बुड्यॉन्नी, स्यिम्यॉन म्यिकायलव्हिच : (२५ एप्रिल १८८३ – २७ ऑक्टोबर १९७३). रशियन सेनानी व सोव्हिएट युनियनचा मार्शल. शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे बालपण डॉन नदीवरील रॉस्टॉव्ह शहराजवळील कॉझ्यूरिन या खेड्यात गेले. १९०३ साली झारच्या क्रमांक ४८ या कझाकी घोडदळ रिसात्यात तो भरती झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतिकार्यात त्याने उत्साहाने भाग घेतला. क्रांतीनंतर कॉकेशस प्रांतातील सैनिकी सोव्हिएटचा प्रमुख असताना त्याने झारनिष्ठांविरुद्ध लढाया केल्या. १९१९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य झाल्यावर पहिल्या घोडदळ सेनेचे त्याला सेनापतित्व मिळाले. याच सेनेत स्टालिन, येगोरोव्ह व व्हरशिलॉव्ह होते. या पहिल्या सेनेने रशियाच्या यादवी युद्धात (१९१७–२२) व रूसो-पोलिश युद्धात (१९२०–२१) महत्वाची कामगिरी केली. यादवी युद्धानंतर बुड्यॉन्नीने घोडदळ निरीक्षकाचे काम केले. १९३५ साली त्यास ’मार्शल ऑफ द सोव्हिएट युनियन’ हा किताब लाभला. १९३८ साली तो सुप्रीम सोव्हिएट प्रिसिडियमचा सदस्य झाला.रूसो-जर्मन युद्धात (१९४१–४५) त्याला जर्मन सेनापतीपुढे हार खावी लागली. १९५८ साली त्याला ’हिरो ऑफ द सोव्हिएट युनियन’ हा अत्युच्च सन्मान मिळाला. याच साली त्याने आत्मचरित्र प्रसिद्ध केले. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.

दीक्षित, हे. वि.