सिंग, नाईक जदुनाथ : (२१ नोव्हेंबर १९१६– ६ फेब्रुवारी १९४८). भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात बिरबल सिंग राठोड आणि जमुना कंवर या दांपत्यापोटी कजुरी (जि. शाहजहानपूर, उत्तर प्रदेश) या खेड्यात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर बहुतेक वेळा ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असत. बालपणी त्यांना कुस्तीचा आणि शरीरसौष्ठवाचा छंद जडला होता, त्यामुळेच त्यांना हनुमानभक्त बाल ब्रह्मचारी हे बिरुद चिकटले आणि त्या बिरुदानुसार ते आजन्म अविवाहित राहिले.

फत्तेगढ येथे राजपूत रेजिमेंटमध्ये त्यांची निवड झाली (२१ नोव्हेंबर १९४१). सुरुवातीचे एक वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची राजपूत रेजिमेंटच्या क्रमांक एक बटालियनमध्ये (सध्याचे नाव ४ गार्ड्‌स) नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्घात त्यांनी दाखविलेल्या शौर्य व नेतृत्वगुणांमुळे त्यांना नाईक पदावर पदोन्नती मिळाली आणि ते सेक्शन (विभाग) कमांडर झाले.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर या भारताच्या अखत्यारीतील भागात घुसखोरांच्या नावाखाली छुपे युद्घ पुकारले. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी ताइनधर येथील पहारा चौकी नंबर दोनचे आधिपत्य नाईक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते. ती आघाडीची चौकी होती तरी सुद्घा संरक्षणार्थ तीत फक्त नऊ जवान होते. चौकीचा ताबा मिळविण्यासाठी शत्रुसैन्याने जोरदार हल्ले केले पण जदुनाथांनी उच्चतम धैर्याने व धीरोदात्त नेतृत्वाने तुटपुंज्या सैन्यबळावर धैर्याने व लष्करी डावपेचांचा उपयोग करुन शत्रुसैन्याला परतविले. या धुमश्चक्रीत त्यांचे चार जवान जखमी झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या हल्ल्यात संयमी जदुनाथांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने संख्येने मोठ्या आणि आक्रमक अशा शत्रुसैन्याला नामोहरम केले मात्र या हल्ल्यात सर्व जवान जखमी झाले होते. जदुनाथांचाही उजवा हात दुखावला होता, तरी सुद्घा त्यांनी जखमी स्टेनगनरकडून स्टेनगन स्वतःकडे घेतली. शत्रू पाठीशी येऊन पोहोचला असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची तमा न बाळगता अत्यंत शांतपणे व धीराने सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की, होणाऱ्या पराजयाचे रुपांतर विजयात झाले. शत्रूने आपल्या मृत आणि जखमी जवानांना तिथेच टाकून पळ काढला.

त्यानंतर शत्रूने मोठ्या संख्येने आणि पूर्ण ताकतीनिशी तिसरा हल्ला केला. नाईक जदुनाथ जखमी झाले होते तथापि त्यांनी एकहाती प्रतिकार करण्याचा निर्धार केला आणि ते चौकीबाहेर आले व स्टेनगनने शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात शत्रुसैन्य पुरते गोंधळले आणि सैरावैरा पळू लागले मात्र यावेळी जदुनाथांच्या छातीत व डोक्यात गोळ्या घुसल्या आणि ते धारातीर्थ पडले. या नॉनकमिशन्ड अधिकाऱ्यांने शत्रूशी एकाकी लढत देऊन विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले (१९४९).

गायकवाड, कृ. म.