युद्ध व युद्धप्रक्रिया : सामान्यपणे दोन किंवा अधिक राजकीय गटांतील किंवा देशांतील सशस्त्र संघर्ष म्हणजे युद्ध होय तथापि प्रत्यक्ष व्यवहारात विविध लाक्षणिक अर्थांनी युद्ध ही संज्ञा वापरली जाते. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. वाग्युद्ध किंवा शाब्दिक युद्ध असाही वाक्प्रयोग रूढ आहे. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्धसंज्ञेच्या स्पर्धा या लाक्षणिक अर्थावर भर दिल्याने युद्ध हे मानवी प्रगतीची एक अट आहे, समाजाची ती एक शाश्वत स्वरूपाची गरज आहे, यांसारखे विचार काही विचारवंतांनी मांडलेले आहेत.

मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. त्यामुळे युद्ध या संज्ञेची अगदी काटेकोर आणि समाधानकारक व्याख्या करणे अवघड आहे. युद्धशास्त्राचा आधुनिक मीमांसक ⇨ कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स (१७८०–१८३१) याने ऑन वॉर (इं. शी. १८३३) या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात युद्धाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘प्रतिस्पर्ध्याला आपली इच्छा मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी बळाचा वापर करून केलेली कृती. बळ हे अर्थातच शारीरिक किंवा प्राकृतिक असते व ते युद्धाचे साधन होय. शत्रूवर आपली आकांक्षा वा इच्छा लादणे, हे त्याचे साध्य होय. युद्धाचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शत्रूला निःशस्त्र करावे लागते आणि अशा प्रकारे त्यास निःशस्त्र करणे हे सैनिकी किंवा लष्करी अशा कृतीचे उचित प्रयोजन ठरते’. तथापि क्लाउझेव्हिट्स याने युद्ध ही आंतरराष्ट्रीय राजकीय देवाणघेवाणीची एक अखंड प्रक्रिया मानलेली असून, या प्रक्रियेत इतरही साधनांचा (बहुधा राजकीय वाटाघाटी, आर्थिक उपाय इ.) अंतर्भाव होतो. मानवी संस्कृतीच्या संघटन आणि विघटन या प्रक्रियांत युद्ध हा प्रमुख कारक घटक असून त्याच्या विधायक व विध्वंसक बाजूंसकट मानवी जगावर पुनःपुन्हा कोसळणारी ही एक आपत्ती आहे, असेही काही समाजशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सामान्यपणे देश किंवा राष्ट्रेच युद्धास प्रवृत्त होतात आणि युद्धप्रक्रिया ही मोठ्या खर्चाची बाब असते त्यामुळे युद्धासंबंधीचा अभ्यास हा राजकीय, आर्थिक व सैनिकी दृष्टींनी करण्यात येऊ लागला. असा अभ्यास साधारणपणे इ. स. पंधराव्या शतकानंतर यूरोपात राजकीय अर्थनीती म्हणून ओळखला जाऊ लागला. सैनिकी संघर्षास प्रवृत्त झालेल्या देशांची उद्दिष्टे आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी आवश्यक असणारी सामाजिक, आर्थिक व राजकीय साधनसामग्री इत्यादींचा विचार राजकीय अर्थनीतीमध्ये होऊ लागला.

युद्ध आणि युद्धप्रक्रिया यांच्या आधुनिक अभ्यासात पुढील गोष्टी समाविष्ट करण्यात येतात : (१) युद्धविषयक वेगवेगळ्या उपपत्ती (२) युद्धविषयक नियम, कायदे आणि संकेत (३) युद्धाचे अर्थशास्त्र (४) लष्करी किंवा सैनिकी प्रक्रियेचे स्वरूप.यातच सैनिकी व्यूहतंत्र (स्ट्रॅटिजी) व रणनीती (टॅक्टिक्स) यांचा अंतर्भाव होतो (५) सैनिकी रसदपुरवठा (६) सैनिकी अभियांत्रिकी (७) आधुनिक सैनिकी संघटनांचे स्वरूप आणि कार्य. युद्धविषयक अभ्यासाच्या या सर्वच विषयांचा ऐतिहासिक आढावाही घ्यावा लागतो.

विश्वकोशात जगातील आणि भारतातील महत्त्वाच्या युद्धांवर स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., अणुयुद्ध, असईची लढाई, एल्‌ ॲलामेनची लढाई, जटलंडची लढाई. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या युद्धतंत्रांवर स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., गनिमी युद्धतंत्र, खंदक युद्धतंत्र, मरुभूमि युद्धतंत्र इत्यादी. आधुनिक सैनिकी किंवा संरक्षण अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या कमांडो, छत्रीधारी सैन्य, यादवी युद्ध, पहिले व दुसरे महायुद्ध, रणनीति, व्यूहतंत्र, शस्त्रसंभार, सांग्रामिकी यांसारख्या विषयांवरही यथास्थळ व स्वतंत्र नोंदी आहेत. यांखेरीज युद्धगुन्हे व खटले, युद्धनिषिद्ध, युद्धकैदी त्याचप्रमाणे भूसेना, नौसेना, वायुसेना अशाही विषयांवर नोंदी आहेत. युद्ध व युद्धप्रक्रिया यांच्या आर्थिक बाजूचे विवेचन ‘अर्थव्यवस्था, युद्धकालीन’ तसेच ‘युद्धजन्य धोका विमा’ यांसारख्या स्वतंत्र नोंदींतून केलेले आहे. युद्ध आणि युद्धप्रक्रिया याविषयी जिज्ञासू वाचकाला अधिक माहिती विश्वकोशातील वर दिलेल्या इतर नोंदींतून मिळू शकेल.

युद्धाची संकल्पना : संरक्षणव्यवस्था किंवा युद्धसंस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. आधुनिक सामाजिक विज्ञानात समाजमान्य अशा नियमांनुसार किंवा संकेतानुसार सुरू झालेल्या आणि चालवलेल्या सशस्त्र संघर्षालाच युद्ध अशी संज्ञा देतात. रूढी किंवा प्रथा अथवा कायदा यांनी मान्य केलेली एक संस्था म्हणून ते युद्धाकडे पाहतात. युद्धशास्त्रज्ञ ही संज्ञा दोन गटांतील सशस्त्र संघर्षाला उद्देशून वापरतात. प्रबळ अशा देशांनी आदिम अप्रगत अशा लोकांशी केलेले सशस्त्र झगडे हे लष्करी मोहिमा म्हणून निर्दिष्ट करण्यात येतात तर प्रबळ राष्ट्रांचे लहान देशांबरोबरचे लढे हे लष्करी हस्तक्षेप किंवा धडा शिकविण्यासाठी केलेली चढाई किंवा बदला या नावांनी ओळखले जातात. देशांतर्गत उठावाला यादवी युद्ध वा बंड अशी नावे देण्यात येतात. तथापि युद्धासंबंधी या वेगवेगळ्या भाषिक प्रयोगांची वर्णने अगदी काटेकोर अर्थाने सर्वमान्य ठरत नाहीत. कारण ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची आहे. या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.

देशादेशांतील संघर्ष हे राजकीय, आर्थिक दबाव, प्रचारयंत्रणा, घातपात किंवा हस्तक्षेपाचे इतर प्रकार, किंबहुना लष्करी बळाच्या उपयोगाचा धाक इत्यादींमार्फत चालू ठेवता येतात. तसेच त्याकरिता अल्पप्रमाणात व अल्पकालीन असा बळाचा उपयोग करण्यात येतो. समाजशास्त्रज्ञांनी युद्धसंकल्पनेचा विचार करताना शांतता आणि शांततेची स्थिती या संकल्पनांपासून युद्ध आणि युद्धाची स्थिती या संकल्पना काटेकोरपणे अलग करण्यावर भर दिलेला आहे. युद्ध या संकल्पनेला कायद्याचीही अशीच एक गुंतागुतीची बाजू आहे तथापि प्रत्येक देशाने आणि राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्रसंघ यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय संकेतांनी (१८९९–१९०७) युद्धाची कायदेशीर बाजू वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहे त्यामुळे युद्धाची कायदेशीरता किंवा बेकायदेशीरपणा ठरवणे हेही गुंतागुंतीचे होऊन बसते.


जिनीव्हा संकेत १९४९ व त्याबाबतचा राजशिष्टाचार मसुदा (१९७७) यांत शस्त्रास्त्रयुक्त संघर्षाचे परिपूर्ण वर्णन केलेले आहे. त्याचे थोडक्यात स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : युद्ध हा दःसाहसी उपाय आहे, ते एकदा सुरू केले की त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य ठरते. युद्ध करण्यास राज्ये नाखूष असावीत, असे वाटते तथापि कोणत्या तरी अपरिहार्य वाटणाऱ्या राजकीय फलनिष्पत्तीसाठी नाईलाज म्हणून ती युद्धास उद्युक्त होतात. युद्धयमान देशांतील सर्वांना युद्धाची कारणे समजली आहेत, असे गृहीत धरले जाते. ती तशी प्रत्यक्षात लोकांना कळली नाहीत, तरी त्यांना युद्धास उद्युक्त करणे व त्यांच्यामार्फत युद्ध चालू ठेवणे हे सोपे असते हे संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांवरून दिसून येते. संयुक्त राष्ट्रांपुढे शस्त्रास्त्रयुक्त संघर्षांची प्रकरणे येतात. त्यावरून युद्ध सुरू करणाऱ्यांची कोणती उद्दिष्टे असतात व ती उद्दिष्टे साध्य करण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, हे समजते. युद्ध चालू असता त्याच्या तथाकथित उद्दिष्टांत बदल होत असतो. युद्धाची जाहीर केलेली व छुपी उद्दिष्टे (उदा., नवीन शस्त्रास्त्रांची चाचणी करणे, शस्त्रास्त्रविक्री वाढवणे, राजकीय नेते व नोकरशाही यांचे स्तोम माजविणे इ.) यांत तफावत असते. युद्धाची प्रधान उद्दिष्टे काहीही असली, तरी त्यांत पुढील कारणांवरून बदल होतात : (१) युद्धखर्चात अंदाजाबाहेर वाढ होणे, (२) शस्त्रास्त्रांची किंवा योद्ध्यांची कमतरता असणे, (३) युद्धाच्या संभाव्य परिणामाने प्रभावित झालेल्या त्रयस्थ राज्यांच्या युद्धाबद्दलच्या प्रतिक्रिया [उदा., सुएझ कालवा युद्ध (१९५६) कोरिया युद्ध (१९५०–५३) इंडोनेशिया स्वातंत्र्य युद्ध (१९४७–४८)]. जो पक्ष अयशस्वी होत जातो, तो आपल्या उद्दिष्टांत बदल करत जातो किंवा युद्ध थांबवण्यास उत्सुक असतो. अशा परिस्थितीत, तथाकथित जाहीर उद्दिष्टांचा फेरविचार सुचविणाऱ्या व्यक्तीवर ती शत्रुधार्जिणी असल्याचा आरोप केला जातो. अनेकदा महाबलाढ्य सत्ता प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे वरील प्रकारच्या छोट्या देशांच्या सशस्त्र संघर्षात भाग घेतात किंवा हस्तक्षेप करतात.

