नाविक युद्धतंत्र : एखाद्या देशाला स्वतःचा सागरी व्यापार बिनधोक आणि अनिर्बंध चालविणे व शत्रूला त्याच्या कामासाठी समुद्राचा उपयोग अजिबात करू न देणे किंवा किमानपक्षी त्याच्या मार्गात अनेक अडथळे उत्पन्न करणे, यांसाठी जे तंत्र वापरण्यात येते, त्यास नाविक युद्धतंत्र अशी संज्ञा देण्यात येते. या दृष्टीने नाविक युद्धाचा उपयोग समुद्रावर आपली सत्ता गाजविण्याकडे करता येतो.

युद्धनौकांची एक डावपेचात्मक रचना

नाविक युद्धनीतीमध्ये राष्ट्राच्या सागरी सत्तेची जी मूलतत्त्वे आहेत, त्यांचे प्रतिबिंब पडलेले असते. नाविक युद्धतंत्र हा नाविक युद्धनीतीचाच एक घटक असतो. आपल्या फौजा समुद्रमार्गे पाठवून त्यांचा पाठपुरावा करणे, भूसेनेला युद्ध जिंकण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे आणि समुद्राखाली, समुद्राच्या पृष्ठभागावर तसेच समुद्रावरील वातावरणात आपली सत्ता प्रस्थापित करणे, हा नाविक युद्धनीतीचा उद्देश असतो. त्यानुसार नाविक युद्धतंत्राचा प्रभावी अवलंब करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते : (१) समर्थ नौसेना, (२) समृद्ध व्यापारी जहाजे व (३) युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची बांधणी तसेच त्यांची डागडुजी यांसाठी लागणारी व्यवस्था आणि संघटना इत्यादी. आधुनिक काळात शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीमुळे नाविक युद्धतंत्र अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे.

ऐतिहासिक आढावा : समुद्रावर शक्य तर पूर्ण सत्ता गाजविणे किंवा हवी तेथे व हवी तेव्हा अशी सत्ता प्रस्थापित करता येणे, हा नाविक युद्धतंत्राचा हेतू असल्यामुळे या सत्तेचे स्वरूप काय आहे, हे पाहिले पाहिजे. या संदर्भात जागतिक आणि नंतर भारतीय नाविक युद्धतंत्राचा ऐतिहासिक आढावा घेतल्यास असे स्पष्टीकरण करता येईल, की प्राचीन काळी गुलामांच्या करवी युद्धनौका वल्हविल्या जात आणि लढवय्ये खलाशी वेगळे असत. नाविक युद्धात अशा जहाजांच्या टकराटकरी (रॅमिंग) होत व शत्रूच्या नौकेवर सैनिक चढून जाऊन त्यांच्याशी हातघाईची लढाई करीत.

शिडांच्या जहाजांचा युद्धनौका म्हणून वापर होऊ लागला, तेव्हा ती जहाजे बहुधा व्यक्तिगत मालकीची असत. त्यानंतर एका दर्यासारंगाच्या नेतृत्वाखाली अनेक जहाजे ठेवून त्यांवर गुळगुळीत तळाच्या व अल्प पल्ल्याच्या तोफा बसविण्यात आल्या. तरीदेखील अंतिम विजयासाठी हातघाईच्या लढाईवरच अवलंबून रहावे लागे. साधारणपणे ही परिस्थिती ट्रफॅल्गरच्या लढाईत (१८०५) नेल्सन विजयी झाला, त्या काळी होती.

एकोणिसाव्या शतकात वाफेच्या शक्तीने चालणारी एंजिने जहाजांवर बसविण्यात आल्यामुळे जहाजांचा वेग साहजिकच वाढला. त्यामुळे जुन्या युद्धतंत्रात बराच बदलही घडून आला. पुढे नाविक युद्धतंत्राचा आविष्कार कसकसा होत गेला, हे ॲड्‌मिरल माहॅन यांनी लिहून ठेवलेल्या माहितीवरून दिसून येते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लांब पल्ल्याच्या व नळीच्या आत कंगोरे पाडलेल्या तोफा तसेच समुद्राच्या पृष्ठभागाखाली नाश करणारी अस्त्रे यांचा उपयोग होऊ लागला. पहिल्या महायुद्धात (१९१४–१८) विनाशिका व पाणबुड्या यांचा जरी सर्रास उपयोग करण्यात आला असला, तरी हे महायुद्ध खंडीय युद्धनीतीवर आधारित होते [⟶ महायुद्ध, पहिले]. त्यात नाविक युद्धनीतीचा पल्ला पूर्णपणे अजमावण्यात आला नाही.

