गनिमी युद्धतंत्र : युद्ध लढण्याचा एक प्रकार किंवा तंत्र. हे युद्धतंत्र नवीन नसले, तरी विसाव्या शतकात दुसर्‍या महायुद्धानंतर त्याची महती विशेषत्वाने वाढली. चीनमध्ये माओ-त्से-तुंग आणि व्हिएटनाममध्ये जनरल झ्यॅप यांनी गनिमी तंत्राचा उपयोग करून असाधारण यश मिळविले. त्यानंतर १९५८ च्या अखेरीस क्यूबात जी क्रांती झाली, तिचेही यश चे गेव्हारा यांच्या कुशल गनिमी नेतृत्वाला देण्यात येते. या तिघांनी गनिमी युद्धतंत्रावर ग्रंथरचनाही केली असल्यामुळे गनिमी युद्धतंत्राचे श्रेष्ठ भाष्यकार म्हणूनही ते प्रसिद्ध झाले. अशा रीतीने गनिमी युद्धतंत्र व त्याचे शास्त्र यांची विशेष चर्चाही दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत्वाने होऊ लागली.

मराठीतील ‘गनीम’ हा रूढ शब्द अरबी भाषेतील ‘घनीम’ या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ लुटारू असा होतो. या तंत्राने महाराष्ट्रात औरंगजेब बादशहाशी मराठ्यांनी जवळजवळ २७ वर्षे लढून बादशहास जेरीस आणले. गनिमी तंत्राने लढणाऱ्या मराठ्यांना उद्देशून मोगलांनी हा शब्दप्रयोग वापरला आणि तो अद्याप प्रचारात आहे. गनिमी युद्धतंत्र म्हणजे मराठ्यांचे युद्धतंत्र असे समीकरण भारतात त्याकाळी रूढ झाले होते. पेशवाईत मात्र या युद्धतंत्राचा वापर कमी झालेला दिसतो.

इंग्रजीतील ‘गरिला वॉरफेअर’ या शब्दप्रयोगाचा ‘गनिमी युद्धतंत्र’ असा मराठी पर्याय आहे. स्पॅनिश भाषेतील युद्धवाचक शब्द ‘ग्युएरा’ (Guerra) असा असून त्यापासून लघुत्वदर्शक शब्द ‘ग्युएरिला’ असा होतो. तेव्हा ‘गरिला वॉरफेअर’ म्हणजे छोट्या लढायांचे तंत्र असा अर्थ होऊ शकतो. ‘गनीम’ आणि ‘गरिला’ या दोन्ही शब्दांमधून गनिमी युद्धतंत्राचे एक सर्वसामान्य सूत्र सूचित होते. अनपेक्षित छापे घालणे, लूटमार करणे, छोट्या चकमकी घडवून आणणे हे सर्व गनिमी युद्धतंत्रात येते.

गनिमी युद्धतंत्राची पूर्वपीठिका : भारतीय युद्धतंत्राच्या परंपरेत असा हा प्रकार पूर्वीपासून आढळतो. अथर्ववेद, रामायण, महाभारत यांत आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अशा प्रकारच्या युद्धतंत्राचे उल्लेख आढळतात. ‘असूर’ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते भारतातील आदिवासी लोक, ‘सुर’ म्हणजे ‘आर्य’ लोकांशी अधर्माने लढत, असे वर्णन केलेले आढळते. कौटिल्याने या तंत्राला ‘कूटयुद्ध’ असे नाव दिले आहे. कल्हणाच्या राजतरंगिणीत यास ‘तूष्णीं युद्ध’असे म्हटले आहे. येथे ‘तूष्णीम्‌’ म्हणजे गुपचूप.

