ब्रॅड्ली, ओमर नेल्सन: (१२ फेब्रुवारी १८९३-९ एप्रिल १९८१). दुसऱ्या जागतिक महायुद्धातील अमेरिकन सेनापती. १३ लक्षांहून अधिक अधिकारी व सैनिकांचे नेतृत्व करून ब्रॅड्लीने अमेरिकन सैनिकी इतिहासात अपूर्व विक्रम केला. ⇨ जॉर्ज पॅटन, कॉलिन्झ जोझेफ लॉटन व मॅथ्यू रिजवे यांसारखे विख्यात सेनापती त्याच्या हाताखाली होते. ब्रॅड्ली हा सामान्य सैनिकांनाही आपलासा वाटे म्हणून त्याला ‘सोल्जर्स जनरल’ असे म्हणत असत. दुसऱ्या महायुद्धापूर्वी त्याला युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता.

ब्रॅडलीचा जन्म मिसूरी राज्यात क्लार्क नावाच्या गावी झाला. त्याचे वडील शिक्षक होते. घरची गरिबी होती. १९११ साली त्याने वेस्ट पॉइंट अकादमीत प्रवेश केला. १९१५ मध्ये ⇨ आयझनहौअर यांच्याबरोबरच तो पायदळात अधिकारी झाला. पायदळ विद्यालयाचा उपप्राचार्य असताना ⇨ जॉर्ज कॅटलेट मार्शल याने ब्रॅड्ली हा भविष्यकाळात सेनापती होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. १९४० साली तो पायदळ विद्यालयाचा प्राचार्य झाला. आयझनहौअर याच्या अगोदर त्याला ब्रिगेडियर जनरलचा हुद्दा मिळाला. पॅटनचा दुय्यम या नात्याने तो १९४३ च्या उन्हाळ्यात उत्तर आफ्रिका व सिसिली या मोहिमांत दुसऱ्या कोअरचा सेनापती होता.

जून १९४४ मधील पश्चिम यूरोपातील नॉर्मंडीवरील चढाईसाठी १ ल्या आर्मीचा सेनापती म्हणून त्याची निवड झाली परंतु चढाईसाठी अमेरिकन सेनेत वाढ झाल्यामुळे त्याला १२ व्या आर्मी ग्रूपचे सरसेनापती करण्यात आले. नॉर्मंडीचा समुद्रकिनारा पादाक्रांत केल्यावर त्याच्या सेनेने पॅरिस जर्मनमुक्त केले. हॉलंडमध्ये आर्नम काबीज करण्यास त्याला वेळ लागला. डिसेंबर १९४४ मध्ये जर्मन सेनेने आर्देनच्या वनराईतून केलेल्या चढाईत ब्रॅड्लीच्या सैन्याची प्रथम तारांबळ उडाली परंतु नंतर जर्मन सैन्याला माघार घ्यावी लागली. ऱ्हाईन नदी ओलांडण्यात ब्रॅड्लीच्या सेना ब्रिटिश सेनांच्या पुढे होत्या. मध्य जर्मनीत घुसण्यातही त्या अग्रेसर होत्या. गतिमान चढाईमुळे एल्बा पार करून टॉर्गू या गावी त्या रशियन सैन्यास येऊन मिळाल्या. रशियनांच्या अगोदर ब्रॅडली बर्लिन सर करू शकला असता, असे म्हणतात परंतु राजकीय निर्णयामुळे त्याला एल्बा नदीवरच थांबावे लागले. १९४५ नंतर त्याने संयुक्त सेनाध्यक्ष मंडळाचा मुख्य तसेच नाटो लष्करी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले. बुलोवा घड्याळ कारखान्याचा तो सरसंचालकही होता. युद्धतंत्राच्या दृष्टीने त्याने आघातशक्ती व युद्धतंत्र, तोफखाना व वायुबल आणि सैनिकी बगलांच्या सुरक्षिततेसाठी छत्रीधारी सैन्य इत्यादींचा योग्य समन्वय साधून सैन्यहानी बरीच कमी केली. १९५१ साली त्याने ए सोल्जर्स् स्टोरी या नावाने आपले आत्मवृत्त प्रसिद्ध केले.

संदर्भ : 1. Carver, Sir Michael, The War Lords, London, 1979.

2. Eisenhower, Dwight David, Crusade In Europe, New York, 1948.

3. Montgomery, Sir Bernard, Normanly to the Baltic, Boston, 1948.

दीक्षित, हे. वि.