होमगार्ड : (गृहरक्षक दल) . भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली. या वेळी एका समाजघटकाने जातीय विद्वेशापोटी खून, लुटालूट, जाळपोळ इ. विध्वंसक कृती केल्यामुळे मुंबई शहरातील व्यापार-व्यवहारच नव्हे, तर सर्वसामान्यांचे जीवनही धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेबरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीय दृष्ट्या आव्हानपर प्रसंगी पोलीस दलावर वारंवार जबरदस्त ताण पडत असे. परिणामी, प्रशासनाला निमलष्करी दलांना स्थानिक पोलिसांच्या दिमतीला तैनात करावे लागत असे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय वा पोलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची पण स्वयंसेवी स्वरूपातसाथ मिळावी, या उद्देशाने मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाईदेसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली. ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली. हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले. 

 

गृहरक्षक दलाच्या स्त्री-पुरुष स्वयंसेवकांना संस्थेच्या स्थापनेपासूनच पोलिसांच्या सोबत व बरोबरीने प्रसंगोपात्त प्रथमोपचार, अग्निशमन दलाला मदत, वाहतूक नियंत्रण, नैसर्गिक आपत्तिग्रस्तांना मदत, दंगलग्रस्त परिस्थितीचे नियंत्रण इ. कामे करावी लागतात. यासाठी गृहरक्षकांना कवायती शिक्षण तसेच शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा सकारात्मक परिणाम व प्रतिसाद हळूहळू दिसू लागला. 

 

संघटनेच्या स्थापनेनंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कवायतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले. त्यांनी दिल्लीला परतल्यावर मुंबईच्या धर्तीवर स्वयंसेवी, शिस्तबद्ध अशा गृहरक्षक दलाची स्थापना अन्य राज्यांमध्येसुद्धा करावी, अशी सूचना संबंधित अधिकारीवर्गाला दिली. त्यानुसार तिची अंमलबजावणी झाली आणि गृहसंरक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ॲक्ट-१९६८ अनुसार त्याची इतर राज्यांतून निर्मिती झाली. परिणामी मुंबई प्रांत-महाराष्ट्राव्यतिरिक्त प. बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात इ. राज्यांमध्ये गृहरक्षक दलाची स्थापना होऊन ते कार्यरत झाले. सांप्रत केरळ राज्याव्यतिरिक्त २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत गृहरक्षक दल ही संघटना कार्यरत असून गृहरक्षकांची संख्या सु. ४,८६,४०१ होती (२०१२). 

 

तत्कालीन महाराष्ट्र राज्यातील नगरसेना हिची स्थापना राज्य शासनाने विधिमंडळात १९४७ मध्ये संमत केलेल्या अधिनियमाद्वारे करण्यात आली. राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित करून त्यासाठी काही वेळ व प्रयत्नांना चालना देण्यासाठी नगरसेनेअंतर्गत नगरसैनिकांची निवड केली जाऊ लागली. अशा प्रकारे निवडक व प्रशिक्षित अशा नगरसैनिक वा गृहरक्षकांनी स्वेच्छेने पुढाकार घेऊन परिस्थिती वा गरजेनुरूप सरकारद्वारा सोपविण्यात येणारी जबाबदारी वा काम पूर्ण करणे अपेक्षित असते. परिणामी गृहरक्षक दलात धर्म, भाषा, जात-पात इ. कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरांतील उदा., महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यापारी, कर्मचारी, कारकून, समाजसेवक, औद्योगिक कामगार, शेतकरी वगैरे लोक स्वयं-प्रेरणेने दाखल होतात. 

 

रचना : गृहरक्षक दलाच्या कामात सुसूत्रता यावी, या उद्देशाने गृहरक्षक दलाची संघटना व रचना निश्चित करण्यात आली असून त्यानुसारच गृहरक्षक दलाचे काम चालते. राज्यस्तरावर गृहरक्षक महा-समादेशकाची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. महासमादेशक हे मानसेवी अधिकाराचे स्थान असते. बृहन्मुंबईशिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील गृहरक्षक दलांची संघटना महासमादेशकांच्या अधिकार-क्षेत्रात येते. जिल्हा स्तरावरील गृहरक्षक समादेशकही स्वेच्छेने काम करणारे असतात. 

 

महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाला स्वतःची ओळख, वेगळेपण व स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने राज्याच्या गृहरक्षक दलाला ध्वज आणिध्वजचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार लॉरेल फुलांच्या माळेने वेष्टित असे कबुतर हे महाराष्ट्र राज्यातील गृहरक्षक दलाचे ध्वजचिन्हअसून ते फिकट निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी सोनेरी धाग्याने विणलेले आहे. 

