सेनाप्रभाववाद : (मिलिटॅरिझम). व्यावसायिक सैनिक वा सैन्य यांमध्ये आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती, चैतन्य आणि लष्करी स्थिरभाव. शासनव्यवस्थेतील लष्करी वर्गाचे वा लष्कराचे वर्चस्व हाही सेनाप्रभाववाद होय. राष्ट्रीय हिताच्या संवर्धन-संरक्षणार्थ राज्य शासनाने प्रबळ, प्रभावी व सक्षम लष्कराचा प्रतिपाळ करावा, अशी जनतेची इच्छा असते. युद्धखोरी वा युद्धाची खुमखुम हा सेनाप्रभाववादाचा आविष्कार होय.

सेनाप्रभाववाद हा अनेक देशांच्या साम्राज्यवादी किंवा विस्तारवादी तत्त्वप्रणालीतील महत्त्वपूर्ण मूलघटक असतो. प्राचीन ॲसिरियन साम्राज्य, स्पार्टासारखी ग्रीसमधील नगरराज्ये, रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, इटलीचे वासाहतिक साम्राज्य, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा नव-साम्राज्यवाद इत्यादी त्याची काही उदाहरणे होत. शिवाय बेनीतो मुसोलिनी, ॲडॉल्फ हिटलर, जोझेफ स्टालिन या हुकूमशाहांनी सेनाप्रभाववादाच्या जोरावर सत्ता ग्रहण केली व ती राबविली. दुसऱ्या महायुद्धानंतर सेनाप्रभाववाद वसाहतोत्तर आशिया-आफ्रिका खंडांतील राष्ट्रांतून दृग्गोचर होतो (उदा., आशियातील उत्तर कोरिया, म्यानमार आणि थायलंड आफ्रिकेतील लायबीरिया, नायजेरिया आणि युगांडा). लॅटिन अमेरिकेतील चिली, व्हेनेझुएला या देशांतूनही सेनाप्रभाववाद तेथील लष्करी क्रांतीतून उद्‌भवला. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने सेनाप्रभाववादाची चुणूक दाखविली. स्वातंत्र्योत्तरकाळात भारत-चीन युद्धातील (१९६२) पराभवानंतर भारताने लष्कराचा विस्तार व आधुनिक शस्त्रास्त्रात प्रगती करून लष्करी सामर्थ्य वाढविले. त्याचे फलित पुढे पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धांत दृष्टोत्पत्तीस आले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सोव्हिएट रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्रांमधील शस्त्रास्त्र स्पर्धा किंवा अण्वस्त्र स्पर्धा ही सेनाप्रभाववादाची अलीकडील प्रमुख उदाहरणे होत.

देशपांडे, सु. र.