सागरी तटरक्षक दल, भारत : (इंडियन कोस्ट गार्ड). भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थापन झालेले लष्करी दल. त्याच्या स्थापनेची घोषणा दिनांक १ फेब्रुवारी १९७७ रोजी झाली आणि केंद्र शासनाने पुढे १९७८ च्या कोस्ट गार्ड अधिनियमाने त्याची विधिवत स्थापना दिनांक १८ ऑगस्ट १९७८ रोजी केली आणि त्यास स्वतंत्र लष्करी दलाचा दर्जा दिला. त्यावर समादेश (हुकमत) व नियंत्रण ठेवण्यासाठी महासंचालक (डायरेक्टर जनरल) या स्वतंत्र पदाची निर्मिती करून त्यांच्याकडे संबंधित खात्याचे सर्वाधिकार सुपूर्त केले. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये अनुक्रमे मुंबई (महाराष्ट्र), चेन्नई (तमिळनाडू), पोर्ट ब्लेअर (अंदमान व निकोबार बेटे) आणि गांधीनगर (गुजरात) येथे आहेत. ही चार प्रादेशिक मुख्यालये भारताच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर अकरा जिल्हा तटरक्षक दल व सहा तटरक्षक स्थानके (स्टेशन्स) यांच्या सहकार्याने कार्य करतात. त्यांना सागरी किनाऱ्यावर नियमबाह्य वा अनियमित असे काही आढळल्यास तत्काळ योग्य ती कारवाई करण्यात येते. भारतीय सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य ‘वयम् रक्षमः’ (आम्ही संरक्षण करतो) असे आहे.

अधिनियमाच्या सनदेत तटरक्षक दलाची कर्तव्ये नमूद केली आहेत. ती अशी : (१) समुद्रावरील जीवित व मालमत्ता यांचे रक्षण करणे. (२) किनाऱ्यापासून सागरी सीमेपर्यंत गस्त घालणे. (३) स्वकीय मच्छीमारांना संरक्षण देणे आणि परकीय मच्छीमारांना अटकाव करणे. (४) संशयास्पद जहाजे तपासणे व दुर्घटनाग्रस्त जहाजांना मदत करून त्यांवरील लोकांचे प्राण व संपत्तीचा बचाव करणे. (५) किनाऱ्यावरील जहाजातून तेलगळती होत असल्यास तिचा निरोध करून मासे व जलचरांना वाचविणे तसेच समुद्रात विमान दुर्घटना झाल्यास मदत करणे. (६) कृत्रिम बेटांचे आणि अपतट (ऑफशोअर) प्रस्थापित तेलसाठे यांची सुरक्षितता व संरक्षण करणे. (७) प्रदूषणाने धोक्यात आलेल्या वनस्पति-जलचर यांच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल साधणे. (८) चोरट्या आयात-निर्यातीवर देखरेख व लक्ष ठेवणाऱ्या सीमाशुल्क व अन्य प्राधिकाऱ्यांना मदत करणे. (९) भारतीय नौदलाला युद्घजन्य परिस्थितीत सहकार्य करणे. (१०) सागरी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे व गुन्हा नोंदविणे इत्यादी.

भारताचा सागरी किनारा सु. ७,५१७ किमी. आहे. यामध्ये पूर्व आणि पश्चिम किनारा, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे आणि अन्य लहानसहान अनेक बेटे यांचा अंतर्भाव होतो. या किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलावर असून पश्चिमेस व उत्तरेस पाकिस्तानचा किनारा पूर्वेस बांगला देश आणि म्यानमार या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांवर तटरक्षक दलाची करडी नजर असते. लहानसहान खाड्यांमधून छोट्या बोटी, शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ, अतिरेकी वगैरेंची अवैध रीत्या ने-आण करतात. त्यांच्यावर तटरक्षक दलाला लक्ष ठेवावे लागते तसेच भाभा अणुसंशोधन केंद्र, गुजरातमधील आण्विक भट्टी, लहान-मोठी बंदरे, खनिज पदार्थ, ॲल्युमिनियम भट्ट्या , नाविक तळ, विमानतळ इ. संवेदनक्षम स्थळे किनारपट्टीवर आहेत. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी तटरक्षक दलावर असून शिवाय सामुद्रिक वादळे व त्सुनामी लाटा यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्या संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर आहे.

प्रत्येक देशाच्या सागरी किनारपट्टीला लागून प्रादेशिक जलाशय (टेरिटोरिअल वॉटर्स) हा भाग असतो. प्रादेशिक जलाशयाची मर्यादा किनाऱ्यापासून सु. ४४ किमी. पर्यंत असलेल्या जलप्रदेशावर असून किनाऱ्यापासून ३२० किमी. अंतरापर्यंतचा जलप्रदेश हा त्या त्या देशाचा आर्थिक क्षेत्रविभाग मानला जातो. या क्षेत्रविभागात असलेल्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीचा शोध लावण्याचा, उपभोग घेण्याचा व संवर्धन करण्याचा हक्क त्या देशाला असतो. या सर्व प्रकारच्या कार्यासाठी सागरी तटरक्षक दल जबाबदार असते. या दलाचा नौसेनेशी घनिष्ठ संबंध असतो. या सीमेत परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. या सागरी प्रदेशावर सुरक्षा, स्वच्छता, वसाहत करणे इ. कारणास्तव तटरक्षक दलाचा हक्क असतो. ह्या दलात लहान-मोठ्या बोटी, जहाजे, किनारपट्टीवर गस्त व टेहळणी करणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्स असतात. याशिवाय तोफनौका, नष्टशेषशोधक (सॅल्व्हर), अग्निशामक आणि प्रदूषणनियंत्रक इ. प्रकारच्या नौका या दलाकडे असतात. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न झाले आणि केंद्र शासनाने त्यासाठी कालबद्घ कार्यक्रम आखला. सांप्रत भारतीय तटरक्षक दलाकडे सु. ९३ नौका आणि ४६ विमाने आहेत (२०११).

खनिज तेलाचे किंवा नैसर्गिक वायूचे साठे जिथे आहेत, त्यांची जबाबदारी खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग (ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन -ओएनजीसी) घेतो. त्या ‘प्लॅटफॉर्म’ना रसद पुरविणे, कामगारांची ने-आण करणे, दुरुस्ती इ. कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ती तटरक्षक दलाची जबाबदारी नाही.

पहा : किनारासंरक्षण गस्त नौसेना.

देशपांडे, सु. र.