किनारासंरक्षण : शत्रूच्या संभाव्य हल्ल्यापासून देशाचा सागरी किनारा व त्यालगतचा प्रदेश यांचे संरक्षण करण्यासाठी केलेला लष्करी बंदोबस्त. हल्ल्याकरिता शत्रूचे आरमार रवाना होण्यापूर्वीच त्याचा बीमोड करणे ते शक्य झाले नाही, तर त्यावर समुद्रातच आरमारी हल्ला करणे किंवा तेही अशक्य ठरल्यास शत्रूचे आरमार किनाऱ्यालगत येऊन ठेपताच, पण किनाऱ्यावर उतरण्यापूर्वीच त्याचा नाश करणे अशी किनारासंरक्षणाची त्रिसूत्री आहे. त्याचप्रमाणे किनारासंरक्षणात हवाई हल्ल्यापासूनही संरक्षण करण्याची व्यवस्था असते. 

सागरी आक्रमणात शत्रूने केलेला नाविक अथवा हवाई हल्ला, नौदलाच्या तोफखान्याने दुरून केलेली गोळामारी, छत्रीधारी सैन्याचे अवतरण, पाणबुड्यांचे हल्ले, क्षेपणास्त्राचा मारा इ. प्रकार संभवतात. त्यांपासून किनाऱ्यावरील दळणवळणाच्या आणि लष्कराच्या दृष्टीने महत्वाची असलेली बंदरे, गोद्या, ⇨नाविक तळ, किनाऱ्यावरील औद्योगिक शहरे, कारखाने, लष्करी वास्तू, उताऱ्याच्या जागा इत्यादींचे संरक्षण करणे आवश्यक असते आणि त्यासाठी विविध योजना आखाव्या लागतात.

सागरी परचक्राला किनारापार रोखण्याच्या लष्करी तरतुदी प्राचीन काळापासून केल्या जात असत परंतु पूर्वी सैन्याच्या वाहतुकीसाठी होड्या, गलबते ह्यांपेक्षा अधिक चांगली साधने उपलब्ध नव्हती, त्यामुळे किनारा संरक्षण व्यवस्था सोपी असे. परकीय सैन्य सुरक्षित बंदरावरच उतरू शकत असल्याने त्यांच्या हल्ल्याच्या अपेक्षित ठिकाणांचा संरक्षण बंदोबस्त तटबंदी व मोर्चे बांधून वा मोक्याच्या ठिकाणी आवश्यक सैन्यतळ उभारून केला जाई. अशा योजना शांततेच्या काळात आखून युद्धकाळात त्यांची अंमलबजावणी केली जात असे. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ह्याच संरक्षण योजना जारी होत्या. 

विसाव्या शतकात किनारासंरक्षणयोजना अत्यंत गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. कारण शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीमुळे नौकाबांधणी, नौकानयन, लष्करी दारूगोळा ðक्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे इ. चा विकास घडून आला. तसेच दूरनिरीक्षण रडार यंत्रणा व संदेशवाहक यांत्रिक उपकरणे, विमानवाहू बोटी इत्यादींच्या उपलब्धतेमुळे किनारा संरक्षण अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. असे असले, तरी किनारासंरक्षणामागील पूर्वीचे हेतू किंवा साध्ये यांत बदल झालेला नाही. संरक्षणाचे साध्य साधण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे शत्रूच्या हल्ल्याची तयारीच उखडवून टाकणे. त्याच्या युद्धसामग्रीच्या निर्मितिकेंद्राचा विध्वंस करून त्याचे मनोधैर्य खचवून टाकणे, हा होय. शत्रूच्या हल्ल्याची शक्यता होण्यापूर्वीच्या संरक्षणयोजना कार्यवाहीत आणावी लागते. 

अद्ययावत किनारासंरक्षणयोजनेत भू, नौ आणि वायू अशी तीनही लष्करी दले सामील आहेत.त्याचप्रमाणे बंदराच्या मुलकी नियंत्रणयंत्रणेसह या तीनही दलांची समन्वित संरक्षक योजना लष्करी नेतृत्वाखाली जारी करण्यात येते. तीत किनाराभर विखुरलेली निरीक्षक आणि हल्ल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, त्वरित संदेशवहन यंत्रणा, मोक्याच्या स्थळी उभारण्यात येणारे भू, नौ किंवा वायू सैनिकांचे तळ व मूलकी नियंत्रण यांचा अंतर्भाव असतो. 

तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ‘चोल’ राजवटीने हिंदी महासागरावर वर्चस्व गाजविले तथापि काही कारणांनी तदनंतर हिंदी नाविक सामर्थ्याला अवकळा आली. वास्को द गामाने पोपकडून अधिकारपत्र मिळवून सबंध हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचा सार्वभौम हक्क असल्याचा दावा मांडला. मध्यंतरी अरबी व्यापाऱ्यांनी चाचेगिरीने अल्पकाळ महासागरावर धुमाकूळ घातला, पण त्यांच्या पाठीशी प्रभावी राज्यसत्ता नव्हती त्यामुळे त्यांना बाजूला सारणे पोर्तुगीजांना कठीण गेले नाही. पोर्तुगीजांच्या या आधिपत्याला शह देण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न जंजिऱ्याचा सीदी जौहर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रोत्साहानाने दर्यासारंग आंग्रे व पुढे हैदर अली यांनी केला. पण या विरोधाचे स्वरूप मर्यादित होते. पोर्तुगीजांनंतर डच व इंग्रजांनी हिंदी महासागरावर प्रभुत्व संपादन केले. १९४१ मध्ये सिंगापूरचा पाडाव होईपर्यंत ब्रिटीश सागरी प्रभुत्व सार्वभौम होते. स्वतंत्र भारताला किनारासंरक्षणाबाबत जागरूक राहण्याची नितांत जरूरी आहे. ‘सागरावर ज्याचे वर्चस्व तोच जमिनीवरही आपले वर्चस्व टिकवून ठेवू शकतो’, असे म्हटले जाते. भारताचा एकूण किनारा ५,७०० किमी. लांबीचा असून त्याचे संरक्षण करणे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रभावी सागरी गस्त [→गस्त], नौसेनेची मजबूत ठाणी, किनाऱ्यावरील जनतेला जागरूकतेचे शिक्षण, शत्रूच्या आक्रमक विमानांना हेरण्याकरिता रडारयंत्रणेचे जाळे, शत्रुच्या विमानांना वेळीच रोखण्याकरीता व ती देशाच्या हद्‌दीत पोहोचण्यापूर्वीच त्यांची अडवणूक करणारी लढाऊ विमाने इ. उपायांनी किनारासंरक्षण करणे आवश्यक ठरते. विमानवाहक लढाऊ जहाज ‘विक्रांत’ याबाबतीत बरेच उपयुक्त ठरले आहे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटे भारतीय किनाऱ्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. डिसेंबर १९७१ मधील पाकिस्तानबरोबरच्या युद्धात तीनही भारतीय लष्करी दलांनी किनारासंरक्षणाचे आणि किनाऱ्यावरील संरक्षक हल्ल्यांच्या प्रतिकारार्थ उत्कृष्ट कार्य केले होते.

पाटणकर, गो. वि.