युद्धाचा आरंभ औपचारिक घोषणा करून किंवा विशिष्ट मुदतीची अट असलेला, निर्वाणीचा इशारा देऊन अथवा प्रत्यक्ष लढ्यास प्रारंभ करून होतो आणि त्याचा शेवट शस्त्रसंधी किंवा तह करून वा लढाई सशर्त थांबवूनही करण्यात येतो. युद्ध हा जगातील सर्वच देशांच्या दृष्टीने मोठ्या काळजीचा विषय ठरला आहे. दळणवळणाच्या आणि वाहतुकीच्या साधनांमुळे जगातील सर्व देश एकमेकांच्या अगदी निकट आलेले आहेत त्यामुळे जगाच्या कोणत्याही एका भागात सुरू झालेल्या वा होणाऱ्या युद्धाचा परिणाम सर्वच देशांवर घडून येण्याची शक्यता असते. ज्ञानविज्ञाने व तंत्रविद्या यांच्या वेगवान प्रगतीमुळे देशादेशांतील राजकीय व सैनिकी समतोल स्थिर ठेवणे किंवा राखणे अवघड झाले आहे. अत्यंत विध्वंसक शक्तीची शस्त्रास्त्रे आणि प्रचंड वेगाने त्यांचा वापर करण्याच्या तांत्रिक सुविधा यांमुळे युद्धापासून संरक्षण करणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस जागतिक युद्धस्थितीचे भान सर्वसामान्य लोकांत वाढत असल्यामुळे युद्धाची शक्यता आणि त्यापासून संभवणारी अगणित प्राणहानी यांबद्दल सर्वसामान्य माणसांना चिंता वाटत आहे. त्यामुळे आधुनिक काळातील युद्धाचा अभ्यास हा समाज आणि समाजाच्या सर्व संस्था आणि जागतिक समाजांचे परस्परसंबंध यांच्या दृष्टीने सर्वांगीण व सर्वंकष अशा विचाराचा विषय बनला आहे. दूर पल्ल्यांच्या शस्त्रास्त्रांनी व वाहतुकीच्या वेगवान साधनांनी रणभूमी व बिनरणभूमी असा भेद राखून अलीकडेच युद्ध न चालता युद्धयमान राष्ट्रांचे संपूर्ण प्रदेशच हे वारंवार रणभूमी बनू शकतात. याला समग्र (टोटल) युद्ध अशी नवी संज्ञा रूढ झाली आहे.

उद्‌गम व कारणे : युद्धसंस्थेच्या उद्‌गमासंबंधी काही दृष्टिकोन मांडण्यात येतात : मार्क्सवादी विचारप्रणालीनुसार राज्यसंस्थेच्या उदयाबरोबरच युद्धसंस्था निर्माण होते. संपत्तीचे किंवा मालमत्तेचे खाजगी उत्पादन व मालकी सुरू होताच शोषक व शोषित असे वर्ग समाजात निर्माण होतात. शोषक वर्ग युद्धाला न्यायाचे अधिष्ठान देतो. यातूनच पुढे वसाहतवाद व साम्राज्यवाद उदयास येतात आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणून क्रांतियुद्धे किंवा मुक्तियुद्धे निर्माण होतात. दुसऱ्या एका दृष्टिकोनानुसार संस्कृतीकरणाची किंवा नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली की, कृषिवलांचे शोषण वाढत जाते. म्हणजे नागरी सत्ता प्रबल होत जाते व तिच्यामार्फत कृषिवलांचे शोषण मोठ्या प्रमाणात होऊ लागते. त्यातून युद्धसंस्थेचा जन्म होतो. या दृष्टीने युद्धसंस्था ही संस्कृतीचे अपत्य होय, असे म्हटले जाते. प्राचीन काळातील ग्रीक व मेसोपोटेमियन नगरराज्यांतील सैनिकी वर्गाचे पोषण कृषिउत्पादनाच्या वाढाव्याद्वारे केले जाई. दुसऱ्या नगरराज्याची शेतजमीन व शेतकरी ताब्यात घेण्यासाठी नगरराज्यांचे एकमेकांत सशस्त्र संघर्ष होत. युद्धसंस्थेचा उद्‌गम सत्‌ आणि असत्‌ यांच्या संघर्षात आहे, असा अध्यात्मवादी दृष्टिकोनही मांडला जातो.

तथापि युद्धसंस्थेच्या निर्मितीची संपूर्ण समाधानकारक अशी उपपत्ती आढळत नाही. आधुनिक क्रमविकासवादी विचारसरणीत जीवमात्रांचा अस्तित्वासाठी चालणारा झगडा, असे एक तत्त्व आहे. युद्धाचा मूलभूत प्रकार आणि युद्धसंस्थेच्या उद्‌गमाची उपपत्ती म्हणून हे तत्त्व उल्लेखनीय वाटते.

युद्धाची प्रत्यक्ष कारणे मात्र अनेक आहेत, असे जागतिक इतिहासावरून दिसून येते. राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा, अन्नसंपादन, आत्मरक्षण, वर्चस्वाभिलाषा, धर्मप्रसार इ. कारणांमुळे इतिहास काळात युद्धे घडून आली आहेत. प्राचीन काळी भटक्या जमातींच्या स्थलांतरांमुळेही युद्धे झाल्याचे दिसून येते. लोकसंख्येतील वाढ व त्यामुळे निर्माण होणारा अन्नधान्याचा व निवासक्षेत्राचा तुटवडा हेही युद्धाचे एक कारण असू शकते. व्यापारविस्तारासाठी व अधिक बाजारपेठा काबीज करण्याच्या आकांक्षेमुळे युद्धे झाल्याचे दिसून येते. राजकीय-सामाजिक विचारप्रणालींच्या प्रसारासाठीही  युद्धाचे साधन वापरण्यात आल्याचे दिसते.

युद्धाची कारणे विविध प्रकारची संभवतात, तथापि राज्यसंस्थेचा एक अंगभूत विभाग म्हणून युद्धसंस्था असते आणि युद्धाची कारणे त्या त्या राज्यसंस्थेच्या राजकीय नेतृत्वाच्या, ध्येयधोरणांच्या आणि ऐतिहासिक परिस्थितीच्या संदर्भात लक्षात घ्यावी लागतात.

युद्धांचे प्रकार : साधारणपणे देशांतर्गत राजकीय गट किंवा पक्ष यांच्यातील सशस्त्र संघर्षाला यादवी युद्ध म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे दोन देश किंवा वेगवेगळ्या देशांचे दोन गट यांच्यातील सशस्त्र संघर्ष हा आहे. याला आंतरराष्ट्रीय युद्ध म्हणता येईल. यांखेरीज मानवी संस्कृतीच्या अगदी प्रारंभकाळात होणारी जमाती-जमातींतील युद्धे हाही एक प्रकार संभवतो. आधुनिक युद्धविचारात विशेषतः, जागतिक महासत्ता आणि त्यांची अंकित राष्ट्रे यांच्या संदर्भात आणि अण्वस्त्रांच्या उपलब्धतेमुळे समर्यादित (लिमिटेड) युद्ध आणि समग्र युद्ध यांच्याही कल्पना मांडल्या जातात. मार्क्सवादानुसार वसाहती वा साम्राज्यवादी युद्धे आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणून उद्‌भवणारी क्रांतियुद्धे किंवा मुक्तियुद्धे असे प्रकर होतात. त्यांचे मूळ वर्गविग्रह किंवा वर्गयुद्ध (भांडवलदार विरुद्ध कामगार) यात असते.

संरक्षणात्मक आण्विक किंवा नक्षत्रयुद्धाची कल्पना आता पुढे आलेली आहे. पुराणकथांतील किंवा मिथ्यकथांतील युद्धांचा विचार येथे केलेला नाही कारण त्यांमधील इतिहास व ऐतिहासिक सांस्कृतिक अर्थ आणि प्रतीकात्मकता यांचा अभ्यास स्वतंत्रपणे करावा लागतो [⟶ पुराणकथा].


जमात युद्धे : संस्कृतीच्या आद्य काळात (सु. दहा हजार वर्षांपूर्वी) तत्कालीन लोकांचे राजकीय एकीकरण समान भाषिक अशा लहानसहान कुळांत किंवा जमातींत झालेले असे. आपापल्या जीवनरहाटीचे संरक्षण व नियंत्रण करण्याचे एक साधन म्हणून शेजारच्या जमातीविरुद्ध त्यांचा संघर्ष चाले. जमातीचा नेता युद्धकलेत निपुण असे. संघर्ष करण्यासाठी किंवा युद्ध लढण्यासाठी विशिष्ट अशी किंवा मुद्दाम बनवलेली शस्त्रास्त्रे नसत. जीवनधारणेसाठी असलेली हत्यारेच युद्धांत वापरली जात. मूर्त स्वरूपाचे काही आर्थिक वा राजकीय उद्दिष्ट साधण्यासाठी जमातयुद्धे होत नसत. जमातीमधील बहुतांश तरुण लढायांत भाग घेत. जमातमान्य संकेत, परंपरा व आचार हेच युद्धनियम असत. युद्धाची प्रमुख कारणे म्हणजे बदला घेणे, जनावरे पळविणे, चराऊ जमिनीसंबंधीचे तंटे  इ. असत.

भौगोलिक परिस्थिती व इतर पर्यावरण घटक लक्षात घेऊन आदिम गटांच्या युद्धखोरतेचे मोजमाप केले जाते. उदा., अत्यंत शीत व उष्ण प्रदेशातील जमाती युद्धविन्मुख प्रवृत्तीच्या असतात तथापि बेरिंग समुद्रालगतचे एस्किमो व आफ्रिकेतील बांतू याला अपवाद आहेत. सागरी काठावरच्या व मरुभूमीवरील जमाती जंगलात आणि डोंगरावर राहणाऱ्या जमातींपेक्षा अधिक युद्धप्रवण असतात. त्यांच्यापेक्षा सपाट गवताळ प्रदेशातील किंवा मैदानावरी विशेष युद्धखोर आढळतात. गवताळ प्रदेशात भौगोलिक अडथळे किंवा नैसर्गिक संरक्षण नसल्याने दूरगामी घाला घालणे अनिवार्य ठरते त्यामुळेच अशा आदिम गटांत आक्रमण व संरक्षण यांसाठी क्षत्रिय वर्ग व युद्धसंस्था प्रस्थापित झाल्याचे दिसते. सामान्यतः समशीतोष्ण व उत्साहजनक हवामान असलेल्या प्रदेशातील जमाती युद्धशील असतात.

जागतिक युद्ध किंवा महायुद्ध : पहिल्या महायुद्धकाळात (१९१४–१९) युद्धक्षेत्राचा विस्तार अमेरिका खंड वगळता जगभर झाला होता. म्हणून त्यास महायुद्ध किंवा जागतिक युद्ध म्हटले गेले. दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूपही त्यासारखेच होते. महायुद्धाचे स्वरूप हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे, वेगवेगळ्या देशांच्या दोन गटांतील युद्ध असे असते तथापि युद्धामान राष्ट्रांखेरीज उरलेल्या इतर देशांवरही त्यांचा दूरगामी परिणाम होत असतो त्यामुळे त्यांना लाक्षणिक अर्थाने जागतिक युद्ध म्हटले जाते. महायुद्धांची उद्दिष्टे, तंत्र, परिणाम या सर्वच गोष्टी अत्यंत गुंतागुंतीच्या असतात [⟶ महायुद्ध पहिले महायुद्ध दुसरे].