शत्रूच्या आकस्मिक हल्ल्यापासून आपल्या नौसेनेचा, व्यापारी जहाजांचा आणि बंदरांचा बचाव करण्यासाठी आगाऊ टेहळणी करणे, हा नाविक युद्धतंत्राचा आद्य भाग असतो. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर रडारचा शोध लागून त्याचा उपयोग करण्यात आला. या शास्त्रीय शोधामुळे नाविक युद्धतंत्राचे स्वरूप बरेचसे पालटले. रडारमुळे अशा टेहळणीचा पल्ला विलक्षण वाढला तर आवाज ओळखणाऱ्या सोनार नामक यंत्राच्या साह्याने पाणबुड्यांचा शोध घेण्यास मदत होऊ लागली. या यंत्रामुळे पाणबुडीचे अस्तित्व व स्थान तिच्या आवाजाच्या पडसादामुळे निश्चित करता येते व दोन किंवा जास्त लढाऊ जहाजे पाणबुडीचा निर्घृण पाठलाग करू शकतात. त्यानंतर स्फोटकगोल, लिंबो वा पाणतीर (टॉर्पेडो) यांच्या साह्याने पाणबुडीचा नाश करता येतो. दुसऱ्या महायुद्धात या प्रकारच्या नाविक युद्धतंत्राचा बराचसा विकास झाला. त्याबाबत अद्यापही संशोधन चालू आहे. पाणबुड्यांचा वेग व सहनशक्तीदेखील वाढत आहे. त्यामुळे पाणबुडी-प्रतिबंधक उपाय आता नाविक युद्धतंत्राचा एक अनिवार्य भाग मानला जातो.

समुद्रात पेरण्यात येणाऱ्या सुरुंगाच्या एका प्रकाराला भूसुरुंग (ग्राऊंड माइन्स) म्हणतात. हे सुरुंग जेथे समुद्र उथळ आहे, अशा ठिकाणी तळाशी पेरले जातात. त्यामुळे त्यांच्यापासून उद्‌भवणारा धोका परिणामकारक होतो. नांगर लावलेले सुरुंग (मूअर्ड माइन्स) जेथे पाणी जरा अधिक खोल असते, तेथे वापरले जातात. हे सुरुंग पाण्याच्या पृष्ठभागाच्या थोडेसे खाली तरंगतात. हे दोन्ही प्रकारचे सुरुंग ज्या जलमार्गावर शत्रूच्या जहाजांची वर्दळ अधिक आहे, अशा ठिकाणी वापरण्यात येतात. त्यावरील प्रतिबंधक उपाय म्हणजे, सुरुंगांची जाळी नाश करणाऱ्या जहाजांकडून असल्या पीडित मार्गाला साफ करावयाचे किंवा जरूर पडेल तर संबंध सुरुंगाचे जाळे नष्ट करावयाचे. आधुनिक सुरुंगांत सगळ्यात अधिक जोखमीचे सुरुंग म्हणजे विलंबित स्फोट होणारे सुरुंग होत. अशा प्रकारचा स्फोट करण्याकरिता नियंत्रित यांत्रिक व्यवस्था करता येते. या प्रकारच्या कारवाईमुळे युद्धसमाप्तीनंतरही दीर्घकाळ अपघात संभवतात. [⟶सुरुंग].


नौसेनेच्या मुख्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतात : (१) शत्रूच्या स्वारीपासून बचाव (२) सागरी व्यापाराचे संरक्षण (३) शत्रूच्या सागरी व्यापाराला मज्जाव व (४) शत्रूच्या नौसेनेचा विध्वंस.

