इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र : युद्धतंत्राचा एक आधुनिक प्रकार, शत्रूकडील इलेक्ट्रॉनीय संदेशवहनपद्धतीमधील संदेशवहन मुद्दाम निरुपयोगी करण्याकरिता या संघर्षतंत्राचा वापर होतो. दळणवळण, संदेशवहन, निरीक्षण, टेहळणी इ. गोष्टी साधण्यासाठी, त्याचप्रमाणे विविध सैन्यदलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांवर नियंत्रण ठेवणे, तसेच शत्रूच्या बाँबहल्ल्याची पूर्वसूचना मिळविणे आणि त्याचा प्रतिकार करणे यांसारख्या कामांसाठी आधुनिक सैन्यदलांना इलेक्ट्रॉनीय साधनांवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे. बिनतारी संदेशवहन, रडार, प्रक्षेपणास्त्रे, रेडिओलहरींची नोंद करून शत्रूच्या लष्करी तळासंबंधीची माहिती मिळविण्याची साधने, निर्मनुष्य विमाने, कृत्रिम उपग्रह इ. बाबी आधुनिक युद्धातील इलेक्ट्रॉनीय उपकरणांवर अवलंबून असणारी शस्त्रास्त्रे ठरली आहेत. यासाठीच इलेक्ट्रॉनीय प्रक्षेपणक्षेत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवून आपल्याक्षेत्रांचा शत्रूला उपयोग करता येणार नाही अशी उपाययोजना करणे आणि या बाबतीत योग्य ती प्रतिकारवाई करणे हे एक युद्धतंत्रच होऊन बसले आहे. शत्रूची इलेक्ट्रॉनीय युद्धाची क्षमता निष्प्रभ करण्याचे तंत्र आणि उपाय आणि शत्रूने केलेल्या उपाययोजना हाणून पाडून आपले इलेक्ट्रॉनीय क्षेत्र अभंग राखण्याचे तंत्र आणि कारवाई ही इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्राची दोन अंगे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर बड्या राष्ट्रांत प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटले नसले, तरी इलेक्ट्रॉनीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात अखंड असे इलेक्ट्रॉनीय शीत युद्ध गेली तीन दशके चालू आहे. इलेक्ट्रॉनीय क्षेत्रातील आपल्या वर्चस्वामुळे प्रतिपक्षाने युद्ध सुरू केले, तर आपला विजय व्हावा, या हेतूने आणि कदाचित आपल्या वर्चस्वामुळे प्रतिपक्ष लढाई सुरू करण्यापासून परावृत्त व्हावा, याही दृष्टीने ही सारी धडपड चालू आहे. यासाठी प्रतिपक्षाची इलेक्ट्रॉनीय आयुधांतील तयारी किती आहे, हे शोधून काढण्यावर मोठा भर दिला जात आहे. याकरिता फक्त एकट्या अमेरिकेने वापरलेल्या साधनांचा उदा., यू–२ विमाने, पेब्‍लो पाणबुडी, महासागरी क्षेत्रात तसेच प्रत्येक महत्त्वाच्या देशाच्या किनाऱ्यालगत सतत संचार करणाऱ्या इलेक्ट्रॉनीय साधनांनी सुसज्ज असलेल्या बोटी, क्षेपणास्त्रे, कृत्रिम उपग्रह इत्यादींचा गेल्या काही वर्षांत बराच गवगवा झाला. एके काळी सर्व देशांच्या सैन्यदलांची गुप्तहेरांवर खूप मदार असे. आता या कामासाठी इलेक्ट्रॉनीय टेहळणी उपकरणांचा फार मोठा वापर होतो. त्यामुळे काही अंशी गुप्तचरसंस्था मागे पडत चालल्या आहेत. गेल्या काही वर्षांत संपूर्ण युद्धाचे तंत्रच आमूलाग्र बदलले आहे. इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्रात मागासलेले राहिल्यामुळे १९६७ साली अरबांना इझ्राएलबरोबरच्या युद्धात जबर फटका बसला. त्यांचे रडार कुचकामी ठरले, त्यांच्या संदेशवहनाची बारीकसारीक तपशीलवार माहिती इझ्राएलला ताबडतोब समजली, अरब वैमानिकांना चुकीचे संदेश मिळाल्यामुळे त्यांनी भलत्याच ठिकाणी बाँबवर्षाव केला. उलट १९७३ साली रशियाच्या मदतीने इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्राचा अरबांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला.

