ग्लायडर व ग्लायडिंग : ग्लायडर (आकाशयान) म्हणजे एंजिन नसलेले विमान. ग्लायडर तरंगत ठेवण्यासाठी लागणारी शक्ती हवेत सूर मारून मिळविता येते. ग्लायडिंग म्हणजे ग्लायडर अथवा सेलप्लेन यातून आकाशात केलेले भ्रमण. भ्रमणाची उंची व पल्ला वातावरणातील वायुवेगावर आणि वायुप्रवाहावर, त्याचप्रमाणे वैमानिकाच्या अनुभवकौशल्यावर अवलंबून असतो.

इतिहास : एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जॉर्ज केलीसारख्या वैज्ञानिकांनी यंत्ररहित कागदी विमानाचे उड्डाण करण्याचे प्रयोग इंग्लंडमध्ये सुरू केले. त्याच सुमारास अमेरिकेमध्ये सॅम्युअल लॅगले, राइट बंधू इत्यादींनी आकाशावरोहण-आकाशरोहण (ग्लायडिंग-सोअरिंग)चे प्रयोग व ग्लायडरच्या बांधणीचे प्रयत्न सुरू केले. जर्मनीमध्येही त्याच सुमारास ओटो लीलिएन्‌टाल याचे ग्लायडिंगचे प्रयत्न चालू होते. १८६७ मध्ये त्याने बनविलेले पहिले ग्लायडर विलो झाडाच्या हलक्या लाकडी काठ्यांच्या सांगाड्यावर मजबूत कापड बसवून तयार करण्यात आले होते. ग्लायडरच्या पंखांचा आकार सपाट ठेवण्याऐवजी तो किंचित बाह्यगोल ठेवल्यास वातप्रवाहांच्या ऊर्ध्वदाबामुळे मिळणारी उचल अधिक असते, हे त्यानेच प्रथम शोधून काढले.

अमेरिकेच्या ऑक्तेव्ह शानूतने १८९६ मध्ये ग्लायडरमधून आकाश संचारास प्रथम सुरुवात केली. त्याने प्रथम तीन पंखी व शेवटी दोन पंखी ग्लायडर बांधणीस सुरुवात केली. ग्लायडरमधील सुकाणूची योजनादेखील त्यानेच प्रथम केली. शानूतच्या मागोमाग राइट बंधूंनी ग्लायडरमध्ये सुधारणा करून १९०२ साली ग्लायडरमध्ये उभ्या व आडव्या सुकाणूंची (रडर) योजना केली. १९०२ ते १९११ पर्यत राइट बंधूंचे लक्ष यंत्रयुक्त विमाने बनविण्याकडे केंद्रित झाल्याने ग्लायडर बांधणीकडे त्यांनी लक्ष दिले नाही परंतु १९११ मध्ये विल्बर राइटने काही वातवैगिकी सिद्धांतांची पडताळणी करण्यासाठी ग्लायडिंग व सोअरिंग यांच्या प्रयोगात पुन्हा लक्ष घातले व सुधारून बांधलेल्या ग्लायडरमधून बरीच यशस्वी उड्डाणे करून दाखविले. १९११ मध्ये त्याने ९ मिनिटे १५ सेकंद ग्लायडिंग करून दाखविले. १९२१ मध्ये क्लेम्पेरर ह्या जर्मनाने १३ मिनिटे ग्लायडिंग करून नवा उच्चांक गाठला.

