टिर्पित्स, आल्फ्रेड फोन : (१९ मार्च १८४९–६ मार्च १९३०). जर्मन ॲड्‌मिरल व नौसेनेचा निर्माता. जन्म ब्राडनबुर्क प्रांतात कॉश्चिन येथे. १८६५ साली नौसेनेत अधिकारी. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेच्या कॅप्टन माहॅन याने सागरीबळाविषयी नवीन सिद्धांत मांडले. त्यांना अनुसरून जागतिक व्यापार, दळणवळण आणि वसाहती स्थापण्यासाठी केवळ किनारासंरक्षणक्षम नौसेनाच आवश्यक नसून, सागरीवर्चस्वासाठी आक्रमणशील नौसेनेची जर्मनीला आवश्यकता आहे, असे त्याने प्रतिपादन केले. १८९७ साली सागरी मंत्री झाल्याबरोबर नव्या लढाऊ जहाजबांधणी कार्यास त्याने प्रारंभ केला. तो स्वतः तंत्रज्ञ असून तोफा, पाणबुड्या व पाणतीर इत्यादींचा तज्ञ होता. त्याच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे जर्मन लढाऊ जहाजे जवळ जवळ अभेद्य वाटत. त्यास प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने ड्रेडनॉट नावाची मोठ्या तोफांची प्रचंड जहाजे बनविली. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सागरीबळाला समुद्रपृष्ठावर निर्बल करणे अशक्य झाल्यामुळे टिर्पित्सला पाणबुड्यांचा स्वैर वापर करणे भाग पडले. याचा विपरीत परिणाम होऊन अमेरिका जर्मनीविरुद्ध युद्धात पडली व टिर्पित्सला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. टिर्पित्स प्रचारतंत्रातही निष्णात होता. तो १९२४–२८ मध्ये जर्मन संसदेचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘टिर्पित्स’ नावाचे लढाऊ जहाज दुसऱ्‍या महायुद्धात लढले.

दीक्षित, हे. वि.