ऐतिहासिक आढावा : अर्वाचीन भारतीय इतिहासात गनिमी युद्धतंत्र पद्धतीने स्वातंत्र्यासाठी जे प्रदीर्घ आणि यशस्वी संग्राम झाले, त्यांपैकी काही ठळक उदाहरणे पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) चौदाव्या शतकात अलाउद्दीन खल्जीने चितोड काबीज करून संपूर्ण मेवाड पादाक्रांत केल्यानंतर राणा हम्मीरने खल्जी सुलतानाविरुद्ध सतत २५ वर्षापर्यंत केलेले अखंड युद्ध. राणा हम्मीरने मेवाडच्या जनतेला स्थानांतर करण्याचा आदेश दिला होता व त्या आदेशानुसार लक्षावधी स्त्रीपुरुष खिलवाड्याच्या व भिलवाड्याच्या जंगलात राहण्यास गेले. शेकडो मैलपर्यंत गावे व शहरे ओसाड पडली. आक्रमकांना दाणावैरण व इतर रसद दिल्लीहून मागवावी लागे. पंचवीस वर्षांच्या लढाईनंतर राणा हम्मीरने चितोडसह सर्व मेवाड मुक्त केला. (२) सम्राट अकबराविरुद्ध राणा प्रतापने लढविलेले १४ वर्षांचे स्वातंत्र्ययुद्ध. राणा प्रतापाने मोगलांशी सहकार्य करणाऱ्या सर्व राजपुतांवर सामाजिक बहिष्कार पाळण्याचा आदेश दिला होता व तो अत्यंत कठोरपणे पाळण्यात आला. (३) औरंगजेबाच्या विरुद्ध राठोड वीर दुर्गादास व महाराज अजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेला संग्राम. (४) स्वराज्यस्थापनेकरिता शिवाजी महाराजांनी या तंत्राचा केलेला अवलंब. विशेषतः छत्रपती राजारामाच्या काळात औरंगजेबाच्या प्रचंड फौजांशी २७ वर्षे मराठ्यांनी केलेले गनिमी युद्ध. मराठ्यांच्या या युद्धतंत्रासंबंधी मुसलमानांचा अभिप्राय कसा होता, याचे वर्णन मल्हार रामराव चिटणीसांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या बखरीत केले आहे, ते असे: “अकस्मात यावे, बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा, शिपाईगिरीची शर्थ करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे, खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाहीत. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी कांदे खाऊन धावतात. त्यांस (मराठ्यांस) कसे जिंकावे? एक्या मुल्कांत फौज आली म्हणोन त्यांजवर रवानगी करावी तों दुसरेकडे जाऊन ठाणीं घेतात. मुलुख मारितात, हे आदमी नव्हत्‌ भूतखाना आहे”. माओ-त्से-तुंग, झ्यॅप, चे गेव्हारा यांचे गनिमी तंत्र यापेक्षा वेगळे नाही. मराठेसुद्धा शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत होते आणि सर्व मराठमोळी जनता त्यांना एकदिलाने सहकार्य करीत होती, हे लक्षात घेतल्यास आधुनिक गनिमी सेनानी म्हणून गाजलेल्यांच्या बरोबरीने संताजी घोरपडे व धनाजी जाधव ही नावे घेणे उचित ठरेल. (५) अखेरचा दाखला शिखांचा आहे. गुरू गोविंदसिंगांच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये शीख सैनिकांनी व जनतेने सतत ९५ वर्षे मोगली सत्तेशी निकराचा सामना दिला.


जगातील इतर राष्ट्रांनीही या युद्धतंत्राचा अवलंब केल्याचे आढळते. अमेरिकेतील मूळ रहिवाशी असलेल्या रेड इंडियनांनी यूरोपीय वसाहतकारांचा लोंढा थांबविण्याचा प्रयत्न या युद्धतंत्राने केला पण संघटनेच्या आणि एकजुटीच्या अभावी तो यशस्वी होऊ शकला नाही. नेपोलियनने स्पेन जिंकल्यानंतर (१८०८–१३) फ्रेंच सत्तेविरूद्ध स्पेनच्या जनतेने गनिमी युद्ध सुरू केले, फ्रेंचांची बरीच मोठी सेना स्पेनमध्ये अडकून पडली व जरी स्पेनमधील जनतेच्या गनिमी युद्धाला प्रत्यक्ष विजय मिळाला नाही, तरी फ्रेंचांचा अंतिम पराजय करण्यास त्यांच्या गनिमी युद्धतंत्राची मदत झाली.

दुसऱ्या महायुद्धात जर्मन व जपानी आक्रमकांनी व्याप्त केलेल्या प्रदेशात गनिमी युद्धतंत्राने संघटित प्रतिकार करण्यात आला होता. रशिया, यूगोस्लाव्हिया व फ्रान्स इ. देशांत प्रतिकारकांनी अशी बहुमोल कामगिरी बजावली. त्यांना ‘पार्टिझन’ म्हणत व त्यांच्या युद्धप्रकाराला ‘पार्टिझन वॉरफेअर’ असे म्हटले जाई. हे गनिमी युद्धतंत्रालाच मिळालेले वेगळे नाव होते.

