पिस्तुल व रिव्हॉल्व्हर : एक शस्त्रप्रकार. पिस्तुल व रिव्हॉल्व्हर ही शस्त्रे तोफ (गन) या दारूगोळ्याचे क्षेपण करणाऱ्या शस्त्रप्रकारात मोडतात; म्हणून त्यांना इंग्रजी भाषेत ‘गन’ व ‘हँडगन’ असेही म्हणतात. ही शस्त्रे सामान्यत: एका हाताच्या मुठीत धरून हाताळावी लागतात. १ – अ. रिव्हॉल्व्हर : (१) दूरदृष्टी-पान, (२) नळी, (३) गोळी-चित्ती, (४) निस्सारक, (५) चाप, (६) चापरक्षक, (७) सुरक्षाखटका, (८) घोडा, (९) मूठ. आकस्मित हल्ल्यापासून आत्मसंरक्षण करण्यासाठी तसेच हातघाईच्या लढाईत त्यांचा उपयोग होतो. एकापेक्षा अधिक गोळ्या एकापाठोपाठ झाडण्यासाठी केलेल्या यंत्रणेतील फरकावरून पिस्तुल व रिव्हॉल्व्हरअसे दोन प्रकार होतात. या लेखात या दोन्हींसाठी पिस्तुल हीच एक संज्ञा सरस कट वापरण्यात आली आहे. रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी ठासण्याचा कप्पा (चेंबर) एका स्वतःच्या आसाभोवती फिरणाऱ्या चितीमध्ये असतो. एका चितीमध्ये असे सहा कप्पे असतात. पिस्तुलाच्या मुठीतच तेरा गोळ्या असतात व चाप दाबल्यावर  त्या या कप्प्यात ठासल्या जातात. रिव्हॉल्व्हरमध्ये चाप दाबल्यावर गोळी असलेला कप्पा नळीला लागतो व गोळी झाडली जाते. पिस्तुलात फिरती चिती नसते. पिस्तुल आता स्वयंचलित झाले असून गोळी ठासणे, बार उडविणे, पुन्हा गोळी ठासणे आणि निकामी टोपण बाहेर टाकणे या त्याच्या सर्व क्रिया प्रचालक दारु-स्फोटामुळे उत्पन्न झालेल्या वायुदाबाने घडविल्या जातात. प्रचारात असलेल्या पिस्तुलाचे वजन (गोळ्यासहित) एक किग्रॅ.पेक्षा थोडे अधिक असते व नळीचा आणि गोळीचा व्यास नऊ मिमी. असतो. ३ ते ४ मीटरअंतरावरून केलेला गोळीबार लक्ष्याला निकामी करतो. काही पिस्तुलांचा पल्ला ५० ते ५०० मीटरपर्यंतही असू शकतो. तसेच त्यातून पाहिजे त्या प्रमाणे थांबून थांबून किंवा शीघ्रगतीने पिस्तुलाचा चाप एकदाच दाबून गोळ्यांचा भडिमार करता येतो. जर्मनीची माउसर व लुगर ही अचूक लांब पल्ल्याची स्वयंचलित पिस्तुले प्रसिद्ध आहेत.