समग्र युद्धे : या युद्धात अण्वस्त्रेच प्रामुख्याने वापरली जातील. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या प्रभावाखाली लोकशाहीवादी आणि साम्यवादी राष्ट्रांचे गट निर्माण झाले. या दोन गटांखेरीज तटस्थ राष्ट्रांचा गटही आहे. रशिया व अमेरिका या महासत्तांच्या सशस्त्र संघर्षाची शक्यता व्यक्त केली जाते. रशियन नेतृत्वाखालील पूर्व यूरोपातील साम्यवादी राष्ट्रांचा गट व अमेरिकन नेतृत्वाखालील पश्चिम यूरोपातील लोकशाहीवादी राष्ट्रांचा गट यांतील संभाव्य युद्धास ‘सार्वत्रिक’ युद्ध असे संबोधण्यात येते. अमेरिका व रशिया या दोन राष्ट्रांमधील भावी युद्धास ‘प्रधान’ युद्ध म्हणण्याचा प्रघात आहे. महाबलाढ्य राष्ट्रांच्या छत्राखालील प्रतिपत्री (प्रॉक्सी) राष्ट्रांमधील युद्धांना ही संज्ञा लागू नसते.

संरक्षणात्मक उपक्रमशीलता किंवा नक्षत्रयुद्ध : या युद्धपद्धतीला यूरोपीय व अमेरिकी सामान्य जनता तसेच विचारवंत ‘तारायुद्ध’ (स्टार वॉर) म्हणतात. भारतात नक्षत्रयुद्ध व साम्यवादी राष्ट्रांत त्यास ‘तारायुद्ध’ किंवा ‘समग्र’ युद्ध म्हटले जाते. शहरे व सैनिकी संपत्ती यांच्या संरक्षणासाठी प्रक्षेपणास्त्र संरक्षक योजना असे नक्षत्रयुद्धाचे स्थूल स्वरूप आहे.

समर्यादित युद्ध : ही संज्ञा अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या कृतींमुळे प्रचारात आली. या युद्धप्रकारात लढत असलेल्या दोन पक्षांपैकी बलवत्तर पक्ष, आपल्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर व युद्धलक्ष्य आणि युद्धक्षेत्रे यांवरील हल्ल्यावर स्वेच्छेने मर्यादा व नियंत्रण घालून घेतो मात्र स्वतःचा युद्धहेतू वा उद्दिष्ट यांत बदल करीत नाही. उत्तर कोरियातील युद्ध आणि व्हिएटनाम युद्ध ही या प्रकारची उदाहरणे होत. मध्ययुगीन युद्धे वरील व्याख्येप्रमाणे ‘समर्यादित’ ठरतील.

ऐतिहासिक आढावा : या आढाव्यात साधारणपणे इ. स. पू. ४००० ते इ. स. एकोणिसावे शतक असा कालावधी विचारात घेतलेला आहे. यातील कालखंड सर्वसामान्य इतिहासलेखनाला अनुसरून केलेले नाहीत. मात्र या कालखंडांत भारताचा ज्या संस्कृतींशी व परकीय सत्तांशी संबंध आला, त्याच्या संदर्भात हे विवेचन केलेले आहे.

इ. स. पू. ४००० ते ६०० या कालखंडात मेसोपोटेमियात सुमेर, अक्कड, खाल्डिया व त्याच्या वायव्येकडे हिटाइट, मितानी इ. साम्राज्ये होऊन गेली. युफ्रेटीस व टायग्रिस या नद्यांमधील दुआबाचा व काठांवरील प्रदेश आणि कालवे मिळविण्यासाठी युद्धे होत. शिवाय मेसोपोटेमियाच्या सभोवती असलेल्या मरुभूमीतील व डोंगराळ प्रदेशातील टोळ्यांना या समृद्ध प्रदेशावर पडणाऱ्या धाडींशी मुकाबला करावा लागे. इ. स. पू. चौथ्या सहस्रकात अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युफ्रेटीस व टायग्रिस यांच्यामध्ये मिडीयन नावाची एक संरक्षक भिंत बांधण्यात आली. याच प्रदेशात प्रथम पद्धतशीर युद्धतंत्र जन्मास आले. चिलखतबंद पायदळ आणि चार गाढवे जोडलेले चार किंवा दोन चाकी रथ असत. घोडे नव्हते. भाले व गदा ही शस्त्रे होती. रथहल्ल्याने शत्रूत गोंधळ निर्माण करून भाले व गदा यांनी हल्ले केले जात. इ. स. पू. २००० ते १५०० या कालात रथचक्रे आऱ्यांची बनविण्यात येऊ लागली. त्यांना ४, ६ किंवा ७ आरे असत. रथ हलके झाल्याने त्यांची गती वाढली. उत्तरेकडील गवताळ प्रदेशातील टोळ्याशी संबंध आल्याने इ. स. पू. २००० च्या सुमारास रथांसाठी गाढवांऐवजी घोडे वापरण्याची प्रथा सुरू झाली. इ. स. पू. ३००० च्या सुमारास तांब्याच्या कुऱ्हाडी, खुरपी, तलवारी प्रचारात आल्या. इ. स. पू. १४०० पासून लोखंडी शस्त्रे प्रचारात येऊ लागली. शहरे तटबंदीची असत. तटबंदीवर चढण्यास शिड्या व तटभिंती फोडण्यासाठी तोडमोड करणारा मेष किंवा एडका वापरत. इ. स. पू. चौथ्या सहस्रकापासून धनुष्यबाण प्रचारात आले होते तथापि इ. स. पू. २००० नंतर रथयोद्धे धनुष्यबाण वापरू लागले. त्यावेळी घोडदळ नव्हते.

मेसोपोटेमियातील युद्धतंत्र व शस्त्रे स्फोटक दारूच्या शोधापर्यंत प्रचारात होती. त्याच्या उत्तरेकडील प्रदेशांतील मितानी लोक हे इंडो-यूरोपीय संस्कृतीचे होते. मितानींच्या पश्चिमेस हिटाइट होते. मेसोपोटेमियाच्या ईशान्येला टायग्रिस नदीभोवतालच्या प्रदेशातील ॲसिरियन लोक अत्यंत युद्धखोर होते. पुरोहितवर्ग युद्धाचे नेतृत्व करीत. त्यांनी प्रथम लढाऊ घोडेस्वार व ⇨घोडदळ  प्रचारात आणले. भालाईत व धनुर्धारी घोडदळ असे दोन प्रकार होते. भालाईत, धनुर्धारी व गोफणदाज पायदळ असे. मोठ्या ढालींनी संरक्षण केले जाई. चिलखत वापरले जाई. एक योद्धा रक्षकाचे काम करी व दुसरा शस्त्रे चालवी. ॲसिरियन लोकांनी संयुक्त कारवाया (नद्यांतून पोहून, बोटी वापरून) करून बॅबिलन इ. शहरे जिंकली. युद्धबंद्यांची सरसहा कत्तल करण्यात येई. शत्रुराष्ट्रातील जनतेचे स्थलांतर करवून त्यांचे ॲसिरियात पुनर्वसन केले जाई.

प्राचीन ईजिप्शियन सेना व युद्धतंत्र मेसोपोटेमियन पद्धतीचे होते तथापि गदेला फार महत्त्व होते. हिक्सास लोकांनी ईजिप्तला घोडदळ, रथ, खुरपी व तलवार यांचा परिचय करून दिला. ईजिप्तमध्ये रथात पुष्कळ सुधारणा करण्यात आल्या. रथाचा आस व चाके मागे नेऊन त्यावरील पीठात युद्ध बसे.


ऋग्वेदा त वैदिकजन किंवा टोळ्या व त्यांचे शत्रू म्हणजे दास किंवा दस्यू यांच्यातील संघर्षांचे वर्णन आहे. वैदिकांचा नेता इंद्र त्याला उद्देशून दस्यूंची तटबंदीची नगरे फोडण्यासाठी केलेल्या प्रार्थना ऋग्वेदात आहेत. इंद्राचे सहकारी मरुतगण आहेत. रथांचे, घोड्यांचे, धनुष्याचे उल्लेख आहेत. सिंधू संस्कृतीकालीन युद्धपद्धतींची निश्चितपणे माहिती मिळत नाही.

इ. स. पू. पहिल्या सहस्रकात ग्रीक व इराण यांमधील युद्धे पूर्व भूमध्य व इजीअन समुद्र आणि ग्रीस भूमीवर झाली. ग्रीक नगरराज्यांतही वारंवार युद्धे होत. स्पार्टा व अथेन्स यांच्यातील पाचव्या शतकातील ⇨पेलोपनीशियन युद्ध प्रसिद्ध आहे.

प्राचीन भारतात वर्णव्यवस्थेनुसार क्षत्रियांकडे युद्ध आणि संरक्षण ही कार्ये होती. राजाच्या सेनेत रथ, अश्व, गज, पदाती (पायदळ) व रसदपुरवठा असे विभाग असत. लोखंडी  तलवारी, गदा, बाण, कुऱ्हाडी ही शस्त्रास्त्रे  प्रचारात आली. युद्धाचे प्रकाश, कूट व अटवी (जंगल) हे प्रकार रूढ होते.

त्याकाळी राज्यविस्तार हे युद्धाचे उद्दिष्ट असे. यातून सम्राट, एकराज, चक्रवर्ती इ. संकल्पना उदयास आल्या. राज्याच्या रक्षणासाठी युद्ध हे राजाचे आद्य कर्तव्य असे. युद्धासाठी क्षत्रिय तसेच सीमेवरील जंगली लोक सैन्यात असत. राखीव सैन्याची कल्पना नव्हती त्यामुळे एकाच लढाईत संघर्षाचा शेवट होई. पराभूतांना दास किंवा गुलाम करण्यात येई. यातून ब्राह्मण व क्षत्रिय वगळले जात. लढाईमधील डावपेच काय होते ते निश्चित नाही. लढाईचे शिंग वाजले की, प्रतियोद्धे एकमेकांवर तुटून पडत. लढाईतून पळ काढला जाई किंवा शरणागती पत्करीत. पराजितांकडून खंडणी घेऊन विजयी राजा पराजित राज्य किंवा जनपद यांच्या रक्षणास जबाबदार असे. पराजित राज्य किंवा जनपद जेत्यांच्या एकतर साम्राज्यात विलीन होई किंवा त्यांचे मांडलिकत्व स्वीकारीत असे. ही परिस्थिती मुस्लिम आक्रमणापर्यंत (इ. स. आठवे शतक) होती.

इ. स. पू. २५० ते इ. स. १३०० या कालखंडात राजकीय दृष्ट्या मोठ्या महत्त्वाच्या घटना घडल्या. सिंधु देशात अरबांची सत्ता स्थापन झाली. खैबर व बोलन या खिंडींतून मुस्लिक तुर्कांच्या स्वाऱ्या झाल्या आणि त्यांनी काबूल, कंदाहारपासून प्रयागपर्यंतच्या प्रदेशावर मुस्लिम अधिराज्य स्थापन केले.