जर्मनीतील काही विद्यार्थी व पहिल्या महायुद्धातील वैमानिक यांनी १९२० मध्ये ग्लायडिंग-सोअरिंगचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू केले. ह्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे व्हर्सायच्या तहान्वये यंत्रयुक्त आकाशयानांच्या बांधणीस जर्मनीवर घातलेली बंदी व ग्लायडिंगला अनुकूल असे ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील ऊर्ध्व दाबाचे वातप्रवाह. १९२२ मध्ये पहिले सेलप्लेन नावाचे ग्लायडर बांधण्यात आले. सुवाही बांधणीचे हे आकाशयान वजनाने हलके व प्रतिसेकंद २०६ मी. अधोगती असलेले, म्हणजेच ताशी सु. दोन किमी. वेगाच्या उदग्रवायू प्रवाहात भरारी घेऊ शकणारे होते. १९२९ पर्यंत ग्लायडिंग-सोअरिंगचा खेळ मर्यादित होता; परंतु त्यानंतर मात्र वातावरणविज्ञान व ऊष्मागतिकी यांतील प्रगतीमुळे सर्व प्रकारच्या प्रदेशांत तो सुरू झाला. १९२६ मध्ये माक्स केगल या जर्मन व्यक्तीने तडित्‌ वादळात ग्लायडरमधून सु. ५४ किमी. पर्यटन करून वायुगतिकीच्या शास्त्रज्ञांना चकित करून सोडले. १९३५ मध्ये आकाशात ३०० गोल कोलांट्या (लूप) मारून ग्लायडर कोलांट्याचा उच्चांक सिमोनोव्ह या रशियन व्यक्तीने करून दाखविला. अमेरिकेच्या रिचर्ड जॉन्सनने १८५१ मध्ये सु. ८५६ किमी. प्रवास करून दूर अंतराचा उच्चांक प्रस्थापित केला. दीर्घ मुदती प्रवासाचा उच्चांक ५६ तास १५ मिनिटे आकाशात भराऱ्या मारीत चार्ल्‌स ॲटगर या फ्रेंचाने १९५२ मध्ये केला, तर आकाशात सु. १३, २७७ मी. पर्यंत उंच भरारी मारण्याचा विक्रम अमेरिकेच्या लॉरेन्स एडगर याने १९५१ मध्ये करून दाखविला.

ग्लायडरचे आकाशावरोहण

ग्लायडरची रचना : ग्लायडरची रचना आणि बांधणी यांत्रिक विमानाप्रमाणेच असते. त्याचे भ्रमण व त्याची हालचाल वायुप्रवाहामुळे शक्य होते. ग्लायडर हलकेफुलके असते. त्याच्या पंखाचा बांधा देवमाशाच्या फुगीर अंगासारखा असतो. जेव्हा हवा पंखांवरून वाहू लागते, तेव्हा ग्लायडर उचलले जाऊन त्यास वातावरणात अधांतरी राहता येते. ग्लायडरला टेकडीवरून ढकलले, तर ते दगडाप्रमाणे खाली पडू लागेल पण जर का वैमानिकाने ते पडताना त्याचे नाक खाली केले (म्हणजे आकाशयानाचे शेपटू वर केले), तर त्याच्या पंखावरून हवा जोराने वाहू लागेल व उचलदाब निर्माण होईल व मग अनुकूल वेग आल्यावर आकाशयान हळूहळू आकाशात अवरोहण करू लागेल. संचाराकरिता आकाशयानाला संचारमार्गाच्या दिशेने प्रचालनरेटा मिळावा लागतो. यांत्रिक यानात प्रचालनक्रिया एंजिनाद्वारे होते. ग्लायडरच्या वजनाविरुद्ध व कर्षणाविरुद्ध त्याच्या वजनाच्या काही भागांमुळे प्रतिभार (काउंटरबॅलन्स) निर्माण होतो. संचारमार्ग हा कर्षण (ड्रॅग) उचलदाब यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो. म्हणून ग्लायडरच्या संचारप्रमाणाची क्षमता वाढविण्यासाठी हे गुणोत्तर कमी करण्याच्या दृष्टीने पंखांचा फुगीरपणा निश्चित केला जातो. भ्रमणाची कालमर्यादा ग्लायडरच्या अवरोहण कोनावर अवलंबून असते. ग्लायडिंग खेळाचे खरे वर्म म्हणजे आकाशरोहण (सोअरिंग) जितके उंच असेल, तितकी संचाराची कालमर्यादा व पल्ला वाढविता येतो. याकरिता वातावरणातील वर वर जाणाऱ्या वायुप्रवाहांचा उपयोग होतो. असे प्रवाह टेकड्यांच्या माथ्यावर, उष्ण भूपृष्ठावरील वातावरणात, राशिमेघ जमत असलेल्या जागेखाली, उष्ण प्रवाह व शीतप्रवाह ज्या ठिकाणी मिळतात अशा स्थानी निर्माण होत असतात. निष्णात वैमानिक अशा प्रवाहांचा उपयोग करतो व यानास बऱ्याच उंचीवर नेतो. हल्ली ग्लायडर प्रचारात नाही, कारण ते फक्त अवरोहणच करू शकते. म्हणून हल्ली प्रचारात असलेल्या आकाशयानास सेलप्लेन म्हणतात. ते अवरोहण (ग्लाइड) व आरोहण (सोअर) या दोन्ही गोष्टी करू शकते आणि त्या दृष्टीने त्याची रचना व बांधणी केलेली असते. एकंदरीत भ्रमणआकाशयान यंत्रयुक्त विमानासारखेच असते, परंतु त्याला एंजिन नसते. या आकाशयानाचे पंख लांबीला १९ मी.पर्यंत असू शकतात. क्षेत्रफळ व फुगीरपणात तुलनेने पंख मोठे असतात. पंखा (प्रॉपेलर) नसतो. बांधणीकरिता ॲल्युमिनियम व फायबर ग्लास वापरतात. यानात उंची, वेग इ. दाखविणारी यंत्रसामग्री असते. भारतात भारतीय हवाई वाहतूक खात्यातर्फे आकाशयाने बनविली जातात. आकाशयानाच्या प्रतिकृती बनवून त्यांची चाचणी वातविवरात (विंड टनेल) केली जाते. त्यानंतरच प्रत्यक्ष रचना व बांधणी करतात. वातविवरे नवी दिल्ली व बंगलोर येथे आहेत. जवळजवळ निश्चल वातावरणात (म्हणजे तीन चार किमी. च्या आत वायुवेग असताना) आकाशयान भ्रमण करू शकेल, या दृष्टीने त्याची बांधणी केली जाते. पिराट बोसियन, जाफिर, फोका, मुशा वगैरे आकाशयाने प्रसिद्ध आहेत. उंचीचा उच्चांक गाठणाऱ्या यानात कृत्रिम वायुदाब ठेवला जातो.

