एरिट्रीया : आफ्रिका खंडातील इथिओपिया देशाचा ईशान्येकडील, तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रांत. इथिओपियाच्या इतिहासात ह्या भागास महत्त्वाचे स्थान आहे. सु. सोळाव्या शतकापर्यंत एरिट्रीयावर इथिओपियाचे साम्राज्य होते. परंतु त्या सुमारास तुर्क लोकांनी हा प्रदेश काबीज केला. पुढे एकोणिसाव्या शतकामध्ये ईजिप्त व इटली या दोन राष्ट्रांचा एरिट्रीयात शिरकाव होऊ नये म्हणून इथिओपियाने फार प्रयत्‍न केले. तरी पण शेवटी आसाब व मसावा बंदरांच्या परिसरात इटालियन लोकांनी आपला पाय रोवला व १८९० मध्ये एरिट्रीयात इटालियन वसाहत स्थापन केली. १९३५­­­–३६ मध्ये इटलीने इथिओपियावर स्वारी करून तो देश पादाक्रांत केला व राष्ट्रसंघास न जुमानता इटलीचे आफ्रिकन साम्राज्य निर्माण केले त्यासाठी एरिट्रीयाचा लष्करी तळ म्हणून उपयोग झाला. दुसऱ्या महायुद्धात एरिट्रीयाचा प्रदेश १९४१ मध्ये ब्रिटिश फौजेने जिंकला व तेव्हापासून १९५० पर्यंत तेथे ब्रिटिश लष्करी सत्ता होती. १९५१ मध्ये हा प्रदेश संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील विश्वस्त प्रदेश ठरविण्यात आला. परंतु त्याच वेळी ह्या प्रदेशावर इथिओपियाने आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली. १९५० मध्येच एरिट्रीया व इथिओपिया ह्यांचे संघराज्य बनवून त्यात एरिट्रीया स्वायत्त असावा अशी योजना संयुक्त राष्ट्रांनी संमत केली व सप्टेंबर १९५२ मध्ये ती अमलातही आली. पुढे नोव्हेंबर १९६१ मध्ये एरिट्रीयाच्या विधिमंडळाने संघराज्य मोडून एरिट्रीया हा इथिओपियाचा अविभाज्य भाग करावा असे ठरविले व तेव्हापासून राजकीय दृष्ट्या एरिट्रीयाचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले. १९७४ साली सम्राट हेले सेलासी यांच्या पदच्युतीनंतर एरिट्रीयाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाच्या मागणीस जोर चढला आहे.

नरवणे, द. ना.