जयदेव: (बारावेशतक). संस्कृतातील ⇨गीतगेविंद  ह्या विख्यात काव्याचा कर्ता. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. तथापि गीतगेविंदातील काही उल्लेखांवरून जे थोडे चरित्रात्मक तपशील मिळतात, ते असे : त्याचा जन्म केंदुबिल्व–पश्चिम बंगाल राज्यातील बीरभूम जिल्ह्यामधील केंदुली–ह्या गावी झाला. त्याच्या पित्याचे नाव भोजदेव असून आईचे रामादेवी असे होते. गीतगेविंदात काही ठिकाणी  ‘पद्मावती’ ह्या नावाचा उल्लेख येतो. हे त्याच्या पत्नीचे नाव असण्याची शक्यता आहे. गीतगेविंदा तील प्रत्येक गीत कोणत्या रागात आणि तालात गायिले जावे, हे जयदेवाने स्पष्टपणे सुचविले आहे. त्यावरून त्याचे संगीताचे ज्ञानही चांगले असावे, असे दिसते. बंगालचा राजा लक्ष्मणसेन (कार. ११७८–सु. १२०५) ह्याच्या दरबारी जयदेव होता. श्रीधरदासाच्या सदुक्तिकर्णामृतात (१२०६) गीतगेविंदातील काही श्लोक घेतलेले आहेत.

कुलकर्णी, अ. र.