ग्लायडरचे उपयोग : ग्लायडर, सेलप्लेन ह्या वाहनांचा शोध व निर्मिती प्रामुख्याने ग्लायडिंग व सोअरिंग या साहसी क्रीडांसाठीच सुरू झाली असली, तरी महत्त्वाच्या नागरी व लष्करी कार्यासाठीही त्यांचा उपयोग केला जातो. वातावरणीय संशोधनासाठी ग्लायडरचा वापर १९३५ पासून रूढ आहे. तडित्‌ वादळातील हवामान अजमावण्यासाठी अमेरिकन वेबर ब्यूरोने ग्लायडरचा उपयोग केला होता. ह्या संशोधनात मिळविलेल्या माहितीच्या आधाराने सिएरा नेव्हाडा येथील पर्वतराशींमधील परिस्थितीच्या अभ्यासासाठी १९५०-५१ मध्ये लॉरेन्स एडगरने आपला सु. १३,२७७ मी. उंच भरारीचा विक्रम साधला होता. १३० प्रवासी बसू शकतील एवढी मोठी सेलप्लेन बांधली गेली आहेत.

ग्लायडरचा लष्करी उपयोग प्रथम दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने केला. १९४० मध्ये नेदर्लंड्‌स व लक्सेंबर्गमधील काही पूल व ॲल्बर्ट कालव्यावर कबजा मिळविण्यासाठी जर्मन ग्लायडर वापरण्यात आली होती. ग्लायडर ट्रेन म्हणजे वाहतुकी विमानामागे आगगाडीच्या डब्यांसारखी एक ग्लायडरमालिका. खुष्की अगर आकाशमार्गे दुर्गम ठिकाणी सैनिकी वाहतूक करण्यासाठी हिचा उपयोग करण्यात आला. याशिवाय क्रीट बेटावरील जर्मनीची चढाई (१९४१), जनरल विंगेटची चिंडिट सेनेची जपानी आघाडीच्या मागे उत्तर ब्रह्मदेशातील चढाई (१९४४), वायव्य जर्मनीत व्हेझेल गावाजवळील चढाई (मार्च १९४५) इ. प्रसंगीही ग्लायडरचा उपयोग करण्यात आला. हॉर्सा, हाड्रियन, हॉटस्पर व वँको ही लष्करी आकाशयाने प्रसिद्ध आहेत.

