हवाई संरक्षण :आकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था. हवाई संरक्षणाची कृती दोन प्रकारची असते. एक, क्रियाशील प्रतिकार म्हणजे हल्ल्याला हल्ल्याने उत्तर देणे आणि दोन, अक्रियाशील प्रयुक्ती म्हणजे शत्रूच्या विमानांचा हल्ला कसा चुकविता येईल, हे पाहणे. सामान्यतः क्रियाशील हवाई संरक्षणात अभिज्ञान (डिटेक्शन), अभिनिर्धारण (आइडेन्टिफिकेशन), आंतर-छेद ग्रहण (इंटरसेप्शन) आणि संहार यांचा विमान हल्ल्याच्या संदर्भात विचार केला जातो. लष्कराची ही कारवाई हवाई यंत्रणेकडून आणि रडार स्थानकांतून मिळालेल्या संदेशांद्वारे पार पाडली जाते. हवाई वाहतुकीवरील नियंत्रण वगैरे काही अक्रियाशील धोरणे लष्करी व नागरी हवाई प्रतिनिधींद्वारे संयुक्त रीत्या पार पाडली जातात. इतर अक्रियाशील कृतींत निर्वासने, परिक्षेपण, छद्मावरण आणि सुरक्षित जागी आसरा घेणे यांचा अंतर्भाव होतो. या संरक्षणाच्या नागरी सुविधा होत. परिणामकारक हवाई संरक्षणासाठी लष्करी व नागरी या दोन्ही संघटनांच्या सहकार्याची आवश्यकता असते.

 

अभिज्ञान वा निरीक्षण, दृष्टिक्षेप या गोष्टी ‘रडार ङ्खद्वारे केल्या जातात. त्यासाठी ज्या ‘लहरी’ निर्माण कराव्या लागतात, त्यांसाठी जमिनीवर असलेल्या डोंगरावरून त्यांचे प्रक्षेपण केले जाते. सांप्रत उपग्रहांद्वारे अशा प्रकारच्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात व शत्रुप्रदेशांत कोणत्याही स्थळावर त्या पोहोचू शकतात. त्या परावर्तित होऊन येतात, तेव्हा त्या ‘ग्रहण’ करण्यासाठी तशाच प्रकारची यंत्रणा असावी लागते. त्यासाठी आवश्यकतेनुसार विमाने २४ तास उडत ठेवावी लागतात.

 

अभिनिर्धारण : अशा परावर्तित लहरी ग्रहण केल्यावर, संगणकाच्या साहाय्याने त्यांचे विश्लेषण करून त्यातल्या धोकादायक वस्तू व एखादे अस्त्र आपल्या देशाच्या दिशेने डागले गेले असल्यास त्याचा वेग, आकार, उंची, दिशा, स्थान, वेळ इ. निश्चित करता येते. असे निर्धारण झाले की, तत्काळ योग्य त्या संहार करणाऱ्या यंत्रणेस आवश्यक ती माहिती पुरविली जाते.

 

आंतर-छेद ग्रहण : वरील माहिती मिळाल्यावर त्या अस्त्राचा विनाश करणारी यंत्रणा आपल्या दोन-तीन विभागांना त्या अस्त्राचा कुठे विनाश करावा याबद्दल ठरवून सूचना देईल आणि अखेर नाश करणारी संहार यंत्रणा योग्य त्या अस्त्रांचा वापर करून शत्रूचे अस्त्र नष्ट करील. असा नाश शक्यतो शत्रूच्या प्रदेशातच व्हावा हे अधिक श्रेयस्कर ठरते.