काठेवाड–गुजरात यावर शकक्षत्रपांचे राज्य आणि नर्मदेच्या दक्षिणेकडील भारतावर सातवाहनांचे साम्राज्य होते. (इ. स. पू. १५०–इ. स. ३००). अगदी खाली चोल, पांड्य व केरळ राज्ये होती. सातवाहनानंतर दक्षिण भारतात अनेक लहानमोठी राज्ये झाली. देवगिरीचे यादव, होयसळचे यादव व चोल हे चौदाव्या शतकापर्यंत टिकले.

या कालातील हिंदुराजांच्या युद्धपद्धतीबद्दलची फारशी माहिती नाही. डोंगरी दुर्ग व मैदानातील नगरांना काही  ठिकाणी  तटबंदी असे. सैन्यात पायदळ व घोडदळ हे दोन प्रमुख विभाग होते. हत्तींचा उपयोग राजे किंवा त्यांचे दंडनायक व मंडलेश्वर करीत. अरबस्तान व इतर यावनी देशांतून अरबी व्यापारी घोडे आणून ते स्थानिक राजांना विकत. घोडदळाचा उपयोग धाडी घालण्यासाठी होत असे. दुर्ग वा तटबंदीयुक्त नगरे सर करण्याच्या तंत्राची माहिती मिळत नाही. मात्र सांची येथील स्तूपाच्या तोरणावर तटयुक्त नगरावरील हल्ल्याचे शिल्प आहे. बहुतेक लढाया मैदानात झाल्या असाव्यात. तमिळ संघम्‌ (पूरम्‌) वाङ्मयातील वर्णनांवरून या लढाया घनघोर झाल्याचे दिसते. जिंकलेल्या प्रदेशातील बायकामुलांची गय केली जात नसावी. महिकावती बखर व काही वीरगळ यांवरून (बेरीनवली) आरमारी लढायांबद्दल कल्पना करता येते. लढाईत तलवारी, खंजीर आणि ढालींचा वापर केला जात असावा. लुटीत घोड्यांना महत्त्व होते. अलाउद्दीन खल्‌जीने देवगिरी यादवांचा पराभव केल्यावर १२,००० घोड्यांची खंडणी घेतली. तुर्कांनी घोडदळ रणतंत्र वापरून (तौघलमा व कोंडी करणे) हिंदू राजांचे पराभव केले. हिंदू राजे तुर्की घोडेस्वार व धनुर्धारी यांना आपल्या सैन्यात भाडोत्री ठेवीत. आग्नेय आशियात ख्रिस्तसंवत्सरापासून हिंदू व बौद्धधर्मप्रसार झाला. चोल राजांनी तेथील शैलेंद्र व विजय राजवंशी राजांशी लढाया केल्या. युद्धपद्धती बहुतांश भारतीय असावी. ब्रह्मदेशावर तेराव्या-चौदाव्या शतकास चीनच्या मंगोल सम्राटांनी आक्रमणे केली, पण ती परतवण्यात आली.

बायझंटिन व इराणी साम्राज्यांचा अंत इस्लामी तलवार, घोडदळ, उंटदळ व धनुर्धारी यांनी केला. अरबांचे सेनापती खलीद बिन-अल वलीद व अम्र-बिन-अल-अस हे प्रसिद्ध आहेत. बायझंटिनांपासून अरबांनी धनुर्धारी आणि भालाईत घोडदळ रणतंत्र स्वीकारले.

बायझंटिन नाविक शक्तीचा पाडाव करणे अरबी नौसेनेला अशक्य होते. याचे कारण, बायझंटिन युद्धनौका उत्कृष्ट बांधणीच्या होत्या. ‘ग्रीक अग्नी’ हे त्यांचे आगलावी बाँब होत. या बाँबमध्ये डांबर, गंधक, चुना, तेल (घासलेट) व राळ ही द्रव्ये असावीत. हे बाँब नौकेवरील नळीतून किंवा क्षेपणयंत्राने शत्रूंच्या नौकांवर फेकले जात. आगीवर पाणी फेकले की जाळ आणखी वाढे. अरबांनी चौदाव्या शतकापासून मलाया, जावा व सुमात्रा यांवर अंमल बसवण्यास आरंभ केला. ते त्यांना आरमारामुळे शक्य झाले. दाक्षिणात्य चोलांकडे व्यापारी नौका होत्या, पण युद्धनौका नव्हत्या. अरबी समुद्रावरही  पोर्तुगीज येण्यापूर्वी  त्यांचा वरचष्मा होता. केरळातील मुस्लिम मोपले हे हिंदू राजांचे दर्यासारंग होते.

इ. स. पू. २५० ते १३०० या काळात शक-कुशाणांमुळे घोडदळाला महत्त्व मिळू लागले असावे. भाजे येथील लेण्यांतील सूर्यशिल्पांवरून रिकिबीचा वापर प्रथम या भागात सुरू झाला असावा. इराणी पद्धतीचे चार घोड्यांचे रथ कदाचित्‌ वापरात असावे. या रथाचे आगमन मगी-ब्राह्मण (शक-ब्राह्मण) व इराणी लोकांच्या आगमनामुळे झाले असण्याची शक्यता आहे. गुप्त राजवटीत हूणांच्या स्वाऱ्यांनी उत्तर हिंदुस्थान त्रस्त झाला होता. गुप्तकालात रथदल लुप्त झाले.

तेराव्या शतकापूर्वी मुस्लिमांचा विजय त्यांचे सेनानेतृत्व, धर्मप्रसाराची प्रबल आकांक्षा, युद्धाचा पूर्वानुभव, घोडदळ, धनुर्धारी, आगलावी यंत्रे (बॅलिस्टा) (महंमूद गझनवीने या यंत्राचा वापर वायव्य सीमेवरील हिंदू राज्यांच्या विरुद्ध केला होता) आणि शिस्त इ. कारणांनी झाला. याउलट, कुलवंशश्रेष्ठतेवर अवलंबून असलेले सेनानेतृत्व, एका राज्यावर परकीयांचे हल्ले होत असताना शेजारच्या हिंदू राजाने त्याचा गैरफायदा उठविणे, क्षत्रियांनीच युद्ध करावे हा संकेत इ. कारणांनी हिंदूंचा पराभव होत असे.

दक्षिण भारतातील मुस्लिम शाह्यांनी एकजूट करून विजयानगर साम्राज्याचा राक्षस तागडी किंवा तालिकोट येथे निर्णायक पराभव केला (१५६५). या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे विजयानगर साम्राज्याचे अप्रगत घोडदळ व धनुर्धारी दळ हे होय. विजयानगरच्या राजांनी आपल्या सैन्यात भाडोत्री तुर्की-इराणी घोडेस्वार व धनुर्धारी भरती केले होते. दक्षिणेकडील मुस्लिम सत्तांना आव्हान देण्याचे कार्य महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी यांनी सुरू केले. त्यांच्या यशाचे प्रमुख कारण गनिमी युद्धतंत्र हे होय. शत्रू ज्या युद्धपद्धतीने लढे, त्या पद्धतीने लढावयाचे नाही, हे त्यांचे लढण्याचे तत्त्व. छ. शिवाजींच्या मृत्यूनंतर छ. संभाजीने मोगलांच्या आक्रमणाला प्रथम गनिमी तंत्राने उलट जबाब दिला. छ. संभाजी व पेशवे यांच्या काळात आरमाराकडे दुर्लक्ष झाले. छत्रपती संभाजींनी कोकणात आश्रय घेऊन लढा देण्याचे धोरण ठेवले परंतु पाठीमागे समुद्र व पुढे सह्याद्रीची तटबंदी, गोवा, कल्याण, भिवंडी या उजव्या डाव्या बगलांवर पोर्तुगीजांचा लष्करी व आरमारी दबाव, यांमुळे छ. संभाजीची कोकणात कोंडी झाली. छ. संभाजींच्या वधानंतर (१६८९) महाराणी ताराबाईंनी मराठ्यांचे नेतृत्व केले. त्यांनी गनिमी तंत्र वापरून मराठा राज्यात व त्याबाहेरील मोगली मुलुखात मोगलांची दमछाक केली. इ. स. १७०७ नंतर म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काळ फिरला. पेशव्यांनी चौथाई खंडणीसाठी उत्तर हिंदुस्थान व निजामाविरुद्ध मोहिमा केल्या. पेशव्यांकडे युद्ध करून निर्णय मिळविण्याची सांपत्तिक व लष्करी शक्ती नव्हती. त्यांचे युद्धतंत्रही सदोष होते.


युद्धपद्धती : काही पश्चिमात्य व पौर्वात्य अशा युद्धपद्धतींची माहिती पुढे दिलेली आहे.

ग्रीक युद्धपद्धती : प्राचीन ग्रीक संस्कृतीवर युद्धे व चाचेगिरी यांचे मोठेच परिणाम झाले. इराण, अफगाणिस्तान व भारत यातील गणराज्यांशी इ. स. पू. चौथ्या शतकात ग्रीकांची युद्धे झाली. इराणचा ॲकिमेनिडी  राजवंश संपुष्टात आला पण ग्रीक सत्ता मात्र तेथे प्रस्थापित झाली नाही. विद्यमान पाकिस्तान व अफगाणिस्तान यांतील सीमा प्रदेश व पंजाबच्या वायव्येकडील भाग येथे काही काळ ग्रीक राजवटी उदयास आल्या पण त्यांनाही मौर्यांशी संघर्ष करणे शक्य झाले नाही.

इ. स. पू. १४०० पासून ग्रीकांचे वीरयुग सुरू झाले. योद्धे रथातून रणांगणावर येत, पायउतार होऊन द्वंद्वयुद्ध लढत. गोल ढाल, सरळ आखूड तलवार व दोन प्रास (जॅव्हेलिन) या शस्त्रास्त्रांनी लढत होई. धनुष्यबाण हे वीराला शोभणारे नसून ते भ्याडाचे शस्त्र आहे, अशी त्यांची भावना होती. कदाचित धनुष्यबाण तयार करण्याचे पौर्वात्य (इराणी) तंत्र त्यांना जमले नसावे. प्रास हे प्रधान हत्यार होते. इ. स. पू. आठव्या शतकापासून स्पार्टाचा प्रभाव वाढला. स्पार्टाला मॅसीनिया व लकोनीअ मधून लोखंड व गुलाम (हिलॉट) मिळाले. इ. स. पू. सहाव्या शतकापासून स्पार्टा सैनिकी क्षेत्रात प्रभाव गाजवू लागले. इ. स. पू. ६२०–६०० या कालात ⇨लायकरगस  याने स्पार्टाची राज्यघटना तयार केली व स्पार्टा हे सैनिकी राज्य बनले. तथापि लायकरगस याच्या कालखंडाविषयी विविध मते (इ. स. पू. ७ वे किंवा ९ वे शतक) आढळतात. उत्तम सैनिक तयार करण्याची शिक्षणपद्धती तेथे अंमलात आली. दुबळ्या बालकांना मारून टाकण्यात येई. वयाच्या सातव्या वर्षांपासून वयाच्या तिसाव्या वर्षांपर्यंत तरुणांना बराकीत ठेवले जाई. तेथे त्यांना शिस्त व सहनशक्ती वाढविण्याचे शिक्षण मिळे. स्पार्टातील प्रत्येक पुरुष हा सैनिक असे. युद्धातील विजय किंवा मृत्यू हेच त्याचे कर्तव्य असे. स्पार्टा सेनेचे आधिपत्य दोन राजे बरोबरीने करीत. आर्थिक गरजा दासवर्गाच्या श्रमातून भागविल्या जात. सुमारे ७०० वर्षांनंतर खांद्याला खांदा लावून लढणारी फॅलँक्स ही नर-दुर्गवत सैनिकी संघटना अस्तित्वात आली. त्यांना ‘हॉपलाइट’ म्हणत. पितळ किंवा काशाचे शिरस्त्राण वापरणारे चिलखतबद्ध असे हे पायदळ होते. दोन मी. लांबीचा भाला, सरळ पात्याची तलवार व गोल ढाल ही त्यांची आयुधे होती. राखीव रांगा मृत सैनिकांची जागा घेत. सैनिकांचे भारी साहित्य वाहण्यास व जखमी शत्रूचा निःपात करण्यासाठी गुलाम होते.

