सेमफॉर : निशाणांचा किंवा प्रकाशाचा उपयोग करून संकेत वा संदेश पोहोचविण्याची एक दृक्‌संकेत पद्धत. तारायंत्र व दूरध्वनीचा शोध लागण्यापूर्वी हा दृक्‌संकेत जलमार्गात, विशेषतः युद्धनौकांच्या बाबतीत, वापरण्यात येत असे. उंच मनोऱ्यावरून हा संदेश देण्यात येई. या शब्दाचा उद्‌भव ग्रीक भाषेतून झाला असून ह्याचा अनुक्रमे शब्दशः अर्थ चिन्ह, निशाणी (सेमा) व ते धारण करणारा (फॉर) असा आहे. द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे : संदेश वा संकेत देण्याचे हे एक उपकरण असून ज्यात स्तंभाप्रमाणे व्यक्ती उभे राहून एक वा दोन्ही हात वर उंचावून निशाण दाखवून जहाज सपाट प्रदेशावरून जात आहे असे समजून त्याचे स्थान निश्चित करते. क्लोड शॅप (१७६३-१८०५) या फ्रेंच अभियंत्याने या पद्धतीचा शोध १७९४ मध्ये लावला. त्यात ८-१६ किमी. अंतरावरील मनोऱ्यात उभारलेल्या स्तंभांवर निशाणे लावून त्यांचा वेध दूरदर्शक यंत्राद्वारे घेण्यात येई. पुढे १८१२ मध्ये ही पद्धत सर्रास वापरात होती. प्राचीन वाङ्‌मयात अशा संकेत खुणांचे काही उल्लेख आढळतात.

जहाजावर आजतागायत सेमफॉरचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध रंगांच्या व आकृतिबंधांच्या निशाणांनी बंदरापासून दूर असलेल्या जहाजास वेगवेगळे संकेत किनाऱ्यावर पोहचविता येतात. आधुनिक सेमफॉरमध्ये हलती निशाणे (हिरव्या-तांबड्या रंगांची) किंवा प्रकाशझोत मनोऱ्यांवरून प्रदर्शित केले जातात. त्यामुळे रेल्वेच्या रूळावरून धावणाऱ्या आगगाड्यांना योग्य ते संदेश पोहोचतात. दोन जहाजांमधील सेमफॉरचा उपयोग आता कालबाह्य झाला असून त्याऐवजी तारायंत्र व दूरध्वनींचा उपयोग केला जातो.

सेमफॉर कोड हे शिकावयास सोपे व सहज समजणारे असे आहे. दोन्ही हातांत झेंडे घेऊन, त्यांच्या बदलत्या स्थानांच्या संयोगावर इंग्रजी वर्णमाला उभारली आहे. ही स्थाने, खांद्याशी पंचेचाळीस अंशाचा कोन, खांद्याशी समांतर व डोक्यावर अशी आहेत. रंगीबेरंगी निशाणांचा उत्साहवर्धी खेळ म्हणून बालवीरांना (स्काउट) ही पद्धत फार आवडते. सेमफॉर इतकीच उपयुक्त व त्याच धर्तीची अन्य पद्धत म्हणजे मार्स कोड (Marse Code). तारायंत्राचे साहाय्याने सूचकचिन्हांचा (Key) वापर करून, आरशावर सूर्यकिरणांचे परावर्तन करून, तसेच रात्रीच्या वेळी संकेत दिव्याची उघडझाप करून संकेत देण्याची पद्धत म्हणजे मार्स कोड होय.

टिपणीस, य. रा.