 

पहिल्या महायुद्ध काळात (१९१४–१८) हवाई संरक्षणाची निकड निर्माण झाली कारण जर्मनीने झेपेलिन या विमानांचा लष्करी अस्त्र म्हणून वापर सुरू करून लंडनवर हल्ले केले. त्या वेळी पहिली अपेक्षित गोष्ट म्हणजे शत्रूच्या विमानांचा मागोवा घेणे ही होती. त्यासाठी ग्रेट ब्रिटनने १९१८ मध्ये हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी सेवा ही संकल्पना निरीक्षण आणि दूरध्वनीच्या संदेशांद्वारे कार्यवाहीत आणली. शिवाय विमानवेधी तोफा विकसित करण्याचे प्रयत्न केले परंतु हे प्रयत्न तोकडे व अपुरे होते. या युद्धातील अनुभवातून विमानांचा मागोवा घेणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली आणि त्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात झाली. भविष्यकाळातील हवाई संरक्षणासाठी ब्रिटिशांनी १९३५ च्या सुमारास रडारचा उपयोग करण्यास सुरुवात केली. रडार ही इलेक्ट्रॉनीय यंत्रणा असून तिचा उपयोग मुख्यत्वेकरून आकाशात फिरणारी विमाने, समुद्रातील बोटी यांसारख्या लक्ष्यांचा शोध घेण्याकरिता तसेच त्यांचे स्थान, त्यांचा वेग इत्यादींचे अचूक निदान करण्याकरिता होऊ लागला. हवाई संरक्षणात रडार यंत्रणेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रडारच्या संरचनेत, कार्यपद्धतीत, आकार-प्रकारात आधुनिक संशोधनाने सुधारणा झाल्या आणि त्याची अचूकता वाढली.

 

ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका या देशांनी १९३० च्या सुमारास रडार व तत्संबंधीची उपकरणे यांच्या संशोधनास प्रारंभ केला होता. १९३२ मध्ये अमेरिकेच्या नाविक प्रयोगशाळेने अविरत-तरंग प्रेषकाच्या ८० किमी. अंतरावरील विमानांचा वेध घेतला. याच सुमारास जर्मनीने बोटींचा वेध घेणारे रडार, १९३९ मध्ये विमानांच्या आगमनाची सूचना देणारे फ्रेआ नावाचे रडार व १९४० मध्ये विमानाची अचूक स्थाननिश्चिती करणारे वुर्ट्सबर्ग नावाचे रडार निर्माण केले. ग्रेट ब्रिटनमध्ये १९३०–३८ दरम्यान जर्मनीच्या बाजूला असलेल्या संपूर्ण किनाऱ्यावर रडार यंत्रणेचे जाळे उभारण्यात आले. दुसऱ्या महायुद्ध काळात (१९३९–४५) सर्व राष्ट्रांनी हवाई संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले मात्र ब्रिटनने रडारची कार्यक्षम यंत्रणा उभी करून त्याच्या जालक (नेटवर्क) योजनेत २० रडार स्थानके (स्टेशन्स) निर्माण केली होती. १९४० मध्ये लढाऊ विमानात २०० मेह.वर संदेश प्रेषित करणारी रडार यंत्रणा बसविण्यात आली होती. पुढे आर्. एच्. व्हेरिअन व एस्. एफ्. व्हेरिअन यांनी क्लायस्ट्रॉन या इलेक्ट्रॉन नलिकेचा शोध लावला. त्यामुळे उच्च शक्तीचे सूक्ष्मतरंग रडार तयार करणे शक्य झाले.

 

दुसऱ्या महायुद्धात रडारच्या वेधक्षमतेत, पल्ल्यात व नियंत्रणात विलक्षण प्रगती झाली. सुरुवातीस ब्रिटिशांनी विमानात बसविण्याकरिता ड पट्टा (३,००० मेह.) रडार तयार केले. त्याला क२ड हे नाव दिले. त्याचा बाँबफेकीकरिता उपयोग करता येऊ लागला. नंतर ब्रिटिश व अमेरिकन प्रयोगशाळांनी संयुक्तपणे क२द हे रडार तयार केले. त्यामुळे बाँबफेकीत जास्त अचूकता आली. ब्रिटिशांनी जर्मनीच्या वुर्ट्सबर्ग रडारपेक्षाही जास्त प्रभावी तोफ-नियंत्रक रडार बनवून त्याचा १९४४ मध्ये वापर करण्यात यश मिळविले.


दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जर्मनीने व्ही-२ अग्निबाणांनी (रॉकेट्स) मारा केला. तेव्हा प्रथम ज्या तळांवरून मारा झाला, तेतळ इंग्लंडने उद्ध्वस्त केले व शत्रू जिथे तळ उभारू शकेल, तो यूरोपमधला प्रदेश अग्रक्रमाने जिंकून घेतला. हवाई संरक्षणाची ही खरी सुरुवात झाली होती. त्यामुळे शत्रूची अस्त्रे हवेत नष्ट करणे व त्याचे तळ नष्ट करणे, ही हवाई संरक्षणाची मूलभूत तत्त्वे ठरली. विमानाद्वारे जहाजांवरून, पाणबुड्यांतून, विमानांतून, क्षेपणास्त्रांनी किंवा खउइच नी शत्रूचा हल्ला होऊ शकतो. त्याच प्रकारच्या साधनांनी विरोधी पक्ष अशा साधनांचे तळ उद्ध्वस्त करू शकतो. अशी अस्त्रे डागल्यावर क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रे (ॲन्टी मिसाइल मिसाइल्स) ती अस्त्रे उद्ध्वस्त करू शकतात. शत्रू कोणते लक्ष्य ठरवेल व त्या लक्ष्यावर कोणत्या अस्त्राने व कसा मारा करेल, याबाबतचा धोका विचारात घेऊनच स्थानाची निर्मिती करावी लागेल. त्याप्रमाणे स्थाने विकरण (डिसिपेशन) करून बांधावी लागतील, तसेच ती छद्मावरण (कॅमूफ्लाझ) आणि छद्मी अशी दडलेली व शत्रूच्या अस्त्राने नष्ट होणार नाहीत, अशी जमिनीखाली भक्कम कोट करून बांधावीत (बंकर). यांत आपल्या २-३ सैनिकांसाठी खणलेले खंदक (ट्रेंच), रणगाड्याचे, तोफांचे तळ, सैन्यांच्या रसदसामग्रीची कोठारे, क्षेपणास्त्राचे बंकर्स, अत्यंत महत्त्वाची स्थाने, शासकीय मुख्यालये यांसारख्या महत्त्वाच्या स्थानांचा समावेश असेल. सीमेपासून किंवा शत्रू मारा करू शकेल, अशा स्थानापासून त्यांची अंतरे लक्षात घेऊन शत्रू कोणत्या अस्त्रांचा कसा मारा करेल, याचा अंदाज घ्यावा लागेल.

 

शोध आणि निरंतर संनिरीक्षण (डिटेक्शन अँड अंडर कॉन्स्टन्ट सर्व्हेलन्स) : शत्रू ज्या अचल स्थानांवरून वा चल स्थानांवरून–विमाने, विमानतळ, क्षेपणास्त्र तळ, जहाजे, पाणबुड्या अशी–अस्त्रे डागू शकेल, अशा चल-अचल तळांची माहिती मिळविणे आवश्यक असते. अशा गोष्टी छद्मावरणात असतात. त्यांचे संसूचन आवश्यक असते आणिती माहिती गुप्तवार्तांकनाद्वारे (इन्टेलिजेन्स) काढणे जरूर असते. तसेच नवीन प्रकारची बांधकामे आढळल्यास, त्यांचे निरीक्षण करून त्यांच्या हेतूबद्दल माहिती काढणेही गरजेचे असते. निरनिराळ्या विभागांची प्रतिक्रियाही जाणून विचारात घेतली पाहिजे. सारांश, गुप्तवार्तांकन अद्ययावत असले पाहिजे. थोडक्यात, सर्व स्थाने कायम दृष्टिक्षेपात अथवा संनिरीक्षणाखाली ठेवली पाहिजेत. याशिवाय लेसर इंट्रजनडिटेक्टर व संगणकावर आधारित पूर्वसूचना देणारी प्रणाली तसेच संसूचन प्रणाली कार्यान्वित असणे आवश्यक आहे. शत्रूने डागलेली अस्त्रेसुद्धा समजली पाहिजेत.

