टोगो हेहाचिरो : (१८४८–१९३४). जपानी आरमाराचा भूतपूर्व सेनापती. जपानच्या कागोशिमा (पूर्वीचे सात्सूमा) प्रांतातील एका सामान्य कुटुंबात जन्म. १८६३ मध्ये जपानी नौसेनेत प्रवेश. १८७१ ते १८७८ या काळात ब्रिटनमध्ये उच्च आरमारी शिक्षण. १८९४–९५ साली चिनी-जपानी युद्धात त्याने केलेल्या उत्तम नाविक कामगिरीमुळे तो प्रसिद्धीस आला. १९०४–०५ च्या रुसो-जपानी युद्धात २७–२८ मे १९०५ रोजी त्सुशिमा सामुद्रधुनीत झालेल्या आरमारी लढाईत ‘टी’ या इंग्रजी वर्णासारखे नाविक रणतंत्र योजून त्याने रशियन आरमाराचे जबरदस्त नुकसान केले. त्यास काउंट (१९०७) व मार्क्विस (१९३४) हे ब्रिटिश किताब देण्यात आले.

दीक्षित, हे. वि.