क्लेलंड, राल्फ आर्स्किन : (२० ऑक्टोबर १८९२– ). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ.  ⇨ आनुवंशिकतेच्या संदर्भात रंगसूत्रांसंबंधीच्या (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे दुसऱ्या पिढीत वाहून नेणाऱ्या सुतांसारख्या सूक्ष्म घटकांसंबंधीच्या, गुणसूत्रांसंबंधीच्या) संशोधनाबद्दल त्यांची ख्याती आहे. ल क्लेर, आयोवा येथे त्यांचा जन्म झाला आणि पूर्वशिक्षण फिलाडेल्फिया येथे झाले. प्राचीन वाङ्‍मय व इतिहास हे विषय घेऊन पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाची ए. बी. पदवी त्यांनी १९१५ मध्ये मिळविली व १९१९ मध्ये वनस्पतिविज्ञानांतर्गत पीएच्. डी. पदवी मिळविली. पहिल्या महायुद्धात सैन्यातील एक वर्षाच्या नोकरीनंतर १९१९–३८ या काळात गौचर महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर ते इंडियाना विद्यापीठात प्रथम वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुख आणि पुढे ग्रॅज्युएट स्कूलचे डीन झाले. १९४२ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून ते निवडून आले. १९६३ पासून वनस्पतिविज्ञानचे सन्मान्य सेवानिवृत्त (एमरिटस) प्राध्यापक झाले.

त्यांचे बहुतेक सर्व संशोधन ⇨इनोथेरा रोजिया (ईव्हनिंग प्रिमरोझ) ह्या ⇨ ओषधीच्या आनुवंशिकतेच्या वैशिष्ट्याचे विश्लेषण व त्यापासून काढलेल्या निष्कर्षांचा साधनासारखा उपयोग करून त्या ओषधीच्या वंशाची उत्क्रांती समजून घेण्याकरिता होते. ह्यूगो द व्हरीस ह्यांनी या वनस्पतीवरील उत्परिवर्तनांचा (आनुवंशिक लक्षणांत होणाऱ्या एकाएकी बदलांचा) अभ्यास करून आपला उत्क्रांतीबद्दलचा [→ क्रमविकास] सिद्धांत प्रस्थापित केला होता. परंतु, त्या लक्षणांच्या अनुहरणामध्ये (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत जाण्याच्या क्रियेमध्ये) आढळलेल्या काही असंगतींसंबंधीचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. क्लेलंड यांनी असे दाखविले की, त्या वंशातील वनस्पतींत चौदा रंगसूत्रे असली, तरी अंतः प्रजननात (नातेसंबंध असलेल्या वनस्पतींपासून होणाऱ्या प्रजननात) सर्व जनुके (आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणारी रंगसूत्रावरील एकके, जीन) जणू रंगसूत्रांच्या एकाच जोडीत असतात बहि:प्रजननात मात्र अनेक संकरजांमध्ये (भिन्न वंश, जाती वा प्रकार यांच्या संकराने निर्माण झालेल्या संततीमध्ये) जनुकांचे वर्तन ती भिन्न रंगसूत्रांत असल्यासारखे दिसते.

पहा : आनुवंशिकी.

परांडेकर, शं. आ.