गस्त : ( पॅट्रोल ). ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. सर्व लष्करी दलांत शत्रूच्या सैन्याबद्दल माहिती मिळविण्याकरिता गस्ती तुगड्या असतात. शहरांतून शहरवासीयांची मालमत्ता व जमीन सुरक्षित राखण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते. काही मोठ्या शहरांतून अग्निप्रतिबंधक दलाचे सेवक, आग लागल्यास चटकन उपाय योजण्याच्या उद्देशाने गस्त घालीत असतात. खेडेगावांतून चोरांचा उपद्रव टाळण्याकरिता रात्रीच्या वेळी पाळीपाळीने लोक पहारा देतात. मोठ्या शहरांतून वाहनांचे वेगनियंत्रण करण्यासाठी आणि अपघातप्रसंगी तातडीने उपाययोजना करण्यासाठी फिरत्या पोलीस तुकड्या असतात. तथापि लष्करी यंत्रणेत गस्तीला विशेष महत्त्व आहे. रणक्षेत्रातील काही महत्त्वाच्या जागांचे रक्षण करणे, शत्रूला उपद्रव देणे, लपून राहिलेल्या शत्रूसैनिकांचा नायनाट करणे त्याचप्रमाणे शत्रूच्या मोर्च्यांची  व तेथील सैनिक व शस्त्रास्त्रबलाची माहिती काढणे, आपल्या बाजूची माहिती काढण्याकरिता आलेल्या शत्रूच्या तुकड्यांना पायबंद घालणे, अशी कामे लष्करी गस्ती पथके करतात. गस्ती तुकड्यांचे वर्गीकरण त्यांना नेमून दिलेल्या कामावर अवलंबून असते. वर्गीकरणाप्रमाणे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सैनिक व शस्त्रास्त्रे यांची योजना करण्यात येते. गस्तीचे वेळापत्रक, कार्यक्रम, मार्ग, टप्पे, परवलीचे संकेत व नेतृत्व इ. गोष्टी कौशल्याने आखल्या जातात. आखणी व योजना वरिष्ठ लष्करी केंद्रे करतात. काही गस्ती प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील : (१) टेहळणी पथके : हाणामारी न करता पाहून, ऐकून किंवा अन्य प्रकारे शत्रूची माहिती मिळवणे, हे काम टेहळणी पथकाचे असते. (२) लढाऊ पथके : प्रसंग आल्यास हाणामारी करून, शत्रूसैनिक पकडून माहिती गोळा करणे व शत्रूला गस्त घालण्यास पायबंद करणे एखादी विशिष्ट मोक्याची जागा वा वाट शत्रूला मिळू नये म्हणून प्रयत्न करणे, इ. कामे या पथकाची असतात. (३) खडी पथके : एका नियुक्त केलेल्या जागीच लपून राहून दिलेली कामगिरी पार पाडणे. याशिवाय पूल, पायवाटा, नद्या, किनारपट्टी इत्यादींची तसेच पूल व पूल बांधण्यास योग्य जागा, सुरूंग वगैरे गोष्टींविषयी तांत्रिक माहिती गोळा करण्याकरिता तांत्रिक दलाच्या गस्ती तुकड्यांचा उपयेग करतात. रणांगणावरील शत्रूच्या विमानांचा आकाशसंचार बंद पाडण्याकरिता वायुसेनेची गस्त असते. गनबोटी, पाणतीर, पाणबुडी, फ्रिगेट्‌स, हेलिकॉप्टर व लढाऊ विमानांचा उपयोग नौसेना आपल्या गस्तीकरिता करतात. पाणबुड्यांच्या शोधाकरिता आधुनिक तांत्रिक उपकरणांनी सज्ज असलेले हेलिकॉप्टर आणि लढाऊ जहाजे हल्ली प्रचारात आहेत.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिश नौसेनेच्या ‘डोव्हर’ गस्ती पथकाने जर्मन ‘त्सिब्रुग’ आरमारी तळावर हल्ला करून त्यांची मोडतोड केली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन पाणबुडी यू-४७ ही ब्रिटिश आरमारी तळ ‘स्कापा फ्लो’ यात घुसली व ‘रॉयल ऑर्क’ हे मोठे आरमारी जहाज पाणसुरूंगाने बुडविण्यात आले. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर अचानक हल्ले सुरू केले. त्याच रात्री पाकिस्तानी पाणबुडी ‘गाझी’ विशाखापटनम्‌च्या आरमारी तळाभोवती ‘विक्रांत’ या भारतीय विमानवाहू जहाजाच्या मागावर होती. त्याच वेळी ‘राजपूत’ हे भारतीय लढाऊ जहाज तळाच्या बाहेर गस्तीवर निघाले. त्याच्या ‘सोनार’ या विद्युत्‌शोधयंत्रावर एका पाणबुडीच्या अस्तित्वाचा इशारा मिळाला. पाणबुडी शत्रूची आहे, हे निश्चित झाल्यावर ‘राजपूत’ने समुद्राच्या पोटात जलस्फोटास्त्रे टाकून ‘गाझी’ला रसातळाला पोहोचविले.

पहा : किनारासंरक्षण.                

भालेराव, य़. त्र्यं. दीक्षित, हे. वि.