एकबारी पिस्तुलाची निर्मिती इ. स. १५१७ सालापूर्वी दक्षिण जर्मनीतील न्यूरेंबर्ग ते वायव्य इटलीतील मिलान यादरम्यानच्या भागात झाली असावी. इटलीतील पीस्तॉया या ग्रामनामावरून किंवा ‘पिस्ताला’ या बोहीमियाच्या मूठतोफे (हँडगन) वरून ‘पिस्तुल’ हे नाव प्रचारात आले असे म्हणतात, चक्र-कुलूप, श्नॅपहाउन्स आणि गारगोटी-कुलूप या पिस्तुलातून गोळी उडविणाऱ्या यंत्रणेचा शोध सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत पूर्ण झाला. लिओनार्दो दा व्हींची व योहान कायफुस यांनी पिस्तुलाच्याअंतर्गत रचनेचे पायाभूत काम केले. पिस्तुल हे बाळगण्यास व हाताळण्यास सुलभ असल्याने सुरुवातीपासूनच विशेष लोकप्रिय ठरले. मध्ययुगात सरदार वर्गातील लोक तलवार, जंबिया यांबरोबरच पिस्तुल बाळगू लागले. त्या काळात यूरोपमध्ये खुनांचे प्रमाण वाढल्यामुळे काही राजांनी पिस्तुलावर बंदी घातली होती. पूर्वी पायदळातील धनुर्धर व भालाईत यांनी घोडेस्वारांवर जो वचक बसविला होता, तो पिस्तुलाच्या प्रसारानंतर कमी झाला. पूर्वीच्या अश्वधनुर्धराची जागा पिस्तुलधारी घोडेस्वारांनी घेतली वपरत ⇨घोडदळ प्रभावी ठरू लागेल. तलवार, छोटी बंदूक व दोन ते तीन पिस्तुले घेऊन घोडेस्वार पायदळावर हल्ला करीत. सोळाव्या शतकारंभी जर्मनी चा राजा पाचवा चार्ल्स याच्या सैन्यातील पिस्तुलधारी घोडेस्वारांच्या १५ ते १६ रांगा एकापाठोपाठ एक शत्रूवर धडका देत. पायदळाशी न भिडता त्यावर दुरून पिस्तुलातील गोळ्या झाडून ते परत फिरत व पुन्हा गोळ्या ठासून धडाक्याचे चक्र चालू ठेवीतआणि शेवटी तलवारीचा हल्ला करून पायदळाची कत्तल करीत. दोरी ओढून दुरून पिस्तुल उडविण्याची क्लृप्तीही पुढे वापरात आली. याचीच पुढे ‘बूबी सापळा’ (बेसावध माणसाच्या एखाद्या हालचालीने उदा., एखादी निरुपद्रवी वाटणारी वस्तू हलविण्याने सहज स्फोट पावेल अशा रितीने लपविलेला बाँब वा सुरुंग) यामध्ये परिणती झाली. त्यानंतर अनेक नळ्यांची पिस्तुले (रिव्हॉल्व्हरची प्राथमिक अवस्था) प्रचारात आली. अमेरिकेत हे पिस्तुल जुगारी लोक वा सोन्याच्या शोधासाठी मोहिमेवर निघालेले साहसी लोक यांना फार सोयीस्कर वाटले. अमेरिकन प्रवासी सॅम्युएल कोल्ट हा १८३० साली हिंदी महासागरात प्रवास करीत असताना त्याला रिव्हॉल्व्हर बनविण्याची कल्पना सुचली व तिचा पाठपुरावा करून १८३६ साली त्याने रिव्हॉल्व्हर तयार केला आणि तो बाजारात आणला. अमेरिकेतील आदिवासी रेडइंडियन जमातीचा विरोध चिरडण्यासाठी अमेरिकेतील वसाहतवाल्यांना पिस्तुल विशेष उपयुक्त ठरले. १८४७ साली अमेरिकन सैनिकांना जगात प्रथमच सरसहा पिस्तुल देण्यात आले. १८५७ साली हिंदुस्थानात झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात असे दिसून आले, की हातघाईच्या लढाईत पिस्तुल निरुपयोगी ठरते, म्हणून भारी गोळ्यांचे व १० मी.पर्यंतपल्ला असणारे पिस्तुल प्रचारात आले. पुढे धातूंची काडतुसे प्रचारात आली व पिस्तुलाची कार्यक्षमता वाढली. १९४५ नंतर कार्बाइन, सब्‌मशीनगन व स्वयंचलित बंदुका प्रचारात आल्या. कित्येक राष्ट्रांत पिस्तुलाऐवजी वरील प्रकारच्या बंदुकाच सैनिकी अधिकाऱ्यांना दिल्या जातात. रणगाड्यातील सैनिक, वैमानिक व शस्त्रदुरुस्ती-पथकाचे सैनिक यांना पिस्तुले दिली जातात. पिस्तुलाला बंदुकीप्रमाणे संगीन लावीत नाहीत.

१ – आ. रिव्हॉल्व्हर : (१) बोल्ट, (२) बोल्ट बुडक्या, (३) ताणधरणी, (४) मुख्य ताणपट्टी, (५) ताण-स्क्रू.

२ – अ. स्वयंचलित पिस्तुल : (१) दूरदृष्टी-पान, (२) नळी, (३) चाप व चापरक्षक, (४) गोळीसारक, (५) मूठ व गोळीभांडार.

२ – आ. स्वयंचलित पिस्तुल : (१) गोळी, (२) आघातक कुणी, (३) चाप-घोडा यंत्रणा, (४) सुरक्षाखटका.

आईन-इ-अकबरीत तसेच रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात  पिस्तुलाचा उल्लेख नाही. हिंदुस्थानात पिस्तुलास तमंचा म्हणतात. हिंदुस्थानातील राजांच्या सैन्यात पिस्तुल नसे; तथापि ११ मार्च १७२९ रोजी दिल्लीत झालेल्या एका दंग्यात मोगल सैनिकांनी तमंचा वापरल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या सैन्यात अधिकारी पिस्तुल वापरीत. ऑलिंपिक क्रीडा सामन्यात पिस्तुलाच्या नेमबाजीच्या स्पर्धा होतात. भारतीय रायफल संघटना स्वतंत्र आहे. महू (मध्य प्रदेश) येथील कॉलेज ऑफ काँबॅटमध्ये राष्ट्रीय नेमबाजीच्या स्पर्धा मधूनमधून होतात. [→नेमबाजी].

पहा : दारुगोळा; बंदुक व रायफल.

संदर्भ : 1.Bellah, Kent Ed.; Smith, W. H. B. Book of Pistols and Revalvers, Harrisburg (U.S.A.), 1965.

2. Blackhore, H. L. Guns and Rifles of the World, London, 1965.

3. Pope, Dudley, Guns, London.1972.

दिक्षित, हे. वि.