 

युद्धास सुरुवात झाल्यानंतर किंवा तत्पूर्वी अशी कायम दृष्टिक्षेपात ठेवलेली स्थाने लवकरात लवकर नष्ट/निष्क्रिय करावी लागतील. त्यासाठी संरक्षण मंत्रालय किंवा उच्चपदस्थ व्यक्तीची म्हणजे शासनाची संमती लागेल. हवाई संरक्षणात अशी अहम योजना कार्यान्वित करावी लागेल. शासनाच्या अशा योजनेत संरक्षण दलांचा फार मोठा सहभाग असेल. या सर्वांवर मात करून शत्रू जर काही क्षेपणास्त्रे, लेसर गायडेड क्षेपणास्त्रे डागू लागला, तर ती क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांद्वारे, सामान्यतः लेसर गायडेड क्षेपणास्त्रांद्वारे, नष्ट केली पाहिजेत.

 

योजना हा हवाई संरक्षणाचा प्रमुख भाग आहे. योजना बनविताना संभाव्य धोक्याची सूचना व गुप्तवार्तांकन यांची व्यवस्था सर्व संरक्षक विभागांत असली पाहिजे व त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागापुरत्या योजना बनविल्या पाहिजेत. अशा सर्व योजना ‘राष्ट्रयोजने’ चा भाग होतील. अशी माहिती त्यांना त्यांच्या ‘जरुरीपुरती’ च व योग्य वेळेस दिली पाहिजे. शत्रू कोणत्या स्थानांवर हवाई हल्ला करण्याची शक्यता आहे, अशा सर्व स्थानांसाठी – उदा., राजधानी, शासकीय स्थाने, अणू संशोधन भट्ट्या, मंत्रालय, रेल्वे, रस्ते, विमानतळ, विद्युत् पुरवठा केंद्रे, पाणी पुरवठा केंद्रे, उत्पादन केंद्रे, तेलशुद्धीकरण व साठविण्याची स्थाने, मोठी धरणे, जलाशय इत्यादी – हवाई संरक्षणाच्या साधनांचा पूर्णतः उपयोग केला पाहिजे. शिवाय हवाई संरक्षणाच्या दृष्टीने पुढील काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे : महत्त्वाची स्थाने विखुरलेली (दूरदूर अंतरावर) असावीत ती शत्रूलासहज न ओळखण्याजोगी (मायावरण) असावीत, शिवाय शत्रूच्याअस्त्रांच्या माऱ्यापुढे टिकणारी असावीत शत्रूला चकविण्यासाठी काही नकली स्थाने उभारावीत आणि ती सर्व स्थाने इलेक्ट्रॉनिक साधनांना दादन देणारी असावीत.

 

योजना तयार करताना शत्रू आपल्या कुठल्या लक्ष्याविरुद्ध कोणते व कोणत्या क्षमतेचे अस्त्र वापरेल, याचा अंदाज घेऊन त्याविरुद्ध कोणत्या शोधयंत्रणेचा वापर करावयाचा हे ठरवावे लागेल. शत्रूसंबंधी माहिती हवी पण त्याबरोबरच शत्रू प्रत्यक्ष युद्ध सुरू करेल ती नेमकी वेळ माहीतअसणे व अशी वेळ माहीत झाल्यानंतर आपण शत्रूस सुगावा न लागूदेता काय काय कामे, केव्हा केव्हा सुरू करावयाची या योजना आखल्या पाहिजेत किंवा त्यांची पूर्वतयारी असली पाहिजे.

 

संरक्षण व्यवस्थेत गुप्तचर खात्याची फारच महत्त्वाची भूमिका असते.त्या खात्यास शत्रूचे उद्देश, शत्रूची यंत्रणा, शत्रू युद्धघोषणा केव्हा करेल, शत्रूची क्षमता, शस्त्रास्त्रांची संहारशक्ती आणि प्रहारयुक्ती, त्यास लागणारा वेळ, शत्रूचे उद्देश यांसंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. ती माहिती सर्व संबंधित खात्यांना तत्काळ देण्यात आली पाहिजे.

