कृशनगर : कृष्णनगर. पश्चिम बंगालमधील नडिया जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ८५,९२३ (१९७१). जलांगी नदीच्या डाव्या तीरावरील व कलकत्त्याच्या उत्तरेस ९६ किमी.वरील ही नगरी पूर्वी नडिया संस्थानची राजधानी होती. येथील हवापाणी चांगले नाही. गावात जिल्हा कचेऱ्या व साखर कारखाना असून भात, ताग, गहू, अळशी व ऊस यांचा व्यापार आहे. पश्चिम बंगालचे फलसंशोधन केंद्र येथे असून तागजोपासना केंद्र, शेतीशिक्षण केंद्र व दोन महाविद्यालये येथे आहेत. मातीच्या रंगीत चित्रांसाठी कृशनगर प्रसिद्ध आहे.

ओक, शा. नि.