिणामतः नॉर्मंडी आणि ब्रिटनी परगण्यांवर मित्र राष्ट्रांचा संपूर्ण कबजा बसला. मित्र राष्ट्रांनी जर्मन शहरांवर पूर्वी केलेल्या बाँबहल्ल्यांचा फारसा उपयोग झाला नाही. वायुसेनेचा प्रमुख सेनाधिपती आर्थर टेडर याच्या सल्ल्यानुसार १९४३ च्या डिसेंबर महिन्यात जोरदार हवाई हल्ला करण्यात आला. त्यात जर्मन रेल्वे, कोळशाच्या खाणी व कृत्रिम पेट्रोल साठे यांवर बाँबवर्षाव करण्यात आला. परिणामतः जानेवारी १९४४ मध्ये रोज ज्या २१,००० वाघिणी कोळसा वाहण्याकरिता उपलब्ध होत्या, त्यांची संख्या घटून १२,००० झाली आणि त्यांतील ३-४ हजारच लांब पल्ल्याच्या वाघिणी वापरण्यायोग्य राहिल्या. अखेर फेब्रुवारी १९४५ मध्ये कोळसा वाहणे बंदच झाले आणि फ्रान्सवरील या आक्रमणानंतर अनेक क्षेपणतळ मित्र राष्ट्रांच्या हातात आले.


 

जर्मन सैन्याची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होत असताना जर्मन वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्रांचा शोध लावला. हिटरलने १२-१३ जून १९४४ रोजी इंग्लंडवर पहिल्यांदाच ‘व्ही-१’ या रॉकेटचा मारा केला. त्याचा विशेष रोख शत्रूचे मनोधैर्य खच्ची करण्याकडे होता. हे अस्त्र आवाजा-शिवाय किंवा प्रत्यक्ष न दिसता अनपेक्षितपणे पोहोचत असल्यामुळे त्याचे संभाव्य परिणाम त्याचा पूर्ण विकास झाल्यावर अधिकच वाढले. ‘व्ही-१ङ्ख पेक्षा ‘व्ही-२ङ्ख हे रॉकेट पुष्कळ परिणामकारक होते. त्याचे एकूण वजन १५ टन असून त्यात १ टन स्फोटक द्रव्ये होती व वेग ताशी ५,६३२ किमी., तर पल्ला सु. ३२० किमी. होता. या दोन्ही अस्त्रांमुळे सु. १०,००० ब्रिटिश नागरिक मृत्युमुखी पडले व २५,००० जखमी झाले पण रडारच्या मदतीने आणि तोफखान्याच्या साहाय्याने ब्रिटिशांनी त्या अस्त्रांचा नाश केला. मित्र राष्ट्रांची ५,००० विमाने व ४४ स्क्वॉड्रन ही कॉर्सिका बेटावरील १४ विमानतळांवर विखुरलेली होती. मित्र राष्ट्रांच्या वायुसेनेने १२,५०० टन बाँबचा वर्षाव करून शत्रूचा संभाव्य प्रतिकार खिळखिळा केला. २८ ऑगस्ट १९४४ रोजी तूलाँव व मॉर्से ही बंदरे मित्र राष्ट्रांच्या सेनेने व्यापली. ३१ डिसेंबर १९४४ रोजी मित्र राष्ट्रांनी जर्मनांची चढाई मोडून काढली.

 

जपानच्या युद्धखोर कारवायांना पायबंद घालण्यासाठी ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी यांवर अणुबाँब टाकले. तेव्हा जर्मनी-जपान हे देश शरण येऊन दुसरे महायुद्ध समाप्त झाले. यानंतर काही अपवादात्मक युद्धप्रसंग सोडता हवाई युद्ध उद्भवले नाही तथापि पाकिस्तानबरोबरच्या १९६५, १९७१ व १९९९ या तीन युद्धांत आपल्या विमान दलाने हवाई युद्धातील प्रावीण्य सिद्ध केले आहे. तसेच जेट विमानांचा वापर सर्रासपणे कोरियन युद्ध (१९५०–५३), व्हिएटनाम युद्ध (१९५४–७५), अरब-इझ्राएल युद्धे (१९६७ व १९७३), रशियाची अफगणिस्तानातील घुसखोरी (१९७९–८९), कुवेत युद्ध वगैरे मर्यादित युद्धांत करण्यात आला आहे.

 

पहा : महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले हवाई दल.

टिपणीस, य. रा.