चीनमध्ये माओ-त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली प्रथम १९२७ पासून क्यूमिंगटांगच्या राष्ट्रीय फौजांविरुद्ध, महायुद्धकाळात जपानी आक्रमक फौजांविरुद्ध आणि नंतर पुन्हा १९४९ पर्यंत राष्ट्रीय फौजांविरुद्ध असे दीर्घकालीन गनिमी युद्ध चालू होते.

व्हिएटनाममध्ये १९४६ पासून १९५४ पर्यंत फ्रान्सविरूद्ध व १९५४ पासून १९७२ पर्यंत अमेरिकेविरूद्ध असे सु. पंचवीस वर्षेपर्यंत गनिमी युद्ध चालू होते. पहिल्या कालखंडात फ्रेंचांपासून स्वातंत्र्य प्राप्त करून घेणे हा उद्देश होता व दुसऱ्या कालखंडात परदेशी सत्तांनी लादलेली फाळणी टिकू न देता व्हिएटनामचे अखंडत्व प्रस्थापित करणे हा होता.

क्यूबामध्ये कास्ट्रोच्या नेतृत्वाखाली बातीस्ताविरुद्ध १९५५ मध्ये पहिला गनिमी हल्ला करण्यात आला. १९५६ मध्ये कास्ट्रो व चे गेव्हारा यांनी सिएरा माएस्ट्राच्या डोंगरी भागात आश्रय घेऊन पद्धतशीर व संघटित गनिमी युद्धाला सुरुवात केली. ३१ डिसेंबर १९५८ रोजी या युद्धात त्यांना निर्णायक विजय मिळाला.

आफ्रिकेत १९५५ ते १९६२ पर्यंत अल्जीरियातील फ्रेंचसत्ता उलथून पाडण्यासाठी अल्जीरियन क्रांतिकारकांनी सतत सात वर्षे गनिमी तंत्राने लढा दिला. १८३० मध्ये स्थापना झालेली फ्रेंचांची साम्राज्यसत्ता या युद्धामुळे १९६२ साली समाप्त झाली.

फाळणीनंतर १९४७ साली अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानच्या पूर्व विभागात म्हणजे बांगला देशात पश्चिम विभागाच्या वर्चस्वाविरुद्ध तीव्र असंतोष होता. त्याचा स्फोट १९७० मध्ये झाला. २५ मार्चला पाकिस्तानने लष्करी कारवाई सुरू केली. शेख मुजीबूर रहमान यांना पकडले आणि जनतेवर भीषण अत्याचार सुरू केले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी ‘मुक्तिबाहिनी’ या नावाने गनिमी फौज उभारण्यात आली. स्वतंत्र व सार्वभौम बांगला देशाची घोषणा करण्यात येऊन एक अस्थायी सरकार स्थापण्यात आले आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा स्वातंत्र्याचा लढा निकराने लढविण्यात आला. नंतर भारतीय सेनेने ‘मुक्तिवाहिनी’ शी सहकार्य केले व दोघांनी मिळून पाकिस्तानचा संपूर्ण पराभव केला. बांगला देशाची ‘मुक्तिवाहिनी’ ही भारतीय उपखंडात निर्माण झालेली अगदी अलीकडची गनिमी सेना होय.

वरील ऐतिहासिक आढाव्यावरून या युद्धतंत्राचा उपयोग वेगवेगळ्या तीन प्रकारच्या परिस्थितीत करण्यात आल्याचे आढळते : (१) परतंत्र राष्ट्र ज्या बलाढ्य राष्ट्राच्या दास्यात सापडलेले असते, त्याच्याविरुद्ध मुक्तिसंग्रामाचा लढा या तंत्रानेच दिला जातो. याची अनेक उदाहरणे आहेत. (२) परकीय आक्रमणाचा प्रतिकार अशक्य वा अयशस्वी झाल्यानंतर स्वराष्ट्राचे विस्कळित झालेले सैन्य व देशभक्त नागरिक संघटितपणे प्रतिकार सुरू करतात व आपल्या युद्धाला लोकयुद्धाचे स्वरूप देतात. (३) स्वकीय परंतु जुलमी व अन्यायी राजवट उलथून पाडण्यासाठी शोषित जनता अंतर्गत युद्ध पुकारते, तेव्हा या युद्धतंत्राचाच वापर करण्यात येतो.