प्रथमपासून सर्व मारक शक्ती वापरून शत्रूवर हल्ला होई. हॉपलाइट रांगा खंडित झाल्या की ते पळ काढीत. ताज्या दमाचे राखीव दल नसल्याने त्यांना दुसऱ्या प्रतिहल्ल्यासाठी बळ उरत नसे. पळ काढणाऱ्या शत्रूचा पाठलाग करणे अशक्य ठरे. लढाई संपे. विजयी पक्षाकडे दूत पाठवून शरणचिट्ठी देऊन मृतांच्या अंत्यसंस्काराची संमती मिळविली जाई. पराजित मृत वीरांचा अंत्यसंस्कार न होता मृताची अवहेलना केली जाई. होमरच्या इलियड या महाकाव्यात याची हृदयद्रावक वर्णने आहेत. हॉपलाइट रणतंत्रात हल्ल्यासाठी कूच करताना उजवी बगल पुढे होत जाई व शत्रूच्या डाव्या बगलेला गुंडाळून टाकण्यात येई. मैदानात व उन्हाळ्यातच लढाया होत. शत्रूला नगरांच्या तटबंदीबाहेर आणण्याचा उपाय म्हणजे त्याची पिके जाळणे व गुरे पळविणे. वेढाबंदी तंत्र माहीत नव्हते. ग्रीसमध्ये घोड्याची निपज शक्य नसल्याने घोडदळ नव्हते. शत्रूचे धनुर्धारी व रथ ग्रीक हॉपलाइट हल्ला परतविण्यास दुबळे ठरत. ग्रीकांना घोड्याची रिकीब किंवा खोगीर माहीत नव्हते. इराणी घोडदळ व धनुर्धारी सेनांचा पराभव ग्रीक हॉपलाइट दलाने केला. ग्रीक फॅलँक्स हॉपलाइटच्या रांगा आखण्यासाठी भूमितीचा उपयोग असतो, असे प्लेटोचे मत होते. ग्रीक ‘पलिस’ या शब्दाचा अर्थ सामान्यपणे तटबंदीयुक्त नगर असा होतो तथापि सर्वच ग्रीक नगरे टेकडीवर किंवा टेकडीभोवती नव्हती. स्पार्टाला पुष्कळ वर्षे तट नव्हते तटबंद्या नागरिकांना भ्याड करतात, असा प्लेटोचा सिद्धांत आहे. तसेच सीमा तटबंदी, दुर्ग आणि ग्रीक युद्धपद्धतीबद्दलही त्याचे विरोधी मत होते. ग्रीक मिथ्यकथांत ट्रॉय, थीब्झ यांवरील हल्ल्यांची वर्णने असली, तरी इ. स. पू. सातव्या, सहाव्या शतकांतील ती नगरयुद्धे जमीन जिंकण्यासाठी आणि शत्रूचा निःपात करण्यासाठी झाली. नगरयुद्धात नगरांचा व पाणीपुरवठ्याचा नाश करणार नाही, अशी शपथ घेतली जाई. इ. स. पू. पाचव्या शतकापासून तटबंदीवर भर द्यावयास आरंभ झाला. पेरिक्लीझने अथेन्स व पायरीअस बंदर यांना जोडण्यासाठी ९ किमी. लांबीची तटबंदी बांधली त्यामुळे अथेन्समध्ये अन्न व इतर वस्तू ग्रीक वसाहतींपासून आयात करणे शक्य झाले. इ. स. पू. ४३१ नंतर ग्रीकांना नाविक युद्धतंत्र व वेढाबंदी युद्धतंत्र शिकता आले. सिसिली (इ. स. पू. ४००), थेसाली यांवरील आक्रमणांत (इ. स. पू. ३५०) ग्रीकांना गलोल (गोळाफेक यंत्र), तटभिंतींची मंडलाकार बांधणी व तटबंदीभेद तंत्र यांचा अनुभव मिळाला. थेसिलियन वेढाबंदी तंत्रज्ञांचा ग्रीक सैन्यात भरणा करण्यात आला. युद्धनीतिविचारात ग्रीक अप्रगत होते. ग्रीक सेनापतींवरील राजकीय नेत्यांच्या दबावामुळे युद्ध लढण्यात त्यांना फारशा सवलती मिळत नसत. रणतंत्रात हॉपलाइट रांगांची खोली वाढविण्यात आली आणि एकप्रकारे राखीव दल उपलब्ध झाले. या राखीव दलाचा उपयोग केव्हा व कसा करावयाचा, हे सेनापतीच्या समयज्ञतेवर अवलंबून असे हाही बदल लक्षणीय आहे. जर युद्धतंत्र पद्धतशीर करावयाचे असेल, तर इतर वैज्ञानिक शिक्षणाप्रमाणे ते शिकविणे शक्य आहे, असा मतप्रवाह सुरू होऊन काही ग्रंथही तयार झाले. पेलोपनीशियन युद्धकालात पेरिक्लीझने ग्रामीण भाग रिकामा केला व तेथील प्रजेला अथेन्समध्ये आश्रय दिला यामुळे सामाजिक क्रांती झाली. याचे पडसाद ग्रीक साहित्यात उमटले आहेत. पेलोपनीशियन युद्धाचे परिणाम म्हणून स्पार्टा व अथेन्समध्ये युद्ध हा एक व्यवसाय बनला. राजकारण व लष्करी व्यवसाय जे पाचव्या शतकापर्यंत एकच होते, ते पुढे विभक्त झाले. पेलोपनीशियन युद्धात अवजड हॉपलाइटऐवजी किंवा त्याच्याबरोबर हलकी शस्त्रास्त्रे असलेले सैनिक (पेल्‌टास्ट) यांचे महत्त्व पटले. एकतर ते शीघ्रतेने हालचाल करू शकत आणि त्यांना युद्धसज्ज करण्यासाठी भांडवली खर्च कमी पडत असे. पेल्टास्टच्या भरीला ग्रीक सैन्यास भाडोत्री सैनिकांची भरती होऊ लागली. परिणामतः ग्रीक पलिस व त्यांचे संरक्षक यांच्यातील मानसिक अनुबंध क्षीण झाला. इ. स. पू. चवथ्या शतकातील आयसॉक्राटीझ या ग्रीक लेखकाचे निर्नागरीकरणामुळे घडणाऱ्या अनर्थाचे वर्णन भडक वाटत असले, तरी युद्धामुळे इ. स. पू. ४०४ पासून ग्रीसमध्ये राजकीय सुव्यवस्था स्थापू शकणारे एकही नगरराज्य राहिले नाही. पुढे ग्रीसवर मॅसिडोनियन फिलिप्सची सत्ता आली व त्याच्या मुलाने–अलेक्झांडरने–दिग्विजयाचा प्रयत्न केला. अलेक्झांडरनंतर ग्रीक युद्धपद्धतीचा विकास खुंटला. ग्रीकांनी हत्तीदल वापरण्यास आरंभ केला कारण हत्तींना घोडे बिचकत असत.


रोमन युद्धपद्धती : प्रसिद्ध रोमन तत्त्वज्ञ व वक्ता सिसरो (इ. स. पू. १०६–४३) याच्या विचाराप्रमाणे दोन देशांतील संबंध विवेकबुद्धी आणि न्याय या तत्त्वांनुसार असावेत. शांतता आणि राष्ट्रावरील अन्यायाचे निवारण यासाठी केलेले युद्ध न्याय्य ठरते. तेही आधी युद्धघोषणा करून करावे. याशिवाय केवळ सत्तालोभ व आत्मगौरव याकरिता राज्यविस्तार करणे त्याने त्याज्य मानले. त्याच्या हयातीतच या मूल्यांचे जूलिअस सीझरपासून अवमूल्यन सुरू झाले. गणराज्यपद्धती जाऊन प्रजापीडक सम्राट व हुकूमशाह यांचे शासन आले. पुढे संस्कृतिहीन पण युद्धविद्येत तरबेज अशा सिथियन व हूण लोकांनी रोमन साम्राज्याना नाश केला. इ. स. पू. चौथ्या शतकापूर्वीची रोमन युद्धपद्धती ज्ञात नाही. सर्व्हिअस टल्लिअसने प्रथमच रोमची तटबंदी बांधली व सेनाधिष्ठित राज्ययंत्रणा स्थापली. १७ ते ४६ वर्षांच्या आतील पुरुषांची सैन्यात भरती केली जाई. ४६ ते ६० वर्षांचे पुरुष राखीव असत. ज्येष्ठ व कनिष्ठ शिलेदार हा एक आणि श्रेष्ठ व गरीब व्हेलायटीस यांचा दुसरा असे सैन्यात दोन स्तर होते. श्रेष्ठांतील श्रीमंत योद्धे काशाचे शिर व तनुस्त्राण आणि जंघात्राण ⇨चिलखत, भाला, खंडा व ढाल वापरीत. चिलखतविहीन व गोफणधारी असा गरीब सेना विभाग असे. रोमन युद्धपद्धती ग्रीकांसारखीच होती. गॉल जमातीशी लढताना आलेल्या पराभवांच्या अनुभवावरून, ग्रीक फॅलँक्स पद्धतीऐवजी ‘लीजन’ संघटना प्रचारात आली. भारी पायदळ, घोडदळ व व्हेलायटीस दळ अशी लीजनची संघटना होती. लढाईसाठी यांचा ‘चौकडी’–सारीपाट किंवा बुद्धिबळ पटासारखा–व्यूह असे त्यामुळे रांगांतील तुकड्यांमधील मोकळ्या जागांचे रक्षण मागील रांगांतील तुकड्या करीत. या व्यूहामुळे रांगांचा भेद करणे, तुकड्यांना अलग पाडणे किंवा बगला गुंडाळणे शत्रूला कठीण जाई. आघाडीला हस्तानी, नंतर मागे प्रिन्सिपीस आणि शेवटची रांग ट्रायआरी अशी समग्र व्यूहरचना केली जाई. जॅव्हेलीन, कृपाण ही नवीन शस्त्रास्त्रे तर व्हेलायटीसना तलवार, जॅव्हेलीन व ढाल इ. शस्त्रास्त्रे देण्यात आली. लांडग्याच्या कातडीचे शिरस्त्राण व्हेलायटिस घालीत. मराठी विटा या भाल्याप्रमाणे जॅव्हेलीनला फेकून परत माघारी खेचता येत असे. घोडदळाचा उपयोग टेहळणी व पाठलागासाठी केला जाई. लढाईत पायउतार होऊन घोडेस्वार लढत. रणांगणाच्या सर्वात मागे रोमनांचे संरक्षित शिबीर निश्चितपणे असे. लढाईत कच खाण्याचा संभव आल्यास रोमन या शिबिराचा आसरा घेत, त्यामुळे सैनिकहानी कमी होई. दोन कॉन्सल रोमन लीजनचे आधिपत्य करीत यांना युद्धनेतृत्वाचा अनुभव नसे पण ते राजकारणी असत. या दुहेरी युद्धनेतृत्वाचा हेतू, सैनिकी दंडेलीला लगाम घालणे हा होता तथापि तो हेतू निष्फल ठरे. कारण दरवर्षी कॉन्सल बदलले जात आणि त्यामुळे धोरणात सातत्य टिकत नसे. या दोघांत मतभेदही होण्याची शक्यता असे. पुढे ही दुहेरी नेतृत्वाची प्रथा बंद झाली. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून रोमनांच्या राजकीय व व्यापारी हितसंबंधांत वाढ झाली. कार्थेजच्या साम्राज्याशी संघर्ष होऊ लागले. [⟶प्यूनिक युद्धे]. हॅनिबलने रोमनांचा कॅनी लढाईत पराभव केला. इ. स. पू. २०८ मध्ये रोमनांनी कार्थेजच्या आरमाराचा पराभव केला त्यामुळे पुढे रोमनांना कार्थेजचा पाडाव करणे शक्य झाले. रोमन साम्राज्याचा अपकर्ष व अंत, फ्रँक, गॉथ, जर्मन व हूण टोळ्यांच्या आक्रमणांमुळे झाला.

