बाँब : बाँब हे क्षेत्रविध्वंसक अस्त्र आहे. धातू, प्लॅस्टीक किंवा तत्सम पदार्थांच्या कोशात स्फोटक द्रव्ये, रसायने किंवा रोगकारक जंतू भरून विविध प्रकारचे बाँब तयार केले जातात. कोश सामान्यतः आयताकार असतो. गैतिक स्थैर्यासाठी कोशाच्या पार्श्वभागास पंख असतात. कोशाग्र अर्धगोलाकार अथवा शंक्वाकार ठेवल्याने कोशाचा मुक्तप्रवास (फ्री फ्लाइट/फॉल) सुवाही होतो. इ.स. अठराव्या शतकापर्यंत ग्रेनेड, तोफगोळा आणि बाँब यांमधील भेद सुस्पष्ट नव्हता. दोन अर्धगोलकांत स्फोटक घालून, त्यांना एकत्र जोडल्यावर जो आयत बने त्यास ग्रेनेड म्हणत. दोन अर्धायतांना जोडून जो आयत बने त्यास बाँब म्हणत. आता विमानातून सोडल्या जाणाऱ्या मुक्त अस्त्रांना (रॉकेट, क्षेपणास्त्रे वगळून) बाँब म्हणतात. दूरगामी क्षेप्यांच्या कोशात भरलेल्या विध्वंसकासही (ॲटम बाँबधरून) बाँब म्हणतात. बाँब हा बिंदुलक्ष्य (पॉइंट टार्गेट) विध्वंसक नसून क्षेत्रलक्ष्य (एरिया टार्गेट) विध्वंसक अस्त्र आहे. पायदळाकडे असलेल्या उखळी तोफांतून सोडल्या जाणाऱ्या अस्त्रांसही बाँब म्हणण्याचा प्रघात आहे. ⇨ बाँबफेकी विमाने (बाँबर), आघात (अटॅक स्ट्राइक) व आघात – झुंज (अटॅक फायटर) किंवा फायटर – बाँबर विमाने यांद्वारे, साधारणतः शंभर मीटर पेक्षा जास्त उंचीवरून इच्छित लक्ष्यावर बाँब मुक्तपणे सोडले जातात किंवा बाँब सोडल्यानंतर लक्ष्यसंधान अचूक व्हावे म्हणून, हल्ली त्यांस मार्गदर्शन केले जाते. या दोन्ही ही क्षेपणपद्धती प्रचारात आहेत.

बाँबचे प्रकार : बाँबच्या अंतिम कार्यावरून हे प्रकार ठरतात. उदा., आग लावणे, प्रभंजन (ब्लास्ट), खंडन (फ्रॅगमेंटेशन), रोगप्रसार, पर्यावरणीय बदल, किरणोत्सर्ग, विदलन (बर्स्ट) आणि विदारण (शॅटरिंग) इत्यादी परंतु बहुतेक बाँबकरवी मिश्रकार्ये करविली जातात. वरील सर्व प्रकारची विध्वंसक कार्ये अणुबाँब, हायड्रोजन बाँब व न्यूट्रॉनबाँब यांमुळे होते. प्रचलित बाँब पुढीलप्रमाणे आहेत.

बहुकामी बाँब : यास ‘लोखंडी’ बाँबही म्हणतात. प्रभंजन, खंडन, विदलन, व विदारण करणे हे त्याचे कार्य. युद्धात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सामान्यतः याचे वजन ५० ते १,५०० किग्रॅ. पर्यंत असते. यामध्ये ५० टक्के महास्फोटक द्रव्य असते. कमी उंचीवरून टाकल्या जाणाऱ्या या बाँबच्या पंखांच्या ओढीमुळे त्यास खाली पडण्यास वेळ लागतो, त्यामुळे बाँबर लक्ष्यापासून बरेच पुढे गेल्यावर बाँबचा स्फोट होतो, इमारती, मोर्चे, तेलाचे वा पाण्याचे नळ इत्यादींच्या विध्वंसनासाठी या बाँबचा उपयोग होतो. या २५० किग्रॅ. बाँबमुळे सु. २० मी. व्यासाचा व ५ मी. खोलीचा खड्डा निर्माण होतो. संघातबिंदूच्या (पॉइंट ऑफ इंपॅक्ट) भोवतालच्या सु. ४,२२५ चौ. मी. क्षेत्रात या बाँबमुळे प्राणहानी संभवते. केवळ एकाच मोठ्या बाँबस्फोटामुळे लक्ष्यक्षेत्राचे समप्रमाणात विध्वंसन होत नाही. दुसऱ्या महायुद्धात ग्रँड स्लॅम यासारखे ११ टनी (११.१७६ किग्रॅ.चे) बाँब बनविण्यात आहे होते.

