हंट्स व्हिल : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ॲलाबॅमा राज्या-तील मॅडिसन परगण्याचे मुख्यालय, अमेरिकेचे प्रमुख रॉकेट संशोधनकेंद्र व अमेरिकन लष्कराचे ‘रेडस्टोन आर्सेनल ‘चे ठिकाण. लोकसंख्या १,८६,२५४ (२०१३). हे बर्मिंगहॅमच्या उत्तरेस १३६ किमी.वर टेनेसी नदीकाठी वसलेले आहे. राज्यातील प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे.

जॉन हंट याने १८०५ मध्ये हे वसविले. प्रारंभी हे ट्विकनहॅम म्हणून ओळखले जात होते. यास १८११ मध्ये शहराचा दर्जा मिळालाव जॉन हंट याच्या सन्मानार्थ याचे हंट्सव्हिल असे नामकरण करण्यात आले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत राज्य म्हणून ॲलाबॅमा १८१९ मध्ये समाविष्ट झाले, त्यावेळी हंट्सव्हिल ही या राज्याची राजधानी होती.तिला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ‘रॉकेट सिटी’ असे संबोधण्यातयेते. अमेरिकन लष्कराचे रेडस्टोन आर्सेनल कॉम्प्लेक्स (१९४१), नासाचे जॉर्ज मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर (१९६०) यांच्या स्थापनेमुळे तसेच तदानुषंगिक उद्योगधंदे व संशोधन संस्था यांमुळे शहराची भरभराट झाली. जर्मन अभियंता व्हेर्नर फोन ब्राउन व इतर तज्ज्ञगटांनी १९५० मध्ये येथेसु. ३२० किमी. पल्ल्याचे लष्करी क्षेपणास्त्र विकसित केले होते. तसेच ब्राउन व त्याच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेच्या चांद्रमोहिमेच्या कार्यक्रमासाठी १९६० मध्ये रॉकेटचा आराखडा येथे तयार केला होता.

हंट्सव्हिल हे आसमंतात उत्पादित होणाऱ्या कापूस, सोयाबीन, धान्य, तंबाखू इ. कृषिमालांचे व्यापारी केंद्र आहे. येथे कापड, दूरध्वनी संच,वाहनांचे टायर, विमानांच्या काचा, विद्युत्साहित्य, कृषिअवजारे इ. निर्मितिउद्योग चालतात.

येथील ॲलाबॅमा ॲग्रिकल्चर अँड मेकॅनिकल युनिव्हर्सिटी (१८७५), ओकवुड कॉलेज (१८९६), ॲलाबॅमा युनिव्हर्सिटी (१९५१) इ. याउच्च शिक्षणसंस्था प्रसिद्ध आहेत. येथे सिंफनी ऑर्केस्ट्रा व अनेक नाट्यसंस्था तसेच सार्वजनिक ग्रंथालये आहेत. येथील नजीकचे माँटे सॅनोस्टेट पार्क, गंटर्झव्हिल सरोवर, स्पेस ओरिएन्टेशन सेंटर ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.