मंगमरी, बर्नार्ड लॉ : (१७ नोव्हेंबर १८८७–२४ मार्च १९७६). ब्रिटिश फील्ड मार्शल. जन्म लंडन येथे.  शिक्षण सेंट पॉल स्कूल व सँडहर्स्ट येथील शाही सैनिकी अकादमी (रॉयल मिलिटरी कॉलेज) मध्ये झाले. १९०८ मध्ये त्याची रॉयल वॉरिकशर रेजिमेंटमध्ये पायदळाचा लेफ्टनन्ट म्हणून  नेमणूक झाली. पाहिल्या महायुद्धात फ्रान्स व बल्जियम येथील आधाड्यांवर त्याने तीन वर्षे काढली. त्यानंतर मंगमरीने स्टाफ ऑफिसर म्हणून ऱ्‍हाईन (जर्मनी), कॉर्क (आयर्लंड) व इंग्लंड आणि हिंदुस्थानामध्येही काम केले. १९३५ साली त्याने इंग्लंडमध्ये ९ व्या इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले तर १९३८ मध्ये पॅलेस्टाइन येथे ८ व्या डिव्हिजनचे नेतृत्व केले. नंतर त्याची ऑगस्टमध्ये तिसऱ्‍याच डिव्हिजनवर नेमणूक करण्यात आली व पुढे त्याला मेजर जनरलचा हुद्दा मिळाला. १९४० मध्ये लेफ्टनन्ट जनरलच्या पदावर त्याची नेमणूक होऊन ५ व्या कोअरचा कार्यभाग तो सांभाळू लागला. १९४० मध्ये डंकर्क या शहरामधून त्यास माघार घ्यावी लागली होती. १९४२ मध्ये मंगमरीने आफ्रिकेमध्ये आठव्या आर्मीचे नेतृत्व केले तसेच जर्मन फील्ड मार्शल ⇨ रोमेल याच्या आफ्रिकी कोअरचे आक्रमण थोपविले व जर्मनांना आफ्रिकेबाहेर हुसकावून देण्यात यश मिळविले.  पुढे १९४३ मध्ये सिसिली व इटलीपर्यंत त्याने आगेकूच केली. त्याचप्रमाणे १९४४ मध्ये त्याने ऑपरेशन ओव्हरलॉर्डमध्ये समुद्रमार्गे सैन्य उतरवून नॉर्मडीवर हल्ला करून उत्तर जर्मनीपर्यंत धडक मारली. उत्तर आफ्रिका व यूरोपमधील त्याच्या पराक्रमामुळे मंगमरी विशेष प्रसिद्ध झाला.

एल् ॲलामेन [⟶ एल् ॲलामेनची लढाई] या गावजवळ झालेल्या युद्धात मंगमरीन मिळविलेल्या देदीप्यमान विजयामुळे त्यास १९४६ साली ‘व्हायकौन्ट ऑफ ॲलामेन’ ही पदवी देण्यात आली. ब्रिटिश इंपीरियल जनरल स्टाफचा प्रमुख म्हणून नंतर त्याने काम केले (२९४६ – ४८). १९४८-५१ या काळात पश्चिम यूरोपीय राष्ट्रांनी स्थापन केलेल्या ‘संरक्षण संघटनेचा’ तो कायमचा सैनिकी अध्यक्षही (चेअरमन ऑफ द वेस्टर्न युनियन कमांडर्स इन चीफ) होता. १९५१-५८ या काळात तो नाटोचा (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) वरिष्ठ सेनाधिपती होता.

मंगमरीने पुढील ग्रंथांचे लेखन केले आहे : फॉरवर्ड टू व्हिक्टरी (१९४६), नॉर्मंडी टू द बाल्टिक (१९४७), फॉरवर्ड फ्रॉम व्हिक्टरी एल् ॲलामेन टू द रिव्हर सांग्रॉ (१९४८), ॲन ॲप्रोच टू सॅनिटी (१९५९), द पाथ टू लीडरशिप (१९६१) आणि ए हिस्टरी ऑफ वॉरफेअर (१९६८) इत्यादी. त्याचप्रमाणे त्याने नियतकालिकांतून लष्करी डावपेच व सैनिकी संघटना यांबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय तसेच आठवणी, मेम्वार्स या छेट्या स्मृतिग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत (१९५८). इंग्लंडमधील हँपशर (ऑल्टन) येथे त्याचे निधन झाले.

बोराटे, मुधीर