क्रूझर : युद्धनौकेचा एक प्रकार. जलद गतीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रुझरचा अगदी सुरुवातीला उल्लेख सोळाव्या शतकात आढळतो. त्यावेळी पिनास जातीच्या अनेक शिडांनी युक्त असलेल्या छोट्या जहाजांना ‘क्रूझर’ या प्रकारात समाविष्ट करीत. ही तत्कालीन जहाजे वेगवान असून त्यांचा उपयोग टेहळणी, संरक्षण व संदेशवहन यांसाठी होत असे. इंग्रज-फ्रेंचांमधील अठराव्या शतकातील सागरी युद्धकाळापर्यंत या प्रकारच्या जहाजांचे स्वरुप १,५०० टनांपर्यंत वाढले आणि त्यांवरील तोफांची संख्याही ५० ते ६० झाली.

क्रुझरची महत्त्वाची लक्षणे म्हणजे जलद वेग, विस्तृत परिभ्रमणक्षमता व सागरात दीर्घकाळ तग धरून ठेवण्याची क्षमता ही होत. या युद्धनौकांचे सांगाडे पोलादाचे बनविण्यात येऊ लागल्यावर आणि त्यांचे प्रचालन करण्यासाठी बाष्पशक्तीचा वापर सुरू झाल्यानंतर त्यांची मजबुती व कार्यक्षमता अधिकच वाढली तसेच तुफानी सागरलाटांची किंवा शत्रूंच्या तोफगोळ्यांची धडक सहन करण्याचे त्यांचे सामर्थ्यही वाढले. नाविक सत्ता संपादन केलेल्या राष्ट्रांच्या सागरी वर्चस्वाचा जसजसा विस्तार होऊ लागला, तसतसा क्रूझरचा वेग, परिभ्रमणक्षणता व तग धरून ठेवण्याची क्षमता यांत वाढ करणे आवश्यक झाले व यासाठी क्रूझरचे चिलखती कवच वगळण्यात आले, परंतु पुढे नाविक तोफांच्या गोळ्यांचे वजन व पल्ला यांत झालेल्या वाढीमुळे क्रूझरचे चिलखती संरक्षण आवश्यक ठरले आणि चिलखती क्रूझरचे युग निर्माण झाले.

ब्रिटिश नौदलातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे ॲडमिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड फिशर यांनी क्रूझरच्या रचनेत चिलखती कवचापेक्षा त्याच्या वेगाला अधिक महत्त्व आहे, हे तत्त्व पुरस्कृत केले. त्यामुळे त्यांच्या अमदानीत सर्वांत मोठ्या आकाराच्या क्रूझरांची निर्मिती सुरू झाली. या लढाऊ क्रूझरांचा आकार आणि त्यावरील तोफादी शस्त्रसंभार ही तत्कालीन अल्पवेगी युद्धनौकेच्या तोडीची होती. युद्धतंत्रानुसार अधिक जलद वेगाच्या लढाऊ क्रूझरने शत्रुपक्षाच्या आरमारी सलामीची नासधूस करावी व त्यानंतर अल्प वेगाची पण अधिक सुरक्षित अशी मोठी लढाऊ जहाजे पुढे येऊन त्यांनी शत्रूच्या आरमाराला घेरून ते नष्ट करावे, असा हेतू असे.

आय्. एन्. एस्. दिल्ली

जर्मनी हे नौदलाच्या बाबतीत अत्यंत प्रबळ राष्ट्र होते. जर्मनीने आपले लढाऊ क्रूझर स्वतंत्रपणे विकसित केले. त्यांचे चिलखती संरक्षण अधिक उच्च दर्जाचे होते. शत्रूच्या तोफगोळ्यांचा पल्ला आपल्या क्रूझरवरील दारूगोळ्याच्या साठ्यापर्यंत पोहोचणार नाही, अशा दृष्टीने त्या चिलखती कवचाची योजना केलेली होती. या यशस्वी प्रयत्नांमुळे पहिल्या महायुद्धात डॉगर बँक व जटलंड येथील जर्मनी आणि ब्रिटन यांच्या आरमारी झटापटींत ब्रिटिशांच्या क्रूझरपेक्षा जर्मन क्रूझरची कार्यक्षमता अधिक आहे, हे सिद्ध झाले. तथापि युद्धनौका म्हणून लढाऊ क्रूझर हा प्रकार विशेष यशस्वी झाला नाही व पहिल्या महायुद्धानंतर क्रूझरची जड आणि भारी अशा दोन प्रकारांतच बांधणी होऊ लागली. १९२१ मधील वॉशिंग्टनच्या तहानुसार १०,००० टन व ८ इंची तोफा अशा मर्यादा त्यास घालण्यात आल्या.

हलके क्रूझर ४,००० ते ६,००० टनांपर्यंत असून त्याचे मुख्य अस्त्र म्हणजे ५ ते ६ इंच आकराच्या (तोफेच्या गोळ्याचा व्यास) तोफा असे होते तर भारी क्रूझर ९,००० ते १०,००० टनांपर्यंत असून त्याच्यावर ८ इंची तोफा असत. वेग अधिक ठेवण्याकरिता क्रूझर जवळजवळ चिलखतविरहित असून फक्त त्याच्या वरच्या बाजूला ३ इंची पोलादी कवच असे. शत्रूच्या दूर पल्ल्याच्या तोफांच्या गोळाबारीविरुद्ध संरक्षण म्हणून त्याची योजना होती पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात क्रूझरवर विमानासाठी क्षेप्ययंत्रे बसविण्याची पद्धत होती. विमानवाहू जहाजांची निर्मिती होऊ लागल्यानंतर आणि दूर पल्ल्यांच्या सागरी विमानांची निर्मिती सुरू झाल्यावर ही पद्धत स्वाभाविकपणेच बंद पडली.

दोन्ही जागतिक महायुद्धांत क्रूझरांनी उत्तम कार्य केले. शत्रूच्या रसदनौकांना व छापा घालणाऱ्या जहाजांना ताब्यात घेणे, नौकांच्या ताफ्यांना संरक्षण देणे, विशिष्ट कार्यपथकांना (टास्क फोर्स) साहाय्य करणे यांसारखी कामे क्रूझर आणि सशस्त्र व्यापारी जहाजे यांनी यशस्वीपणे पार पडली.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निर्मितिखर्चातील वाढीमुळे नौदलातील क्रूझर बांधणी जरी मर्यादित झाली, तरी लढाऊ जहाजांचा एक प्रकार म्हणून उद्याच्या सागरी संघर्षाच्या गरजांनुसार क्रूझरची खूपच आवश्यकता भासेल. अलीकडे शस्त्रास्त्रनिर्मितीत अणुकेंद्रीय प्रचालनाचे उपयोजन सुरू झाले आहे. त्यामुळे तर क्रूझरचे परिभ्रमणक्षेत्र व प्रभावक्षेत्र इतके विस्तृत होऊ शकेल की, त्यांवर पारंपरिक तोफा असोत वा क्षेपणास्त्रे असोत, जागतिक महासागरी मार्गावरील आदर्श पोलीस म्हणून त्यांचा उपयोग होईल.

भारतीय नौदलातील दिल्ली व म्हैसूर हे दोन क्रूझर प्रसिद्ध आहेत.

संदर्भ : Blackman, V. B. The World’s Warships, London, 1961.

सोमण, भा. स. (इं.) जाधव, रा. ग. (म.)