ग्लायडरचे आकाशावरोहण

ग्लायडरचे अंतराळातील प्रक्षेपण : आकाशयानाच्या अंतराळातील प्रक्षेपणाचे (लाँच) पाच प्रकार आहेत. त्यांपैकी चारांचा उपयोग सर्वत्र करण्यात येतो : (१) बंजी प्रक्षेपण : यानाच्या पुढील टोकांवरील आकड्यात दोन रबरी दोर जोडतात. त्याचप्रमाणे यानाच्या धडाला डाव्या-उजव्या बाजूस दोन दोर असतात. यानाला ५० ते १०० मी. उंचीच्या टेकडीवर नेतात. नंतर पुढील टोकांचे दोन दोर पुढे खेचतात. धडाचे दोन दोर फक्त घट्ट धरून ठेवतात. खेचण्याचा जोर पुरेसा वाटल्यावर धडाचे दोर सोडून देतात व यान आकाशात फेकले जाते (२) गलोल प्रक्षेपण : ही पद्धत धोकादायक असल्यामुळे प्रचारात नाही (३) भ्रमणीयंत्र प्रक्षेपण (विंच लाँच) : या पद्धतीत यानाच्या पुढील टोकाला १५०–३०० मी. लांबीचा दोर अडकवितात. दोराचे दुसरे टोक भ्रमणी यंत्राला जोडतात. भ्रमणी यंत्र सुरू केल्यावर दोर झपाट्याने गुंडाळत जाऊन यान वेगाने पुढे सरपटते. पुरेसा वेग असताना व यानाची उंची ३००–३५० मी.पर्यंत आल्यावर यान-वैमानिक दोर खाली सोडतो (४) स्वयंप्रक्षेपण (ऑटो टो) : जीप किंवा मोटारगाडीला दोराने यान जोडतात. जीप पळावयास लागल्यावर यानाला गती मिळून ते जमीन सोडून वरवर जाते.साधारणपणे ३००–३५० मी. उंचीवर यान गेल्यावर दोर सोडून देण्यात येतो (५) विमान-प्रक्षेपण (एअरो टो) : यंत्रयुक्त विमानाला दोराने आकाशयान जोडले जाते. विमानाच्या उड्डाणाबरोबर ते देखील वरवर जाते. १,००० मी. उंचीवर यान पोहोचल्यावर वैमानिक दोर सोडून देतो. लष्करी आकाशयान याच पद्धतीने वापरले जाते. भारतीय नागरी हवाई वाहतूक खात्यातर्फे आकाशयानांवर नियंत्रण असते. अवकाशयान मंडळे आणि आकाशयानांची नोंद करणे, आकाशयाने तपासून योग्य ती प्रमाणपत्रे देणे, आकाशयान वैमानिकांची परीक्षा घेऊन त्यांना परवाने देणे व इतर आनुषंगिक कामे करणे इ. बाबी हे खाते करते.

भारतात १६ वर्षांवरील कोणासही ग्लायडर चालविण्यास शिकता येते. वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण झाल्यावर (१) हवाई नियम, (२) हवाई नौकानयनशास्त्र, (३) विमान वातावरण विज्ञान आणि (४) वायुमान व उपकरणे या विषयांची परीक्षा द्यावी लागते प्रथम विद्यार्थ्याला शिक्षकाबरोबर रोहिणी किंवा टी–२१ बी या दुहेरी ग्लायडरमध्ये उड्डाणाचे शिक्षण द्यावे लागते. नंतर त्यास आय.टी.जी.–३ या एकेरी ग्लायडरमध्ये एकटे उड्डाण करण्याची परवानगी मिळते. त्याची प्रगती होईल त्याप्रमाणे ए, एस्‌–१, केए–७, केए–६, बिकन, कार्तिक या उंच संचार करणाऱ्या ग्लायडर उड्डाणास परवानगी मिळते. नंतर बरोबर एखादा सहप्रवासी गमतीने नेण्यास किंवा दूर अंतरावर जाण्यास परवानगी मिळते.