सर्वसामान्यपणे इलेक्ट्रॉनीय साधनांचे दोन भाग पाडता येतील. विद्युत्, आवाज, उष्णता इ. प्रकारची शक्ती निर्माण करणारी साधने आणि प्रतिपक्षाकडून निर्माण होणाऱ्या विद्युत्‌शक्ती, रेडिओलहरी, आवाज-उष्णता-शक्ती इत्यादींची अचूक नोंद करणारी साधने. ही दुसऱ्या  प्रकारची साधने कोणत्याही  प्रकारची शक्ती निर्माण करीत नाहीत. रेडिओ प्रक्षेपक आणि रेडिओ ग्रहणी ही अनुक्रमे वरील दोन प्रकारच्या इलेक्ट्रॉनीय साधनांची सोपी उदाहरणे आहेत.

विरोधी पक्षाची संदेशवहनयंत्रणा बंद पाडण्यासाठी वा रडारची अथवा रेडिओची मुस्कटदाबी करण्यासाठी या साधनांचा वापर करण्यात येतो. शत्रू ज्या प्रक्षेपण-कंप्रतेवर संदेशवहनासाठी किंवा इतर कारणांसाठी रेडिओलहरी निर्माण करतो, त्याच प्रक्षेपण-कंप्रतेवर अशा लहरी निर्माण करता येतात. याशिवाय त्या प्रक्षेपण-कंप्रतेवर प्रचंड आवाजलहरी निर्माण करून ती शत्रूच्या संदेशवहनाची मुस्कटदाबी करू शकतात. अशा रीतीने शत्रूच्या संदेशवहनात गोंधळ निर्माण करता येतो. काही साधने आवाजाऐवजी या प्रक्षेपण-कंप्रतेवर अधिक जलद अशा लहरी निर्माण करून शत्रूचे मूळ संदेश बिघडवून टाकतात. अशा मुस्कटदाबीला स्वीप-थ्रू-जॅमिंग असे नाव आहे. अशा प्रकारची मुस्कटदाबी रडारचीसुद्धा करता येते. रडार एकसारख्या रेडिओलहरी निर्माण करीत असते. या लहरी उलट बाजूने येणाऱ्या विमानांवर आदळल्या, की त्या परावर्तित होऊन रडारकडे परत येतात. अशा परावर्तित लहरींच्या साहाय्याने विमानाची जागा, उंची, दिशा आणि वेग यांची माहिती मिळविता येते. रडारचा स्त्रोत आणि रुंदी माहीत झाली, तर त्याच जातीच्या स्रोताचे आणि रुंदीचे जॅमर्स वापरून रडार कुचकामी करता येते. ही साधने रडारची मुस्कटदाबी दुसऱ्या एका प्रकारानेही करू शकतात : रडारवरून येणाऱ्या लहरी काही काळ अडवून आणि त्यांची तीव्रता वाढवून त्या परत रडारकडे सोडल्या, तर विमानाची प्रत्यक्ष जागा, उंची, वेग, दिशा या बाबतींत रडारची चांगलीच फसगत होते. म्हणून या साधनांना फसवी साधने (डीसेप्शन सेट्स) असे नाव आहे. काही फसवी साधने विमानावर आदळून रडारकडे परावर्तित होणाऱ्या लहरींबरोबर इतर अनेक लहरीही धाडतात. यामुळेही रडारची फसगत होते. याप्रकारच्या साधनांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युतशक्ती आवश्यक असते.