विभंजक बाँब : याचा कोश तारांचा किंवा खंडणक्षम लोखंडाचा असतो. बाँबच्या एकूण भारापैकी १४ टक्के भाराचे स्फोटक असते. स्फोटामुळे तारांचे किंवा लोखंडाचे तुकडे इतस्ततः वेगाने उडतात. उघड्यावरील सैनिक, भंगू शकणाऱ्या  वस्तू, विमाने इत्यादींचा नाश करण्यासाठी हे बाँब उपयुक्त ठरतात.

खंडक बाँब (ब्लॉक बर्स्टर) : याचा कोश अगदी पातळ असतो. भेदनशक्ती किरकोळ असून प्रभंजन शक्ती दांडगी असते. याची बांधणी अगदी तकलादू असल्याने हवाई छत्रीने त्यास लक्ष्यावर सोडतात. दुसऱ्या महायुद्धात १२ टनांचे (१२,१९२ किग्रॅ.) या प्रकारचे बाँब तयार करण्यात आले होते.

गुच्छ (क्लस्टर) बाँब : क्षेपणास्त्राने तोफमोर्चे, रणगाडे यांसारख्या लहानलक्ष्यावर बाँब अचूकपणे टाकणे कठीण असते म्हणून समप्रमाण विध्वंसनासाठी हे बाँब वापरतात. एका कोशांत शेकडो पिटुकले बाँब भरतात. या पिटुकल्यांत शेकडो पोलादी गोळ्या ठासतात. सु. १०० ते १५० मीटर उंचीवर कोश संपीडित वायूने उघडला जातो व छोट्या बाँबचा पाऊस पडतो आणि त्यांच्या स्फोटामुळे पोलादी गोळ्या इतस्ततः विखरून लक्ष्यात घुसतात. स्फोटामुळे रणगाड्यांची चिलखते निकामी होतात.

धरणविध्वंसक बाँब : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची युद्धक्षमता नष्ट करण्यासाठी रूर या औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मना, एडर व सोर्प धरणांचा विध्वंस करणे आवश्यक होते. त्यासाठी डॉ. बार्नझ वॉलिस यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण ‘गोलक बाँब’ शोधून काढला. बांधापासून विशिष्ट अंतरावर हा बाँब विशिष्ट वेगाने विशिष्ट व उंचीवरून जलपृष्ठावर सोडल्यावर तो उड्या मारत बांधावर आदळतो व त्याच्या स्फोटाचा धक्का बसून बांधाचे विदारण होते. बांधापाशी पाण्यात बाँब घुसतो व घुसल्यावर पाण्यातच त्याचा स्फोट होऊन बांधकाम ढासळते. या बाँबचे वजन १२ टनांइतके (१२,१९२ किग्रॅ.) होते.

आगलावे बाँब : या प्रकारच्या बाँबमुळे आग लागते. ते एक ते पन्नास किग्रॅ. वजनाचे असतात. यात पेट्रोल मिश्रण किंवा थर्माइट ही ज्वालाग्राही द्रव्ये वापरतात. थर्माईट पाण्याच्या आतसुद्धा जळते. वातावरण अनुकूल असल्यास आग झपाट्याने पसरते व अग्निवादळे निर्माण होतात. हँबर्ग, ड्रेझ्‌डेन आणि लाइपसिक या जर्मन शहरांचा विध्वंस या प्रकारच्या बाँबने करण्यात आला.

