झिश्का, योहान : (? – ११ ऑक्टोबर १४२४). बोहीमियन योद्धा व नेता. बोहीमियात ट्रॉच्‌नॉव्ह येथे जन्म. पुढे बोहीमियाच्या सैन्यात नोकरी. एका लढाईत त्याचा एक डोळा गेला. १४१० मध्ये ट्यूटॉनिक सरदारांविरुद्ध झालेल्या टॅननबर्गच्या लढाईत पोलंडच्या बाजूने तो लढला. जॉन हस या हुसाइट पंथाच्या प्रथम नेत्यानंतर झिश्का हा त्याचा नेता झाला. हुसाइट पंथीयांचे रोमन कॅथलिकांशी धार्मिक मतभेद होते, म्हणूनच बोहीमियाच्या संरक्षणासाठीही झिश्काने हुसाइटांची एक सेना तयार केली आणि शेतीगाडे, तोफा, हाततोफा आणि हलके घोडदळ यांचा योग्य समन्वय करून एक नवीन रणतंत्रच त्याने प्रचारात आणले. शेतीगाड्यांना चिलखते ठोकून त्याने त्यांतून हाततोफा व तोफा डागण्याची सोय केली. गाड्यांना हलतेफिरते भुईकोट बनविले. भुईकोटांच्या मधील मोकळ्या जागेत भालाईत ठेवून घोडेस्वारांचे हल्ले परतविण्याचीही योजना त्याने केली. तसेच तोफगाडे कोटांच्या मध्ये ठेवून चौफेर तोफा डागणे शक्य केले. या रणतंत्राच्या बळावर प्रत्येक लढाईत जर्मन राजा झीगिसमुंट आणि कॅथलिक यांच्या सैन्याचा झिश्काने पराभव केला. प्राग (प्राहा) येथे १४२० साली झीगिसमुंटशी ज्या टेकडीपाशी त्याची लढाई झाली, तिला ‘झिक्का टेकडी ’ म्हणतात. राबी (हल्लीचे सुशित्से) च्या वेढ्यात झिश्काचा दुसरा डोळा जाऊन तो पूर्ण आंधळा झाला तरीसुद्धा १४२२ साली उस्तिनादलाबेम येथील लढाईत सत्तर हजार जर्मनांचा पंचवीस हजार हुसाइटांनी पराभव केला. पुढे हुसाइटांच्यात दुफळी होऊन यादवीयुद्ध झाले. झिश्काने परत एकजूट करून १४२२ मध्ये निबोव्हिड आणि न्येमत्स्की ब्रॉट (हल्लीचे हाव्ह्‌लीचकूफ ब्रॉट) या ठिकाणी जर्मनांचा दणदणीत पराभव केला. पर्झिबिस्लाफ येथे प्लेगने तो मरण पावला.

दीक्षित, हे. वि.