याशिवाय प्रबल राष्ट्रे आपल्या जवळपासच्या देशांत आपल्याला अनुकूल अशी राजकीय सत्ता स्थापन व्हावी म्हणून बंडाचा उठाव घडवून आणतात. त्यासाठी लष्करी शिक्षण व आर्थिक साहाय्य देऊन शस्त्रपुरवठाही करतात. या परिस्थितीतही गनिमी युद्धतंत्राचा उपयोग दोन्ही पक्षांकडून होऊ शकतो.

गनिमी युद्धाचे आधुनिक तंत्र : प्राचीन चिनी युद्धशास्त्रज्ञ सून झू यानेही आपल्या बुक ऑफ द वॉरमध्ये या तंत्राची चर्चा केली आहे. वेगाने हल्ला करणे, शत्रूला आश्वर्यचकित करणे आणि त्याची फसवणूक करणे ही महत्त्वाची सूत्रे त्याने त्यात मांडली आहेत. सून झूहा माओचा स्फूर्तिदाता समजला जातो. सून झूच्या मूळ विचारांचा अधिक विकास व विस्तार  माओने केला.

जगप्रसिद्ध युद्धशात्रज्ञ ⇨क्‍लाउझेव्हिट्‌झ  यानेही आपल्या ऑन वॉर या ग्रंथाच्या चौथ्या भागात या युद्धपद्धतीचा ऊहापोह केला आहे. तो या युद्धतंत्रास नागरी जनतेचे युद्ध असे म्हणतो. असा प्रतिकार तत्त्वनिष्ठेने प्रेरित झालेल्या जनतेकडूनच होऊ शकतो, असे त्याचे मत आहे.

परंतु आधुनिक काळाच्या पार्श्वभूमीवर आणि समृद्ध अनुभवांच्या अनिष्ठानावर गनिमी युद्धतंत्राची अधिक सांगोपांग चर्चा माओ-त्से-तुंग, जनरल झ्यॅप आणि चे गेव्हारा यांच्या ग्रंथांत सापडते. त्यांनी केलेले सैद्धांतिक विवेचन एकसारखे वाटले, तरी प्रत्येकाच्या विशिष्ट अनुभवामुळे त्यात काही प्रमाणात स्वतंत्रपणाही आढळून येतो.

माओ-त्से-तुंग, जनरल झ्यॅप अथवा चे गेव्हारा हे तिघेही मूलत: क्रांतिकारक असल्याने गनिमी युद्ध हे त्यांच्या दृष्टीने केवळ क्रांतीचे साधन होते. तिघांचाही उद्देश केवळ प्रस्थापित राजकीय सत्ता नष्ट करण्यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्यांना व्यापक सामाजिक क्रांती घडवून आणावयाची होती. या क्रांतीचे शत्रू प्रबळ, शस्त्रसज्‍ज आणि संघटित असल्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी गनिमी तंत्राचा उपयोग करणे अपरिहार्य होते. क्रांती हा या तिघांच्याही गनिमी युद्धाचा सर्वसामान्य उद्देश होता. माओ-त्से-तुंगच्या मताप्रमाणे चिनी क्रांती ही मुख्यत: शेतकऱ्यांची क्रांती आहे. शेतकरी हाच माओचा गनिमी सैनिक आहे. शेतकरी आणि सैनिक यांच्यात तो फरक करीत नाही. झ्यॅपची भूमिका अशीच आहे. त्याच्या दृष्टिनेही व्हिएटनामसारख्या मागासलेल्या देशात लोकयुद्ध हे प्रामुख्याने कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली लढविलेले शेतकऱ्यांचे युद्ध असते. व्हिएटनामच्या गनिमी सैनिकांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी होते आणि चे गेव्हाराच्या मतानुसार गनिमी युद्ध जनतेचा मुक्तिसंग्राम असतो, गनिमी सैनिक हा समाजसुधारक असतो, एक नवीन समाजपद्धती अस्तित्वात आणण्यासाठी तो हातात शस्त्र धारण करतो. गनिमी हा मुख्यतः किसान क्रांतिकारक असतो, असे त्याचे म्हणणे आहे.

