नाविक तळ : युद्धनौकांसाठी उभारलेले तळ. नाविक तळांवर युद्धनौकांना दारूगोळा, रसद व इंधन इत्यादींचा पुरवठा केला जातो. तसेच नौसैनिकांच्या निवासाचीही सोय यांवर केलेली असते. युद्धनौका व पाणबुड्या यांची बांधणी करणे, त्या दुरुस्त करून त्यांच्यात आवश्यक ते फेरबदल घडवून आणणे इ. कामेही नाविक तळावर चालतात. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने सैनिकी नाविक तळ व गोद्या या नागरी तळांपासून दूर ठेवाव्या लागतात तसेच त्यांचा संभाव्य विस्तार लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्यांचे स्थान निश्चित करावे लागते. नाविक तळांच्या मानाने गोद्यांचे प्रमाण कमी असते.

जहाजांवर यंत्रे-शस्त्रास्त्रे बसविणे, डागडुजी करणे, तसेच नौसेनेच्या सागरी शिक्षणाची सोय, संशोधन व प्रयोगशाळा, युद्धनौका-पाणबुड्या यांची बांधणी, त्यांची दुरुस्ती व प्रतिसंस्करण, नौकांचा प्रथम सागरप्रवेश करविणे व तत्संबंधित अन्य कार्यांसाठी गोद्यांची आवश्यकता असते.

नाविक तळ स्थापन करण्यापूर्वी त्याची अनेक दृष्टींनी अनुकूलता पहावी लागते. तसेच एकूण राष्ट्रीय व संरक्षणात्मक धोरणही विचारात घेतले जाते. नाविक तळांचे खालील प्रकार असतात.

मुख्य नाविक तळ : यांची गरज प्रामुख्याने हवाई, पाण्याखालील घातपाती स्वरूपाच्या व अण्वीय अस्त्रांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठीच असते. युद्धनौकांना युद्धक्षेत्र सोडण्यास भाग पडले, तर या तळांचा आसरा घेणे सुलभ होते, त्यामुळे असे तळ संभाव्य युद्धक्षेत्राच्या शक्य तितके समीप असणे चांगले असते. युद्धनौका मुख्य तळावर सुरक्षित राहू शकतील असे धक्के आणि पाण्याची पुरेशी खोली असावी लागते. तसेच युद्धनौकांच्या डागडुजीसाठी सुसज्ज कर्मशाळाही असतात. तद्वतच इंधन, साधनसामग्री व सुटे यांत्रिक भाग ठेवण्यासाठी पुरेशी सोयीस्कर जागा, युद्धनौकांना लागणारी साधने पुरविणारी छोटी जलवाहू, तेलवाहू जहाजे, वजन उचलणारी यंत्रे इ. गोष्टीही मुख्य तळांवर उपलब्ध असतात. संभाव्य विस्तारासाठी पुरेशी जागा अशा तळानजीक ठेवावी लागते. नाविक युद्धासाठी लागणारी जहाजे, विमाने व पाणबुड्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले मुख्यालय या तळावरच असून तेथेच प्रादेशिक नौसेनाधिपतीही असतो. आघाडीचा नाविक तळदेखील युद्धक्षेत्राच्या निकट असावा लागतो. अशा तळांचा उपयोग किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती तसेच वरचेवर लागणारी साधनसामग्री पुरविण्यासाठी केला जातो. शत्रूचा हल्ला झाल्यास या तळांचा अडसरासारखा उपयोग होतो. शत्रूच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळण्यास आणि त्याला तोंड देण्याची तयारी करण्यास थोडासा वेळ मिळण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या तळांवरून शत्रूवर हल्ले करण्यास मदत होते. छोट्या युद्धनौकांचा प्रवासपल्ला कमी असल्यामुळे त्यांचा उपयोग अशा तळांवरून करता येतो.

शैक्षणिक नाविक तळ : या प्रकारचा तळ संभाव्य युद्धक्षेत्रापासून शक्य तो दूर असतो. त्यावर अधिकारी आणि नौसैनिक यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येते.

