अधिरोध : (एंबार्गो). आपल्या बंदरातील व्यापारी नौकांवर किंवा विशिष्ट प्रकारच्या मालाची ने-आण करण्यावर बंदी घालण्याचा देशाचा हक्क. अधिरोध पूर्णपणे सफल व्हावा ह्यासाठी आपल्या हवाई तळांवरील विमानांवर व मालाच्या वाहतुकीवरसुद्धा अशी बंदी घालणे आवश्यक असते.

आपल्या बंदरात आश्रय घेणाऱ्या परराष्ट्रीय नौकांचा तात्पुरता ताबा घेण्याचा युध्यमान राष्ट्रांचा कायदेशीर हक्क, परदेशी नौकांच्या किंवा विमानांच्या हालचालींस करण्यात येणारा तात्पुरता अटकाव अथवा बहिष्कार ह्यांच्यात व अधिरोध ह्यांमध्ये तत्त्वत: फरक असतो.

अधिरोध हा नागरी उपायात्मक असू शकतो अथवा शत्रुत्वाच्या दृष्टीनेही तो जारी करता येतो. बंदी घातलेल्या परदेशी नौकांची वा मालाची दर्यावर लुटालूट होऊ नये किंवा आपल्याला नको असलेल्या देशांना तो माल पुरविला जाऊ नये हा हेतू नागरी स्वरूपाच्या अधिरोधामागे असतो. अशा प्रकारचा अधिरोध अमेरिकेने १८०७ मध्ये जारी केला होता. शत्रुत्वाच्या हेतूने केला जाणारा अधिरोध म्हणजे परदेशी जहाजे व मालमत्ता अटकेत धरून ठेवणे. अशा प्रकारचा अधिरोध बदला घेण्यासाठी किंवा इतर राजकीय हेतू साधण्यासाठी अंमलात आणण्यात येतो. १८०७ मध्ये अमेरिकेने फ्रान्स व ब्रिटन यांविरूद्ध वापरलेला अधिरोध अशा स्वरूपाचा होता. राजकीय हेतूने अंमलात आणविलेला अधिरोध हा युध्यमान राष्ट्राला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वा मदत मिळू नये यासाठी तटस्थ राष्ट्राने युध्यमान राष्ट्रावर किंवा युध्यमान राष्ट्राने तटस्थ राष्ट्रावर घातलेला असतो. अशा प्रकारचा अधिरोध अमेरिकेने १९३७ मधील स्पेनच्या यादवी युद्धात आपली तटस्थता टिकवण्यासाठी घातला होता.

राष्ट्रसंघाने अधिरोधास मान्यता दिली होती. संयुक्त राष्ट्र सनदेच्या ४१ व्या कलमान्वये सैनिकी आक्रमणात आक्रमकांविरूद्ध अधिरोध अंमलात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरियन युद्धात उत्तर कोरियाला व चीनला शस्त्रास्त्रे व इतर युद्धोपयोगी साहित्य पुरविण्यावर अधिरोध जारी करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी सभासदराष्ट्रांना आवाहन केले होते. १९६२ मध्ये अमेरिकेने शिक्षा म्हणून क्यूबावर अशा प्रकारचा अधिरोध जारी केला होता.

पाटणकर, गो. वि.