पाणबुडी युद्धतंत्र : पाणबुडी ही एक जलनिमग्न अस्त्रयंत्रणा असल्याने आधुनिक नाविक युद्धतंत्रात तिला विशेष महत्त्व आहे. आक्रमक स्वरूपाचे व पाणबुडीविरोधी अशी दोन्ही तंत्रे आधुनिक काळात विकसित झाली आहेत. पाणबुडी दीर्घ काळ पाण्यात लपून राहू शकते. त्याचप्रमाणे तिचे सागरी संचारक्षेत्रही विस्तृत असते त्यामुळे तिचे सागरी कार्यक्षेत्र वरचेवर बदलल्यास शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण होऊन त्याची सागरी वाहतूक खंडित, विलंबित वा विस्कळित करता येते.

पाणबुडी : डीझेल एंजिनावर चालणाऱ्या पारंपरिक पाणबुडीची पाण्याखाली राहण्याची क्षमता कमी असते. तिच्यावर पाणतीर, पाणसुरुंग, तोफ इ. शस्त्रास्त्रे असतात. शत्रूच्या बंदरात व किनारपट्टीवर सुरुंग पेरणे व घातपाती कृत्ये करणारे लोक आणि हेर उतरविणे, त्यांची व्यापारी जहाजे आणि पाणबुड्या बुडविणे तसेच गोळामारी करणे इ. आक्रमक कारवाया पाणबुडीद्वारा केल्या जातात. युद्धनौकांशी सामना देण्यासाठी मात्र त्या निरुपयोगी असतात. संरक्षक कामगिरीच्या दृष्टीने जलस्थलगामी आक्रमणात आपल्या नौकांचे रक्षण करणे, आरमाराला मार्गदर्शन करणे, सागरी किनाऱ्यासंबंधी गुप्तवार्ता मिळवणे, समुद्रात पडलेल्या वैमानिकांची सुटका करणे व पाणसुरुंग पेरणे इ. कामे त्यांच्यामार्फत केली जातात. या पाणबुड्या शत्रूच्या दुर्बळ नाविकदलावर वचक ठेवू शकतात. काही राष्ट्रे डीझेल पाणबुडीत क्षेपणास्त्रे ठेवतात. या क्षेपणास्त्रांना पर्यटन क्षेपणास्त्र (क्रूइझ मिसाइल) म्हणतात. त्यांचा पल्ला ४५ ते ४०० किमी. पर्यंत असतो. अस्त्र सोडण्यासाठी पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. शत्रूच्या पाणतीरांच्या पल्ल्याबाहेर राहून ती अस्त्रे फेकली जातात. तसेच अस्त्रक्षेपणानंतर पळून जाण्यास बराच अवधी मिळतो. या डीझेल पाणबुड्यांत मूलतः दोष असल्यामुळे त्यांच्याऐवजी अणुशक्तीवर चालणाऱ्या आघातक पाणबुड्या प्रचारात येत आहेत. आघातक पाणबुडीचे प्रचालन अणुशक्तीने केले जाते. अणुइंधन संपेपर्यंत म्हणजे साधारणपणे ३९ महिने ती पाण्याच्या पृष्ठभागाखाली काम करू शकते अथवा १,९२,००० किमी. लांबीचा प्रवासही करू शकते मात्र पाणबुडीत सतत राहून काम करण्याची नाविकांची क्षमता फक्त ६० दिवसांइतकीच असते. शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या नौकांवर ही पाणबुडी हल्ला करू शकते. हिच्यावर पाणतीर व पर्यटन क्षेपणास्त्र ही प्रमुख आक्रमक अस्त्रे असून तिला पाण्यात दडून राहून या अस्त्रांचा मारा करता येतो. शत्रूच्या पाणबुड्यांची पारध करणे, हे तिचे मुख्य काम होय. तिचा जलांतर्गत पर्यटनवेग ३० नॉटपेक्षा अधिक असल्यामुळे चाहूल लागू न देता व फार आवाज न करता ही पाणबुडी संचार करू शकते त्यामुळे तिचा शोध व पारध करणे अत्यंत कठीण जाते. या ३४० मी. लांबीच्या व ४,००० ते ८,२५० (जलनिमग्न) भाराच्या असतात. त्यांवर २० पाणतीर व आठ आणवीय अस्त्रे असतात. अमेरिकेच्या थ्रेशर, स्किपजॅक इ. व रशियाच्या इ. एच्. सी.वर्गाच्या आघातक पाणबुडी-नौका प्रसिद्ध आहेत. 

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आंतरखंडीय व दूरगामी प्रक्षेपी अण्वस्त्रांचा व अशा अस्त्रांना फेकू शकणाऱ्या प्रक्षेपी अस्त्रयुक्त पाणबुड्यांचा जन्म झाला. प्रक्षेपी अस्त्रयुक्त पाणबुड्या दूरगामी अस्त्रांचा मारा करू शकतात. लष्करी केंद्रे, औद्योगिक वसाहती, महानगरे इत्यादींचा विध्वंस करून शत्रूवर वचक बसविणे, हा त्यांचा एक हेतू मानला जातो.  