युद्धनौकांची दोन प्रमुख रचनातंत्रे

शत्रूच्या स्वारीपासून बचाव करण्यासाठी मुख्यतः  स्वतःची सागरी सत्ताच प्रस्थापित करणे क्रमप्राप्त ठरते. तसेच शत्रूच्या आगमनाची पूर्वसूचना मिळावी म्हणून गुप्तहेरांतर्फे बातमी मिळविणे, युद्धनौकांना स्वतःच्या किनाऱ्यापासून बऱ्याच दूरवर गस्त घालण्यासाठी पाठविणे, पूर्वसूचनापद्धत (अर्ली वॉर्निंग सिस्टिम) योजणे वगैरेंचा उपयोग होतो. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठीदेखील नाविक युद्धतंत्राचा सर्व प्रकारे उपयोग करावा लागतो. या तंत्राचे साधारणपणे पुढील तीन घटक असतात : (अ) पहिला घटक बलावर अवलंबून असतो. त्यात वायुसेना, युद्धनौका, व्यापारी जहाजांच्या काफिल्याचे संरक्षण करणारे बल आणि पाणबुड्यांच्या कारवाया यांचा अंतर्भाव होतो. (आ) दुसरा घटक शत्रूकडील लक्ष्यावर अवलंबून असतो उदा., शत्रूच्या भूमीवरील लक्ष्य (लँड टारगेट), शत्रूच्या पाणबुड्यांना नष्ट करण्याच्या कारवाया इत्यादी. (इ) तिसरा घटक युद्धनीतीच्या स्वरूपावर अवलंबून असतो उदा., भूसेनेस पाठिंबा देणे, वायुसेनेबरोबर काम करणे इत्यादी. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही एका कारवाईचे (ऑपरेशन) एकच ध्येय असणे आवश्यक असते. मग त्यासाठी कराव्या लागणाऱ्या हालचाली अनेक असल्या, तरी कारवाईचे लक्ष्य एकच ठेवावे लागते.

प्रतिपंक्ती युद्धतंत्र

यांखेरीज शत्रूची घातपाती कृत्ये आणि चोरून बंदरात प्रवेश करण्याची शक्यता यांविरुद्ध प्रतिबंधक उपाय योजण्यात येतात. तसेच किनाऱ्याची राखण करणाऱ्या पथकाची तरतूद करून त्याच्या केंद्रात व नियंत्रण केंद्रात संदेशवहनाची व्यवस्था करण्यात येते. किनारा जलस्थलविहारी जहाजे उतरविण्याला सोईचा, सौम्य उताराचा व शांत पाण्याचा असेल, तर असल्या किनाऱ्यावर सुरुंगाचे जाळे पेरावे लागते आणि शत्रूच्या जहाजांच्या परिवहन-मार्गात अडथळे उभे करावे लागतात. दीपस्तंभांच्या रक्षणार्थ पुष्कळदा त्यांच्या परिसरात सुरुंग पेरावे लागतात. शत्रूच्या स्वारीपासून केवळ आपल्या काफिल्याचे संरक्षण करून भागत नाही, तर शत्रू बंदरात येऊन त्याचा तेथे हस्तक्षेप होता कामा नये, तसेच बंदरातील दैनंदिन कारभार सुरळीत चालावा म्हणून बंदराच्या संरक्षणासाठी परिपूर्ण व्यवस्था करावी लागते. संरक्षण-योजना, सुरुंग-पेरणी, रडार- व्यवस्था, पूर्वसूचनापद्धती, किनारा संरक्षक तोफखाना, विमानवेधी तोफा, पाणसुरुंग पेरण्याची व्यवस्था इत्यादींची योजना करावी लागते. तसेच शत्रूची विमाने, पाणबुड्या आणि जहाजे यांच्याशी टक्कर देऊ शकेल, अशी समर्थ नौसेना बंदराच्या आसपास सुसज्ज ठेवावी लागते. व्यापारी जहाजे जरी काफिल्यांनी जात असली, तरी त्यांच्या नौकानयनाचे संघटन, वेगवान बोटींचे एक-एकटे परिवहन आणि वक्र मार्गाने शत्रूला चुकवीत जाणे यांचा उपयोग करून त्या जहाजांचे संरक्षण शक्य तो करण्यात येते. नाविक युद्धनीतीच्या काही तात्त्विक बाबींचा विचार पुढीलप्रमाणे करता येईल त्या दृष्टीने प्रत्यक्ष युद्धकालात अवलंबण्यात येणारे धोरण असे : (१) शत्रूच्या हल्ल्यास सामना देण्याचा अधिक योग्य मार्ग म्हणजे स्थायिक स्वरूपाचे रक्षण आणि भली मोठी भूसेना हा नसून, शक्य तर सहज हलविता येणारी जलस्थलसेना हा आहे, याची जाणीव ठेवणे (२) समुद्राचा उपयोग शत्रूला मागील बाजूने घेरण्याकडे करणे (३) समुद्राचा उपयोग करण्यास शत्रूला सर्व प्रकारचा प्रतिबंध निर्माण करणे (४) आपल्या जहाजांचा शत्रूच्या विमानांपासून तसेच क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याची व्यवस्था करणे व (५) एकट्यादुकट्या जहाजाच्या रक्षणापेक्षा काफिल्याचे रक्षण करणे सोपे, कमी खर्चाचे आणि जास्त उपयोगी ठरते, म्हणून त्यांचा वापर करणे.