नेपाम बाँब : या बाँबमुळेही आग लागते. खोबरेल, ॲल्युमिनियम व पेट्रोलच्या सांद्र द्रव्याचे मिश्रण किंवा पॉलिस्टायरीन, पेट्रोल आणि बेंझीन यांचे मिश्रण पातळ पत्र्याच्या कोशात भरतात. मिश्रण चेतवण्यासाठी एका स्फोटक कांडीभोवती फॉस्फरस ठेवतात. स्फोट झाल्यावर तीस ते चाळीस मीटरपर्यंत मिश्रणाचा सडा पडून ते पेट घेते. पेटलेले मिश्रण पदार्थमात्रास चिकटून राहते. खरवडल्यास  आग आणखी भडकते. अग्नितपमान सु.१,१००° से. इतके असते. मिश्रण सूक्ष्म चिरा व फटीतूनही शिरते. या बाँबच्या हल्ल्यातील बहुतांशी वस्तू जळून जातात. जखमा भरल्या तरी विद्रुपता जात नाही. ज्वालांमुळे वातावरणीय ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी होऊन गुदमरण्यानेही प्राणहानी होते. नेपामचे वजन ५०० किग्रॅ. असते. हे बाँब विमानातून मुक्तपणे सोडले जातात व ते गडगडत खाली येतात. हेग येथील आंतरराष्ट्रीय करार (१९२३) मधील कलम २३ (इ) प्रमाणे यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानी शहरांवर मोठ्या प्रमाणावर नेपाम बाँब फेकण्यात आले होते.

चिलखतभेदी बाँब : युद्धनौका तसेच तटबंदी फोडण्यासाठी हे बाँब वापरतात. त्यांचे कोशाग्र जड व घडीव पोलादाचे असते. हा बाँब चिलखत व तटबंदी भेदून आत घुसतो व मग त्याचा विलंबित काडवातीने (फ्यूज) स्फोट होतो.

रसायनी बाँब : धूर किंवा विषारी वायू पसरविणारे बाँब. शत्रूला निरीक्षण करता येऊ नये म्हणून या बाँबच्या साहाय्याने धूम्रपटल निर्माण करून सैन्याच्या हालचाली करण्यात येतात. संदेश दळणवळणासाठी विविध रंगांचे धूर वापरतात. विषारी वायू हे ⇨जैव व रासायनिक युद्धतंत्रात वापरतात. विपर्णक व वनस्पतिनाशक अशा पारिस्थितिकीय युद्धतंत्रातही यांचा वापर केला जातो.

जलांतर्गत बाँब : यांचा उपयोग पाणबुड्या बुडविण्यासाठी केला जातो.


मार्गदर्शित बाँब : एखद्या लक्ष्यावर बाँब मुक्तपणे सोडल्यास लक्ष्याचे जरी अचूक विध्वंसन होते, तरी त्याकरिता एकापेक्षा अधिक बाँब टाकावे लागतात. शिवाय लक्ष्याबरोबरच आजूबाजूंच्या इतरही वस्तूंचा नाश होतो. यालाच ‘परिसर विध्वंसन’ (को-लॅटरल् डॅमेजेस) म्हणतात. हे टाळण्यासाठी प्रथम मुक्तपणे बाँब सोडले जातात व नंतर त्यांना लेसर किरण, दूरदर्शक किंवा अवरक्त बोधक (इन्फ्रारेड मॉनिटर) याद्वारे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे लक्ष्यविध्वंसन अचूक होऊ शकते. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनीने तयार केलेल्या व्ही-१ व व्ही-२ या उडत्या अस्त्रास ‘उडते‘ किंवा ‘रोबो’ बाँब म्हणतात. रोबो बाँबची आधुनिक आवृत्ती म्हणजे दूरगामी – प्रक्षेपणास्त्रे होत.

स्फोटक द्रव्ये : प्रभंजन, विदलन, विदारण व प्रक्षोभ क्रिया करणाऱ्या बाँबमध्ये पुढीलप्रमाणे स्फोटक द्रव्ये भरतात. टीएनटी (किंवा ॲमॅटॉल व ॲमोनल), टेट्रिल,ॲमोनल व आरडीएक्स. ग्रेनेड आणि उखळी तोफगोळ्यांत ट्रायटोनल भरतात. ⇨सुरुंग वपाणतीरात ॲमोनल आणि हेक्झॅनाइट असते. विमानातून टाकल्या जाणाऱ्या बाँबमध्ये टॉरपेक्स असते.

