भट्टनारायण : (इसवी सनाच्या सातव्या शतकात उत्तरार्ध किंवा आठव्याचा पूर्वार्ध). संस्कृत नाटककार. वेणीसंहार ह्या विख्यात नाटकाचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी निश्चित अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. वामनाने त्यांच्या काव्यालंकासूत्रात आणि आनंदवर्धनाने ध्वन्यालोक ह्या त्यांच्या ग्रंथात वेणीसंहारातील उद्धृते दिलेली असल्यामुळे तो बाणानंतर आणि वामनापूर्वा म्हणजे इ.स.च्या आठव्या शतकात किंवा सातव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला असावा, एवढे म्हणता येते.

बंगालच्या आदिसूर राजाने कान्यकुब्ज (विद्यमान कनोज) येथील पाच ब्राह्यणांना आमंत्रून आपल्या राज्यात वसविले होते. आणि भट्टनारायण हा त्यांच्यापैकी एक होता, अशी आख्यायिका आहे. तथापि तिला ऐतिहासिक आधार नाही. सुप्रसिद्ध टागोर घराणे भट्टनारायणाच्या वंशातले आहे, असे म्हणतात. भट्टनारायणाची ‘भट्ट’ ही उपाधी आणि वेणीसंहारातील अनेक उल्लेख तो ब्राह्यण असल्याचे व वैष्णव धर्माकडे त्याचा कल असल्याचे दर्शवितात. वेणीसंहार नाटकातील विविध उल्लेखांवरून काव्य नाट्यांचा त्याचा व्यासंगही प्रत्ययास येतो. भट्टनारायणाचे वेणीसंहार हे एकच नाटक आज उपलब्ध आहे पण त्याची नियमानुसार रचना, रसदर्शी माडंणी काव्य आणि नाट्य यांचा समन्वय यामुंळे ते साहित्यशास्त्रज्ञ आणि संस्कृत नाटकांचे प्रेक्षक यांत फार लोकप्रिय असल्याचे दिसते.

भट, गो. के.