इराणी युद्धपद्धती : येथे इराणी संज्ञा इ. स. पू. ६४१ पूर्वीच्या इराणच्या (पर्शिया) संदर्भात आहे. इ. स. पू. नववे शतक ते इ. स. पू. ३३० आणि इ. स. पू. २५० ते इ. स. ६४१ या कालांतील युद्धपद्धतीचा येथे आढावा घेतला आहे. साम्राज्यविस्तार, साम्राज्यसंरक्षण व इतर राजकीय उद्दिष्टांसाठी या काळात युद्धे झाली. इ. स. पू. ३३० पूर्वकालात भारताने इराणी सम्राटांना भारतीय गजदल व पायदळी भारी धनुर्धारी दलांची मदत दिली होती. ग्रीकांच्या विरुद्ध झालेल्या लढायांत कधी इराणी सैन्य व आरमाराचा विजय झाला तर कधी त्यांना पराभव पत्करावा लागला. हीरॉडोटस या प्राचीन ग्रीक इतिहासकाराने इराणी सैन्याची संख्या ४० लाख, तर इतर इतिहासलेखकांनी ती अडीच लाख होती असे लिहिले आहे. हान्स डेलब्रूक (जेर्मनी : लेखन काल १८७३-१९२२) याने काल, वेग व अवकाश आणि आधुनिक कालातील सैन्याच्या हालचाली, हत्यारे, वाहने, रसदपुरवठा इ. लक्षात घेऊन असे दाखवून दिले, की ग्रीक-इराण युद्धात इराणी सैन्य व आरमार नेहमी ग्रीकांपेक्षा कमीच असे. लढाया नक्की कोठे झाल्या हेही त्याने ग्रीक वर्णनावरून दाखवून दिले आहे. इराणची तत्कालीन वर्णाश्रम संस्था भारताप्रमाणेच राजा, पुरोहित, क्षत्रिय आणि इतर अशी होती. इराणी सैन्यात पायदळाला महत्त्व नव्हते. इराणी क्षत्रिय वर्गात सम्राटाचे नातेवाईक, जमीनदार हेच राजकारण व युद्धकार्याचे नेतृत्व करीत. हे रथी व घोडदळात असत. भाले व धनुष्य ही या क्षत्रिय वर्गाची प्रमुख शस्त्रास्त्रे होती. इराणी रणतंत्रात रथ (चार किंवा दोन घोड्यांचे) आणि घोडदळ यांना महत्त्व दिले जाई. घोडदळ व रथदळाला हालचाल करण्यास विस्तीर्ण भूप्रदेश आवश्यक असे. निरुंद रणक्षेत्रात घोडदळ व रथदळही निष्प्रभ ठरत त्यामुळे आणि ग्रीकांच्या अधिक सैन्यबळामुळे इराणी सैन्याचा पराभव करणे ग्रीकांना शक्य झाले. उदा., मॅराथॉन लढाई व एर्बिल ऊर्फ गॉगामीला लढाई. इराणी आघाडीला गजदळ, त्यामागे पहिल्या रांगेत रथ व बगलांवर घोडदळ, त्याच्या मागच्या दुसऱ्या रांगेत इराणी, बाल्खीय (बॅक्ट्रियन), पल्हव (पर्शियन) व भाडोत्री ग्रीक हॉपलाइट व पेल्टास्ट पायदळ आणि पार्श्वभागी पायदळ असा रणव्यूह आखला जाई. घोडदळात अश्वधनुर्धारी व भालाईत घोडेस्वार असत. इराणी हत्तीदळ भारतीय माहूत व गजयोद्धे नसल्यास कुचकामी ठरे. राखीव सेना ठेवली जात नसावी असे वाटते. सामान्यतः रथयोद्धयांच्या आघाती हल्ल्याने आरंभ होई. घोडेस्वार शत्रूच्या बगला गुंडाळून त्यांना चक्रव्यूहात कोंडण्याचा प्रयत्न करीत. घोडेस्वार व रथ पुढे जावयास लागले की त्यांच्यामागे काही अंतर ठेवून पायदळ कूच करी. दमलेले घोडेस्वार व रथी या पायदळाच्या आसऱ्याने दम घेऊन व हत्यारे बदलून परत लढाईत सामील होत. या तंत्रास शत्रूचा व्यूह पाहून फेरफार केले जात असत. पुढे सातव्या शतकात नवीन मुस्लिम युद्धपद्धतीमुळे पारंपारिक इराणी पद्धती कुचकामी ठरली.

भारतीय युद्धपद्धती : कौटिलीय अर्थशास्त्रा तील उल्लेखावरून प्राचीन भारतात रथयोद्धे, गजदळ, अश्वदळ व पायदळ अशी लढाऊ दळे होती. अलेक्झांडरने पोरस राजाचा पराभव झेलम नदीकाठच्या झेलम गावापाशी कर्राई मैदानात केला. पोरस पराभूत होण्याचे कारण त्याचे रथ मैदानात कुचकामी ठरले व ग्रीक घोडदळाने हूल दाखवून त्यांच्या पिछाडीवरच्या उजव्या बगलेवर आणि आघाडीच्या डाव्या बगलेवर हल्ला चढवून पोरसच्या सैन्याची कोंडी केली हे होते. ॲरियन या ग्रीक इतिहासलेखकाच्या वर्णनाचे विश्लेषण केल्यास असे दिसते, की या सर्वांत प्रदीर्घ लढाईत ग्रीक सैन्याची दमछाक झाली असावी व हे युद्ध समझोत्याने थांबविण्यात आले असावे. असा एक प्रवाद आहे, की या लढाईच्या वेळी चंद्रगुप्त मौर्य व कौटिल्य उपस्थित होते. हत्ती व रथ कुचकामी ठरले हे सत्य असल्यास कौटिल्याने अर्थशास्त्रात तसा अभिप्राय दिला असता व त्यांची गणना चतुरंगबळात केलीच नसती. अलेक्झांडरच्या मागे राहिलेल्या सेल्युकस ग्रीक याचा चंद्रगुप्तापुढे निभाव लागला नाही. अलेक्झांडरच्या सैन्यातील धनुर्धारी व घोडेस्वार हे बहुसंख्येने भाडोत्री इराणी होते. भारतीय धनुर्धाऱ्यांच्या बाणवर्षावामुळे खुद्द अलेक्झांडर जखमी झाला होता. ग्रीक सैनिक कंटाळल्यामुळे पुढे आक्रमण न करता अलेक्झांडर परतला असेही म्हटले जाते. दुर्दैवाने ग्रीक इतिहासलेखकांचे वर्णन पडताळून पाहण्यासाठी भारतीय पुरावे उपलब्ध नाहीत.


मंगोल युद्धपद्धती : मंगोल म्हणजेच मंगोलियातील चंगीझखानाचे पूर्वज व त्याचे मुस्लिमेतर वंशज होत. मंगोलिया हे गवताळ प्रदेशातील पशुपालक संस्कृतीचे केंद्र होते. उत्कृष्ट घोडे हे वीरांचे वाहन व वाहतुकीचे साधन होते. तंबूंत व घोड्यांवर त्यांचे बहुतांश जीवन व्यतीत होई. मंगोल घोडेस्वार आखूड चिलखत वापरीत. कच्च्या रेशमाचा खमीस व त्यावर लाखरोगणाचे चिलखत घालीत. लढताना बिनीचे योद्धे व सेनापतीचे रक्षक ढाली वापरत. इतरांकडे ढाली नसत. बाकदार तलवार खुपसण्यास आणि काटण्यास उपयोगी पडे. घोड्यावरून दौडताना एक हलका व पायउतार होऊन लढण्यासाठी दुसरा भारी असे दोन तीरकमठे, याशिवाय आकडायुक्त फाळ असलेला भाला व पाश इ. आयुधे स्वाराकडे असत. स्वाराबरोबर आणखी एक राखीव घोडा असे. वीराची रणसामग्री जय्यत ठेवण्याचे काम बायका करीत. रणतंत्र हे घोडा व स्वार यांना अनुकूल असे. सैन्याची विभागणी करून शत्रूवर अनेक दिशांकडून हल्ला करणे, शीघ्र व दूरपल्ल्याच्या हालचाली करून शत्रूला चकित करणे यांवर भर असे. अनेक दिशांकडून आलेल्या तुकड्यांनी झटपट एकत्र होऊन शत्रूवर तुटून पडणे असे रणतंत्र होते. चीनमधील तटबंद गावांवरील हल्ल्यांच्या अनुभवावरून मंगोल सेनेने वेढा घालण्याचे आणि तटबंदी फोडण्याचे तसेच आगलाव्या बाणांचा वापर करण्याचे कौशल्य संपादन केले होते. मैदानावरील लढाईत तौघलमा, बगल हल्ले यांसारखी तंत्रे वापरून शत्रूला कोंडून लढाईचा निकाल लावला जाई. आगेकूच करताना मुख्य सेनेच्या खूप पुढे टेहेळणी पथक, त्यामागे बिनीपथक व मुख्य सैन्य असे. बिनीपथकात ३ हजार व मुख्य सैन्यात दीड लाखापर्यंत घोडेस्वार असत. नक्षत्रतारे व सूर्याचा उदयास्त वगैरे पाहून, दिशा ओळखून हजारो किमी. अंतर मंगोल तुकड्या कापू शकत. उपसेनापतींना स्वतःचे चातुर्य व समयोचित कसब वापरण्यास मोकळीक ठेवली जाई. या मंगोल सैन्याला यूरोपीय लोक ‘सोनेरी धाड’ म्हणून ओळखीत. मंगोल धाड पोलंडपर्यंत पोहोचली होती चंगीझखानाने इराणची मुस्लिम राजवट संपुष्टात आणली.

