नागानो, ओसामी : (? १८८०— ५ जानेवारी१९४७). जपानी ॲड्‌मिरल. कोची येथे जन्म. नाविक अकादमी, स्टाफ कॉलेज व अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात उच्च नाविक शिक्षण (१९१३). अमेरिकेत नाविक सहचारी म्हणून काम (१९२०—२३). त्या सुमारास वॉशिंग्टन येथे भरलेल्या नाविक परिषदेस (१९२१—२२) आणि१९३० व१९३५—३६ मध्ये लंडन येथे भरलेल्या नाविक परिषदांस तो आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून हजर होता.१९३६—३७ मध्ये तो नौदल खात्याचा मंत्री होता. ॲड्‌मिरल यामामोटोच्या सल्ल्याप्रमाणे अमेरिकेचे संरक्षणबल निर्बल करण्यासाठी पश्चिम पॅसिफिक महासागरावर जपानी वर्चस्व स्थापणे आवश्यक होते. म्हणून त्याने ७डिसेंबर१९४१रोजी पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या पर्ल हार्बर या प्रमुख नाविक तळावर हल्ला करण्याचा आदेश दिला. या यशस्वी हल्ल्यामुळे अर्थातच युद्धाअगोदर जपानी आरमाराचे पॅसिफिक महासागरावर वर्चस्व निर्माण झाले. त्यामुळे देशात नागानोची कीर्ती व प्रतिष्ठा वाढली परंतु लवकरच स्थिती पालटली. फेब्रुवारी १९४४मध्ये त्यास बडतर्फ करण्यात आले. युद्ध संपल्यानंतर त्याच्या युद्धगुन्ह्यांविषयी चौकशी होऊन त्याच्यावर आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायाधिकरणात खटलाही भरण्यात आला परंतु खटला सुरू होण्यापूर्वीच टोकिओ येथे त्याचे निधन झाले.

बोरोटे, सुधीर