माओ-त्से-तुंगने गनिमांच्या कार्याचे दुहेरी स्वरूप सांगितले आहे. त्याच्या मते गनिमांच्या हालचालींचे उद्देश दोन असतात : एक म्हणजे आपल्या मूळच्या सैन्याला मदत करणे आणि दुसरा म्हणजे आपल्या गनिमी दलाची संघटना क्रमश: विकसित करून तिला पारंपरिक फौजेचे स्वरूप प्राप्त करून देणे व अखेरच्या प्रतिकारास सज्‍ज होणे.


गनिमी सैन्याच्या संघटनेसंबंधी लिहिताना माओ-त्से-तुंगने पुढील सूत्रे मांडली आहेत : (१) निश्वित राजकीय ध्येय. असे निश्वित ध्येय नसेल, तर गनिमी युद्धास यश मिळणार नाही. या ध्येयात जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. (२) गनिमी सैनिकांची शिस्त बाह्य अधिकाराने लादलेली नसावी. सक्तीची शिस्त निष्प्रभ ठरते. ही शिस्त स्वयंस्फूर्त, गनिमांच्या अंतःप्रेरणेतून, श्रद्धेतून निर्माण झालेली असावी. (३) अधिकारी व सैनिक यांच्या राहणीत फारसा फरक नसावा. युद्धाच्या हालअपेष्टा व धोके सहन करण्यात दोहोंच्या राहणीत सारखेपणा आवश्यक असतो. (४) गनिमी सैनिक व जनता यांच्यात एकजूट असली पाहिजे. जनता ही सागरासारखी असून गनिमी सैनिक हे त्यातील माशांसारखे असतात, हा त्याचा दृष्टांत प्रसिद्ध आहे. माओच्या दृष्टीने गनिमांची मुख्यत: तीन कार्ये असतात : (१) शत्रूच्या पिछाडीला हालचाल करणे (२) आपले तळ स्थापन करणे (३) युद्धक्षेत्राचा सतत विस्तार करीत जाणे आत्यंतिक सावधानता, गतिशीलता व सतत हल्ले करण्याची तयारी हे गनिमांचे मुख्य डावपेच असावेत शत्रूची परिस्थिती, ज्या प्रदेशात हालचाली करावयाच्या त्या प्रदेशाची स्थिती, दळणवळणाच्या उपलब्ध सोयी, शत्रूची व आपली तौलनिक शक्ती, हवामान आणि लोकांची परिस्थिती हे सर्व घटक लक्षात घेऊन गनिमांनी आपली व्यूहरचना केली पाहिजे.

गनिमी सैनिकांची भरती कोणत्या समूहात करावी, त्याचेही प्रकार माओने दिले आहेत, ते असे : आक्रमक शत्रुसैन्याचा प्रतिकार करण्यासाठी जनतेचे नेते जनतेमधून गनिमी दल उभारतात, हा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात शेतकरी गनिमी सैनिक होऊ शकतो. गनिमी सैनिक आणि शेतकरी यांच्यात भेद नाही. गनिमी दलात एका वेगळ्या प्रकारचीही भरती होते, ती म्हणजे शत्रुसैन्यातून फुटून आलेल्या लोकांची. तिसऱ्या प्रकारात लुटारू-दरोडेखोऱ्यांच्या टोळ्यांचा अंतर्भाव होतो. या तीन प्रकारांत मूलभूत फरक असले, तरी त्यांची एकजूट करणे शक्य आहे, असे माओचे मत आहे. गनिमी दलाला पूरक म्हणून १६ ते ४५ वर्षे वयाच्या सर्व स्त्री-पुरूषांची संरक्षक दले उभारली पाहिजेत पहारे ठेवणे, माहिती गोळा करणे, फितुरांना पकडणे, शत्रूच्या प्रचाराला पायबंद घालणे इ. कामे या संरक्षक दलाने करावयाची असतात. शत्रूच्या शस्त्रांची लूट करणे, हाच शस्त्रपुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे, असे माओचे म्हणणे आहे.

चे गेव्हाराने गनिमी युद्धासंबंधी तीन प्रमुख तत्त्वे सांगितली आहेत, ती अशी : (१) जनतेचे सामर्थ्य प्रतिक्रांतिकारक प्रस्थापितांच्या संघटित सैन्यावर विजय मिळवू शकते. विषारी ताप उत्पन्न करणाऱ्या व घोंघावणाऱ्या डासांवर बंदूक चालत नाही, त्याप्रमाणे गनिमांविरुद्ध संघटित लष्कराचा उपाय चालू शकत नाही. (२) क्रांतिकारक परिस्थिती निर्माण होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नसते तशी परिस्थिती निर्माण करता येते, (३) अविकसित देशांत क्रांतीसाठी ग्रामीण भाग हीच उत्कृष्ट रणभूमी ठरते.

