लोकसेना : (मिलिशिया). सामान्यपणे परकीय आक्रमण, सशस्त्र उठाव, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत देशाच्या संरक्षणाच्या कामी साहाय्य व्हावे म्हणून नागरिकांमधून तात्पुरते सैनिकी प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध रीतीने उभारण्यात येणारी संघटना. राष्ट्राच्या स्थायी सेनेला पूरक म्हणून लोकसेनेचे कार्य अनन्यसाधारण असते. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी नागरिक स्वत:च्या उपजीविकेचा उद्योगव्यवसाय काही काळ बाजूला ठेवून राष्ट्राच्या संरक्षणाकरिता उत्स्फूर्तपणे वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध होतात प्रसंगी राष्टाच्या स्थायी सेनेबरोबर युद्धातही भाग घेतात. लोकसेनेचा मूळ हेतू उदात्त व व्यापक राष्ट्रहिताशी निगडित आहे.

लोकसेनेच्या निर्मितीवर इतिहासकाळापासून निरनिराळ्या राजकीय विचारप्रणालींचा प्रभाव पडल्याचे आढळून येते. राष्ट्रउभारणीच्या कामात जगातील अनेक देशांतील लोकसेनांनी सक्रिय सहयोग दिलेला दिसून येतो. अर्थात विशिष्ट ध्येय, शिस्तपालन, कर्तव्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव इ. मूलभूत घटकांचे महत्त्व लोकसेना-उभारणीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक मानले जाते. लोकसेनेची उभारणी व महत्त्व बहुधा प्रत्येक देशाची राजकीय स्थिती व परिस्थितिजन्य घटना यांवरच अवलंबून असते. त्यामुळे काही राष्ट्रांतील लोकसेना, आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर, ठराविक काळानंतर आपातत: विसर्जित झाल्या. तर काही देशांतील लोकसेना पुढे टिकून राहिल्या.

जेव्हा सर्वसामान्य जनतेला प्रस्थापित राज्यव्यवस्थेकडून लष्करी सामर्थ्याच्या जोरावर भरडले जाते, तिची आर्थिक पिळवणूक केली जाते किंवा तिला गुलामसदृश जीवन जगावे लागते, अशा वेळी जनतेला मुक्त करण्यासाठी किंवा सत्तास्थित्यंतरासाठी क्रांतीच्या विचारांनी भारलेल्या लोकांमधून, तरुणांमधून क्रांतिकारी लोकसेनेचा उदय होतो. उदा., फ्रेंच राज्यक्रांतिकाळातील ‘नॅशनल गार्ड’, रशियन राज्यक्रांतिकाळात (१९१७) बोल्शेव्हिकांनी स्थापन केलेली लोकसेना, चीनमधील कम्युनिष्ट सत्तासंघर्षातील ‘पीपल्स आर्मी’ इ. लोकसेना होत. हिटलर, जनरल फ्रँको या हुकूमशहांनीदेखील सशस्त्र क्रांतीसाठी आपल्या विचारसरणीला अनुकूल अशा लोकसेनेसारख्या लष्करी संघटना  उभारल्या होत्या.  भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीनी नि:शस्त्र सत्याग्रहींची लोकसेना स्थापन केली होती. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी या संघटित लोकसेनेने अनेक लढ्यात भाग घेतला होता.

प्राचीन ईजिप्त, ग्रीस आणि रोमन संस्कृतींत लोकसेना स्थापन केल्याचे आढळते, स्पार्टामध्ये उत्तम दर्जाच्या सैनिकी निर्मितीसाठी लोकसेनेचा उपयोग केला जात असे. मॅसिडोनियाचा राजा चौथा फिलिप (मृ. इ. स. पू. ३३६) याने सीमेवरील आक्रमकांना परतवून लावण्यासाठी स्थानिक लोकांमधून एक कार्यक्षम लोकसेना दल निर्माण केले होते. इंगलंडमधील अँग्लो-सॅक्सन राजांनी राष्ट्रीय लोकसेना स्थापन केली होती. तीत सुदृढ प्रकृतीच्या पुरुषांना भरती करून सैनिकी  प्रशिक्षण व सेवा सक्तीची केली होती. याच काळात इटली, जर्मनी तसेच इतर काही देशांत लोकसेनेची वाढ झाली.

अठराव्या शतकात फ्रान्समध्ये प्रतिवर्षी लोकसेनेच्या काही जवानांना स्थायी सेनेत नियमित प्रवेश देण्यात येत असे. ब्रिटिशांच्या अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स वसाहतीत पहिली लोकसेना स्थापन करण्यात आली आणि पुढे तशाच प्रकारची लोकसेना अमेरिकेतील इतर वसाहतींमध्ये स्थापन करण्यात आली. या लोकसेनेने स्थानिक सुरक्षाव्यवस्था व इतर सेवाभावी कार्यक्रम यांची जबाबदारी उचलली होती. अमेरिकन राज्यक्रांती तसेच यादवी युद्धाच्या वेळी या लोकसेनेने स्थायी सेनेबरोबर भाग घेऊन महत्त्वाची कामगिरी पार पडली. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत प्रत्येक घटक राज्यात गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली लोकसेनेची स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात आली.

पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेतील संपूर्ण लोकसेनेचे नॅशनल गार्ड या संघटनेत रुपांतर करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात या संघटनेने अमेरिकन संरक्षण दलाला पूरक सहकार्य दिले. विद्यमान नॅशनल गार्डमध्ये एअर फोर्स रिझर्व्ह, एअर नॅशनल गार्ड, आर्मी नॅशनल गार्ड, मरीन कोअर रिझर्व्ह, नेव्हल रिझर्व्ह अशा विविध संरक्षण विभागांचा समावेश होतो. देशातील आणीबाणीच्या परिस्थितीत संघराज्य तसेच घटक साज्य सरकारे या नॅशनल गार्डचा उपयोग करून घेतात.

ग्रेट ब्रिटनममध्ये १९०८ पासून लोकसेना गृहसंरक्षणासाठी राखीव दल म्हणून ठेवण्याची पद्धत होती. १९२१ मध्ये तिचे प्रादेशिक सेनेत रुपांतर करण्यात आले. देशाबाहेर ब्रिटिशांच्या वसाहतींतही तिचे कार्यक्षेत्र पसरले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात या प्रदेशिक सेनेचे होमगार्डमध्ये रुपांतर करण्यात आले. १९४२ पासून यांतील काही प्रशिक्षित तुकड्यांना सैनिकी दलात सक्तीने भरती करण्यात येऊ लागले.

आधुनिक काळात चीनच्या माओ-त्से-तुंगने लोकसेना या संकल्पनेला वेगळा अर्थ दिला. त्याने ‘पीपल्स आर्मी’ या नावाने शेतकरी-काम-गारांमधून उभारलेली संघटना ही चीनमधील लोकसेनाच होती. चीनमधील क्वोमिंतांग राजवटीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी या संघटनेमार्फत माओने ‘प्रदीर्घ मोर्चा’ (लाँग मार्च) आयोजित केला होता. शेतकरी-कामगारांना बरोबर घेऊन निघालेला हा प्रदीर्घ मोर्चा शिस्तबद्ध व शांततापूर्ण स्वरुपाचा होता. चँग-कै-शेकच्या सैन्याने त्याच्यावर विविध ठिकाणी अनेक वेळा हल्ले चढविले. तथापि लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या स्त्री-पुरुषांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असल्यामुळे चँग-कै-शेकच्या सैन्याचे हल्ले विफल ठरले. पुढे माओ सत्तेवर आल्यानंतर त्याने पीपल्स आर्मीमधील निवडक लोकांना ‘रेड आर्मी’ ह्या नियमित सैन्य दलात समाविष्ट करून घेतले. उर्वरित लोकांना एकदम घरी पाठविण्याऐवजी शेती, घरबांधणी, रस्ते उभारणे, धरणे बांधणे वगैरे विकास कार्यात गुंतवून घेतले. तसेच त्यांना उपजीविकेच्या उद्योगव्यवसायाचे प्रशिक्षण देऊन हळूहळू ही लोकसेना विसर्जित केली.

लिबियाच्या कर्नल गडाफीनेही लोकसेनेचा मोठ्या चातुर्याने वापर करून घेतल्याचे आढळून येते. त्याने देशातील सक्षम नागरिकांना सैनिकी प्रशिक्षिण देण्याची व्यवस्था करून वेळप्रसंगी सेनादलाच्या साहाय्यार्थ तयार ठेवले. त्यामुळे स्थायी सेनेचा आकार व त्यावरील खर्चाच्या प्रमाणात बचत होऊन लष्करी सामर्थ्य टिकवून ठेवले गेले.

भारतात लोकसेनेला ऐतिहासिक परंपरा असून देशाच्या तसेच संस्कृतीच्या अस्मिता जपण्याच्या दृष्टिकोनातून तिने अभूतपूर्व व उत्स्फूर्तपणे कार्य केल्याचे आढळून येते. रामायणकाळात प्रभू रामचंद्राच्या साहाय्यार्थ उभी राहिलेली आदिवासी सेना (वानर सेना) ही प्रमुख्याने लोकसेनाच होती. तसेच महाभारतकाळात पांडवांच्या मागे कुरुक्षेत्रावर लढावयास सिद्ध झालेली सेना हीसुद्धा लोकसेना होती. तत्कालीन युद्धांत भाले, धनुष्णबाण, तलवारी इ. शस्त्रास्त्रे सर्वसामान्य जनतेच्या घरोघरी असत. त्यामुळे अर्थातच देशावर कोणतेही संकट व समरप्रसंग ओढविल्यास सामान्य जनता आपखुशीने युद्धात सामील होत असे. युद्धसमाप्तीनंतर लोक पुन्हा आपल्या नेहमीच्या उद्योगव्यवसायांकडे वळत.