काडवात : जमिनीवर आदळल्यावर स्फोट होण्याइतकी बाँबस्फोटके संवेदनशील नसतात म्हणून स्फोट घडविण्यासाठी विविध प्रकारच्या यांत्रिक काडवाती वापरतात.

इतिहास : प्राचीन धार्मिक व इतर वाङ्‌मयात मानवी आकाश संचाराच्या कथा आहेत. त्याचप्रमाणे आकाशातून शत्रूवर अस्त्रांचा मारा केल्याची वर्णने आहेत. अथर्ववेदात (११.९) वर्णिलेल्या सात ‘उदार’ अस्त्रांपैकी एक आकाशातून फेकण्यासाठी आहे. रामायणात इंद्रजीताने रामसेनेवर आकाशातून अस्त्रमार केल्याचे वर्णन आहे. अरेबियन नाइट्‌समध्ये सिंदबाद समुद्रप्रवास करीत असताना त्याच्या नौकेवर दोन पक्ष्यांनी दगड टाकून नौका बुडविल्याची कथा आहे. १६७० च्या सुमारास इटलीतील फ्रान्सिस्को लाना द तेर्झी याने वायुयानातून नागरिकांवर शस्त्रांचा मारा केल्याची कल्पना प्रसृत केली. १७०९ पासून ग्लायडर, बलून, वातनौका अशा वायुगामी वाहनांचे प्रयोग सुरू झाले. १८४९ साली ऑस्ट्रियन सैन्याने मुक्त फुग्याद्वारे व्हेनिसवर ग्रेनेड टाकण्याचे निष्फळ प्रयत्न केले. १९०३ मध्ये राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यामुळे आकाशातून जमिनीवर मारा करण्याची कल्पना साकार होऊ घातली. इटली व तुर्कस्तान यांच्यात झालेल्या युद्धात १ नोव्हेंबर १९११ रोजी इटलीचा लेफ्टनंट चॅव्होत्ती  याने ट्रिपोलीपाशी तुर्कांवर दोन किग्रॅ. वजनाचे चार बाँब (ग्रेनेड) टाकले. तुर्कस्तानने या बाँबहल्ल्याचा निषेध करुन इटलीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. १९११ साली विमानातून बाँब सोडण्यासाठी ‘बाँबदृष्टी’ चा शोध ब्रिटनच्या रायली स्कॉट याने लावला परंतु तिचा उपयोग कोणीही केला नाही. पहिल्या महायुद्धात १४ ऑगस्ट १९१४ रोजी फ्रेंच वैमानिकांनी मेट्स येथील जर्मन त्सेपेलीन तळावर बाँब हल्ले केले. जर्मन वैमानिकांनी त्सेपेलीनमधून लंडनवर हल्ले करून सैनिकी युद्धाला निरंकुश संकुल युद्ध बनविले. या महायुद्धात सुरूवातीस बाँबचे वजन १० ते २५ किग्रॅ. पर्यंत असून विमानात उभे राहून वैमानिक ते हाताने खाली सोडीत. पुढे भारी बाँब बनविण्यास सुरुवात होऊन बाँबर विमानांची निर्मिती चालू झाली. दुसऱ्या महायुद्धात बाँबचे विविध प्रकार प्रचारात आले. बाँबर व बाँबदृष्टीयंत्रात झपाट्याने सुधारणा झाल्या. दोस्त राष्ट्रांनी एकावेळी हजारो भारी बाँबफेकी विमाने जर्मनीवर धाडून, ब्रेमेन, ड्रेझ्‌डेन, लाइपसिक, बर्लिन इ. शहरांचे अनन्वित नुकसान केले. जपानवरही अमेरिकेने असेच आगलावे व स्फोटक नेपाम बाँबचे हल्ले केले. तसेच अनावश्यक असतानाही नागासाकी व हीरोशीमावर अणुबाँब टाकून अणुयुद्धाची बीजे पेरली. हल्लीच्या अणुयुगात वर निर्दिष्ट केलेल्या बाँबच्या प्रकाराखेरीज अणुबाँबची निर्मितीही होत आहे.