प्रक्षेपी अस्त्रांच्या पाणबुड्या ८,००० ते १६,८०० टनभाराच्या असून त्या १६० ते २२४ अण्वस्त्रे फेकू शकतात. अण्वस्त्रांचा पल्ला ३,००० ते ९,००० किमी.पर्यंत असतो. या पाणबु़ड्या नेहमीच्या नाविक लढाईत भाग घेत नाहीत परंतु आघातक पाणबुड्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे पाणतीर असतात. अशा एका पाणबुडीची आजची किंमत १२ अब्ज रु. आहे.

 आक्रमक युद्धतंत्राच्या दृष्टीने विस्तीर्ण सागरी क्षेत्र व गनिमी हल्ले करण्याची पात्रता यांमुळे आघातक पाणबुड्यांचे आजतरी परिपत्य करणे अशक्य दिसते. शिवाय पाणबुडीविरोधी तंत्र अपरिपक्व असल्यामुळे अशा पाणबुड्यांची पारध करणे कठीण असते. अणुशक्तीच्या वापरापूर्वी डीझेल पाणबुड्या एकाकी व्यापारी जहाजांवर किंवा त्यांच्या काफिल्यावर बेमुर्वत हल्ले करू शकत. सागरी नाकेबंदी करण्यात त्यांचा उपयोग होई परंतु रक्षित काफिल्यावरील त्यांचे हल्ले महाग पडतात. पहिल्या महायुद्धात पाणबुड्यांनी व्यापारी जहाजे बुडवून महत्त्वाची कामगिरी केली. पाणबुड्यांच्या तळांची नाकेबंदी करणे व बंदरात पोलादी जाळी उभी करून त्यांच्या संचारास पायबंद घालण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या ॲड् मिरल कार्ल डनिट्स याने व्यापारी जहाजांच्या काफिल्यावर हल्ले करण्यासाठी लांडगेतोड (वुल्फ पॅक) तंत्र प्रथमच वापरले. एका पाणबुडीने प्रथम शत्रूच्या काफिल्याचा शोध घेऊन व नंतर इतर पाणबुड्यांना बोलावून हल्ला करणे, असे हे तंत्र होते. हल्ला करण्यापूर्वी पाणबुडी प्रमुखाची संमती घ्यावी लागे परंतु असे करण्यात फार वेळ जाई. संदेश देवाण-घेवाण करताना पाणबुड्यांचे कार्यक्षेत्र समजत असे व त्यांच्याविरुद्ध शत्रूच्या युद्धनौकांना कारवाई करणे सुलभ होई. शिवाय पाणबुड्यांची संख्या अपुरी पडे. तथापि अमेरिकी तंत्राप्रमाणे सापडेल त्या शत्रु-जहाजावर टोळीतील पाणबुड्यांनी स्वतंत्रपणे हल्ला करावा, अशी योजना होती. जपानने आपल्या पाणबुड्यांचा आक्रमणासाठी फारसा उपयोग केला नाही. पॅसिफिक महासागरातील बेटांवरील सैन्याला रसद पुरविण्यासाठी पाणबुड्यांना गुंतविण्यात आले. अमेरिकन पाणबुड्यांनी व युद्धनौकांनी जपानी वाहतूक-जहाजांचा व पाणबुड्यांचा जवळजवळ समूळ नाश केला. जर्मनांच्या ७८० पाणबुड्यांचा नाश झाल्यामुळे नाविक युद्ध चालू ठेवणे व दोस्त राष्ट्रांची सागरी वाहतूक बंद पाडणे जर्मनीस शक्य झाले नाही.


