बाब : (२॰ ऑक्टोबर १८१९ – ९जुलै १८५॰). इराणमधील मिर्झा सय्यिद अली मुहंमद या शिया पंथी तरुणाने धर्मप्रवर्तनाच्या प्रेरणेने धारण केलेली ‘ बाब’ ही एक उपाधी होय. ‘ बाब’ या अरबी शब्दाचा मूळ अर्थ ‘ प्रवेशद्वार’ असा आहे. (सूफी पंथात अंतरात्म्याशी संपर्क साधण्याचे द्वार असा त्याचा अर्थ असून सूफी व इस्माइली या दोन्ही पंथांत प्रमुख ‘ ‘शेखां’ना उद्देशून हा शब्द वापरला जातो).‘बाब’ ही उपाधी मिर्झांनी का स्वीकारली, हे समजण्यासाठी शिया पंथातील इमामांविषयीच्या धारणा घेतल्या पाहिजेत. या पंथांच्या श्रद्धेनुसार बारावा इमाम महदी हा मृत झालेला नसून केवळ अदृश्य झालेला आहे, तो अजूनही जिवंत असून योग्य वेळी त्याचे पुनरागमन होणार आहे. तो अदृश्य झाल्यानंतर पहिल्या ६९ वर्षांमध्ये क्रमाने चार मध्यस्थांच्या मार्फत त्याने लोकांना संदेश दिले होते. या मध्यस्थांनी स्वत:ला ‘ बाब’ म्हणवून घेतले. याचा अर्थ बाराव्या इमामाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रवेशद्वार म्हणून तो काम करीत होते परंतु सु. ९४॰ – ४१ पासून हे संदेश मिळावयाचे थांबले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात मिर्झा सय्यिद अली हेच बाब म्हणून पुढे आले. या बाबतीत त्यांना शेख अहमद अल्-अहसाई (१७३३ – १८२६) यांच्या शैखी पंथाकडून प्रेरणा मिळाली, असे दिसते. त्यांचे उत्तराधिकारी सय्यिद काझिम व मिर्झा सय्यिद अली यांची करबला (इराक) येथे भेट झाली होती. या पंथानुसार शिया लोकांत एक परिपूर्ण असा शिया नेहमी उपस्थित असतो किंवा त्याचा बाराव्या इमामाशी संपर्क असतो. काझिमचा मृत्यू झाल्यावर असा परिपूर्ण शिया कोण म्हणून शोध घेण्यास प्रांरभ झाला, तेव्हा मिर्झा सय्यिद अली यांनी स्वत:ला बाब म्हणून घोषित केले (२३ मे १८४४). अशा रीतीने बाबी वा बहाई धर्माच्या उगमाची बीजे शैखी पंथातच असल्याचे दिसते.बाब यांना अनेक अनुयायी मिळाले आणि त्यांच्या पंथाचा प्रचार इराणमध्ये झपाट्याने झाला. त्यांना प्रारंभी मिळालेल्या १८ शिष्यांना त्यांनी ‘जीवनाची अक्षरे’ ही उपाधी दिली. त्यांच्या बाबी पंथातूनच पुढे बहाई हा धर्म निर्माण झाला [⟶बहाई धर्म]. त्यांनी फार्सी व अरबीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी बयान नावाचे त्यांचे लेखन अत्यंत प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळात त्यांनी बाब या उपाधीचा त्याग केला आणि आपण प्रत्यक्ष बारावा इमामच असल्याचे घोषित केले. त्याही नंतर आपण ‘नुक्ता’ असल्याचे त्यांनी घोषित केले (संपूर्ण कुराणाचे सार बिसमिल्ला या शब्दातील ‘बि’ या अक्षराखाली दिल्या जाणाऱ्या नुक्त्यामध्ये आहे, अशी मुसलमानांची समजतू आहे). अगदी शेवटी त्यांनी आपण ईश्वरी आविष्कार असल्याचे घोषित केले. सध्याचे बहाई लोक मात्र त्यांच्या ‘बाब’ खेरीज बाकीच्या उपाधी मान्य करीत नाहीत व त्यांना फक्त ⇨बहाउल्लांचा अग्रदूत मानतात.