सागरी नाकेबंदी : (ब्लॉकेड). युध्यमान राष्ट्राने शत्रूला आर्थिक वा सैनिकी कैचीत पकडण्यासाठी त्याच्या बंदरकिनाऱ्याच्या सागरी वाटा रोखून त्याला पोहोचणारी लष्करी मदत आणि बंदरातून होणारी इतर आयात-निर्यात बंद पाडणे म्हणजे सागरी नाकेबंदी होय. आंतरराष्ट्रीय प्रघातविषयक कायद्यानुसार तसेच आंतरराष्ट्रीय तहांतील अटींनुसार युध्यमान राष्ट्राचा हा नाकेबंदीचा हक्क काही मर्यादेपर्यंत मान्य करण्यात आला होता.

लंडनच्या जाहीरनाम्यात (डेक्लरेशन ऑफ लंडन–१९०९) विशद केलेल्या सागरी युद्घ नियमांमध्ये नाकेबंदीसाठी आवश्यक नाविक कारवाई शत्रूने व्यापलेला किनारा अगर बंदरापुरतीच मर्यादित राखणे आणि शत्रुनियंत्रित बंदरातून ये-जा करणाऱ्या जहाजांपुरतीच ती लागू करणे, तसेच नाकेबंदीची जाहीर सूचना सर्व तटस्थ राष्ट्रांना व स्थानिक अधिकाऱ्यांना देणे, नाकेबंदीचा काल व जागेची भौगोलिक माहिती देणे आणि संकटात सापडलेल्या जहाजांना बंदरात मालाची चढ-उतार न करण्याच्या अटीवर आसरा घेण्यास परवानगी देणे, शिवाय सर्व राष्ट्रांच्या जहाजांना हे नियम एकसारखे लागू करणे, अशी कलमे अंतर्भूत करण्यात आली होती.

व्यापक अर्थाने सामान्यतः नाकेबंदीत शत्रूच्या राज्यात प्रत्यक्षाप्रत्यक्ष रसदपुरवठा होऊ नये ह्यासाठी योजलेले उपाय, सागरी व्यापार बंद पाडण्यासाठी शांतता काळातसुद्घा केलेल्या नाविक कारवाया, शत्रू राष्ट्रांच्या मालावर घातलेला बहिष्कार व स्थानिक बंधने आणि आक्र मकाला बदनाम करण्यासाठी केलेल्या सांघिक आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रतिबंधी योजना वगैरे बाबींचा समावेश होतो. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत, सागरी नाकेबंदीचे बरेच प्रयोग प्रशांत महासागरात करण्यात आले होते. त्याला आंतरराष्ट्रीय प्रघात विधी (इंटरनॅशनल कस्टमरी लॉ) आणि आंतरराष्ट्रीय तहविषयक विधी (इंटरनॅशनल ट्रीटी लॉ) या दोन कायद्यांनी नाकेबंदीच्या मर्यादा अधोरेखित केल्या होत्या. आक्रमकाविरुद्घ करावयाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक कारवायांची खुलासेवार व्याख्या जरी त्यांत होऊ शकली नाही, तरी पुढे पहिल्या महायुद्घानंतर (१९१९) राष्ट्रसंघाच्या बैठकीत असे सुचविण्यात आले की, अशा तऱ्हेच्या सार्वत्रिक नाकेबंदी बहिष्कार योजना, काही राष्ट्रे सहकार्य करावयास तयार नसतील, तर अपुऱ्याच पडतील.

दोन्ही जागतिक महायुद्घांतील अनुभवावरून दिसून येते की, नाकेबंदीचा परंपरागत आंतरराष्ट्रीय कायदा मागे पडून जवळजवळ लुप्त झाला आहे. याला प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधन आणि कायद्यातील मर्यादा कारणीभूत असून क्षेपणास्त्रे, पाणबुड्या , विमाने व पाणसुरुंग यांच्या प्रभावी वापरामुळे बंदरे सागरी नाकेबंदीच्या दृष्टिकोनातून असुरक्षित झाली आहेत जलवाहतूक, खुष्कीची वाहतूक व हवाई वाहतूक यांतील विलक्षण वैकासिक प्रगतीमुळे शत्रूला त्याच्या सभोवतालच्या राष्ट्रांकडून सहजगत्या रसद पुरवठा होणे साध्य होत असल्याने केवळ सागरी नाकेबंदी निष्फळच ठरली आहे. दळणवळण, संदेशवहन व वाहतुकीच्या ह्या सोयींमुळे दोन्ही महायुद्घांत सागरी तटबंद्या अयशस्वी झाल्या. तथापि १९४९ मध्ये झालेली शांघाय बंदराची तटबंदी आणि १९७१ मध्ये झालेली कराची बंदराची तटबंदी यांना मर्यादित यश मिळाले. या दोन्ही उदाहरणांत नाकेबंदी फोडण्याची क्षमता प्रतिस्पर्ध्यांजवळ नसल्यामुळे ती यशस्वी होऊ शकली.

पहा : आंतरराष्ट्रीय कायदा नौसेना युद्घनिषिद्घ व्यूहतंत्र, सैनिकी.

संदर्भ : 1. Akehurst, Michael A. Modern Introduction to International Law, London, 1984.

2. Taylor, Richard K. Blockade : A Guide to Non-violent Intervantion, London, 1983.

इनामदार, य. न.