 

या सर्व प्रक्रियांना वेळ लागणे क्रमप्राप्त आहे. शत्रूने जर विमानातून बाँबफेक करण्याचे ठरविले, तर त्याला वेळ लागेल. यासाठी शत्रू शक्यतो सीमेच्या जवळून क्षेपणास्त्र डागेल व पाच ते दहा मिनिटांत ते अस्त्र आपल्या लक्ष्यावर पोहोचेल. जर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असेल, तर त्याचा शोध घेणे अवघड असते. या सर्वांवर मात करणारी यंत्रणा इझ्राएल-पॅलेस्टाइन युद्धात (जुलै २०१४) मिसाइल डिफेन्स सिस्टिमद्वारे क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा इझ्राएलने साधली. या हवाई सुरक्षेच्या तंत्रज्ञानामुळे इझ्राएलच्या हजारो नागरिकांचे संरक्षण झाले. प्रति-स्पर्ध्यास प्रतिउपाय योजण्यास साधारण ५–७ मिनिटेच मिळू शकतील, याप्रमाणे यंत्रणा असली पाहिजे. हवाई हल्ला तजवीज (सावधगिरी) यंत्रणा जरी कार्यरत असल्या, तरी एखादे अस्त्र आपल्या लक्ष्याचा भेद करण्याची शक्यता असते. या अस्त्रामुळे कमीत कमी हानी व्हावी, विशेषतः मनुष्य-हानी टाळता आली तर पाहावे, असे धोरण असते. अशी यंत्रणा फक्त आपत्काली राबविण्यात येते.

 

सूचना मिळाल्यावर भोंगे (सायरन) वाजविले जातात. त्यानंतर सर्व दिवे बंद केले जातात. सर्व लोक लपून बसतात किंवा एखाद्या सुरक्षित छत्राखाली दडतात. पूर्वी फक्त विमानांतून बाँबहल्ले केले जात असत सांप्रत ते क्षेपणास्त्रांनी होतात. त्यामुळे वास्तूही ढासळतात पण लपलेल्या लोकांना कमी इजा होते. पहिल्या महायुद्धापासून अशी यंत्रणा सर्वत्र कार्यरत आहे.

 

जोशी, श्रीकांत (इं.) जोशी, मु. ना. (म.)


