ड्यूक ऑफ वेलिंग्टनवेलिंग्टन, ड्यूक ऑफ : (१ मे १७६९–१४ सप्टेंबर १८५२). ग्रेट ब्रिटनचा पंतप्रधान व सरसेनापती. त्याचे मूळ नाव आर्थर वेलस्ली. डब्लिन येथे जन्म. त्याने ईटन महाविद्यालय (ऑक्सफर्ड) व ॲन्जर्स (फ्रान्स) येथील सैनिकी अकादमीत शिक्षण घेतले. प्रथम त्याची कनिष्ठ अधिकारी म्हणून भूदलात नियुक्ती झाली (१७८७). तो लेफ्टनंट कर्नल झाला. फ्लॅंडर्सच्या लष्करी मोहिमेत (१९९४-९५) त्याचे युद्धकौशल्य दिसून आले. त्यामुळे त्याच्याकडे हिंदुस्थानातील ⇨टिपू सुलतानविरुद्धची मोहिम सोपविण्यात आली (१७९६). त्याचा वडीलभाऊ ⇨लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हिंदुस्थानात गव्हर्नर जनरल (कार. १७९७–१८०५) म्हणून रुजू झाला होता. वेलिंग्टनने टिपूचा पराभव करून तो म्हैसूरचा गव्हर्नर झाला. मद्रास इलाख्याचा प्रशासन व सेनाप्रमुख म्हणूनही त्याने काम केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांबरोबर वसईचा तह करून (१८०२) तैनाती फौज स्वीकारली. वेलिंग्टनने असई व आरगाव येथील लढायांत शिंदे-होळकरांचा पराभव केला (१८०३) व त्यांना अंकित केले.

फ्रान्सचा सम्राट पहिला नेपोलियन याने यूरोपीय देशांत धुमाकूळ घातला होता. तेव्हा ब्रिटिशांनी फ्रेंचांविरुद्ध लढण्यासाठी वेलिंग्टनची नेमणूक केली आणि त्यास लेफ्टनंट जनरल हा हुद्दा दिला. त्याने कोपनहेगनची लढाई जिंकल्यावर (१८०७) द्वीपकल्पीय युद्धांत (पेनिन्स्युलर वॉर्स) भाग घेतला. प्रथम त्याने फ्रेंच जनरल ए. ज्यूनॉतचा लिस्बन येथे पराभव केला. तसेच सालामांकाच्या युद्धात मार्शल मॉर्‌मॉंतचा पराभव करून माद्रिदवर कब्जा केला (१८१२). त्यामुळे मित्रराष्ट्रांच्या फौजेचे नेतृत्व त्याच्याकडे आले. त्याने व्हिक्टोरिया येथे फ्रेंचांच्या फौजेचा धुव्वा उडविला (१८१३) व तो फ्रान्समध्ये दाखल झाला.

वेलिंग्टनने फ्रान्सबरोबरची तूलूझची लढाई (एप्रिल १८१४) जेव्हा जिंकली, तेव्हा नेपोलियन राज्यत्याग करून एल्बाला गेला होता. या विजयानंतर वेलिंग्टनला `फील्ड मार्शल’ व `ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. पॅरिस शांतता तहानंतर त्याची राजदूत म्हणून पॅरिसला नेमणूक झाली (जुलै १८१४). तेथून तो व्हिएन्ना कॉंग्रेसमध्ये इंग्लंडचा प्रतिनिधी म्हणून गेला. त्या सुमारासच नेपोलियन स्वगृही परतला होता. तेव्हा मित्रराष्ट्रांनी त्याविरुद्ध फील्ड मार्शल वेलिंग्टन आणि फील्ड मार्शल ब्ल्यूखर या उभयतांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोहीम आखली. ⇨वॉटर्लूच्या लढाईत (१८ जून १८१५) नेपोलियनचा दारूण पराभव झाला. पुढे तीन वर्षे पॅरिस येथे फौजेची देखभाल करण्यासाठी वेलिंग्टनची नेमणूक झाली.

वेलिंग्टन १८१८ मध्ये इंग्लंडला परतला. १८२७ मध्ये त्याची सरसेनापती पदावर नियुक्ती झाली तथापि त्याने राजीनामा देऊन (१८२८) सक्रिय राजकारणात भाग घेतला. प्रथम त्याने विस्कळित झालेल्या टोरी पक्षाचे पुनर्संघटन करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या जॉर्जच्या विनंतीनुसार त्याने पंतप्रधानपद स्वीकारले. आपल्या कारकीर्दीत (१८२८–३०) त्याने रोमन कॅथलिकांना विशेष अधिकार देणाऱ्या विधेयकास विरोध केला नाही. परिणामत: बहुसंख्य प्रॉटेस्टंट त्याच्यावर नाराज झाले. तशातच मतदानपद्धतीविषयक सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकास विरोध होऊन त्याचे सरकार गडगडले. पुढे पंतप्रधान रॉबर्ट पीलचा संसदेत पराभव होईपर्यंत (१८४६) तो सक्रिय राजाकारणात होता.

त्याचे कौटुंबिक जीवन फारसे समाधानी नव्हते. लॉर्ड लॉंगफोर्ड याची मुलगी कॅथरिन (किटी) पॅकेनहॅम हिच्याशी त्याने विवाह केला (१० एप्रिल १८०६). कायदेशीर रीत्या ते विभक्त झाले नव्हते, तरीसुद्धा ते क्वचितच एकत्र राहिले. त्याचा मोठा मुलगा आर्थर (१८०७–८४) याने वडिलांचा पत्रव्यवहार संपादित करून प्रकाशित केला. वेलिंग्टनचे लंडन येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

संदर्भ :  1. Griffith, Paddy and Others, Wellington Commander : The Iron Duke’s Generalship, London, 1986.

            2. Longford, Elizabeth, Wellington : Pillar of State, Chicago, 1982.

            3. Strachan, H. W. Wellingtion’s Legacy : The Reform of the British Army 1830-1854, Longwood, 1984.

बाळ, नि. वि. देशपांडे, सु. र.