फ्रून्झ्ये, म्यिखईल व्हस्यील्येव्ह्यिच : (२ फेब्रुवारी १८८५-३१ ऑक्टोबर १९२५). एक कुशल रशियन सेनानी व रशियातील लाल सेनेचा एक संस्थापक. जन्म रशियाच्या किरगीझिया प्रांतातील पिश्पेक येथे. त्याच्या स्मरणार्थच या गावाचे फ्रून्झ्ये हे नाव ठेवण्यात आले. त्याचे वडील रशियन लष्करातील वैद्यकीय सेवेत होते. सेंट पीटर्झबर्ग येथील तंत्रनिकेतनात शिक्षण घेत असतानाच तो बोल्शेव्हिकांच्या क्रांतिकारी चळवळीत भाग घेऊ लागला. परिणामतः १९०४ साली त्याला या संस्थेतून काढून टाकण्यात आले. १९०५ च्या मॉस्को येथील क्रांतिकारी उठावातही त्याने भाग घेतला. १९०७ ते १९१४ या दरम्यान घडलेल्या तुरुंगवासात त्याने युद्धविषयक साहित्याचे विपुल वाचन केले. त्याला सायबीरियात हद्दपार केले असतानाच १९१५ साली तो तेथून पळाला. पहिल्या महायुद्धात रशियाच्या पश्चिम आघाडीवर त्याने झारविरोधी सैनिकी संघटना उभारली. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर झारनिष्ठ जनरल करन्यीलॉव्ह याने पेट्रग्राडवर हल्ला केला त्यावेळी फ्रून्झ्येने कामगारसेनेच्या मदतीने त्याचा पराभव केला. क्रांत्युत्तर यादवी युद्धकाळात (१९१७-१९२०) फ्रून्झ्येला जनरलपद देण्यात आले. यादवी युद्धात त्यावेळी पूर्वेकडील आघाडीवर फ्रून्झ्येने प्रतिक्रांतिवादी ॲड्‌मिरल ए. व्ही. कॉलचाक याचा (१९१९) आणि दक्षिणेकडील आघाडीवर जनरल रँगेल याचा (१९२०) पराभव केला. मार्च १९२४ मध्ये ‘डेप्युटी कॉमिसार’ (युद्धविभागाचा उपप्रमुख) म्हणून व जानेवारी १९२५ मध्ये ट्रॉट्स्कीच्या जागी ‘कॉमिसार’ (युद्धविभागाचा प्रमुख) म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. एकात्म सेनेचे तत्त्व फ्रून्झ्येनेच पुरस्कृत केले. जागतिक कामगारक्रांतीच्या ध्येयानुसार व प्रणालीनुसार आक्रमक लष्करी कारवाईस योग्य अशी लोकसेना तयार करणे, असा त्या तत्त्वाचा अर्थ आहे. हे काम जुन्या शाही सैनिकी अधिकाऱ्यांकडून होणार नाही, असे त्याचे मत होते. उलट १९१८ नंतर ट्रॉट्स्कीने एक आपद्‌धर्म म्हणूनच लाल सेनेत असे अधिकारी नियुक्त केले. स्टालिन-ट्रॉट्स्की सत्ता-संघर्षात म्हणूनच फ्रून्झ्येने स्टालिनला पाठिंबा दिला. दुसऱ्या महायुद्धात रशियन सेनेला मिळालेल्या काही आघाड्यांवरील यशाचे श्रेय फ्रून्झ्येच्याच लष्करी डावपेचांना दिले जाते. रशियन नागरिकांना जे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते, त्यांचे मूळ फ्रून्झ्येच्याच विचारसरणीत आहे. पोटातील व्रणव्याधीच्या शस्त्रक्रियेनंतर फ्रून्झ्ये मॉस्को येथे मरण पावला.

संदर्भ : Liddell Hart, B. H. The Soviet Army, London, 1957.

दीक्षित, हे. वि.