संयुक्त नाविक तळ : सागरी टेहळणी करणारी व नौसेनेच्या आधिपत्याखाली असलेली लढाऊ विमाने इत्यादींसाठी नौसेना आणि वायुदल यांच्या संयुक्त तळाची आवश्यकता असते. हे तळ सागरी किनाऱ्यावर किंवा जवळपास असतात. विमाने दुरुस्त करणे, त्यांना दारूगोळा, इंधन इ. पुरविणे यांसारखी कामे या तळांवर केली जातात.

पाणबुडी नाविक तळ : पाणबुड्या बांधणे आणि दुरुस्त करणे यांसाठी वेगळे तळ असतात. गोद्यांतही त्यांची बांधणी-दुरुस्ती करतात परंतु अशा गोदीत पाणबुडीला बुडवून तिची कार्यक्षमता व बांधणी यांची चांचणी घेण्यासाठी खोल पाणी असावे लागते. आधुनिक सागरी युद्धतंत्रात पाणबुड्यांना मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून त्यांच्यासाठी किनाऱ्यावर भूमिगत धक्के बांधतात तसेच इतर सोयीही केल्या जातात. पाणबुडी तळावरच पाणबुडीदलाचा अधिकारी असतो.

फिरते नाविक तळ : बड्या यूरोपीय राष्ट्रांना १९४५ पूर्वी परराष्ट्रांत किंवा त्यांच्या जगभर असलेल्या वसाहतींत नाविक तळ प्रस्थापित करता येत असत. त्यांमुळे त्यांना कोठल्याही सागरात मुक्त संचार करणे शक्य होते. १९४५ नंतर वसाहती नष्ट होऊ लागल्या व परराष्ट्रांत तळ स्थापणे किंवा नौसेनेला लागणाऱ्या सोयी- साधने मिळणे अशक्यप्राय होऊन बसले. ही उणीव भरून काढण्यासाठी नौसेनेचे फिरते तळ प्रचारात आले आहेत. अशा फिरत्या तळांमुळे युद्धनौकांना दुरुस्ती करण्यासाठी अथवा अन्य सामग्री मिळविण्यासाठी वारंवार मायदेशी परतण्याची आवश्यकता कमी होते. या फिरत्या तळांवरच दुरुस्तीची सोय व फिरत्या शुष्क गोद्या असतात. शिवाय भर समुद्रात रसद-इंधन इत्यादींचा पुरवठा करणारी फिरती जहाजेदेखील असतात. फिरते नाविक तळ व जहाजे संभाव्य युद्धक्षेत्राच्या सीमेवरच फिरतात. या फिरत्या तळांमुळे जास्तीत जास्त युद्धनौका वा पाणबुड्या युद्धासाठी सज्ज ठेवता येतात. तसेच फिरत्या तळांवरून विमानांचीही अदलाबदल करता येते.

भारतात ओखा, अंदमान इ. ठिकाणी प्रगत नाविक तळ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते. विशेषतः समुद्राखालचे तेल उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी ओखा येथे अशा तळाचा बराच उपयोग होण्याचा संभव आहे. भारतीय नाविक दलाच्या सर्व गरजा भागवू शकतील अशा प्रकारे मुंबई आणि विशाखापटनम् येथे प्रचंड नाविक तळांची योजना आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

जगातील काही महत्त्वाचे नाविक तळ पुढीलप्रमाणे आहेत : (१) अमेरिका : पर्ल हार्बर, केफ्लाव्हिक, ग्वॉम, मिडवे, द्येगो गार्सीआ, सूबिक उपसागर (२) रशिया : लेनिनग्राड, सेव्हॅस्टोपोल, व्ह्‌लॅडिव्हस्टॉक त्याचप्रमाणे बर्बरा, होडेडा, सोकोत्रा व पोर्ट लूई येथे नाविक तळाच्या सोई उपलब्ध असाव्यात असे कळते (३) ब्रिटन : स्कॅपा फ्लो, पोर्टस्मथ (४) भारत : मुंबई, कोचीन, विशाखापटनम् (५) चीन : व्हांपोआ, शांघाय, चुशान इत्यादी (६) जपान : योकोसूका, कूरे (७) पाकिस्तान : कराची (८) इराण : बंदर आब्बास, चाहबहार (९)इंडोनेशिया : सुरबाया, जाकार्ता इत्यादी.

इनामदार, य. न.