शांततेच्या काळातच युद्धाची पूर्वतयारी करावी लागते. त्या काळात अमलात आणावयाची तत्त्वे म्हणजे : (अ) नाविक सुरक्षादलाची उभारणी आपल्या व्यापारी जहाजांच्या मानाने करणे व त्यांचे योग्य संरक्षण करण्याची कुवत त्या दलामध्ये असणे (आ) संयुक्त कारवाईसाठी लागणाऱ्या युद्धनौकांची बांधणी करणे (इ) युद्धनौकांना लागणारे साहित्य आणि इतर गोष्टी यांचा पुरवठा करण्यासाठी परदेशी बंदरात सोय करणे आणि (ई) आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे.

पाणबुड्या : पहिल्यामहायुद्धामध्ये पाणबु्ड्यांचा मुख्य उपयोग शत्रूच्या व्यापारी आणि लढाऊ जहाजांवर हल्ले करण्यासाठी करण्यात आला. महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्यांवर हल्ले करण्यासाठी करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्यांवर हल्ले करण्यासाठी प्रयत्न झाले परंतु त्यासाठी उपलब्ध असलेली साधने कमी दर्जाची व कमी कार्यक्षम होती. फक्त सरळ धावणारे आणि संसर्ग स्फोटक (काँटॅक्ट फायरिंग)पाणतीर त्यावेळी उपलब्ध होते. त्यानंतरच्या सु. वीस वर्षात पाणबुड्यांच्या अनुसंधानाची साधने बरीचशी सुधारली. लक्ष्यानुगामी पाणतीरदेखील उपलब्ध झाला. त्यामुळे शत्रूची पाणबुडी कितीही खोल पाण्यात शिरली असली, तरी तिच्यावर हल्ला करणे शक्य झाले. पाणबुड्यांकरवी करण्यात येणारी इतर महत्त्वाची कामे म्हणजे पाणसुरुंग लावणे, किनाऱ्याची टेहळणी करून सैनिक उतरवता येतील अशी ठिकाणे शोधून त्यांची नोंद करणे, शत्रूच्या हालचालींची बातमी मिळविणे आणि लढाऊ सेनापथके शत्रूच्या किनाऱ्यावर रातोरात उतरविणे इ. असतात.

शत्रूच्या पाणबुड्यांवर हल्ले करण्यासाठी अमलात येणाऱ्या साधनांतही आता सुधारणा झाली आहे. एकतर, स्वनक (सोनार)च्या साह्याने पाणबुड्यांचा आवाज दूरवर एेकू येऊ शकतो. शिवाय पाणबुडीचा परिदर्शक (पेरिस्कोप) किंवा हवानळ अगदी थोडा वेळ समुद्राच्या पृष्ठभागावर डोकावला, तरी तिचा वेध घेणे शक्य होते आणि लक्ष्यानुगामी पाणतीराचा उपयोग करून शत्रूवर यशस्वी हल्ला चढविणे सुलभ ठरते परंतु रडार वा ध्वनिक साधनांचा आपल्या पाणबुडीने उपयोग केल्यास शत्रूच्या इलेक्ट्रॉनीय युद्धसाधनांद्वारे तिचा शोध लागू शकतो. शांततेच्या काळात नाविक जहाजांना पाणबुडीविरोधी प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी पाणबुड्यांची अतिशय आवश्यकता असते [⟶इलेक्ट्रॉनीययुद्धतंत्र].