इलेक्ट्रॉनीय प्रतिकारसाधनांचे टेहळणी हे एक प्रमुख कार्य आहे. ही साधने विमान, युद्धनौका आणि कृत्रिम उपग्रह इत्यादींवर बसविण्यात येतात. ज्या भूप्रदेशावरून विमाने किंवा उपग्रह जात असतील, तेथील अत्यंत सूक्ष्म अशा रेडिओलहरी, विद्युतनिर्मिती इ. बाबी ही साधने टिपून घेतात. त्यामुळे शत्रूची युद्धक्षमता लष्करी तळ, क्षेपणास्त्रे इत्यादींबाबत अचूक माहिती मिळू शकते. या साधनांना इलेक्ट्रॉनीय गुप्तवार्ता साधने असे नाव आहे. शत्रूचे रडार, क्षेपणास्त्रे इत्यादींबाबत धोक्याची पूर्वसूचना देणारी साधने (वॉर्निंग रीसिव्हर्स) बाँबफेकी विमानांवर आणि युद्धानौकांवरही बसवितात. धोक्याची सूचना मिळताच आवाजी किंवा फसगत करणारे जॅमर्स यांसारखी साधने वापरून रडार आणि क्षेपणास्त्रे यापासून संरक्षण करता येते. रडारला फसविण्यासाठी ॲल्युमिनियम किंवा ॲल्युमिनियमचा मुलामा दिलेल्या सूक्ष्म तारांचा हवेत वर्षाव करण्यात येतो. याला भुसकट (चॅफ) असे नाव आहे. या तारांवर रडार किंवा क्षेपणास्त्रसज्‍ज रडारने केलेल्या लहरी आदळून परावर्तित होतात आणि शत्रूचे विमान असल्यासारखे वाटून फसवी नोंद केली जाते. चढाईच्या वेळी जसे प्रथम धुराचे प्रचंड लोट तयार करून भूदले आगेकूच करतात, तसेच फसवी बाँबफेकी विमाने प्रथम आकाशात भुसकटाचे लोट फेकून रडारला गोंधळून टाकतात आणि मागून बाँबफेकी विमाने चढाई करतात. हे भुसकट ठराविक कालांतराने, नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी फेकण्याची नवनवीन तंत्रे विकसित होत आहेत. हे ॲल्युमिनियमचे भुसकट रडारच्या लहरी जशाच्या तशा परावर्तित करते. उलट दुसरे काही पदार्थ असे आहेत की, जे या लहरी काही प्रमाणात आत्मसात करतात किंवा जिरवून टाकतात. परिणामी कमी शक्तीच्या लहरी परावर्तित होऊन रडारची पूर्ण फसगत होते.

रशियन क्षेपणास्त्रे इलेक्ट्रॉनीय दिशादर्शक यंत्रांच्या साहाय्याने बाँबफेकी जेट विमानांच्या मागच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या निरुपयोगी इंधनवायुमुळे निष्कासाच्या निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वेध घेऊन त्या विमानांवर अचूकपणे धडक देतात. यापासून बचाव करण्यासाठी क्षेपणास्त्राची चाहूल लागल्यावर विमानातून उष्णता निर्माण करणारे विस्फोटक पदार्थ फेकता येतात. त्यामुळे क्षेपणास्त्रे विमानाऐवजी या दुसऱ्या कृत्रिम उष्णतेचा वेध घेऊन निकामी करता येतात. क्षेपणास्त्राचा वापर करण्यापूर्वी रडारतळावर खूप मोठ्या प्रमाणावर विद्युतशक्ती वापरावी लागते. विमानातील धोक्याची सूचना देणाऱ्या साधनांना याचा ताबडतोब पत्ता लागतो. त्यामुळे त्यांना विमानातील बाँब फेकून देऊन आत्मरक्षण करता येते. याला प्रतिशह देण्यासाठी काही वेळा समोर विमान नसले, तरी मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा सुरू केला जातो. त्यामुळे दूरवरची विमाने भिऊन लगोलग दारुगोळा फेकून देतात आणि पळून जातात. अशा रीतीने ही शहप्रतिशहाची स्पर्धा चालू राहते. या स्पर्धेतूनच इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र विकसित झाले आहे.

सूक्ष्म तरंगांच्या साहाय्याने संदेशवहन अधिक कार्यक्षमतेने करता येत असल्यामुळे त्यांचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. क्षेपणास्त्रांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा अमेरिकेच्या सर्व किनाऱ्यांवर बसविण्याची योजना आखण्यात आलेली आहे. अशी पूर्वसूचना मिळाल्यानंतर त्याला प्रतिशह देणारी क्षेपणास्त्रे सोडण्याच्या यंत्रणेतही इलेक्ट्रॉनीय तंत्राचा उपयोग करण्यात येतो. या प्रकारच्या विविध नियंत्रक यंत्रणांमध्ये संगणक यंत्रांचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. अशा रीतीने इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र वेगाने विकसित होत आहे.

पहा : रडार संदेशवहन अभियांत्रिकी.

नगरकर, व. वि. दीक्षित, हे. वि.