जटलंडची लढाई : पहिल्या महायुद्धातील एक महत्त्वाची सागरी लढाई. ही ब्रिटिश आणि जर्मन नौसेनेत जटलंड द्वीपकल्पाच्या वायव्येस स्कॅगरॅक आखाताच्या मुखाशी झाली (३१ मे १९१६–१ जून १९१६). ब्रिटिश अड्‌मिरल जेलिको व जर्मन ॲड्‌मिरल शेर हे प्रमुख होते. ब्रिटिशांच्या १५१ व जर्मनांच्या ९९ लढाऊ जहाजांनी लढाईत भाग घेतला होता. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मनीची कडेकोट सागरी नाकेबंदी केल्यामुळे जर्मनीला कच्चा माल आणि अन्नधान्य मिळणे दुरापास्त होऊन बसले. अशा परिस्थितीत ३१ मे १९१६ रोजी जर्मन ॲड्‌मिरल हिपर याच्या आघाडी दलाने स्कॅगरॅगच्या दिशेला कूच केले. या हालचालीची बातमी जेलिकोला आधीच मिळाल्यामुळे त्यांने ॲड्‌मिरल बीटीचे दल आघाडीवर पाठविले. दुपारी ३.३० वाजता ही दोन्ही दले जटलंडच्या वायव्येस भिडून लढाईस सुरुवात झाली. पाठोपाठ जेलिको व शेर याची मुख्य दलेही संग्रामात सामील झाली. संध्याकाळच्या सुमारास जेलिकोने जर्मन दलाचा परतीचा मार्ग तोडण्यास सुरुवात केली. शेरच्या ध्यानात ते आल्यामुळे व शिवाय ब्रिटिशांशी निकाली युद्ध देण्याची शक्ती नसल्यामुळे त्याने मध्यरात्रीच्या सुमारास भयंकर हाणामारीने कोंडी फोडली व आपले दल याड या सुरक्षित जर्मन तळाच्या आसऱ्यास नेले. दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांनी जर्मन आरमाराला गाठण्याचा प्रयत्न केला परंतु जर्मन दल निसटून गेल्याचे दिसल्यामुळे ब्रिटिश स्कॅपा फ्लो या तळाकडे ते परतले. या युद्धात जर्मनांची ११ जहाजे व ३,०३९ खलाशी आणि ब्रिटिशांची १४ जहाजे व ६,७८४ खलाशी नष्ट झाले. जटलंडची लढाई ही सागरी संग्रामपर्वाचा शेवट होय. या लढाईमुळे लढाऊ क्रूझरांचा निरूपयोगीपणा पटला. या युद्धाचा जरी दूरगामी परिणाम झाला नाही. तरी ब्रिटिश नौशक्ती खच्ची करणे आवश्यक आहे, याची खात्री पटून जर्मनांनी पुढे मोठ्या प्रमाणावर पाणबुड्यांचा उपयोग सुरू केला.

दीक्षित, हे. वि.