फुलर, जॉन फ्रेड्रिक चार्ल्‌स : (१ सप्टेंबर १८७८- १० फेब्रुवारी १९६६). ब्रिटिश जनरल व चिलखती युद्धतंत्राचा प्रणेता. आधुनिक युद्धशास्त्रज्ञ म्हणून दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत त्याला विशेष प्रतिष्ठा होती. सँडहर्स्ट येथील सैनिकी अकादमीत शिक्षण घेतल्यानंतर ‘ऑक्सफर्ड व बर्किंगहॅमशायर’ पायदल पलटणीत त्याने अधिकारी म्हणून काम केले. बोअर युद्धात (१८९९-१९०२) लढताना बोअर कमांडोच्या रणतंत्राचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. पुढे एका प्रादेशिक पलटणीचा ‘अँड्‌ज्युरंट’ असताना त्याने या तंत्राचे प्रशिक्षण सैनिकांना दिले होते. १९२६ मघ्ये तो रणगाडा दलाचा जनरल स्टाफ ऑफिसर झाला. तेव्हापासूनच नव्या रणतंत्राचा तज्ञ म्हणून तो प्रसिद्धीस आला. पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील युद्धक्षेत्रात नोव्हेंबर १९१७ मध्ये कँब्रे येथील लढाईची योजना त्यानेच आखली. आधुनिक युद्धेतिहासातील रणगाड्यांचा वापर केलेली ही पहिली लढाई होय. रणगाड्यांच्याच सेना उभारून खंदकी युद्धाऐवजी गतिमान अशा या नव्या रणतंत्राची त्याने आखणी केली होती [⟶ खंदक युद्धतंत्र]. या युद्धानंतर त्याने महत्त्वाची अनेक कार्ये पार पाडली. १९३० मध्ये ब्रिटिश सरकारने मुंबई सैनिकी विभागाचे आधिपत्य त्यास देऊ केले होते परंतु ते त्याने नाकारले. पुढे त्याच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली : इंग्लंडमधील सर ऑझ्‌वाल्ड मोझलीच्या (१८९६- ) ब्रिटिश फॅसिस्ट संघटनेचा (१९३२-४०) तो सदस्य झाला परंतु सुदैवाने त्याला आपला मूर्खपणा लक्षात आला आणि त्याच्या मनोवृत्तीला अनुकूल अशा युद्धशास्त्रीय विषयांवरील लिखाणाकडे तो वळला. त्याने लिहिलेल्या युद्धशास्त्रीय ग्रंथांची संख्या तीसपेक्षा अधिक आहे. स्वतःच्या देशात जरी त्याच्या या लेखनाची कदर करण्यात आली नाही, तरी इतर राष्ट्रांतील सैनिकी नेत्यांवर त्याच्या मतप्रणालीचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. टँक्स इन ग्रेट वॉर (१९२०), द सेकंड वर्ल्ड वॉर (१९४८), डिसायसिव्ह बॅटल्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड (१९३९-४०), जनरलशिप ऑफ अलेक्झांडर (१९५८), काँडक्ट ऑफ वॉर (१९६१) व मेम्वॉर्स ऑफ ॲन अन्‌कन्व्हेन्शनल सोल्जर (१९३६) यांसारखे त्याचे ग्रंथ अभ्यासनीय आहेत. फॅल्मथ येथे त्याचे निधन झाले.

पहा : रणगाडा.

दीक्षित, हे. वि.