कार्ल गुस्ताफ एमिल मानेरहममानेरहेम, कार्ल गुस्ताफ एमिल:  (४  जून  १८६७–२७ जानेवारी १९५१). मार्शल, फिनलंडचा विख्यात राष्ट्रपती, सेनापती व  स्वातंत्र्ययुद्धनेता.  तुर्कू  येथे  एका उच्च  कुटुंबात जन्म. १९२० पर्यंत फिनलंड रशियाच्या अंमलाखाली होते त्यामुळे त्याचे सैनिकी शिक्षण रशियात  झाले  व रशियाच्या घोडदळात तो अधिकारी बनला. त्याने रशिया-जपान युद्धात भाग घेतला. पहिल्या महायुद्धात [→ महायुद्ध, पहिले] रशियाच्या सहाव्या घोडदळ कोअरचा तो सेनापती असताना त्याने रूमानिया आघाडीवर काम केले.  रशियातक्रांती झाल्यावर फिनलंडनेस्वातंत्र्य जाहीर केले, तेव्हा तोफिनलंडला परतला. रशियाचेबोल्शेव्हिक सैन्य तसेच फिनलंड मधील साम्यवादी यांनी एकत्रयेऊन फिनलंडवर हल्ला केला.फिनलंडच्या नव्या शासनानेमानेरहेमला फिनलंड मुक्तीफौजेचा सरसेनापती नेमले तेव्हा त्याने फिनलंडवरील आक्रमण परतवले व राष्ट्रद्रोह्यांचा पाडाव केला.

त्याची १२ डिसेंबर १९१८ रोजी फिनलंडचा मुख्य कार्यकर्ताम्हणून नेमणूक झाली. फिनलंडच्या  शासनाचे  जर्मनी-धार्जिणे  धोरण  त्याला नापसंत होते. डॉर्पाटच्या  तहान्वये  (१४  ऑक्टोबर  १९२०) फिनलंडचे स्वातंत्र्य रशिया व इतर राष्ट्रांनी मान्य केल्यावर, नवीन संविधानाप्रमाणे फिनलंडमध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मानेरहेमचा पराभव झाला. त्याने प्रमुख कार्यकर्त्याच्या पदाचे त्यागपत्र दिले. फिनलंडचा शेजारी जो रशिया त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्यावर त्याचा भर होता. तसेच रशियाच्या प्रचंड शक्तीचीही त्याला वस्तुनिष्ठ जाणीव होती. हे लक्षात घेऊन त्याने फिनलंडच्या दक्षिण सीमेवर ‘मानेरहेम तटबंदी’ उभी केली. १९४१ मध्ये या तटबंदीमुळे रशियाच्या आक्रमणाला थोडाफार पायबंद बसला होता. ३० नोव्हेंबर १९३९ रोजी रशियाने फिनलंडवर आक्रमणास प्रारंभ केला. या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्याला परत सरसेनापती नेमण्यात आले. फिनलंडच्या चिमुकल्या सैन्याने कडवा लढा दिला तथापि त्याला हार खावी लागली. ⇨ गनिमी युद्धतंत्राप्रमाणे मानेरहेमने हे ‘हिवाळी युद्ध’ लढविले. या युद्धात फिनलंडचे सु. २५,००० आणि रशियाचे सु. २ लक्ष सैनिक ठार झाले. जर्मनीने जून १९४१ मध्ये रशियावर आक्रमण सुरू केले. लेनिनग्राडच्या सुरक्षिततेसाठी रशियाने तहभंग करून फिनलंडवर परत आक्रमण केले. ऑगस्ट १९४४ पर्यंत हे युद्ध चालू राहिले. शेवटी दक्षिण सीमेवरील (लेनिनग्राडच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील) प्रदेश रशियाला देऊन शांतता प्रस्थापित केली. १९४२ मध्ये मानेरहेमला फिनलंडचा एकमेव मार्शल हा सन्मान देण्यात आला. १९४४ मध्ये तो फिनलंडचा राष्ट्रपती झाला तथापि वृद्धत्वामुळे त्याने निवृत्ती स्वीकारली. लोझॅन येथे त्याचा मृत्यू झाला. त्याने मेमरिज ऑफ मार्शल मानेरहेमनामक ग्रंथ फिनिश भाषेत प्रसिद्ध केला.

संदर्भ : 1. Lewenhaupt, Eric Trans. Mannerheims Memories, 1954.

           2. Mazour, A. G. Finland Between East and West, London, 1956.

दीक्षित, हे. वि.