पिऱ्हस :  (इ. स. पू. ३१९–२७२). प्राचीन ग्रीसमधील ईपायरस परगण्याचा सत्ताधीश. वडिलांचे नाव ईसिडेस. अलेक्झांडरच्या मातृकुलाशी त्याचे नाते होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच तो ईपायरसचा राजा झाला परंतु लवकरच त्यास पदच्युत करण्यात आले. मॅसिडोनियाचा राजा डीमीट्रिअस याच्याकडून त्याने युध्दकलेचे शिक्षण घेतले. त्याच्या सैन्यात गजसेना होती व ती हाताळल्यात तो कुशल होता.

डाइडेमीआ या डीमीट्रिअसच्या बहिणीशी पिऱ्हसचा विवाह झाला. फ्रिजीयामधील इप्सस येथे आँटिगोनसबरोबर झालेल्या लढाईत तो पराभूत झाला (इ. स. पू. ३०१) त्यामुळे त्यास अँलेक्झांड्रिया येथे टॉलेमी व डीमीट्रिअस यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे ओलीस ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात टॉलेमीच्या अँटिगनी या सावत्र मुलीशी त्याने दुसरा विवाह केला.

दक्षिण इटलीतील रोमनांचे आक्रमण थांबविण्यासाठी टॅरेन्टमच्या जनतेने पिऱ्हसचे साहाय्य मागितले. त्यानुसार इ. स. पू. २८० ते २७४ या सहा वर्षांच्या काळात हेराक्लीया, अँस्क्यलम (आस्कॉली सात्रीआनॉ), प्रीनेस्ती (पालेस्त्रीना), मॅलव्हेंटम (बेनेव्हेंतो), अन्याग्नीया व फ्रिजेली या ठिकाणी रोमनांशी त्याने युध्द केले. हेराक्लीया व अँस्क्यलम येथील लढायांत त्याची प्रचंड हानी होऊनही पिऱ्हस विजयी झाला. या लढायानंतर ‘आणखी अशा प्रकारचा विजय म्हणजे आपला सर्वनाशच’, असे तो म्हणाला. त्यास युध्दात नेहमी जबरदस्त लष्करी नुकसान सोसून विजय मिळत असे. त्यावरून ‘पिऱ्हस विजय’ (म्हणजे खूप नुकसान होऊन मिळणारे यश) असा वाक्प्रचारच रूढ झाला.

पिऱ्हस हटवादी व चंचल स्वभावाचा होता. परदेशात दीर्घकाल युध्द करण्याची त्याची क्षमता नव्हती. इ. स. पू. २७४ साली त्याने इटलीतून माघार घेतली. सिसिलीवरील कार्थेजची पकड ढिली करण्यात तो अयशस्वी ठरला. पिऱ्हसने वैयक्तिक लढाया जिंकल्या, पण तो युध्दे हरला. पिऱ्हसनंतर रोमानांच्या सत्ताविस्ताराला वेग आला. त्याच्या मेम्वार्स  या व इतर युध्दशास्त्रावरील ग्रंथांची सिसेरोने स्तुती केली आहे. इ. स. पू. २७२ साली ग्रीसमधील आर‌्गॉस शहरात लढत असताना पिऱ्हस मारला गेला.

बोराटे, सुधीर