असईची लढाई :  भारतातील इंग्रज–मराठे-संघर्षास इंग्रजानुकूल कलाटणी देणारी प्रसिद्ध लढाई. औरंगाबादच्या ईशान्येस ७२ किमी. वर असणाऱ्या असई या गावी दि. २३ सप्टेंबर १८०३ रोजी ही लढाई झाली. ही मुख्यत्वे इंग्रज व त्यांविरुद्ध रघूजी भोसले, नागपूरकर आणि दौलतराव शिंदे, ग्वाल्हेरकर या मातब्बर मराठा सरदारांत झाली. ⇨ मराठा मंडळ उद्‌ध्वस्त करून मराठ्यांचे राज्य नामशेष करणे, तसेच तैनाती फौजेचा एतद्देशीय राज्यकर्त्यांना स्वीकार करावयास लावून ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि हळूहळू ब्रिटिशांची सत्ता भारतात दृढमूल करणे असे अनेक हेतू या लढाईमागे होते. या लढाईचे मुख्य ब्रिटिश सूत्रधार आर्थर वेलस्ली (ड्यूक ऑफ वेलिंग्टन) व स्टीव्हन्सन हे सेनाधुरंधर असले, तरी गव्हर्नरजनरल ⇨ वेलस्ली, जनरल लेक, पुणे दरबारचा वकील कर्नल क्लोज वगैरे इतर अधिकारी व्यक्तींनी तत्संबंधी अत्यंत धूर्तपणे पूर्वतयारी केली होती. ब्रिटिशांनी प्रथम १८०२च्या वसई तहाने बाजीराव पेशव्यास कमजोर केले, दिल्लीचा बादशाह शाहअलम, यशवंतराव होळकर तसेच इतर मराठा सरदार यांच्याशी मैत्रीची बोलणी चालू ठेवून आमिषे दाखविली आणि हैदराबादचा निजाम व म्हैसूरकर यांना तैनाती फौजेने अंकित केले. एवढे करूनही

इंग्रज सेनेची आगेकूच.

ब्रिटिशांनी शिंदे व भोसले यांच्या फौजांतील यूरोपीय अधिकारी, शिंद्यांचा सरदार अमीरखान व बेगम समरूची दोन पलटणे यांना फितुरीने आपल्या पक्षाकडे घेतले. याशिवाय शीख व भडोचकडील भिल्ल यांनाही लाचलुचपतीने फितूर केले. हे सर्व कारस्थान पूर्ण झाल्यानंतर ड्यूक ऑफ वेलिंग्टनने भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून लढाईस योग्य ती वेळ निवडली कारण पाऊस, पूर आलेल्या नद्यांचे अडथळे, महाराष्ट्रातील अपरिचित व दुष्काळी मुलूख, अन्नधान्य व जनावरांच्या वैरणीची टंचाई वगैरे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी त्यांना मुकाबला करावयाचा होता. या दृष्टीने तयारी होताच, वेलस्लीने शिंद्यास दक्षिणेतून सैन्य परत नेण्याविषयी सांगितले. त्याने नकार कळविताच युद्धास सुरुवात झाली. प्रथम वेलस्लीने निजामच्या सरहद्दीवरील शिंद्याच्या ताब्यातील अहमदनगरचा किल्ला ऑगस्ट १८०३ मध्ये काबीज केला. शिंदे व भोसले यांच्या फौजा भोकरदन व जाफराबाद या दोन गावांच्या दरम्यान तळ ठोकून होत्या. त्यात कवायतीच्या १६ पलटणी होत्या. या वेळी स्टीव्हन्सन व वेलस्ली यांनी बदनापूर या गावी असता असे ठरविले, की निरनिराळ्या मार्गांनी जाऊन २४ ऑगस्टला सकाळी मराठ्यांवर हल्ला चढवावयाचा. स्टीव्हन्सन पश्चिमेकडील मार्गाने व वेलस्ली पूर्वेकडील मार्गाने गेला. वेलस्ली नौलनी येथे २३ तारखेस आला तेव्हा त्यास गुप्त हेराकडून समजले, की तेथून जवळच सु. १० किमी.वर खेळणा नदीकाठी मराठे तळ देऊन आहेत. स्टीव्हन्सन आला नसतानाही वेलस्लीने मराठ्यांवर एकदम हल्ला करण्याचे ठरविले. तत्पूर्वी त्याने कॅप्टन बर्क्‌ली यास काही सामग्री व निवडक सैन्य देऊन नौलनी गावात राहण्याचा हुकूम दिला व स्वत: टेहळणीकरिता निघाला. जवळच्या टेकडीवर येताच त्यास मराठ्यांचे सैन्य खेळणेच्या पैलतीरावर जुआ नदीच्या संगमावर एका लांब रेषेत तळ देऊन राहिल्याचे आढळून आले. त्याच्या उजव्या बाजूस फक्त फौज व डाव्या बाजूस असई गावानजीक पायदळ व तोफा होत्या. प्रथम तोफा निकामी करण्याच्या उद्देशाने मराठ्यांच्या डाव्या बाजूस जाण्याकरिता त्याने आगेकूच केली. असई येथे दोन्ही सैन्यांची गाठ पडून निकराचे युद्ध झाले. मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांकडे ५०,००० सैन्य होते, तथापि त्यातील बेगम समरूच्या दोन पलटणी कुचकामी होत्या आणि इतर मराठा सरदारांचे फारसे साहाय्य मिळाले नाही. इंग्रजांची खडी फौज सु. ६,००० होती आणि पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, पेशवे व म्हैसूरकर यांच्या फौजांनीही इंग्रजांस मदत केली होती.

या युद्धामुळे मराठा मंडळाचे कार्य संपुष्टात येऊन मराठी सत्तेस उतरती कळा लागली आणि इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली.

संदर्भ : 1. Duff, Grant, History of the Marathas, Bombay, 1880.

२. परांजपे, शि. म. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास, पुणे, १९३४.

देशपांडे, सु. र.