 भारत : स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे हवाई संरक्षणाकडे फार उशिरा लक्ष गेले. पाकिस्तानबरोबरच्या १९६५ च्या युद्धानंतर हवाई संरक्षणाला चालना मिळाली आणि इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अणु-स्फोटाचा प्रयोग करून भारताने अण्वस्त्रधारी राष्ट्राकडे वाटचाल केली. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात भारतास शेजारील पाकिस्तान व चीन या राष्ट्रांच्या युद्धपिपासू वृत्तीला पायबंद घालण्यासाठी हवाई संरक्षणाची निकड भासली कारण पाकिस्तानने एम्-११ क्षेपणास्त्रे चीनकडून खरेदी केली. भारताच्या सीमावर्ती प्रदेशांतील या शेजारच्या देशांची आक्रमक वृत्ती आणि घुसखोरी याला प्रतिबंध करण्यासाठी भारताने १९९५ मध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी एस्-३०० ही क्षेपणास्त्रे रशिया-कडून मिळविली. पुढे मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अण्वस्त्राचा यशस्वी स्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला आणि क्षेपणास्त्राची निष्कास योजनाही कार्यवाहीत आणली. त्यानंतर अल्पावधीतच पाकिस्ताननेही अणुस्फोट करून अण्वस्त्रधारी राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला. १९९९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये कारगील युद्ध होऊन त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या युद्धात भारतीय हवाई दलाने स्पृहणीय कामगिरी केली. तत्पूर्वी पाकिस्तानातील लोकांनी अण्वस्त्रांचा वापर करावा म्हणून त्या देशावर दडपण आणले होते पण पाकिस्तानने हवाई संरक्षणावर भर देऊन अमेरिकेकडून लष्करी मदत घेतली. त्या वेळी भारताने क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्र यंत्रणेच्या कार्यक्रमास प्राधान्य दिले आणि सु. ४० खासगी व सार्वजनिक कंपन्यांना या उपक्रमाधिकारात सामील करून घेतले. त्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., भारत डायनॅमिक्स लि., ॲस्ट्रॉ मायक्रोवेव्ह, ए. एस्. एल्. लार्सन अँड टुब्रो, व्हेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लि., केल्टेक इ. कंपन्यांचा अंतर्भाव होता. या वेळी भारतानेमल्टी फंक्शन फायर कंट्रोल रडार (एम्. एफ्. सी. आर्.) विकसित केले. तसेच डिफेन्स रिसर्च अँड डिव्हेलप्मेन्ट लॅबरेटरी (डी. आर्. डी. एल्.) या संस्थेने मिशन कंट्रोल सॉफ्टवेअर हे ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स (ए.ए. डी.) क्षेपणास्त्रांना शह देण्यासाठी बनविले. यांशिवाय रिसर्च सेंटर इर्मात या संस्थेने इलेक्ट्रोमेकॅनिकल ॲक्चूएशन (कार्यप्रवण) सिस्टिम्स आणि ॲक्टिव्ह रडार सिकरची रचना केली. त्यानंतर त्यांनी प्रक्षेपी क्षेपणास्त्र संरक्षण हा बहुस्तरीय कार्यक्रम योजिला. त्याचा हेतू क्षेपणास्त्राच्या हल्ल्यांपासून भारताचे संरक्षण करणे हा होता. ती द्विस्तरीय योजना असून तीत उंचीवरून आकाशात मारा करणारी व जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणारी तद्वतच शत्रूच्या अंतर्गामी क्षेपणास्त्राशी मुकाबला करणारी अशी क्षेपणास्त्रे बनविण्याची योजना होती. अंतर्गामी ५,००० किमी.वरील क्षेपणास्त्राचा अंतर्च्छेद घेऊ शकेल, अशा क्षेपणास्त्रभेदी पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नोव्हेंबर २००६ मध्ये झाली. त्यानंतर डिसेंबर २००७ मध्ये ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि भारत हा क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात अमेरिका, रशिया व इझ्राएल यांखालोखाल चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला. ६ मार्च २००९ रोजी भारताने आणखी एका परिरक्षक क्षेपणास्त्राची यशस्वीचाचणी करून शत्रूच्या अंतर्गामी क्षेपणास्त्राचा आकाशात धुव्वा उड- विण्यात यश मिळविले. पुढे १० फेब्रुवारी २०१२ रोजी ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्सने भुवनेश्वर (ओडिशा) पासून १७० किमी.वर असलेल्या समुद्रातील व्हीलर बेटावर यशस्वी प्रयोग केला. त्याच वर्षी २३ नोव्हेंबरला भारतात बनविलेले सुपरसॉनिक ॲड्व्हान्स्ड एअर डिफेन्स अंतर्च्छेद क्षेपणास्त्र ओडिशाच्या पूर्व किनाऱ्यावरील संरक्षित तळावरून उडविण्यात आले. या हवाई संरक्षणाच्या कार्यक्रमांना रडार यंत्रणेची नितान्त आवश्यकता असते. यातील स्वोअर्डफिश रडारची क्षमता ६००–८०० किमी. पल्ल्यावरील लक्ष्य टिपण्याची असून क्रिकेट बॉलएवढी लहान वस्तूसुद्धा त्याच्या कक्षेतून सुटत नाही. त्याचा पल्ला १,५०० किमी. पर्यंत वाढविण्याचा डीआर्डीओचा प्रयत्न असून डॉ. व्ही. के. सारस्वत या शास्त्रज्ञांचे प्रयत्न त्याची क्षमता २०१६ पर्यंत ५,००० किमी. पल्ल्यापर्यंत नेण्याचे आहेत. हवाई संरक्षणाचा एक अत्यंत प्रगत भाग म्हणून लेसरच्या अधःस्तरावरील महाप्रकल्प अस्त्र बनविण्याचा भारताचा प्रयत्न असून ते शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा अंतर्च्छेद घेऊन ते नष्टही करेल.

 

पहा : रडार लढाऊ विमाने क्षेपणास्त्रे.

देशपांडे, सु. र.

संदर्भ : 1. Barton, D. K. Radar System Analysis, Englewood Cliffs ( N. J. ), 1976.

            2. Powers, P. W. A Guide to National Defence, London, 1965.

         3. Skolnik, M. I. Introduction to Radar Systems, New York, 1980.