तूलाँ : आग्नेय फ्रान्समधील व्हार प्रांतातील शहर व सुरक्षित बंदर. लोकसंख्या १,८१,६०० (१९७१ अंदाज). व्होबान् या ख्यातनाम लष्करी स्थापत्य विशारदाने उभारलेल्या तटबंदीने सुरक्षित झालेले हे बंदर भूमध्य समुद्रावर मार्सेच्या आग्नेयीस ४८ किमी. आहे. तूलाँ फ्रान्सचे पहिले आरमारी ठाणे व शस्त्रागार म्हणून प्रसिद्ध असून आरमाराशी निगडित विविध व्यवसाय येथे चालतात. मद्ये, तेल, फळे यांची बाजारपेठ तसेच लोखंडी व कातडी सामान, पादत्राणे, यंत्रे आदींचे कारखाने येथे आहेत.

या रोमन पूर्वकालीन शहराने फ्रान्सच्या इतिहासातील अनेक रोमहर्षक प्रसंग पाहिले आहेत. १७९३ मध्ये येथेच इंग्लिश आरमाराचा पराभव करून नेपोलियन महत्पदास चढला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांच्या ताब्यात सापडू नये म्हणून अनेक फ्रेंच जहाजे येथे बुडविण्यात आली.

ओक, द. ह.