यूरोपीय युद्धपद्धती : यूरोपीय सरंजामशाहीत चिलखत वापरणारे सरदार, घोडेस्वार व पायदळ असे सैन्याचे विभाग होते. गढ्या, दुर्ग, घोडे, लोखंडी चिलखत ही सरदारांची युद्धसामग्री असे. सैनिकी प्रशिक्षणाचा फायदाही त्यांना मिळे. सरदार आणि त्यांच्या खाजगी सेना यांना पोसण्यासाठी सामान्य शेतकरी राबत असे. एकंदर सर्वच क्षेत्रांत सरदारांचा पगडा होता राजालाही त्यांची मर्जी व ध्येयधोरणे सांभाळणे व राबवणे भाग पडे. सरंजामी रयत व इतर श्रमिकांना लष्करी कार्यापासून दूर ठेवण्याचे धोरण होते. तोफा व दारूगोळा आल्यानंतरच सरंजामदार व सरंजामशाही यांचा प्रभाव कमी करणे राजांना शक्य झाले. ख्रिश्चन पुरोहित हे मुस्लिम व ज्यू धर्मीयांविरुद्ध सरंजामदारांना युद्धात गुंतवून ठेवीत. काहीच कारण नसले, तर ‘जुस्त टुर्नामेंट’ या चढाओढींद्वारा त्यांची युद्धलालसा जिरवली जाई. खनिज संपत्तीचा शोध, औद्योगिक उत्पादन व वाहतूक साधने यांच्या विकासामुळे तसेच धार्मिक युद्धांच्या अनुभवावरून युद्ध लढण्याचे नवीन संकेत प्रस्थापित होऊ लागले तथापि सैनिकी रणतंत्राचा विकास मंदगतीचा होता. समाजातील मध्यम व कनिष्ठ वर्गाची शक्ती वाढण्याची भीती राजे व राजनिष्ठांना वाटे. फ्रेंच राज्यक्रांतीने यूरोपीय समाजाला जागृत केले. राष्ट्र-राज्य व राष्ट्रीयत्व या संकल्पना दृढ झाल्या. वैज्ञानिक शोध व नवीन दळणवळण साधने-वाफेची एंजिने, रेल्वे, तारायंत्र- यांमुळे युद्धपद्धतीत मूलग्राही बदल झाले. उदा., युद्धक्षेत्राचा विस्तार, सैन्याची शीघ्र संचारगती, बंदुका-तोफांत सुधारणा वगैरे. क्रिमियाच्या युद्धातील जखमी व आजारी सैनिकांची हेळसांड पाहून⇨फ्लॉरेन्स नाइटिंगेल या स्त्रीने सैनिकी रुग्णालये, स्त्री शुश्रूषापथके यांस चालना दिली (१८५५). त्यातूनच पुढे ⇨रेडक्रॉस  ही संस्था उदयास आली.

चिनी दृष्टिकोन : चिनी संस्कृतीत चीन हे स्वर्गीय साम्राज्य असून त्याचा सम्राटही गुणसंपन्न असतो आणि इतर समाज संस्कृतिहीन असल्याने त्यांना सुसंस्कृत करणे हे चीनचे परमकर्तव्य आहे, अशी मिथ्यकथा प्रचलित आहे. महायान बौद्धपंथातील मंजुश्री ऊर्फ मंजुनाथ बोधिसत्त्वाची संकल्पना चीनचा मंगोल सम्राट कूब्लाईखानाने उचलली व तीनुसार चिनी साम्राज्याचा विस्तार केला. याशिवाय परकीय राजांनी चिनी सम्राटाला पाठविलेल्या भेटवस्तू तसेच आपापसांतील व्यापारी संबंध या गोष्टी सम्राटाला नजर केलेल्या खंडणीच आहेत असे एकतर्फी मानून, असे राजे व देश हे चिनी सम्राटाचे मांडलिक समजण्यात येऊ लागले. माओप्रणीत चिनी पुनरुज्जीवन करताना ‘पंचशील’ तत्त्वांसारख्या घोषणा स्वीकारून चीनचे तथाकथित गेलेले प्रदेश परत चीनमध्ये आणावयाचे, ही कार्यवाही चालू आहे [⟶भारत-चीन संघर्ष]. चीन हे राष्ट्र जरी साम्यवादी असले आणि साम्राज्यवाद व वसाहतवाद यांविरुद्ध असले, तरी वरील चिनी विचारसरणीचे अंतःप्रवाह टिकूनच असल्याचे दिसते.

चीनने १९४९ ते १९७५ या कालात उत्तर व्हिएटनाम व उत्तर कोरिया यांचा पक्ष घेऊन फ्रेंच व अमेरिकन साम्राज्यवादी शक्तींना माघार घेण्यास भाग पाडले. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. माओच्या मृत्यूनंतर चीनने व्हिएटनामला धडा शिकवण्याचा लष्करी प्रयत्न केला (१९७९), पण तो फसला.

संघर्ष व प्रतिरोध सामाजिक प्रक्रियेतच अंतर्भूत असतात, असे माओचे एक मूलगामी तत्त्व होते. या तत्त्वावरच माओचे युद्धसिद्धांत आधारलेले होते. अनेक अडचणी व हालअपेष्टा यांच्यावर मात करण्यास मनुष्याची जबदरस्त इच्छाशक्ती कारणीभूत असते, असेही त्याचे मत होते. चँग-कै-शेकच्या लढाऊ विमानांचा व रणगाड्यांचा पराभव साम्यवादी सेनेच्या ‘रागी (चिनी मिलेट) आणि रायफली’ करतील, हे त्याचे म्हणणे सत्य ठरले. त्यातूनच ‘दमछाकी युद्ध’ (प्रोट्रॅक्टेड वॉर) ही युद्धनीती उदयास आली. शत्रू हा कस्पटासमान मानावा, तथापि दमछाकी युद्धात रणतंत्राच्या  दृष्टीने त्याला महत्त्व दिले पाहिजे, असा त्याचा सिद्धांत होता. या सिद्धांताप्रमाणे क्रांतीवादी व स्थितिवादी यांच्यातील असमतोल उलटविण्याच्या दृष्टीने तात्पुरते रणतंत्र व दीर्घ मुदतीचे व्यूहतंत्र (स्ट्रॅटिजी) आखली पाहिजे, अशी माओची विचारधारा होती. माओने युद्ध व शांतता हा भेद न मानता त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या. कोरियन युद्धामुळे आलेल्या अनुभवावरून माओच्या युद्धसंकल्पनेत बदल झाला. मनुष्याच्या इच्छाशक्तीचे तत्त्व आधुनिक विज्ञान आणि तंत्रविद्यांपेक्षा कनिष्ठ असून ते तत्त्व आधुनिकतेचे स्थान घेऊ शकणार नाही, हे त्यास पटू लागले. चीनचे औद्योगिक धोरण, अणुऊर्जा व प्रक्षेपणास्त्रातील प्रगती, सैन्याची पुनर्रचना हे लक्षात घेता, माओनंतरच्या चिनी नेत्यांना देखील चिनी सामाजिक अस्मिता लक्षात घेऊन, युद्धदृष्टी व रणतंत्र यांत कालोचित बदल करण्याची आवश्यकता पटू लागल्याचे दिसते.


युद्धाचे परिणाम : गेल्या सु. ५,५०० वर्षांत जगात १४,००० युद्धे झाली. १८१६ ते १९८० या काळात २२४ युद्धे झाली. त्यांपैकी ६७ आंतरदेशीय, ५१ साम्राज्यावादी /वसाहतवादी आणि १०६ यादवी युद्धे होती. यादवी युद्धे वगळल्यास एकूण १६५ वर्षांपैकी फक्त २० वर्षांच्या कालावधीतच प्रत्यक्ष युद्धे झाली नाहीत. ११८ युद्धांत (यादवी युद्धे वगळून) ३ कोटी १० लक्ष पहिल्या महायुद्धात ९० लक्ष दुसऱ्या महायुद्धात १ कोटी ५० लक्ष कोरिया युद्धात २० लक्ष अशी सैनिकहानी झाली.

वरील कालावधीत फाळणीपूर्व हिंदुस्थानशी संबंधित अशी नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. देशांतील युद्धे ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळे झाली. या युद्धांत हिंदी सैनिकांना आपले प्राण वेचावे लागले. प्राणहानीचा तपशील फारसा उपलब्ध नाही. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल तशीच स्थिती आहे. सध्या चालू असलेल्या इराक-इराण युद्धात १९८५ पर्यंत दहा लाख माणसे ठार झाली. या युद्धात बिगरसैनिक व सैनिक हा भेद दिसत नाही.

कत्तली, तोफांचे भडिमार व बाँबहल्ले, वेढाबंदी, आर्थिक ताण व एकूण अस्थिर परिस्थिती यांमुळे बिगर-सैनिकांची युद्धात हानी होते. नेपोलियनच्या युद्धमालिकेत ग्रामीण भाग बेचिराख झाल्याने व युद्धजन्य रोगराईमुळे स्पेनचे फार नुकसान झाले. हवाई बाँबहल्ल्यांमुळे दुसऱ्या महायुद्धात १९४३ ते १९४४ या काळात जर्मनीत दर महिन्यांची मृत्युसंख्या ८,१०० ते १४,००० होती. याच युद्धात एकूण ४ ते ५ लक्ष जर्मन, ६० हजार ब्रिटिश, ३ लक्ष ४० हजार जपानी बिगरसैनिकी लोक मारले केले. दुसऱ्या महायुद्धात एकूण प्राणहानी पुढीलप्रमाणे झाली : यूरोप–३·७ कोटी, आशिया–१·२३ कोटी, अमेरिका–३·४ लक्ष, आफ्रिका–१० लक्ष व ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड–४० हजार.

युद्धाच्या अनेक सुपरिणामांचा आणि दुष्परिणामांचा आढावा घेताना हानी आणि कल्याण असा विरोधाभास दिसून येतो. युद्धामुळे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता यांना जोराची चालना दिली जाते. क्रिमिया व बोअर युद्धासाठी जेव्हा ब्रिटनमध्ये सैनिकभरती सुरू झाली, तेव्हा जवानांच्या दुर्बळ व रुग्ण अवस्थेची जाणीव ब्रिटिश शासनाला झाली आणि यातूनच जनतेच्या आरोग्यासंबंधी पाहणी करण्याची व राष्ट्रीय आरोग्य सेवा निर्माण करण्याची गरज लक्षात आली. पहिल्या महायुद्धाची शंका आल्यानंतर ब्रिटनमध्ये ‘राष्ट्रीय धडधाकटता’ (नॅशनल फिटनेस) ही एक गंभीर राजकीय समस्या झाली. युद्धामुळे दोन प्रकारे विकास होण्याची शक्यता असते : (१) औद्योगिक उत्पादनावर युद्धकार्य अवलंबून असल्याने श्रमिकवर्गाला भरपूर श्रममूल्य देऊन त्याला संतुष्ट ठेवावे लागते एवढेच नव्हे, तर श्रमिक नेत्यांना शासनव्यवस्थेत समाविष्ट करून घ्यावे लागते. श्रमिक सामूहिकपणे राजकीय शक्ती वापरू शकतात. ब्रिटनमध्ये १९१८ साली मताधिकारात वाढ होऊन कामगार आणि श्रमिकवर्गांना तसेच बहुसंख्य स्त्रियांनाही मताधिकार मिळाले. (२) सैनिकी सेवेतील अनुभवांमुळे जनतेत राष्ट्रीय एकात्मता आणि समानबंधुत्व दृढ होते. निरनिराळ्या सामाजिक गटांतील व्यक्तींच्या सामाजिक जाणिवा व निष्ठा वाढतात. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनमधील श्रमिकांचा संघर्ष व लोकशाहीविरोधी कायद्याचे निर्मूलन इ.गोष्टी उल्लेखनीय आहेत.युद्धात नोकरशाहीची सामाजिक बांधीलकी (उदा., अन्नधान्य वितरण, बाल व वृद्ध कल्याण) व सेवाभाव इ. जागृत होतात. युद्धामुळे कधी कधी विविध राजकीय पक्षांचे संयुक्त शासन प्रस्थापित होते.