सामान्य जनांतील ही राष्ट्राभिमानाची व उत्स्फूर्तपणे लोकसेनेत सामील होण्याची भावना नंतरच्या काळआत, विशेषतः गुप्तकालात, क्षीण झालेली दिसते. हूण, क्षत्रप या परकीय आक्रमकांना संघटित रीत्या प्रतिकार होत नव्हता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात लोकसेनेच्या या उदात्त कल्पनेला चालना दिली. त्यांनी आपल्या रयतेमधून लोकसेनेची निर्मिती केली. समाजाच्या सर्व थरांतील लोकांत मोगल साम्राज्यशाहीविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी हिम्मत, राष्ट्रभक्ती, स्वदेशाभिमान निर्माण केला. आपल्या खड्या सैन्यदलात त्यांनी सर्व जातिजमातींच्या लोकांना प्रवेश दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, मराठे-मावळे आणि गोरगरीब जनता वेळोवेळी स्वराज्यावर आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी महाराजांच्या आदेशानुसार आपला उपजीविकेचा व्यवसाय तात्पुरता बाजूला ठेवून सैन्यदलात सामील होत असे. रयतेमधील ही लोकसेना मराठी सेनेला सशस्त्र साहाय्य देत असे.

पेशवाईत बाळाजी विश्वनाथाने लोकसेना उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठा सरदारांच्या आपापसांतील मतभेदांमुळे त्याला शिवाजी महारांजांप्रमाणे लोकसेना निर्माण करण्यात यश आले नाही. १८५७ च्या उठावाच्या वेळी भारतीय जन आंदोलनातून लोकसेना उभारण्याचा प्रयत्न झाला. तथापि सुसूत्रता, शिस्त व स्वदेशनिष्ठा लोप पावल्यामुळे तो अयशस्वी ठरला.

ब्रिटिशांनी भारतात गोऱ्या नागरिकांपुरती मर्यादित परंतु सक्तीची प्रादेशिक सेना उभारली. पहिल्या जागतिक महायुद्धकाळात काही प्रमाणात भारतीयांना या प्रादेशिक सेनेत सामावून घेण्यात आले. परंतु अधिकारीवर्ग ब्रिटिशच राहील, अशी दक्षता घेण्यात आली. परंतु  अधिकारीवर्ग ब्रिटिशच राहील, अशी दक्षता घेण्यात आली. पुढे हळूहळू या धोरणात बदल करण्यात येऊन भारतीयांना नियमित सेनेत तसेच प्रादेशिक सेनेत अधिकारीवर्गाच्या जागा मिळू लागल्या. कालांतराने कायद्याच्या अंतर्गतच विद्यापीठ स्तरांवर विद्यार्थी व शिक्षक यांची प्रादेशिक सेना उभारण्यात आली. दुसऱ्या महायुद्धकाळात या विद्यापीठीय प्रादेशिक सेनाविभागांतून अनेक तरूण भारतीय स्थायी सेनादलात जवानांपासून अधिकारीवर्गापर्यंत विविध स्तरांत सामील झाले. त्यामुळे युद्धकाळात ही विद्यापीठीय संघटना प्रादेशिक सेनेपासून अलग करून तिला युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोअर (युओटीसी) असे संबोधण्यात येऊ लागले. पुढे युओटीसीचे विसर्जन करण्यात येऊन राष्ट्रीय छात्रसेना स्थापन करण्यात आली (१९४८).

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय प्रादेशिक सेनेत लक्षणीय वाढ झाली. या प्रादेशिक सेनेत पायदळ, तोफखाना, अभियांत्रिकी, टपाल व तार, गोदीबंदरे, रेल्वे इ. विभागांचा समावेश होतो. प्रादेशिक सेनेत दाखल होणाऱ्या नागरिकांना सैनिकी तसेच नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी या सेनेबरोबरच राष्ट्रीय छात्रसेना, सीमा सुरक्षादल, मध्यवर्ती राखीव पोलीसदल यांसारख्या स्वतंत्र संघटनाही भारतीय सेनेस पूरक म्हणून साहाय्य करतात. यांशिवाय निव्वळ नागरी संरक्षणाच्या दृष्टीने घटक राज्य सरकारांच्या अखत्यारीत नागरिकांची होमगार्ड ही स्वतंत्र संघटना कार्यरत असते. वरील सर्व संघटनांचे कार्य लोकसेनेच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असेच आपद्काली संरक्षणाची दुसरी वा तिसरी फळी म्हणून त्यांचा उपयोग केला जातो.

पहा : प्रादेशिक सेना राष्ट्रीय छात्रसेना होमगार्ड.

दीक्षित, हे. वि. पाटील, ल. ह.