झामाची लढाई : भूमध्य समुद्र आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशावर स्वामित्व मिळविण्यासाठी इ. स. पू. तिसऱ्या शतकात रोम व कार्थेज यांच्यात दोन युद्धे झाली. ती प्यूनिक युद्धे म्हणून ओळखली जातात. इ. स. पू. २०२ मध्ये ट्युनिसच्या नैर्ऋत्येस सु. १२० किमी. अंतरावर, झामा गावाजवळ झालेल्या निर्णायक लढाईत कार्थेजच्या सत्तेचा शेवट झाला. तत्पूर्वी कार्थेजचा सेनापती [⟶ हॅनिबल] याने रोमनांचा खुद्द इटलीत व इतर ठिकाणी वरचेवर पराभव केला होता. कार्थेजला लगाम घालण्यासाठी कार्थेजच्या भूमीवर लढाया करणे, हाच उत्तम उपाय आहे हे रोमनांनी ओळखले. परिणामतः सेनापती पब्लिअस कॉर्नीलिअस सिपिओ (सिपिओ ॲफ्रिकेनस) याने सिसिली सोडून इ. स. पू. २०३ च्या उन्हाळ्यात राजधानी कार्थेजच्या वायव्येला उटिका येथे रोमन सैन्य उतरविले. त्यामुळे हॅनिबल इटली सोडून कार्थेजला परतला आणि झामापाशी त्याने सैन्य जमविले. सिपिओने उटिकाचा वेढा उठवून सिर्टामार्गे झामाकडे कूच केली. कार्थेजचा शत्रू  न्युमिदियाचा राजा मॅसिनिसा हा ६,००० घोडेस्वार व ४,००० पदाती घेऊन सिपिओला मिळाला. रोमन सैन्याचा जोर पाहून हॅनिबलने तहाची बोलणी सुरू केली पण सिपिओने ती झिडकारली. हॅनिबलच्या सैन्याच्या अग्रभागी ८० हत्ती होते व त्यांच्या मागे पायदळ व पायदळाच्या बगलांवर घोडदळ होते. रोमनांकडे हत्ती नव्हते पण हत्तीचा हल्ला झाल्यास त्यांनी सैन्य-तुकड्यांमध्ये हत्तींना जाण्यासाठी वाटा  ठेविल्या. लढाईची सुरुवात हत्तींनी केली परंतु रोमन पायदळाने शिंगे-तुताऱ्या वाजवून हत्तींना घाबरवून सोडले. हत्ती परत फिरले व कार्थेजच्या घोडदळावर आदळले. काही हत्ती मात्र रोमन पायदळात घुसले पण ते रोमन पिछाडीस जाताच त्यांचा फडशा पाडण्यात आला. या गोंधळात मॅसिनिसाने कार्थेजच्या घोडदळावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. दोनही बाजूंच्या पायदळांत युद्धास सुरुवात झाली परंतु कार्थेजच्या अग्रिम पायदळाने धीर सोडला व ते माघारी फिरले. त्यामुळे मागील पायदळाबरोबरच त्यांचा झगडा सुरू झाला. सिपिओने या संधीचा लाभ घेऊन कार्थेजच्या सैन्याची कोंडी केली. त्याच सुमारास रोमन घोडदळही पाठलाग संपवून परत आले. यामुळे कार्थेजच्या सैन्याला कोंडी फोडणे अशक्य होऊन त्यांचे २०,००० सैनिक कापले गेले. कार्थेजचा पराभव झाला. या युद्धात सु. २,००० रोमन व न्युमेडियन ठार झाले. कार्थेज व रोमन यांच्यात तह होऊन रोमची सत्ता भूमध्य समुद्र व त्याच्या परिसरात स्थिरपद झाली.

दीक्षित, हे. वि.