 

गृहरक्षक दलांतर्गत पद व जबाबदारीच्या विभागणीच्या दृष्टीने राज्यात गृहरक्षक-महासमादेशक, जिल्हा समादेशक, जिल्हा वरिष्ठ दलसंभाग नायक, बटालियन नायक, दलसंभाग नायक, द्वितीय समादेशक, कंपनी नायक, वरिष्ठ पलटण नायक, पलटण नायक, रेजिमेंटल सार्जंट मेजर, रेजिमेंटल सामग्री प्रबंधक सार्जंट, कंपनी सार्जंट मेजर, कंपनी सामग्री प्रबंधक सार्जंट, उप-विभाग नाईक, साहाय्यक उप-विभाग नाईक इ. पदांची त्यांची कार्ये आणि जबाबदाऱ्यांसह रचना करण्यात आली आहे. गृहरक्षक दलाच्या कामाचे विशिष्ट कालावधीनंतर समालोचन करून त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी व संघटनेचे काम निश्‍चित उद्दिष्टांनुसार व कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य स्तरावर सल्लागार समित्या नेमल्या आहेत. 

 

यांपैकी राज्य स्तरावरील मध्यवर्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री वा गृहमंत्री आणि सदस्य म्हणून राज्याचे अर्थमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महानिरीक्षक, राज्य गृहरक्षक दलाचे महासमादेशक व चार अशासकीय व्यक्ती सदस्य म्हणून काम करीत असतात. मध्यवर्ती सल्लागार समितीचे सचिव म्हणून राज्य गृहरक्षक दलाचे महासमादेशक काम करीत असतात. 

 

गृहरक्षक दलाच्या जिल्हास्तरीय जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात, तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक व त्याशिवाय राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ३ ते ५ अशासकीय व्यक्ती या समितीच्या सदस्य असतात. जिल्हा सल्लागार समितीचे सचिव म्हणून गृहरक्षक दलाचे संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समादेशक काम पाहतात. 


 

पात्रता : शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारी १८ ते ५० वयोगटातील व शालांत परीक्षा उत्तीर्ण असणारी कुठलीही व्यक्ती स्वेच्छेने गृहरक्षक दलात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकते तथापि त्यांना ३ ते ५ वर्षांपर्यंतच गृहरक्षक दलाचे सदस्य म्हणून काम करता येते. गृहरक्षक दलात सामील होण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची कमीत कमी १६५ सेंमी., वजन किमान ५० किग्रॅ., छाती सामान्यपणे ८० सेंमी. व फुगवून ८५ सेंमी. आणि दृष्टी निकोप असणे आवश्यक असून या प्रमुख बाबींचा शारीरिक पात्रताक्षमतेमध्ये समावेश होतो. 

 

गृहरक्षक दलातील स्वयंसेवकांची निवड ही मुख्यतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवड-निकषांवर आधारित असते. त्यामुळे स्त्री-गृहरक्षकांची निवड त्या नियमानुसार होते. ही निवड गृहरक्षक दल भरती समितीद्वारा करण्यात येऊन या भरतीचे आयोजन वर्षातून दोनदा करण्यात येते. उमेदवारांची निवड साधारणतः जिल्हा पातळीवर करण्यात येते. निवड झालेल्या गृहरक्षकांना विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागते. 

 

निवड चाचणीद्वारा निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात येते. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या व आकारमानानुसार प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार हजार गृहरक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या राज्यासह देशपातळीवर प्रत्येक तालुक्यात गृहरक्षक दल कार्यरत आहे. गृहरक्षकांचे निवृत्तीचे वय साधारणतः ५५ वर्षे असते. जे गृहरक्षक-स्वयंसेवक तीन वर्षे गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात अशांना पोलीस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इ. मधील निवडप्रसंगी पाच टक्के आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात.

 

गृहरक्षकांना विशिष्ट परिस्थितीत वाहतूक नियंत्रण, अत्यावश्यक सेवा संचालन, परिस्थिती नियंत्रण, गरजूंना मदत, प्रथमोपचार व आपत्ती निवारण यांसारख्या कामी स्थानिक पोलिसांसोबत काम करावे लागते. यासाठी पुरुष व महिला गृहरक्षकांना पोलिसांच्या धर्तीवर पोशाख-गणवेश दिले जातात. याशिवाय गृहरक्षकांना ते प्रत्यक्ष कामावर असताना पूर्वी दररोज रु. ४०० एकत्रित भत्ता दिला जात असे. 