तथापि युद्धाचे काही दुष्परिणाम होतात : समाजात शारीरिक व मानसिक रोगटपणा व रोगराई पसरता, महागाई वाढते व यामुळे लोकजीवनावर विपरित परिणाम होतो. युद्धोत्तर काळात दैववाद व भोगवाद यांचा प्रभाव वाढू लागतो. वेश्याव्यवसाय वाढीस लागतो. शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण जनता शहरांकडे धाव घेऊ लागते. युद्धामुळे नवीन राज्ये प्रस्थापित होऊन राजकीय नकाशे बदलतात. नवे सीमाप्रश्न निर्माण होतात. मध्ययुगात भारतावरील आक्रमणे व अंतर्गत युद्धे यांमुळे नवीन धर्मपंथ–उदा., भक्तिमार्ग, वीरशैव, शीख धर्म इ. – उदयास आले. आधुनिक युद्धात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळत आहे. प्रजोत्पादननियंत्रण पहिल्या महायुद्धापासून सुरू झाले. युद्धसंबंधित वैज्ञानिक व तांत्रिक शोधांमुळे कौटुंबिक जीवनातील श्रम व वेळ वाचविणे शक्य झाले. सैनिकांना मारणाऱ्या विषारी वायुद्रव्यांचा उपयोग शेती उत्पादनाच्या क्षेत्रात उपयोगी पडत आहे. युद्धोत्तर काळात बेकारी वाढू लागते. दारूगोळा, शस्त्रास्त्रे इत्यादींच्या निर्मितीमुळे जीवनोपयोगी कच्च्या मालात घट होते. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो [⟶शिधावाटप]. शास्त्रास्त्रनिर्मिती कार्यातील अधःसंरचना (कारखाने, यंत्रे) शांतताकालीन कार्याला उपयोगी पडेलच असे नाही. स्थावरजंगम मालमत्तेची हानी भरून काढण्यास भांडवल अपुरे पडते. राष्ट्रीय कर्जबाजारीपणा वाढू शकतो. शांतताकालीन आर्थिक व्यवस्था व युद्धकालीन व युद्धोत्तर अर्थव्यवस्था यांची सांगड घालणे हे एक मोठे राजकीय आव्हान ठरते.


युद्धविषयक कायदे व संकेत : युद्धामुळे सैनिकांना, सैनिकेतर व्यक्तींना व इतर गोष्टींना जी हानी पोहोचते आणि क्रूर वागणूक मिळते, त्यात सौम्यपणा आणण्यासाठी व विध्वंसनाला आळा घालण्यासाठी पुरातन कालापासून प्रयत्न होत आहेत. आदिम जमातींमध्ये लढाई होण्यापूर्वी काही शर्ती दोन्ही पक्ष मान्य करीत आणि त्याप्रमाणे मारामारी होत असे. अशाच शर्तींचे रूपांतर पुढे पथा, चालीरीती यांत होऊन परंपरा प्रस्थापित झाल्या, तरी  दर वेळी त्यांची उजळणी करूनच मारामारी केली जाई. पूर्वजांची स्मृतिचिन्हे, पवित्र मानल्या गेलेल्या नैसर्गिक वस्तू (वृक्ष वगैरे), पाणीपुरवठा इत्यादींचे नुकसान न करणे या प्रमुख अटी असत. रामायणा त राम-रावण युद्धासाठी आचारसंहिता होती. ही राम-रावण कालीन संहिता परंपरा ठरली नाही, मात्र कौरव-पांडव युद्धाचारसंहिता हा जगातील आद्य युद्धकायदा आहे, असे म्हटले जाते. उदा., नीच प्रयत्नाने पृथ्वीचे राज्य मिळविणे त्याज्य (म. भा. शां. प. ९६·१) आहे. शरणागत, विमुक्त केशाचा योद्धा, घोडा, शस्त्र किंवा रथविहीन सैनिक वा युद्धात झाडावर किंवा उंच जागी आसरा घेतलेला व न लढता बसून असलेला विनम्र योद्धा इत्यादींशी लढू नये वा त्यांना ठार मारू नये, असे संकेत होते (म. भा. शां. प. राजधर्म ९५). गौतम (१७·३०), आपस्तंब (२·५·१०), बौधायन (१·१०·१८) इ. धर्मसूत्रांतही युद्धासंबंधी आचारनियम आहेत. भारतातील युद्धविषयक संकेतासंबंधीची माहिती रघुवंश तसेच अल्‌ बिरूनी वा अल्‌ बतूता यांच्या ग्रथांत मिळते. तथापि प्रत्यक्ष आचरणात त्या आदर्शांचा भंगच करण्यात येत असे, असे दिसते. इ. स. आठव्या शतकापासून या आचारसंहिता इतिहासापुरत्याच उरल्या कारण भिन्न धर्म व संस्कृतीच्या परकीयांची आक्रमणे भारतावर होऊ लागली.

यूरोपात ह्यूगो ग्रोशिअस याने यूरोपीय धार्मिक युद्धातील क्रूरकृत्यांच्या पार्श्वभूमीवर युद्धाचाराविषयी विचार प्रकट केले. त्यांना ख्रिस्ती धर्मविचार व शिलेदारी दाक्षिण्य यांचा आधार होता. त्याने धार्मिक व अधार्मिक युद्धांतील न्याय्य व अन्याय्य अथवा नैतिक व अनैतिक यांसारखी भिन्नतादर्शक तत्त्वे त्याज्य ठरविली. ग्रोशिअसच्या सिद्धांताचा विकास आंतरराष्ट्रीय युद्ध-कायद्यात झाला. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत फ्रान्सिस लायबर याने अमेरिकी सैन्याच्या कृत्यावर नियंत्रणासाठी काही विधिवत नियम घातले. हेग संकेतांत त्यांचा समावेश करण्यात आला [⟶ हेग परिषदा].

वेळोवेळी सर्वसंमत झालेले युद्धविषयक कायदे व संकेत यांचा ढोबळ तपशीलही देणे अशक्य आहे, म्हणून पुढे त्यांचा नामोल्लेख केला आहे. (१) पॅरिस जाहीरनामा (१८५६)–सागरी युद्ध (२) ⇨जिनीव्हा युद्धसंकेत, (३) सेंट पीटर्झबर्ग जाहीरनामा (१८६८)–दारूगोळा, (४) पहिली हेग शांतता परिषद (१८९९) : स्थल/भूमी युद्ध हेग संकेत (१८९९, १९०७) व वेळोवेळी झालेल्या हेग येथील परिषदा, (५) पहिल्या व दुसऱ्या महायुद्धोत्तर विधी व संकेत : राजशिष्टाचार करार १९२५ व १९३६ आणि जिनीव्हा युद्धसंकेत १९४९, (६) राष्ट्रसंघ सनद (पहिल्या युद्धानंतर) व्हर्सायचा तह, संयुक्तराष्ट्र सनद (दुसऱ्या महायुद्धानंतर).

संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी संरक्षण सेनाविषयक कायदे व नियम वरील युद्धविषयक आंतरराष्ट्रीय कायदे, संकेत इत्यादींना अनुसरून केलेले असतात. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस या संस्थेनेही याबाबतीत उल्लेखनीय कार्य केले आहे.

पहा : अर्थव्यवस्था, युद्धकालीन कमांडो खंदक युद्धतंत्र गनिमी  युद्धतंत्र घातपात छत्रीधारी सैन्य जंगल युद्धतंत्र जैव व रासायनिक युद्धतंत्र टेहळणी, सैनिकी डोंगरी युद्धतंत्र तडित्‌ युद्धतंत्र दारूगोळा धनुर्विद्या नाविक युद्धतंत्र पाणबुडी युद्धतंत्र पारिस्थितिकीय युद्धतंत्र मरुभूमि युद्धतंत्र महायुद्ध, दुसरे 

महायुद्ध, पहिले युद्धकैदी युद्धगुन्हे व खटले युद्धजन्य धोका विमा युद्धनिषिद्ध रणनीति वायु युद्धतंत्र व्यूहतंत्र शस्त्रसंभार शांतता व युद्धप्रतिबंध शीतयुद्ध संरक्षणात्मक तारायुद्ध सांग्रामिकी सेनाप्रभाववाद सैनिकी प्रशासन.

संदर्भ : 1. Andrews, K. R. Trade, Plundes and Settlement, Cambridge, 1984.

    2. Aron, Raymond, Peace and War, London, 1976.

   3. Bailey, S. D. How Wars End: The United Nations and the Termination of Armed Conflict,1946-64, Vol. I, Oxford, 1982.

  4. Davie, M. R. The Evolution of War: A Study of it’s role in Early societies, New Haven,1929.

  5. Dikshitar, V. R. R. War in Ancient India, Madras, 1944.

  6. Drekmeier, Charles, Kingship and Community in Early India, Oxford, 1962.

  7. Earle, E. M. Makers of Modern Strategy, Princeton, 1971.

  8. Garvey, J. E. Marxist–Leninist China: Military and Social Doctrine, New York, 1960.

  9. Jack and Levy, War in Modern Great Power System: 1495-1975, London, 1984.

10. Krishna Chaitanya, Mahabharat, New Delhi, 1985.

11. Lacquer, Walter, Europe since Hitler, The Rebirth of Europe, Harmondsworth, 1982.

12. Martin, Laurence, Arms and Strategy, London, 1973.

13. Montgomery, of Alamein, A History of Warfare, London, 1968.

14. Montross, Lynn, War Through the Ages, New York, 1960.

15. Nagendra Singh, The Theory of force and Organisation of Defence in India Constitutional History. Vol. II, Bombay, 1969.

16. Pear, T. H. Psychological Factors of War and Peace, London, 1950.

17. Richardson, L. F. Arms and Insecurity, Chicago, 1960.

18. Richardson, L.F.Statistics of Deadly Quarrels, Chicago, 1960.

19. Romanujan, A. K. Poems of Love and War, Delhi, 1985.

20. Russell, Bertrand, History of Western Philosophy, London, 1955.

21. Semmel, Barnard, Ed. Marxism and The Science of War, Oxford, 1981.

22. Sokolovskly, V. D. Soviet Military Strategy, London, 1973.  

23. Spengler, Oswald, The Decline of the West, London, 1959.

24. Stallworthy, Jon, Ed. The Oxford Book of War Poetry, Oxford, 1984.

25. Waltzer, Michael, Just and Unjust Wars, Harmondsworth, 1980.

26. Wright, Quincey Study of War, Chicago, 1964.

२७. चौहान, देवीसिंग, भारत ईराणी  संश्लेष  भाग १, पुणे, १९७३.

दीक्षित, हे. वि.