एका उड्डाणात पाच तास हवेत राहणाऱ्यास आणि १,००० मी. उंच जाऊन ५० किमी. दूर अंतरावर ग्लायडर उतरविणाऱ्यास आंतरराष्ट्रीय एअरोनॉटिक फेडरेशनचे रौप्य –सी चिन्ह मिळते. ३,००० मी. उंची व ३०० किमी. अंतर कापणाऱ्यास सुवर्णचिन्ह मिळते. ३०० किमी. अंतरावर आधी ठरविलेल्या ठिकाणी जाणे, ५,००० मी. उंच जाणे व ५०० किमी. अंतर कापणे यासाठी प्रत्येकी एकएक हिरकणी सुवर्णचिन्हावर विराजमान होते. तीन हिरकण्या असलेले सुवर्णचिन्ह हे ग्लायडिंग जगातील सर्वोच्च मानचिन्ह आहे.

कार्तिक : भारतीय बनावटीचे ग्लायडर

भारतातील ग्लायडर व ग्लायडिंग : भारतात १९२९ मध्ये औंध संस्थानचे महाराज भवानराव पंतप्रतिनिधी यांनी सर्वप्रथम ग्लायडिंगच्या खेळाची सुरूवात केली. तेथेच ग्लायडर व सेलप्लेन बांधण्यात आले. कोल्हापूरचे पंडित यांनी जर्मनीत उच्च ग्लायडिंगचे रौप्य पदक मिळविले होते. १९३९ मध्ये पुण्याचे इराणी यांनी जर्मनीत ग्लायडिंग शिक्षकाचा अभ्यासक्रम पुरा केला. मुंबईच्या रेसकोर्सवर १९४१ मध्ये टाटा व जयपूर आणि जोधपूरचे राजे यांच्या मदतीने ग्लायडिंग सुरू झाले. नंतर पुण्याजवळील चतुःशृंगी टेकडीपाशी अशीच ग्लायडिंगला सुरुवात झाली. १९५० मध्ये दिल्ली येथे भूतपूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रोत्साहनाने आकाशयान मंडळाचे उद्‌घाटन झाले. सरकारी अनुदानाने पिलानी, अमृतसर, जयपूर, अहमदाबाद, पतियाळा, हिस्सार, पाटणा, रायपूर, आग्रा, कानपूर, जलंदर, पुणे व नासिक येथे आकाशयान मंडळे स्थापिली गेली. १९५४ मध्ये पुणे येथे हडपसरच्या परिसरात नागरी वाहतूक खात्याच्या आधिपत्याखाली आकाशयानाचे मध्यवर्ती शिक्षणकेंद्र स्थापन झाले.

देशी ग्लायडर बनविण्याच्या कामात औंधच्या ग्लायडिंग केंद्राने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते. जर्मन आराखड्यानुसार त्यांनी वर पंख असलेले व इतरही काही प्रकारची ग्लायडर बनविली. बडोद्याच्या महाराजांनी नंतर यासाठी एक छोटा कारखाना काढला, पण तो लवकरच बंद पडला. १९५० च्या सुमारास नागरी हवाई वाहतूक खात्याच्या तांत्रिक केंद्रात परदेशी आराखड्यानुसार ग्लायडर-बांधणी सुरू झाली. १९५८ मध्ये त्यांनी देशी आराखड्याचे व बनावटीचे दुहेरी शिकाऊ ‘अश्विनी’ ग्लायडर तयार केले. पाठोपाठ ‘रोहिणी’ व ‘भरणी ’ तयार झाले. खूप उंचीवर लीलया संचार करणारे ‘कार्तिक’ देखील तयार झाले. यांव्यतिरिक्त जगातील सर्वोत्कृष्ट बनावटीच्या ग्लायडरशी बरोबरी करतील, असे ग्लायडर बनविण्याचे काम चालू आहे.

गुप्ते, कुसुम व.; दीक्षित, हे. वि.