तिमिरियाझ्येफ, क्ल्यिम्येंट अर्काद्यियेव्ह्यिच : (३ जून १८४३–२८ एप्रिल १९२०). रशियन वनस्पति–वैज्ञानिक. वनस्पतीतील ⇨ प्रकाशसंश्लेषणासंबंधींच्या महत्त्वाच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. जन्म सेंट पीटर्झबर्ग येथे व शिक्षण सेंट पिटर्झबर्ग विद्यापीठात झाले. १८६४ साली त्यांनी चार्ल्स डार्विन यांच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज या ग्रंथांसंबंधी एक लेख लिहिला. यकृतका (लिव्हरवर्ट्स) या वनस्पतीसंबंधी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सुवर्णपदक व पदवी मिळाली (१८६५). त्यानंतर काही काळ मेंडेलेव्ह यांच्याबरोबर त्यांनी काम केले. त्या वेळी त्यांनी शेतीच्या तंत्रातील नवीन पद्धतीचा अभ्यास केला व प्रकाशसंश्लेषणासंबंधी काही प्रयोगही केले. १८६८–७० या काळात त्यांनी जर्मनीत व फ्रांन्समध्ये जी. आर्. किरखोफ, आर्. डब्ल्यू. बन्सन इ. प्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर काम केले. रशियाला परतल्यावर पेत्रोव्ह एग्रिकल्चरल अँड फॉरेस्ट्री ॲकॅडेमीमध्ये (सध्याचे नाव के. ए. तिमिरियाझ्येफ मॉस्को ॲकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चर) ते वनस्पतिविज्ञानाचे शिक्षक झाले. १८७१ मध्ये त्यांनी हरितद्रव्याचे वर्णपटीय विश्लेषण व १८७५ मध्ये प्रकाशाचे वनस्पतींत होणारे सात्मीकरण या विषयावर निबंध लिहून स्नातकोत्तर पदवी व डॉक्टरेट पदवी मिळवली व तेथेच प्राध्यापक झाले. त्यानंतर मॉस्को विद्यापीठात १८७७ साली वनस्पतिशारीर व शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सरकारशी मतभेद झाल्यामुळे १८९८ साली त्यांना या पदावरून कमी करण्यात आले. तथापि वनस्पतिविज्ञानाच्या प्रयोगशाळेचे व्यवस्थापन त्यांच्याकडेच राहिले. १९१७ मध्ये त्यांना पुन्हा प्राध्यापकपदावर नेमण्यात आले परंतु आजारपणामुळे त्यांना पुढे काम करणे शक्य झाले नाही.

तिमिरियाझ्येफ यांचे मूलभूत संशोधनकार्य वनस्पती शरीरक्रियाविज्ञानासंबंधी आहे. १८६० नंतर त्यांनी प्रकाशसंश्लेषणासंबंधी महत्त्वाचे सैद्धांतिक व प्रायोगिक कार्य केले. त्यांनी वर्णपटीय विश्लेषणाचा उपयोग करून हरितद्रव्याचे प्रकाशकीय गुणधर्म आणि या गुणधर्मीवर व सौर वर्णपटातील निरनिराळ्या किरणांवर प्रकाशसंश्लेषण कसे अवलंबून आहे, यांचा सखोल अभ्यास केला. पिवळ्या, हिरव्या  किरणांत महत्तम प्रकाशसंश्लेषण होते या कल्पनेचे त्यांनी खंडन केले व ही क्रिया वर्णपटाच्या तांबड्या भागात अधिक तीव्रतेने होते, असे दाखवून दिले. ⇨ प्रकाशरसायनशास्त्राचा पहिला नियम व ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम यांचा प्रकाशसंश्लेषण क्रियेच्या बाबतीत उपयोग करण्यासंबंधी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

हरितद्रव्याच्या भौतिक संकल्पनेबरोबरच त्यांनी ते प्रकाशसंश्लेषणात ऑक्सिडीभवनक्षपण [→ ऑक्सिडीभवन क्षपण] रूपांतरणाचा त्वरेने  परिणाम होणारे एक संवेदनशील रासायनिक द्रव्य आहे, हाही दृष्टिकोन मांडला. १८९० मध्ये त्यांनी हरितद्रव्याला दुसरा शोषण पट्ट [→ वर्णपटविज्ञान] असल्याचे प्रतिपादन केले. प्रकाशसंश्लेषण आणि प्रकाशनाची तीव्रता यांच्यातील संबंधाचा अभ्यास करून आता माहीत झालेले प्रकाशसंश्लेषणातील प्रकाशाच्या संपृत्तीकरणासंबंधीचे (जास्तीत जास्त प्रकाशसंश्लेषणासंबंधीचे) आलेखीय स्वरूप मांडले (हे संपृक्तीकरण पूर्ण सौरतापमानाच्या जवळजवळ निम्म्या तापमानाला होते). त्यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रकाशसंश्लेषणासंबंधीच्या संशोधनाचे निष्कर्ष १९०३ साली लंडनच्या रॉयल सोसायटीपुढे दिलेल्या ‘द कॉस्मीकल फंक्शन ऑफ द ग्रीन प्लँट’ या व्याख्यानात मांडले. १८७४–१९०३ या काळात त्यांनी तयार केलेल्या अनेक संशोधनपर निबंधांचा सन, लाइफ अँड क्लोरोफिल या १९२३ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात समावेश करण्यात आलेला आहे. प्रकाशाच्या तरंगसिद्धांताची जागा आता पुंजसिद्धांताने [→ प्रकाश] घेतलेली असली, तरी प्रकाशसंश्लेषणातील ऊर्जेसंबंधी त्यांनी मांडलेला मूलभूत सिद्धांत अद्यापही ग्राह्य आहे.

तिमिरियाझ्येफ यांनी वनस्पतींतील शरीरक्रियांचा अभ्यास करण्यासाठी नवीन पद्धती शोधून काढल्या व नवनवीन उपकरणे स्वतः तयार केली. डार्वीन यांच्या सिद्धांताचा रशियात प्रसार व विकास करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. ए शॉर्ट स्केच ऑफ द थिअरी ऑफ डार्विन (१८६५) आणि चार्ल्स डार्विन अँड हिज थिअरी  या त्यांच्या ग्रंथांच्या १८८३ ते १९४१ या काळात १५ आवृत्या निघाल्या. प्रॉब्लेम्स ऑफ सायन्स, एग्रिकल्चरल प्लँट सायन्स, लाइफ ऑफ द प्लँट, हिस्टॉरिकल मेथड इन बायॉलॉजी  इ. त्यांचे इंग्रजीत भाषांतरित झालेले ग्रंथ आहेत. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्य होते. ते मॉस्को येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.