ड्राखमान, हॉल्गर : (९ ऑक्टोबर १८४६–१४ जानेवारी १९०८). डॅनिश भावकवी, कादंबरीकार व नाटककार. जन्म कोपनहेगन येथे. त्यांचे वडील नौदलात डॉक्टर होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने चित्रकलेचा अभ्यास केला. १८७१ मध्ये त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये असताना तो तेथील व फ्रान्समधील सामाजिक चळवळींकडे आकृष्ट झाला. सामाजिक समस्यांवर त्याने काही कविताही लिहिल्या. स्वदेशी परतल्यावर तो डॅनिश साहित्यातील नव्या वास्तववादी चळवळीत सामील होऊन तिचा एक अध्वर्यू बनला. ह्या चळवळीचे नेतृत्व ⇨गिऑर ब्रांडेस (१८४२–१९२७) याच्याकडे होते. १८७२ मध्ये ड्राखमानचा Digte हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात त्याच्या सुरुवातीच्या भावकविता व सामाजिक कविता आहेत.
सुरुवातीची त्याची कविता ब्रांडेसप्रणीत वास्तववादी परंपरेतील असली, तरी नंतर मात्र स्वच्छंदतावादी व देशभक्तिपर लेखन तो करू लागला. शेवटी तर सामाजिक–नैतिक दृष्टीने असांकेतिक अशा बोहीमियन व्यक्तिवादी वादातून तो लेखन करू लागला.
डॅनिश साहित्यात ड्राखमान हा एक श्रेष्ठ भावकवी मानला जातो. तो अत्यंत भावनाशील व लहरी स्वभावाचा कवी होता. त्याची भाववृत्ती अत्यंत तरल व गीतानुकूल होती. लहानपणापासूनच त्याला समुद्राचे आकर्षण होते. समुद्राच्या सतत बदलत्या रूपांत त्याला स्वतःच्याच स्वभावाचे प्रतिबिंब पडलेले दिसे. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचाही त्याच्या साहित्यावर खोल ठसा उमटलेला आहे.
ड्राखमानची वास्तववादी परंपरेतील भावकविता त्याच्या Daempede Melodier (१८७५, इं. शी. म्यूटेड मेलडीज), Sange ved Havet (१८७७, इं.शी. साँग्ज बाय द सी), Venezia (१८७७) आणि Ranker og Roser (१८७९, इं. शी. वीड्स अँड रोझेस) ह्या संग्रहांत आलेली आहे. Gamle Guder og Nye (१८८१, इं.शी. ओल्ड अँड न्यू गॉड्स), Sangenes Bog (१८८९, इं.शी. द बुक ऑफ साँग्ज) आणि Den hellige Ild (१८९९, इं. शी. द होली फ्लेम) हे त्याच्या नंतरच्या कवितांचे विशेष उल्लेखनीय संग्रह होत. अभिजात छंदोरचनेची बंधने झुगारून त्याने जिवंत अनुभवांच्या लयीच्या अंगाने आपली भावकविता लिहिली आणि भाषेची स्वाभाविक लय संपन्न केली. स्वप्नसदृश व कल्पनाजालयुक्त प्रतिमासृष्टी हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रेम विषयाप्रमाणेच समुद्राचाही त्याच्या रचनेशी अतूट संबंध आहे. त्याच्या अनेक कथांतूनही कोळी व खलाशांचे जीवनचित्रण आढळते.
त्याच्या कादंबऱ्या काही अंशी आत्मचरित्रात्मक आहेत. Forskrevt (१८९०, इं. शीं प्लेज्ड) ही त्याची विशेष उल्लेखनीय कादंबरी असून Der var engang (१८८५, इं. शी. वन्स अपॉन अ टाइम), Volund Smed (१८९४, इं. शी. व्हाल्यूंड द स्मिथ) आणि Renaessance (१८९४) ही त्याची लोकप्रिय नाटके होत पण ड्राखमानचा खरा पिंड भावकवीचाच होता.
ड्राखमानच्या लेखनातील शब्दबंबाळपणा, अहंता आणि अस्थिर दृष्टिकोण हे दोष उघड असले, तरी त्याच्या उत्कृष्ट भावकवितेत आढळून येणरी व्यक्तिनिष्ठा, भावनेची खोली, रचनाकौशल्य संगीतानुकूल लय व भाषाप्रभुत्व या गुणांमुळे तो श्रेष्ठ कवी मानला जातो. डेन्मार्कमधील हॉर्नबेक येथे तो निधन पावला.
यानसेन, बिलेस्कॉव्ह एफ्. जे. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“