पाणबुडीविरोधी नाविक युद्धतंत्र : आधुनिक परंतु परंपरागत पाणबुडी ही समुद्राच्या पोटात असताना थोड्याच अवधीसाठी विशेष वेगाने जाऊ शकते कारण त्यानंतर तिच्या विजेरीचे (बॅटरीचे) पुन्हा भारण करावे लागते व त्यासाठी डीझेल जनित्राचा उपयोग करावा लागतो. तसेच हवा घेण्यासाठी हवानळीचा उपयोग करावा लागतो. हा नळ समुद्राच्या पृष्ठभागावर दिसू शकतो आणि रडारच्या किंवा मानवी दृष्टीला तो पडला, तर पाणबुडीचा ठावठिकाणा लागून तिचा निःपात केला जाण्याची शक्यता असते.

याउलट अणुशक्तीद्वारा चालणारी पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली दडून राहू शकते. तिला हवानळाची आवश्यकता नसते. केवळ परिदर्शकाचा उपयोग करतानाच तिचा शोध लागण्याची थोडीबहुत शक्यता असते परंतु या परिदर्शकाचा उपयोग अल्पकाळच करावा लागतो. मात्र ती जर त्या क्षणीच योगायोगाने शत्रूच्या दृष्टिपथात आली, तर तिला धोका पोहोचू शकतो.

विद्युत् चुंबकीय किरणोत्सर्ग मग तो रडार, प्रकाश, अवरक्त वा रेडिओलहरी यांपैकी कोणताही असो, तो पाण्यात खोलवर शिरूच शकत नाही किंवा तो पाण्यातून प्रसरणही करू शकत नाही. कारण पाण्याचा विद्युत्- प्रतिरोध प्रभावी असतो. ध्वनिक-शक्ती मात्र खाऱ्या पाण्यात लीलया म्हणजे हवेपेक्षासुद्धा जास्त सहजतेने प्रवेश व प्रसरण करू शकते. यामुळेच ध्वनिलहरींच्या साहाय्याने चालणाऱ्या स्वनक यंत्राचा उपयोग पाणबुडीप्रतिबंधासाठी आवश्यक आहे.

स्वनक : स्वनक हे सक्रिय वा निष्क्रिय असते उदा., जलकर्ण (हायड्रोकोन). सक्रिय स्वनक ध्वनिलहरी निर्माण करून त्या ते सक्रिय लक्ष्यावर आदळते आणि त्यात आदळून परत जाण्या-येण्यासाठी ध्वनिलहरींना जो वेळ लागतो, त्या अवकाशाच्या साहाय्याने त्या लक्ष्याचे अंतर आणि ध्वनिलहरींच्या आगमनाच्या दिशेवरून लक्ष्याचे दिगंश (बेअरिंग) कळू शकतो. उलटपक्षी, निष्क्रिय स्वनकाचे कार्य लक्ष्याने केलेल्या आवाजावरच अवलंबून असते, त्यामुळे ते केवळ लक्ष्याचा दिगंशच ठरवू शकते म्हणून लक्ष्याच्या अंतराची कल्पना येऊ शकत नाही, तसेच शत्रूच्या पाणबुडीने आवाज न केल्यास ती निसटून जाऊ शकते. सक्रिय स्वनकामुळे केवळ अंतर आणि दिगंशच नव्हे, तर डॉप्लर परिणामानुसार परत येणाऱ्या लहरीच्या आवर्तनांतील फरक मोजून त्यानुसार शत्रू कोणत्या दिशेने आणि किती वेगाने जात-येत आहे, याचाही छडा लावता येतो. मात्र स्वनकाच्या लहरी पाठवीत असताना जो आवाज निर्माण होतो, तो शत्रूला दूरवर ऐकू जाऊ शकतो त्यामुळे स्वतःची पाणबुडी किंवा जहाज धोक्यात येऊ शकते. खडक, भरती-ओहोटी, तपमानथर, मोठाले मासे वा त्यांचे थवे वगैरेंचा प्रतिध्वनीही ऐकू येऊन तो आपल्याला पुष्कळदा गोंधळात टाकतो. त्यामुळे आगोदर लक्ष्याची पक्की खात्री पटवूनच पाणतीर लक्ष्यावर सोडावा लागतो. इतर पार्श्वभौतिक आवाजांमुळेही संभ्रम होऊ शकतो. जहाजाने किंवा पाणबुडीने केलेला आवाज वा सागरलहरींचा आवाज इत्यादींचा उपद्रव तर होतोच पण ध्वनिलहरी समुद्राच्या पाण्यातून प्रवास करताना तपमानातील फरकामुळे चक्क वाकतात आणि पाण्याचे असे थर स्वनक-लहरींना प्रतिबंध करतात. अटलांटिक महासागरात उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेमुळे असे काही थर निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांच्याखाली लपून बसलेल्या पाणबुडीचा स्वनकाच्या मदतीने शोध लावणे शक्य होत नाही. हिवाळ्यात मात्र साधारणतः ९,००० मीटरपर्यंत स्वनक-लहरी सरळ जाऊ शकतात आणि पाणबुड्यांचा थांगपत्ता तत्काळ लागू शकतो. बेथोथर्मोग्राफ नामक उपकरणामुळे किती खोलीवर किती तपमान आहे, याचे मापन करता येते. त्यामुळे लढाऊ जहाजांवर या उपकरणाची आवश्यकता असते. पाणबुडीविरोधी तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असून जगातील सर्वच नौसेना या यंत्राचा विशेष अभ्यास करीत आहेत.