गनिमी युद्धाच्या यशासाठी पीडित जनतेच्या आशाआकांक्षा ज्यात व्यक्त होतील, अशा निश्चित राजकीय ध्येयाची आवश्यकता असते. गनिमी युद्धतंत्राच्या यशस्वी प्रयोगासाठी आवश्यक अशी दुसरी गोष्ट म्हणजे युद्धाची दीर्घकालीनता. माओ-त्से-तुंग व जनरल झ्यॅप या दोघांनीही या मुद्द्दयावर भर दिलेला आढळतो. याचा अर्थ या युद्धाला निश्चित कालमर्यादा असू शकत नाही. विजय मिळेपर्यंत लढत राहण्याचा दुर्दम्य असा निर्धार गनिमांच्या ठिकाणी असावा लागतो. राणा हम्मीर २५ वर्षे लढला, राणा प्रताप १४ वर्षे लढला, तर मराठे सतत २७ वर्षे म्हणजे व्हिएटनामी गनिमांपेक्षा काही वर्षे अधिकच लढत होते. असा प्रदीर्घ संग्राम चालविण्यासाठी दुर्दम्य संकल्पशक्ती असावी लागते आणि ती केवळ गनिमांतच असून भागत नाही, तर त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या सामान्य जनतेतही ती असली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युद्धाची सर्वंकषता. ते सर्वव्यापी असले पाहिजे. सर्व आघाड्यांवर चालले पाहिजे. प्रासंगिक जयापजयाची पर्वा न करता, शत्रू भेटेल त्या ठिकाणी, त्याच्या मनुष्यबळाचे, रणसाहित्याचे, द्रव्याचे, उत्पादन केंद्रांचे करता येईल तितके नुकसान करणे आणि मुख्यतः शत्रूचे मनोधैर्य खच्ची करीत राहणे महत्त्वाचे असते.

देशभक्तांचे प्रतिकार युद्ध (पार्टिझन वॉर) आणि क्रांतिकारक गनिमी आंदोलन यांतील मूलभूत फरकांचेही विवेचन माओने केले आहे. जे देशभक्त प्रतिकार युद्ध करतात ( उदा., बांगला देशमधील मुक्तिबाहिनी), त्यांच्या युद्धाला गनिमांच्यासारखे क्रांतिकारक विचारप्रणालीचे अधिष्ठान नसते. तो फक्त राजकीय मुक्तीचा लढा असतो, सामाजिक क्रांतीचा नव्हे. या दोन प्रकारच्या युद्धांच्या संघटनांतही फरक पडतो. प्रतिकार प्रथम उत्स्फूर्तपणे सुरू होतो आणि नंतर संघटित केला जातो. उलट गनिमी आंदोलन प्रथम संघटित केले जाते आणि नंतरच लढाईला सुरुवात होते. प्रतिकारयुद्ध आक्रमकांची हकालपट्टी झाल्यानंतरच समाप्त होऊ शकते. परंतु गनिमी युद्ध हे ज्या प्रस्थापित सत्तेविरुद्ध पुकारले जाते, त्या सत्तेला नष्ट केल्यावरच संपते अथवा त्या सत्तेकडून ते चिरडले जाते.

पहा: क्रांती. 

संदर्भ: 1.Campbell, Arthur, Guerillas: A History and Analysis, London, 1967.

          2. Clausewitz, Carl Von Trans. Gatzke, H. W. Principles of War, Pennsylvania, 1960.

          3. Dixon, C.A. Heilbrunn, Otto, Communist Guerilla Warfare, New York, 1962.

          4. Giap, V.N. People’s War People’s Army, Dehradun, 1971.

          5. Greene, T.N. Ed. The Guerrilla and How to fight Him, New York, 1962.

          6. Heilbrunn, Otto, Partisan Warfare, New York, 1962.

          7. Mao Tse-Tung Che Guevara, Guerrilla Warfare, London, 1961.

          8. Osanka, F.M. Ed. Modern Guerrilla Warfare, New York, 1962.

दीक्षित, हे. वि. साक्रीकर, दिनकर