 

प्रशिक्षण : गृहरक्षक दलात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना ठराविक व विशिष्ट स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे मुख्यत: शिकाऊ अवस्था, उमेदवारी अवस्था व प्रगतावस्था असे तीन टप्पे असतात. प्रशिक्षणामध्ये गृहरक्षकांना प्राथमिक कवायत, सशस्त्र कवायत, निशाणबाजी, शस्त्रास्त्रे-प्रशिक्षण, प्राथमिक कायदा, जमाव नियंत्रण, प्रथमोपचार, नैसर्गिक आपत्ती निवारण, अग्निशमन प्रशिक्षण इत्यादींचा समावेश असतो. 

 

महाराष्ट्रातील गृहरक्षक दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथे असून त्या ठिकाणी गृहरक्षकांना तीन आठवडे कालावधीचे नागरी आकस्मिक सहायता, टेहळणी करणे व माहिती देणे, दळणवळण, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन व आग नियंत्रण, आग विझविण्याचा प्रगत अभ्यासक्रम, आपद्ग्रस्तांना मदत आणि सुटका, आकस्मिक दुर्घटनेच्या प्रसंगी मदत आणि कारवाई, जखमींना प्रथमोपचार, नि:शस्त्र संरक्षक कारवाई, उजळणी प्रशिक्षण, काल्पनिक दुर्घटना स्थिती व तीवर नियंत्रण इ. स्वरूपाचे योजनाबद्ध प्रशिक्षण देण्यात येते. 

 

गृहरक्षक दलांना मध्यवर्ती नागरी संघटना केंद्रांकडून प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून बनविलेल्या ३०३ ली एन्फील्ड रायफली, स्टेन अँड बेन गन्स देण्यात येतात. 

 

कार्ये व मूल्यमापन : गृहरक्षक दलांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर वेळोवेळी व गरजेनुरूप विशेष उल्लेखनीय कामगिरी करून आपले कर्तव्य बजावले आहे. भारत-चीन यांतील १९६२ च्या युद्धानंतर या संघटनेची राष्ट्रीय स्तरावर पुनर्बांधणी करण्यात आली आणि कालानुरूप प्रदेशपरत्वे तिच्या शाखा स्थापन झाल्या. तत्पूर्वी १९५६ मधील सुरत येथील पूर नियंत्रण, सीमावर्ती भागातील लष्करी नियंत्रण या कामी, तसेच सागरी सीमा क्षेत्रातील तटरक्षक दलाला गृहरक्षकांचे साहाय्य झाले आहे पण त्यांची संख्या मर्यादित होती. 

 

गृहरक्षक हा सर्वसामान्य नागरिक असला, तरी त्याला आपद्प्रसंगी व आवश्यकतेनुसार खालील कामे करावी लागतात : 

 

(१) पोलीस दलाला साहाय्यकारी म्हणून काम करणे. 

(२) राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे. 

(३) नैसर्गिक संकट वा विमानहल्ला इत्यादी आपत्तींच्या प्रसंगी आपत्ती निवारणाच्या कामी मदत करणे. 

(४) अपघात वा तत्सम संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार व रक्त देणे, रुग्णवाहिकेची सेवा पुरविणे वगैरे कामे करणे. 

(५) संपकाळात किंवा अन्य कारणाने दैनंदिन व रोजचे कामकाज बंद पडले असता विविध आवश्यक सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण, दळणवळण-संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास मदत करणे. 

(६) समाजकल्याणविषयक कामांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे. 

(७) राज्य शासन अथवा राज्याच्या गृहरक्षक महासमादेशकांकडून गृहरक्षक दलाकडे सोपविलेल्या कामांची अंमलबजावणी करणे. 

(८) आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला प्रसंगोपात्त मदत करणे. इत्यादी. 

 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून सध्या सु. ५३ हजार गृहरक्षक कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी मदत केली. शिवाय लातूर व किल्लारीचा भूकंप, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला, मुंबईतील २६ जुलै २००५ चा महापूर, पुणे जिल्ह्यातील माळीण गावची ३० जुलै २०१४ ची दुर्घटना इ. आपत्कालीन प्रसंगी गृहरक्षक दलाने मदत केली असून राज्यातील धार्मिक उत्सव, सार्वजनिक निवडणुका इत्यादींच्या यशस्वी व शांततापूर्ण संचालनासाठी नेहमीच आपले योगदान दिले आहे. 

आंबुलकर, दत्तात्रय