पाणबुडीविरोधी तंत्र: सागरी वाहतूक व युद्धनौकादल यांचे पाणबुड्यांपासून रक्षण करणे आणि शत्रूच्या पाणबुड्यांना बुडविणे, हे या तंत्राचे उद्दिष्ट असते. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा पर्यटनमार्ग, वेग, प्रकार व पाण्यातील स्थान इ. निश्चित करणे तसेच योग्य त्या संहारक शस्त्रास्त्रांचा उदा., पाणतीर, जलभार स्फोटक, अण्वस्त्र इत्यादींचा मारा करून त्यांचा निःपात करणे, अशी पाणबुडीविरोधी कार्यपद्धती असते. या कार्यपद्धतीत आपल्या आघातक व शोधक पाणबुड्या, इतर युद्धनौका, हेलिकॉप्टर, टेहळणी व लढाऊ विमाने व उचित क्षेपणास्त्रे या सर्वांचा परस्परपोषक उपयोग करावा लागतो. पाणबुड्यांचा वेध घेण्यासाठी स्वनक (सोनार), रडार व चुंबकीय विक्षेप-अभिज्ञातक त्याचप्रमाणे डीझेल एंजिनांचे निष्कासित वायू हुंगणारी (स्निफर) इ. इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे आवश्यक असतात. गणकयंत्राद्वारे त्या उपकरणांनी ग्रहण केलेल्या माहितीचे संकलन केले जाते. पाणबुडीविरोधी दलाची उभारणी करताना परिव्ययफलकारकते (कॉस्ट इफेक्‍टिव्हनेस) चा विचार करावा लागतो. आघातक पाणबुडीची किंमत साधारणपणे ३०,००० टनभार असलेल्या व्यापारी जहाजाच्या किंमतीच्या सातपट असते. दहा व्यापारी जहाजांच्या बदल्यात जर एक आघातक पाणबुडी बुडविता आली, तरच विरोधी योजना लाभदायक ठरते परंतु जर का सैनिक किंवा युद्धोपयोगी सामग्री वाहून नेणारी जहाजे बुडविली गेली, तर मात्र हे प्रमाण व्यस्त ठरते. परिव्यय-फलकारकता लक्षात घेता पारंपरिक क्षेपणास्त्रयुक्त पाणबुड्या आघातक पाणबुड्यांपेक्षा लाभदायक ठरतील, असे काही युद्धशास्त्रज्ञांचे मत आहे. पाणबुडीविरोधी कारवाईत शत्रूच्या पाणबुड्यांची माहिती मिळवून  ती आपली विमाने व हेलिकॉप्टर यांना कळविणे आवश्यक असते. तसेच आपल्या नाविक दलाच्या किंवा काफिल्याच्या क्षेत्रसीमांवर पाण्यात दडून राहून शत्रूच्या पाणबुड्यांच्या हालचालींची वार्तां दलाधिकारी व काफिला प्रमुखास पुरविणे व नंतर पाणबुडीविरोधी यंत्रणा कार्यवाहित असणे आवश्यक असते. विमानांतूनही पाणतीर सोडता येतात. शत्रूच्या पाणबुड्यांना फसविण्यासाठी प्रलोभक नौकाही (डिकॉय शिप्स) वापरतात. विशेषतः उर्ध्वारोहणावतरणक्षम विमाने पाणबुडीविरोधी कारवाईसाठी अत्यंत उपयोगी असतात. मात्र त्याकरिता काफिल्यातील दोन नौकांमधील अंतर २५ ते ३० किमी. राखावे लागते.

निष्क्रिय पाणबुडीविरोधी उपाय: हे उपाय पुढीलप्रमाणे असतात. समुद्राच्या तळपृष्ठावर ठिकठिकाणी स्थिर नादश्रावक (फिक्स्ड लिसनिंग डिव्हाइसेस) पेरून ठेवणे. त्याच्यामार्फत किनाऱ्यावरील नाविक केंद्रांना शत्रूच्या पाणबुड्यांची माहिती कळविण्यात येते. उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा ते उत्तर अटलांटिक रिजच्या द्रोणीत आणि जिब्राल्टरच्या खाडीच्या पश्चिम दाराशी असे श्रावक बसविलेले आहेत. समुद्राच्या पोटात अंकितस्वनक (कॅप्टिव्ह) पाणतीर हे शत्रूच्या पाणबुडीचा आवाज उमटल्याबरोबर जाऊन आदळतात. बंदराच्या व  नाविक तळाच्या परिसरात पाणसुरुंग व पाणबुड्यांना अटकाव करणारी पोलादी जाळी पसरून ठेवण्याचीही सोय करता येते. पाणबुड्यांना नौकनयनासाठी व जलांतर्गत स्थान निश्चित करण्यासाठी कृत्रिम उपग्रह व किनाऱ्यावरील रेडिओ केंद्र यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहावे लागते. यात अडथळा आणण्यात यश आल्यास शत्रूच्या पाणबुड्यांचा धोका बराच कमी होऊ शकतो. पाणतीर व अस्त्रे यांच्यात महास्फोटकाऐवजी आणवीय संहारशीर्षे वापरण्याचीही सोय असते. यामुळे एकाच अस्त्रफेकीत पाणबुडीचा नाश करता येणे शक्य असते. जोपर्यंत पाणबुडीचा शोध हमखास आणि चटकन लावता येत नाही तोपर्यंत पाणबुडी हे दुर्दम्य संहारशस्त्र म्हणून राहू शकेल. क्षुद्र पाणबुड्या (मिड्जेट सबमरीन) या पाणतीरासारख्याच असतात परंतु नाविकाला त्यांचे मार्गदर्शन करावे लागते. दुसऱ्या महायुद्धात यांचा उपयोग क्वचितच करण्यात आला. पाकिस्तानकडे अशा पाणबुड्या आहेत. किनाऱ्यापाशीही यांचा उपयोग करता येतो परंतु तोफनौका व तत्सम युद्धनौकांच्या पुढे त्या निष्प्रभ ठरतात. अत्याधुनिक नाविक लढायांत त्यांना स्थान नाही.

पहा : तोफनौका तोफ व तोफखाना नौसेना पाणतीर पाणबुडी.

संदर्भ: 1. Corse, C.D. Introduction to Shipboard Weapons,  Annapolis, 1975.

  2. Morris, E. &amp Others, Weapons &amp Warfare of the 20th Century, London, 1976.

  3. Warner,  Oliver &amp Others, The Encyclopedia of Sea Warfare,  London, 1975.

दीक्षित, हे. वि.