ग्राइझेन : मुख्यत्वेकरून क्वॉर्ट्झ व शुभ्र अभ्रक यांनी बनलेल्या खडकास ग्राइझेन म्हणतात. ग्राइझेनामध्ये पुष्कराज (टोपॅझ) थोड्या फार प्रमाणात नेहमीच असतो. शिवाय तोरमल्ली (टुर्मलीन), कॅसिटेराइट, वुल्फ्रॅमाइट, रूटाइल आणि प्ल्युओराइट ही गौण खनिजे त्यात असतात. त्याचे वयन (सूक्ष्म संरचना, पोत) ग्रॅनाइटासारखे असते [→ ग्रॅनाइट]. ग्राइझेन तीन प्रकारे आढळतो. (१) सामान्यतः जेथे क्वॉर्ट्झ व खनिजांच्या शिरा ग्रॅनाइटाला छेदतात त्यांच्या आसपास उष्णवायवीय क्रियेने (शेवटी राहणाऱ्या शिलारासातील बाष्पनशील म्हणजे उडून जाणाऱ्या द्रव्याच्या क्रियेने) ग्रॅनाइटामध्ये कायांतरण (बाहेरील द्रव्ये मूळ द्रव्यांच्या जागी येऊन म्हणजे येथे ग्राइझेनीभवन) होऊन तो तयार झालेला आढळतो. संस्पर्शांच्या पृष्ठांपासून काही सेंमी. जाडीपर्यंतच कायांतरण झालेले आढळते व त्यापुढे ते कमी कमी होत जाऊन बदल न झालेला मूळचा ग्रॅनाइट असतो. अशा प्रकारे प्रतिष्ठापना झाल्याचा दुसराही पुरावा मिळतो. ग्रॅनाइटातील फेल्स्पाराच्या जागी शुभ्र अभ्रकाचे पुंजके झालेले असतात. प्रतिष्ठापना मुख्यत्वेकरून फ्ल्यूओरिनामुळे झाल्याचे त्यातील झिन्वाल्डाइट, फ्ल्युओराइट व पुष्कराज या फ्ल्युओरीनयुक्त खनिजांमुळे कळून येते. शिलारासातील उष्ण वायूंमध्ये लिथियम व कथिल यांची बाष्पनशील संयुगे असल्यास ग्राइझेनात कॅसिटेराइट, लेपिडोलाइट यांसारखी खनिजे आढळतात. असे ग्राइझेनीभवन काही थोड्या भागांतच आढळते. उदा., कथिलाच्या खाणींच्या भागात – सॅक्सीनीतील एर्झगेबिर्ग, कॉर्नवॉल आणि उत्तर नाजेरिया. (२) दुसऱ्या प्रकारात ग्रॅनाइटातील भेगांमध्ये शिलारसातील अवशिष्ट भागद्रव्यांपासून ॲप्लाइट, पेग्मटाइट यांच्याप्रमाणे ग्राइझेनाच्या शिरा व भित्ती तयार होतात. हे ग्राइझेन आद्य प्रकारचे ठरतात (म्हणजे अशा ठिकाणी ग्रॅनाइटाचे कायांतरण झाल्याचे आढळत नाही). (३) कधीकधी ग्राइझेनाचे पट्टे ग्रॅनाइटाच्या सभोवतालच्या खडकांत घुसलेले आढळतात. भिन्नीभवनाने (एकाच एकजिनसी शिलारसापासून वेगवेगळ्या संघटनांचे खडक तयार होण्याच्या क्रियेने) मूळच्या शिलारसापासून विशेष प्रकारचा शिलारस तयार होऊन त्याचे भोवतालच्या खडकांत अंतर्वेशन झाल्यामुळे (घुसल्यामुळे) ते तयार होतात असे समजतात. असे ग्राइझेन कंबर्लंडमध्ये आहेत.
ठाकूर, अ. ना.