अणुयुगाचे नाविक युद्धतंत्रावर परिणाम :लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर अण्वीय संहारशीर्ष लावून युद्धनौकेवर हल्ला करता येतो. तथापि एकेकटी युद्धनौका हे काही विशेष महत्त्वाचे सावज (टार्गेट) आहे, असे म्हणता येणार नाही. अणुकिरणोत्सर्ग हा घातक असतो. शिवाय त्यामुळे १ ते ३ किमी. आंतरावरील सर्व जहाजांना धक्का बसतो व जहाजांचे बरेच नुकसान होते. दूरवर असलेल्या जहाजांना देखील या किरणोत्सर्गाचा उपसर्ग पोहोचतो. दूषित झालेले हे कण वाऱ्यामुळे सर्वत्र पसरतात विशेषतः ते वाऱ्याच्या दिशेने इतस्ततः विखुरतात. यासाठी प्रत्येक युद्धनौकेवर पाण्याच्या कारंज्यांची जय्यत तयारी ठेवली जाते. अशा दूषित जागेतून कोणाला जाणे आवश्यक आहे, असे घ्यानात येताक्षणीच पाण्याचे फवारे मारून जहाजाचा पृष्टभाग धुऊन निर्दोष करण्यात येतो. प्रदूषित भागातून बाहेर पडेपर्यंत हे काम चालूच ठेवले जाते.

जहाजाच्या आत काम करणाऱ्या नौसैनिकांना उपद्रव होऊ नये म्हणून बाहेरील हवा आत येण्याच्या जागा क्षणार्धात बंद करण्याची व्यवस्था असते आणि त्यांनंतर पुनःप्रसरण यंत्रे चालविण्यात येतात. त्यामुळे शुद्ध हवेची तरतूद केली जाते. बाहेरचे वातावरण प्रदूषित झालेले असल्यामुळे जहाजाच्या आतील हवेचे  शुद्धीकरण करून तीच हवा पुन्हा खेळविणे आवश्यक असते. यातूनही काही नौसैनिकांना नियंत्रित कालावधीमध्ये अत्यावश्यक कामासाठी बाहेर पाठविण्याची तरतूद करावी लागते. अशा वेळी त्यांना प्रदूषणाचा त्रास कितपत सुसह्य होतो, हे पहातात. त्यासाठी गायगर गणकाच्या साह्याने उत्सर्गाचे मापन करून त्यांना सुखरूप आत आणावे लागते. जहाजाचा हा आतील सुरक्षित भाग बालेकिल्ला (सिटडेल) या नावाने ओळखला जातो.

व्यापारी जहाजांच्या काफिल्याबरोबर जर युद्धनौका जात असतील, तर अण्वस्त्रांचा स्फोट होताक्षणीच त्या युद्धनौकांना काफिल्याला सोडून जाण्याची आज्ञा दिली जाते. तसेच त्यांना सर्वांत जास्त वेगाने वाऱ्याची दिशा चुकवून पळून जाण्याची संधीही देण्यात येते. अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांच्या ठिकाणी खोल पाण्यात शिरून बराच काळ राहण्याची क्षमता असल्यामुळे त्या आण्विक युद्धात वाचण्याची बरीच शक्यता असते.

पहा: पाणतीर पाणबुडी युद्धनौका.

संर्दभ : Gretton, Sir Peter, Maritime Strategy, London, 1965.

 

इनामदार, य. न.