त्यांनी मुल्ला-मौलवींवर कडक टीका केली. सनातनी धर्मगुरू व सरकार या दोघांनी त्यांना पाखंडी मानून तीव्र विरोध केला. धर्मप्रवर्तनानंतरचा त्यांचा बहुतेक काळ तुरुंगातच गेला. ते तुरुंगात असतानाच त्यांच्या अनुयायांनी बदश्त येथे भरलेल्या अधिवेशनात इस्लामशी सर्व संबंध तोडून टाकण्याची घोषणा केली. याच अधिवेशनात ताहिरा (सु. १८१९-५२) नावाच्या विदुषीने आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा दूर केला आणि इस्लामी रूढींविरुद्ध बंड पुकारले. स्वप्नामध्ये बाब यांच्या शिकवणीचा साक्षात्कार झाल्यानंतर तिने पती, वडील व समाज या सर्वांनी केलेला छळ सहन करून रूढींना विरोध करण्याचे महान कार्य केले. अखेरीस विरोधकांकडून तिची हत्या झाली. बाब यांच्या हत्येसाठी त्यांच्यावर शेकडो सैनिकांनी गोळ्यांचा वर्षाव केला, तेव्हा फक्त दोऱ्या तुटल्या आणि ते सुखरूप राहिले. लोकांना हा दैवी चमत्कार वाटला परंतु तरीही दुसऱ्यांदा गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची हत्या करण्यात आली (१८५॰). हत्येनंतर त्यांचे शव खड्ड्यात टाकण्यात आले होते परंतु त्यांच्या शिष्यांनी त्यांचे दफन केले. काही वर्षांनी तेथून पॅलेस्टाइनमधील मौंट कार्मेल पर्वतावर नेऊन तेथे त्याचे दफन करण्यात आले. आता तेथे त्यांचे भव्य स्मृतिमंदिर बांधण्यात आले आहे. याच काळात त्यांच्या सु. वीस हजार अनुयायांची हत्या करण्यात आली. त्यांच्या अनुयायांनी केलेल्या सशस्त्र उठावात त्यांनी स्वत: भाग घेतला नाही परंतु त्यांच्या अनुयायांचे हे उठाव अत्यंत जबरदस्त होते व त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रचंड आव्हान दिले होते. बाब यांनी केलेली ही क्रांती सरंजामशाहीविरोधी होती, असे काही विद्वानांना वाटते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. त्यांची चौकशी करण्यासाठी पाठविलेल्या दूताला आणि वेगवेगळ्या प्रशासकांनाही त्यांनी वश केले होते. आपण आरसा असून एकमेव असा ईश्वर त्यामध्ये प्रतिबिंबित होतो, असे ते म्हणत. त्यांनी कुराणातील अनेक नियम कालबाह्य म्हणून त्याज्य ठरविले. स्वर्ग, नरक, अंतिम निवाडा इत्यादींचे वेगळे अर्थ सांगितले. स्त्रियांना बुरख्याची गरज नाही, विधुर व विधवा यांनी पुनर्विवाह करावा, घटस्फोटास परवानगी असली, तरी तो टाळण्याचा प्रयत्न करावा, अंत्यसंस्कारांखेरीज इतर वेळी सार्वजनिक पूजा वा प्रार्थनेची गरज नाही, एक महिना म्हणजे १९ दिवस, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करावा, अमली पदार्थाचे सेवन करू नये, भिक्षा मागू नये व देऊही नये, दर १९ दिवसांनी १९ लोकांना बोलवावे व त्यांना किमान पेलाभर पाणी द्यावे इ. नियम त्यांनी घालून दिले. त्यांच्या या बाबी पंथात १९हा अंक पवित्र मानला असून वर्षाचे महिने १९ व महिन्याचे दिवसही १९ मानले आहेत. ईश्वर लवकरच नव्या प्रेषिताला पाठवणार आहे, हे बाबच्या तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व असून त्याला अनुसरूनच पुढे बहाउल्ला यांनी आपणच तो प्रेषित असल्याचे घोषित केले. स्वत: बाब यांनी मात्र बहाउल्लांचा सावत्र भाऊ मिर्झा याह्या नूरी याला आपला आध्यात्मिक वारस नेमले होते व त्याला सुबह-इ-अझल (शाश्वताचा उष:काल) अशी उपाधी दिली होती.

संदर्भ : Brown, E.G.A. Traveller’s Narrative, New York, 1930

बेही, एच् साळुंखे, आ.ह.