सॅपर्स अँड मायनर्स : सैनिकी अभियांत्रिकीतील एका दलाला ब्रिटिशांनी दिलेली उभयान्वयी संज्ञा. सॅप (Sappe -आरंभीचे अवघड काम किंवा खंदक खणणे) या फ्रेंच शब्दापासून सॅपर हा शब्द बनला आहे. शत्रुपक्षाचे सैन्य जेव्हा आच्छादित खंदक खणून किल्ल्यात प्रवेश करते, तेव्हा त्याला प्रतिकार करण्याच्या निकडीमधून सतराव्या शतकात सैनिकी अभियांत्रिकीची गरज भासली. त्यातील अभियंत्यांनी भुयारे वा खंदक खणून त्यांद्वारे सुरुंग लावले. या खंदकांना आणि भुयारांना ‘सॅप्स’ ही संज्ञा रुढ झाली आणि ते खणणाऱ्याना ‘सॅपर्स’ हे नाव प्राप्त झाले तर मायनर हा शब्द ‘माइन’ या इंग्रजी शब्दावरून बनला असून त्याचा मराठी पर्याय ‘खणणारा सैनिक’ असा आहे. युद्घतंत्रात खंदक वा भुयार खणण्याच्या पद्घतीसही ही संज्ञा वापरतात.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतरयूरोपियन व हिंदुस्थानातील पायदळातील सैनिक आवश्यकतेनुसार मोहिमांत सहभागी होत. त्या मोहिमा संपताच ह्या स्वयंसेवकी सैनिकांना रजा देण्यात येत असे पण ब्रिटिशांनी ऐच्छिक तत्त्वावर कामगारांची तात्पुरती पलटण बनविण्याचा प्रयोग केला, तो अयशस्वी ठरला. अखेर सततच्या युद्घजन्य परिस्थितीमुळे ३० सप्टेंबर १७८० रोजी त्यांनी ‘मद्रास पायॉनिअर’ नावाचे दल प्रामुख्याने पायदळातील सैनिक घेऊन स्थापन केले. या सुमारास सैनिकी अभियांत्रिकीच्या विकास व विस्तारास प्रारंभ होत असतानाही हे दल बिन-सनदी अधिकारी (नॉन-कमिशन्ड ऑफिसर्स) व शासनेतर अधिकारी (प्रायव्हेट्स) यांचे करण्यात आले. त्यालाच पुढे सॅपर्स अँड मायनर्स कोअर हे नामाभिधान देण्यात आले. ही अभियांत्रिकी दले त्या त्या इलाख्यांवरून जसे बेंगॉल, मद्रास (चेन्नई) व बाँबे (मुंबई) अशी ओळखली जाऊ लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या तीन इलाख्यांतील सैन्याच्या आवश्यकतेकरिता तीन स्वतंत्र केंद्रे बंगलोर (कर्नाटक), रुडकी (उत्तर प्रदेश) आणि खडकी(महाराष्ट्र) येथे उघडण्यात आली. या दरम्यान सिग्नल कोअर या संदेश दलाची स्थापना झाली आणि ते हिंदुस्थानात सॅपर्स अँड मायनर्स या दलातून १९१० मध्ये डिव्हिजनल सिग्नल कंपनीज या नावाने विकसित झाले. त्याचा निर्देश एस् अँड एम् ( सॅपर्स अँड मायनर्स ) या लघुरुपाने करण्यात येऊ लागला. प्रथम त्याचा उपयोग वायव्य सरहद्दीवरील अबोर मोहिमेत ब्रिटिशांनी त्याच वर्षी केला. पहिल्या महायुद्घाच्या सुरुवातीस (१९१४) त्याचा विस्तार तारायंत्र तज्ञांच्या मदतीने करण्यात आला. दुसऱ्या महायुद्घाच्या वेळी (१९३९-४४) भारतीय संदेश पथकांनी फ्रान्स, बेल्जियम, मेसोपोटेमिया, ईजिप्त, पॅलेस्टाइन, सिरिया, रशिया, पर्शिया, पूर्व आफ्रिका आदी प्रदेशांत स्पृहणीय कामगिरी केली.

सॅपर्स अँड मायनर्स या दलाचे १८५९ मध्ये रॉयल इंजिनियर्स असे नामांतर करण्यात आले तथापि शासनेतर अधिकाऱ्याना अनधिकृत रीत्या सॅपर्सच म्हणत असत. त्यांनी भारतातील तसेच भारतेतर देशांतील मोहिमांत अनेक विजय मिळविले. पहिल्या महायुद्घाच्या वेळी (१९१४ -१८) बेंगॉल सॅपर्स अँड मायनर्सचे नाव बदलून ते किंग जॉर्ज्स ओन बेंगॉल सॅपर्स अँड मायनर्स करण्यात आले, तसेच मद्रास सॅपर्स अँड मायनर्सचे नाव १९२२ मध्ये क्वीन व्हिक्टोरियाज ओन मद्रास सॅपर्स अँड मायनर्स असे करण्यात आले आणि बाँबे सॅपर्स अँड मायनर्सचे रॉयल बाँबे सॅपर्स अँड मायनर्स असे नाव झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यातील ‘रॉयल’ हा शब्द जाऊन फक्त बाँबे सॅपर्स अँड मायनर्स हे नाव राहिले. तसेच शीर्षकांच्या बदलांनुसार शिरस्त्राणावरील (टोपीवरील) बिल्लाही बदलला जात असे मात्र स्वातंत्र्योत्तर काळात १९४९ मध्ये सॅपर्स अँड मायनर्सची पुनर्रचना करण्यात येऊन त्याचे नाव ‘कोअर ऑफ इंडियन इंजिनिअर्स ’ असे करण्यात आले आणि शिरस्त्राणावर नवीन तुरा (न्यू क्रे स्ट) स्थापन झाला. तत्पूर्वी १९३५ पर्यंत सर्व सॅपर्स अधिकारी ब्रिटिश शाही (रॉयल) अभियांत्रिकी दलातील असत. तसेच सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्घा काही दुय्यम अधिकारी (वॉरन्ट ऑफिसर्स) ब्रिटिशच होते. त्याच वर्षी (१९३५) हिंदुस्थानातील किंग्ज कमिशन्ड इंडियन ऑफिसर्स या नावाने ओळखला जाणारा आर्. इ. असराप्पा नावाचा पहिला भारतीय हिंदू अधिकारी नेण्यात आला. त्यालाच पुढे १९५६ मध्ये पदोन्नती देऊन इंजिनिअर इन चीफ करण्यात आले मात्र तोपर्यंत या पदावर हॅरी विल्यम्स हे इंग्रज गृहस्थ प्रमुख होते.

आधुनिक युद्घतंत्रातील भूसेनेत सॅपर्स अभियंत्यांकडे तीन प्रमुख कामे सोपविलेली आढळतात. एक, सैन्याच्या हालचालींसाठी सुवाह्य पूल बांधणे, कामचलाऊ विमानतळ तयार करणे, रस्ते व इंधनाच्या साठ्यांसाठी इमारती यांची बांधकामे करणे. दोन, रणांगणावर रणगाड्यांच्या मार्गासाठी सुयोग्य साफसफाई व अडथळे दूर करणे आणि तीन, जिवंत बाँब, तोफगोळे निकामी करून त्यांची विल्हेवाट लावणे आणि सैन्याच्या हालचालींसाठी योग्य दिशादर्शक मानचित्रे (नकाशे) बनविणे.

पहा : सैनिकी अभियांत्रिकी.

टिपणीस, य. रा.