बाँबहल्ल्याचे परिणाम : दुसऱ्या महायुद्धात ग्रेट ब्रिटनमधील ७०,००० नागरिक ठार झाले. घरे, कारखाने, सार्वजनिक इमारती इत्यादींचे प्रचंड नुकसान झाले. नागरी संरक्षणव्यवस्था उत्तम असल्यामुळे एकंदर लोकांवर दुष्परिणाम झाले नाहीत. अन्नधान्यनियंत्रणामुळे व आरोग्यसुविधांमुळे बालमृत्युप्रमाण घटले. युद्धकाळात व तदनंतर जन्मलेली मुले वजनात व उंचीत यूद्धापूर्वी जन्मलेल्या बालकांपेक्षा सरस होती. पुनर्वसनक्षमता, अन्नधान्य नियंत्रण व इतर जीवनोपयोगी यंत्रणा कार्यक्षम असल्यामुळे बाँबहल्ले फारसे परिणामकारक ठरले नाहीत. जर्मनीवर ४.३४ लक्ष टन भाराचे बाँब टाकण्यात आले, त्यामुळे पाच लक्ष माणसे मेली व ७.८ लक्ष जखमी झाली. त्याशिवाय ७.५ लक्ष लोक बेघर झाले. औद्योगिक उत्पादन कमी व्हावे म्हणून जर्मनीवर बाँबहल्ले झाले परंतु युद्धकालात तसेच युद्धोत्तर कालात जर्मनी व जपान या राष्ट्रांचे औद्योगिक वा शेतकी उत्पादन अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावर न घटता ३० टक्क्यापर्यंतच घटले. जर्मनीत बालमृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पोषक अन्नपुरवठा कमी पडल्याने जखमी व रोगी यांची मृत्युसंख्या वाढली. जर्मनी व जपान यांचे सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. इंडोचायना युद्धात (१९६१ – १९७५) उत्तर व्हिएटनाममधील मनुष्यनिर्मित पर्यावरणाच्या (कारखाने, पूल, रेल्वे, वगैरे) नाशासाठी अमेरिकेने बाँबहल्ले केले परंतु उत्तर व्हिऐटनामी समाजाच्या बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्याच्या कुवतीमुळे बाँबहल्ले बहुतांशी निष्फळ ठरले. याउलट दक्षिण व्हिएटनाममध्ये नैसर्गिक पर्यावरणाचा नाश करण्यासाठी बाँबहल्ले झाले. यामुळे एक कोटीवर ग्रामीण जनता परागंदा झाली. शहरी लोकसंख्या एकदम वाढली. अन्नपाण्याचा तुटवडा, हवेचे प्रदुषण, वेश्याव्यवसायात वाढ, बेरोजगारी व रोगराईत वाढ झाली. तसेच समाजात बेफिक्रीपणा वाढला. अशीच परिस्थिती लाओस व कंबोडियात होती. इंडोचायनावरील बाँबहल्ल्यामुळे एकंदरीत नैसर्गिक, सांस्कृतिक व औद्योगिक हानी भयंकर झाली.

अणुस्फोटामुळे अमर्याद विध्वंसन व मनुष्यहानी होणे शक्य झाले आहे. कार्यक्षम स्फोटके आणि इतर जैव व रासायनिक द्रव्ये बाँबमध्ये वापरण्याच्या दृष्टीने संशोधन चालल्याचे दिसते. हेग वायुयुद्ध नियम (१९२३) तयार झाले आहेत. तरी त्यांना आंतरराष्ट्रीय कायदा म्हणून मान्यता नाही. जमिनीवर स्फोट न झालेल्या बाँबला निःशस्त्र करण्यासाठी व त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अभियंत्यांची निष्णात पथके असतात.

पहा : ग्रेनेड दारूगोळा नागरी संरक्षण वायु युद्धतंत्र वायुसेना स्फोटक द्रव्ये.

संदर्भ : 1. Brodie, Bernard, Strategy in the Missile Age, London, 1959,

            2. Chant, C. Humble, R. &amp Others, Air Warfare, London. 1977.

            3. Saundby, R. Air Bombardment, London, 1961.

दिक्षित, हे. वि.